Monday, December 29, 2025

नीरा रेल्वे स्थानकात भीषण अपघात; प्रवाशाचे दोन्ही पाय चुरडले रेल्वे पोलिस व आरपीएफ मदतील आले नसल्याचा गंभीर आरोप

 

नीरा रेल्वे स्थानकात भीषण अपघात; प्रवाशाचे दोन्ही पाय चुरडले 


रेल्वे पोलिस व आरपीएफ मदतील आले नसल्याचा गंभीर आरोप 



नीरा : प्रतिनिधी 


     सोमवारी (दि.२९) सायंकाळी नीरा रेल्वे स्थानकात पुणे–सातारा डेमो रेल्वेमधून उतरत असताना एका तरुणाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तरुणाचे दोन्ही पाय रेल्वेखाली सापडून पूर्णतः चुरडले गेले असून त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे. 


     आदित्य साहेबराव होळकर (वय १८, रा. सोमेश्वरनगर, ता. बारामती) असे जखमी तरुणाचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डेमो रेल्वे नीरा स्थानकात थांबत असताना आदित्य उतरण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी तोल गेल्याने तो थेट रेल्वेखाली गेला आणि भीषण अपघात घडला. 


     अपघातानंतर रेल्वे पोलिस, आर.पी.एफ. तसेच नीरा रेल्वे स्थानकातील कर्मचाऱ्यांनी जखमी प्रवाशाला तत्काळ मदत न केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे नीरा रेल्वे स्थानकातील पोलीस मदत केंद्राला कुलूप लागलेले असून आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्याचे चित्र दिसून आले. ही बाब अत्यंत संतापजनक असून रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 


      दरम्यान, स्थानिक तरुण मदतीला धावून आले. प्रहार संघटनेच्या रुग्णवाहिकेतून जखमी आदित्यला प्रथम लोणंद, त्यानंतर जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील संचेती रुग्णालयात हलवण्यात आले आहे. 


     या घटनेची वरिष्ठ कार्यालयाने तातडीने गंभीर दखल घ्यावी, निष्काळजी कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई करावी तसेच नीरा रेल्वे स्थानकातील सुरक्षा व आपत्कालीन व्यवस्थेचा तात्काळ आढावा घ्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Saturday, December 27, 2025

बाबुर्डी येथे MAHAVISTAR AI अ‍ॅपचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 बाबुर्डी येथे MAHAVISTAR AI अ‍ॅपचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 



बारामती : 

         डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती अधिक शाश्वत व लाभदायक व्हावी, या उद्देशाने कृषी विभागामार्फत बाबुर्डी (ता. बारामती) येथे कृषीदूतांच्या माध्यमातून कृषी खात्याच्या MAHAVISTAR AI अ‍ॅपचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाला शेतकरी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 


        कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाधारित उपक्रमांतर्गत बाबुर्डी गावात कृषीदूतांनी शेतकरी व ग्रामस्थांना कृषी खात्याच्या MAHAVISTAR AI अ‍ॅपचे सखोल मार्गदर्शन केले. बदलत्या हवामान परिस्थितीत आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल साधनांचा वापर करून शेती अधिक सक्षम करण्याचा हा प्रयत्न असल्याचे कृषीदूतांनी सांगितले. 


      या कार्यक्रमात MAHAVISTAR AI अ‍ॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक नियोजन, हवामान अंदाज, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, बाजारभावाची अद्ययावत माहिती तसेच विविध शासकीय कृषी योजनांची माहिती कशी मिळवता येते, याचे प्रात्यक्षिकाद्वारे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले. मोबाईलमध्ये अ‍ॅप कसे डाउनलोड करावे, नोंदणी प्रक्रिया कशी करावी व प्रत्यक्ष शेतीसाठी त्याचा वापर कसा करावा, याबाबतही कृषीदूतांनी मार्गदर्शन केले. 


       यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी अ‍ॅपविषयी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. डिजिटल तंत्रज्ञानामुळे निर्णय घेणे अधिक सोपे होणार असून शेतीत उत्पादनवाढीसोबतच खर्चात बचत होण्यास मदत होईल, अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 


       कृषीदूतांनी शेतकऱ्यांनी MAHAVISTAR AI अ‍ॅपचा नियमित वापर करून आधुनिक शेतीकडे वाटचाल करावी, तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या अ‍ॅपचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन केले. 


    या कार्यक्रमासाठी गावातील शेतकरी, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमात सुरज मुळे, अभय धुमाळ, ताहीर तांबोळी, चैतन्य तुपे, शुभम धुमाळ, विश्वविजय मिसाळ तसेच कृषीसेवक दिलीप यादव यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे बाबुर्डी गावातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख मिळाल्याने समाधान व्यक्त

 करण्यात आले.

युईआय ग्लोबल एज्युकेशनची तिसरी राष्ट्रीय ‘युसीसी’ पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न

 युईआय ग्लोबल एज्युकेशनची तिसरी राष्ट्रीय ‘युसीसी’ पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न

दिल्लीच्या विनोद विश्वकर्मा यांना प्रथम, पुण्याला दुसरा क्रमांक




पुणे | प्रतिनिधी

युईआय ग्लोबल एज्युकेशन संस्थेच्या वतीने आयोजित तिसरी संस्थांतर्गत राष्ट्रीय पाककृती (क्युलिनरी) स्पर्धा अर्थात युसीसी (UCC) पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत देशभरातील युईआय ग्लोबलच्या नऊ अभ्यासकेंद्रांमधील प्रथम वर्षाच्या १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या चुरशीच्या स्पर्धेत दिल्लीच्या विनोद विश्वकर्मा यांनी उत्कृष्ट पाककृती सादर करत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना मानाचा चषक, ‘मास्टर शेफ 2025’ हा किताब, रोख ५१ हजार रुपये, पदक व गोल्डन शेफ कोट देऊन गौरविण्यात आले.

पुण्याच्या ओंकार राजू देशमुख याने दुसरा क्रमांक मिळवला (रोख ३१ हजार रुपये), तर दंडोती मोहम्मद दानिश रियाज (पुणे) याने तिसरा क्रमांक पटकावला (रोख ११ हजार रुपये).

याशिवाय मिस्ट्री बॉक्स चॅलेंजमध्ये महाराष्ट्राच्या शैलेंद्र लक्ष्मण परदेशी यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर ग्लोबल बिर्याणी फेरीत दिल्लीच्या अमिनेश अंबर यांनी बाजी मारली.

ही स्पर्धा हॉटेल मॅनेजमेंट शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी असून, येथे विद्यार्थ्यांनी भारतीय, प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय पदार्थ सादर करत परीक्षकांची दाद मिळवली. ‘मास्टर शेफ’च्या धर्तीवर घेण्यात येणारी ही स्पर्धा विशेषतः प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते.



पारितोषिक वितरण समारंभ आयसीएफ अध्यक्ष शेफ देवींदरकुमार, उपाध्यक्ष शेफ सिरीश सक्सेना, महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अधिकारी डॉ. जयदीप निकम, रेडिसन हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक पंकज सक्सेना, देवव्रत जातेगांवकर, रिट्झ कार्लटनचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत पाट्रो तसेच युईआय ग्लोबलचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक मनीष खन्ना यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी स्पर्धकांचे कौतुक करत हॉटेल व्यवस्थापन व पाहुणचार क्षेत्रात उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या. तर मनीष खन्ना यांनी सांगितले की, “युसीसी स्पर्धा विद्यार्थ्यांमधील नवनिर्मिती, कल्पकता, कष्ट करण्याची तयारी, तंत्रज्ञानाची जाण आणि चवीचा कस विकसित करणारी आहे. गेल्या १९ वर्षांपासून युईआय ग्लोबल संस्था विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आमचे विद्यार्थी चमकत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.”

विद्यार्थ्यांना उद्योगजगतात ओळख मिळावी यासाठी पुणे, महाराष्ट्र व देशभरातील हॉटेल व्यवसायातील अनेक दिग्गजांना या स्पर्धेसाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे परीक्षण करून मार्गदर्शनही केले.


Thursday, December 25, 2025

जेऊर रेल्वे अंडरपासजवळ भरधाव रेल्वेखाली युवक ठार

 जेऊर रेल्वे अंडरपासजवळ भरधाव रेल्वेखाली युवक ठार 



पुरंदर : 


      नीरा नजिकच्या पिंपरे खुर्द (ता. पुरंदर) गावच्या हद्दीतील जेऊर रेल्वे अंडरपास शेजारी पुणे–मिरज रेल्वे मार्गावर भरधाव रेल्वेची धडक बसून एका युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.२५) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेनंतर नीरा पोलिसांनी तत्काळ हालचाली करत मृत युवकाची ओळख पटवण्यात यश मिळवले आहे. 


      पुणे–मिरज रेल्वे मार्गावर पुणे बाजूकडून सातारा दिशेने जाणाऱ्या भरधाव रेल्वेची धडक बसून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की युवकाच्या शरीराचे तुकडे झाले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. 


       या घटनेची माहिती सर्वप्रथम संबंधित रेल्वेच्या लोको पायलटने रेल्वे विभागाला दिली. त्यानंतर रेल्वे प्रशासनामार्फत नीरा पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. माहिती मिळताच नीरा पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक घनश्याम चव्हाण व हवालदार संतोष मदने यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतला. 


      मृतदेहाची ओळख पटवणे अवघड असतानाच घटनास्थळी आढळलेल्या मोबाईलच्या आधारे तपास करण्यात आला. मोबाईल तपासणीतून सदर युवकाचे नाव पोलीसांनी निष्पन्न केले असून त्याचे अंदाजे वय ४५, रा. वीर, ता. पुरंदर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 


      या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून पुढील तपास नीरा पोलीस करत आहेत. मृत्यू अपघाती की अन्य कारणामुळे झाला, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Friday, December 19, 2025

🔴 एकतर्फी प्रेमातून क्रूर खून! प्रियकराने प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने वार करून घेतला जीव

 🔴 एकतर्फी प्रेमातून क्रूर खून! प्रियकराने प्रेयसीच्या पतीवर कोयत्याने वार करून घेतला जीव




पुणे ग्रामीण | प्रतिनिधी

एकतर्फी प्रेमातून निर्माण झालेल्या विकृत भावनेने अखेर रक्तरंजित वळण घेतले! प्रियसीला मिळवण्यासाठी प्रियकराने थेट तिच्या पतीचा काटा काढल्याची धक्कादायक घटना पुणे ग्रामीणमध्ये उघडकीस आली असून, या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील माळशिरस (ता. पुरंदर) परिसरात ही भीषण घटना घडली. मृताचे नाव दीपक गोवर्धन जगताप (वय 32) असे असून, तो आपल्या पत्नी व कुटुंबासोबत राहत होता.

💔 एकतर्फी प्रेमातून कट

पोलिस तपासात उघड झाले की, आरोपी सुशांत संदीप मापरे (वय 32, व्यवसाय – चालक) याचे मृताच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम होते. तिने वारंवार नकार देऊनही आरोपी तिचा पाठलाग करत होता. मृत दीपक जगताप याने या त्रासाला विरोध केला होता. याच रागातून आरोपीने खुनाचा कट रचला.

🔪 कोयत्याने निर्घृण हल्ला

दिनांक 26 डिसेंबर 2024 रोजी सकाळच्या सुमारास आरोपीने दीपक जगताप याला गाठून कोयत्याने सपासप वार केले. गंभीर जखमी अवस्थेत दीपक याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आरोपी वार करून पसार झाला.

🕵️‍♂️ पोलिसांची थरारक तपास मोहीम

घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण, गोपनीय बातमीदार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. तो गावातून फरार होण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

⚖️ न्यायालयीन कारवाई

आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

👮‍♂️ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

ही यशस्वी कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलिसांनी केली.

एकतर्फी प्रेम, संशय आणि विकृत मानसिकता यामुळे आणखी एका निष्पापाचा बळी गेला. प्रेम नाकारले म्हणून खून करण्यापर्यंत मजल जाणे ही समाजासाठी गंभीर चेतावणी आहे

🔴 दारूच्या नशेत रक्तरंजित खेळ! सासवड शहरात तरुणाचा निर्घृण खून; दोन आरोपी जेरबंद

🔴 दारूच्या नशेत रक्तरंजित खेळ! सासवड शहरात तरुणाचा निर्घृण खून; दोन आरोपी जेरबंद



सासवड | प्रतिनिधी

सासवड शहरात दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे सासवड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत तरुणाचे नाव राजू दत्तात्रय बोराटे (वय 36, रा. सासवड, ता. पुरंदर) असे असून, तो मजुरीचे काम करत होता. दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी सासवड शहरातील न्यू अमर कॉलनी परिसरात एका निर्जन ठिकाणी त्याचा मृतदेह आढळून आला. मृताच्या डोक्यावर व शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा आढळल्याने खुनाचा संशय बळावला.

📌 दारूच्या वादातून खून

पोलिस तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार, मृत राजू बोराटे याचा आरोपींसोबत दारू पिण्यावरून वाद झाला होता. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी त्याला मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यानंतर राजूचा मृत्यू झाला. गुन्हा लपवण्यासाठी आरोपींनी मृतदेह घटनास्थळीच टाकून पलायन केले.

🕵️‍♂️ पोलिसांची जलद कारवाई

घटनेची माहिती मिळताच सासवड पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला.

या प्रकरणात

➡️ ओमप्रकाश गोसावी (वय 34, व्यवसाय – बांधकाम मजूर)

➡️ नीरज गोसावी (वय 25, व्यवसाय – बांधकाम मजूर, रा. मध्यप्रदेश)

या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी बांधकाम मजूर असून सासवड परिसरात कामासाठी आले होते.

⚖️ न्यायालयीन कोठडी

आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.

👮‍♂️ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग व उपविभागीय पोलीस अधिकारी सासवड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलिसांच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


Thursday, December 18, 2025

पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

 पॅशनला प्रोफेशन बनवून स्वत:ला उच्च स्थानावर घेऊन जा; मनीष खन्ना यांचा विद्यार्थ्यांना सल्ला




पुणे

युईआय कलिनरी कॉम्पिटिशनचे दिमाखात उद्घाटन; देशभरातील 9 कॅम्पसमधील सुमारे 150 विद्यार्थ्यांचा सहभाग 


हॉस्पिटॅलिटी आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी केवळ काम करायचे म्हणून करू नये तर; ते काम तुमचे पॅशन झाले पाहिजे. हेच पॅशन तुमचे प्रोफेशन बनले पाहिजे.त्यामुळे तुमचे पॅशन अशा पध्दतीने विकसित करा की जे तुम्हाला उच्च स्थानावर घेऊन जाईल, त्याच दृष्टीने युआयई ग्लोबल एज्युकेशन इन्स्टिट्यूट देशभरातील 9 कॅम्पसच्या माध्यमातून सुमारे 20 वर्षांपासून काम करत आहे,असे प्रतिपादन युआयई ग्लोबल एज्युकेशनचे व्यवस्थापकीय संचालक (MD) व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मनीष खन्ना (Manish Khanna, Managing Director, UIE Global Education)यांनी केले. 

UEI ग्लोबल एज्युकेशनतर्फे पुण्यातील मुळाशी येथील द फॉरेस्टा रिसॉर्ट येथे आयोजित तिसऱ्या UEI कलिनरी कॉम्पिटिशन-2025 ( पाककृती स्पर्धा) (UEI Culinary Competition-2025) स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मनीष खन्ना बोलत होते. याप्रसंगी इंडियन कुलिनरी फोरम उपाध्यक्ष शेफ शिशिर सक्सेना ,पुण्यातील JW Marriott चे एक्झिक्युटिव्ह शेफ मिहीर काले ,L&D, Marriott International Asia Pacific & Chinaचे माजी संचालक नरेश कपूर , IHM भोपाळचे माजी प्राचार्य आनंद कुमार, ICF चे जॉइंट सेक्रेटरी अरविंद राय , ITC चे निवृत्त एक्झिक्युटिव्ह शेफ आलोक , Novotel – Accor Group चे एक्झिक्युटिव्ह शेफ गौरव मावरी , कुलिनरी कन्सल्टंट व उद्योजक शेफ सिद्धार्थ शिंत्रे , YCMOUचे संचालक डॉ. जयदीप निकम, Taj चे निवृत्त एक्झिक्युटिव्ह शेफ, व माजी डीन शेफ हेमंत गोकळे, फॉरेस्टा रिसॉर्टचे व्यवस्थापकीय संचालक विशाल चव्हाण आदी उपस्थित होते.



विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मनीष खन्ना म्हणाले, यूसीसी हा विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा उपक्रम असून तो पाककलेचे विद्यार्थी, प्रशिक्षक आणि व्यावसायिक यांना एकत्र आणतो. अशा स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच खाद्यकलेबद्दलची आवड शोधण्याची, शिकण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची उत्तम संधी देतात. यूसीसी केवळ त्यांना उत्तम कामगिरीसाठी प्रेरित करत नाही, तर त्यांना त्यांच्या पाककौशल्यांचे प्रदर्शन, उद्योगातील दिग्गजांशी नेटवर्किंग आणि ओळख मिळवण्याचे व्यासपीठही देते.या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी भारतातील विविध संस्कृती, परंपरा आणि वारसा प्रादेशिक पाककृतींमधून एकत्र सादर करतात.

गुरूवारी (दि.18 ) UEI कलिनरी कॉम्पिटिशन 2025 चे उद्घाटन झाले असून तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत मिस्ट्री बॉक्स चॅलेंज, ड्रेस अ केक, ग्लोबल बिर्याणी आणि इनोव्हेशन फ्युजन अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. अंतिम फेरी ही नॉक-आउट स्वरूपाची असून, त्यातून विजेता आणि उपविजेते निवडले जाणार आहेत. विजेता आणि उपविजेत्यांना रोख पारितोषिके, पदके तसेच Golden Chef Coat सह प्रतिष्ठित MasterChef UCC हा किताब प्रदान करण्यात येणार आहे,असेही मनीष खन्ना यांनी सांगितले. 

स्पर्धेविषयी माहिती देताना पुण्यातील युआयई ग्लोबल एज्युकेशनच्या उपसंचालिका वैशाली पाटील म्हणाल्या, या स्पर्धेत यूईआय ग्लोबलच्या सर्व कॅम्पस मधून सुमारे 150 होतकरू शेफ्स सहभागी झाले आहेत. ते प्रादेशिक, भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय पदार्थ सादर करत UCC Master Chef 2025 या प्रतिष्ठित किताबासाठी स्पर्धा करणार आहेत. हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण क्षेत्रात सुमारे 20 वर्षांचा अनुभव असलेल्या यूईआय ग्लोबल एज्युकेशनने आजपर्यंत 25 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून देश-विदेशातील नामांकित स्टार कॅटेगरी हॉटेल्समध्ये यशस्वीपणे प्लेसमेंट दिले आहे. यूईआय ग्लोबलचे अभ्यासक्रम यूके, स्वित्झर्लंड, कॅनडा तसेच इतर अनेक देशांमध्ये लॅटरल एंट्रीसाठी मान्यताप्राप्त आहेत.

Wednesday, December 17, 2025

पुरंदरमध्ये अजब घटना.. निसर्गाचा अद्भुत चमत्कार! मेंढरू जन्माला पाच पायांसह

 पुरंदरमध्ये अजब घटना..

निसर्गाचा अद्भुत चमत्कार! मेंढरू जन्माला पाच पायांसह 



पुरंदर : 

       निसर्ग अनेकदा अशा घटना घडवतो की ज्या पाहून माणूसही थक्क होतो. अशाच एका दुर्मिळ आणि रंजक घटनेमुळे परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे. एका शेतकऱ्याच्या गोठ्यात मेंढरू जन्माला आले असून, विशेष म्हणजे या मेंढराला चक्क पाच पाय आहेत. 


      पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी गावात ही अनोखी घटना घडली असून, संबंधित मेंढीने अलीकडेच एका पाच पायांच्या मेंढराला जन्म दिला आहे. जन्मत:च वेगळेपण दिसत असल्याने शेतकरी कुटुंबासह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. सामान्यतः मेंढरांना चार पाय असतात; मात्र या मेंढराच्या शरीराच्या पुढील बाजूस अतिरिक्त पाय स्पष्टपणे दिसत आहे. 



     पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, गर्भावस्थेत झालेल्या जैविक बदलांमुळे किंवा अनुवंशिक कारणांमुळे अशा प्रकारची शारीरिक रचना निर्माण होते. ही अवस्था वैद्यकीय भाषेत ‘जन्मजात विकृती’ म्हणून ओळखली जाते. सध्या मेंढरू तंदुरुस्त असून ते दूध पित आहे व हालचालीही सामान्य असल्याचे सांगण्यात आले. 


     पिसुर्टी येथिल माहादेव सोमा काळे यांच्या मेंढ्यांच्या वाडग्यातील या घटनेमुळे निरा, वाल्हे परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले असून अनेक जण हे मेंढरू पाहण्यासाठी येत आहेत. काहींनी याला निसर्गाचा चमत्कार मानले आहे, तर काहींनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून या घटनेकडे पाहण्याची गरज व्यक्त केली आहे. या दुर्मिळ घटनेमुळे पशुपालन क्षेत्रातही चर्चेला उधाण आले आहे.

Monday, December 15, 2025

पुरंदर हादरला... प्रेमविवाहाचा राग ठरला जीवघेणा; तरुणाचा कोयत्याने निर्घृण खून. या हत्याकांडाने पुरंदर तालुक्यात भीतीचे वातावरण

 पुरंदर हादरला 

प्रेमविवाहाचा राग ठरला जीवघेणा; तरुणाचा कोयत्याने निर्घृण खून. 


या हत्याकांडाने पुरंदर तालुक्यात भीतीचे वातावरण 



पुरंदर | प्रतिनधी 


      प्रेमविवाहाचा राग मनात धरून एका तरुणाने थेट सूडाचा मार्ग स्वीकारत नवविवाहित तरुणाचा कोयत्याने निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना पुरंदर तालुक्यात घडली आहे. माळशिरस गावच्या हद्दीतील रामकाठी शेताच्या शिवारात घडलेल्या या हत्याकांडाने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


       दिपक गोरख जगताप (वय २२, रा. राजेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो १३ डिसेंबर रोजी दुपारी घरातून बाहेर पडला होता. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी रामकाठी शेताच्या शिवारात त्याचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. मृतदेहावर डोके, मान, पाठ तसेच उजव्या पायावर धारदार शस्त्राने केलेल्या गंभीर जखमा स्पष्ट दिसून आल्या. 


       प्राथमिक तपासात हा खून प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या सूडभावनेतून झाल्याचे उघड झाले आहे. आरोपी सुशांत संदीप मापारी (रा. माळशिरस, ता. पुरंदर; मूळ रा. पिंपळगाव, ता. दौंड) याची पूर्वीची प्रेयसी पायल अमोल कांबळे हिने दिपक जगताप याच्याशी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून आरोपीने ही हत्या केल्याचा आरोप आहे. 


     लग्नानंतरचे वाद मिटविण्याचा आणि पायलचा जुना मोबाईल परत देण्याचा बहाणा करत आरोपीने दिपकला शेतात बोलावून घेतले. तेथे एकांतात संधी साधून आरोपीने धारदार लोखंडी कोयत्याने दिपकवर सपासप वार केले. जागीच मृत्यू झाल्याची खात्री करून आरोपीने घटनास्थळीच हत्यार टाकून पलायन केल्याचे तपासात समोर आले आहे. 


      या प्रकरणी संतोष रोहिदास शेंडकर (वय ४६, रा. चांबळी, ता. पुरंदर) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून त्याच्या शोधासाठी पोलीस प्रशासनाने विशेष पथके रवाना केली आहेत. 


     सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील करत असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास जेजुरी पोलिसांनी व्यक्त केला आहे. 


     प्रेम, राग आणि सूड यांचे भीषण परिणाम या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले असून, एका चुकीच्या निर्णयाने एका तरुणाचे आयुष्य संपुष्टात आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

इंदापूरची श्रावणी शिताप कुराश वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड; 57 किलो गटातून राज्यातील पहिली खेळाडू

 इंदापूरची श्रावणी शिताप कुराश वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड; 57 किलो गटातून राज्यातील पहिली खेळाडू



  बारामती


पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील श्रावणी प्रशांत शिताप हिची जानेवारी 2026 मध्ये इराण येथे होणाऱ्या कुराश वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड करण्यात आली आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे पारपडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप निवड चाचणीत श्रावणीने उत्कृष्ट कामगिरी करत पात्र ठरली. 57 किलो वजन गटातून वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळणारी ती महाराष्ट्रातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे.


श्रावणी ही इंदापूरसारख्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून पुढे आलेली खेळाडू आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर तिने हा टप्पा गाठला आहे. 2024-25 या कालावधीत तिने राष्ट्रीय स्तरावर दोन पदके पटकावली असून तिच्या खेळातील प्रगती सातत्याने दिसून येते आहे.



या यशामागे कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव तसेच इंटरनॅशनल वन स्टार पंच दत्तात्रय व्यवहारे व जयश्री व्यवहारे यांचे विशेष योगदान आहे. इंदापूर परिसरातील गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील शेकडो खेळाडूंना प्रसंगी मोफत प्रशिक्षण देत त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते आणि त्यांचा स्टाफ करीत आहेत.


श्रावणीला कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अंकुश नागर व महासचिव शिवाजी साळुंखे यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. जानेवारी 2026 मध्ये श्रावणी भारताचे प्रतिनिधित्व करत 57 किलो वजन गटात कुराश स्पर्धेत उतरणार आहे.


तिच्या या ऐतिहासिक निवडीमुळे इंदापूर तालुका तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील कुराशप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्व स्तरांतून श्रावणीवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या यशामुळे आई-वडील व शहा हेल्थ क्लबचा मान अभिमानाने उंचावला आहे. श्रावणीची ही कामगिरी ग्रामीण भागातील खेळाडूंना निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Thursday, December 11, 2025

सासवड व जेजुरी नगरपालिकांच्या निवडणुकांनंतर ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघातर्फे उपक्रमाचे आयोजन

 सासवड व जेजुरी नगरपालिकांच्या निवडणुकांनंतर ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रम 


पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघातर्फे उपक्रमाचे आयोजन 



पुरंदर : 

      पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघातर्फे सासवड व जेजुरी नगरपालिकेच्या निवडणुकांनंतर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व राजकीय नेते, नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक पदांचे उमेदवार व स्थानिक नागरिक यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी “चाय पे चर्चा” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणूक काळातील विविध मतभेद विसरून विकासाच्या दिशा ठरवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. 


      या चर्चासत्रात शहराच्या प्रगतीसाठी मतमतांतरांना बाजूला ठेवत रचनात्मक आणि सकारात्मक चर्चा होणार असून, शहर विकासाचा मार्ग अधिक भक्कम करण्यास हा संवाद उपकारक ठरेल, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली आहे. 


कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून बी. एम. काळे, प्रकाश फळके, दत्ता भोंगले, सुनील लोणकर आणि भरत निंगडे यांचा समावेश आहे. आयोजन समितीमध्ये अध्यक्ष योगेश कामथे, उपाध्यक्ष प्रविण नवले, सचिव अमोल बनकर, सहसचिव मंगेश गायकवाड आणि कोषाध्यक्ष निलेश भुजबळ, समन्वयक किशोर कुदळे यांचा सहभाग आहे. याशिवाय संघटनेचे सदस्य समीर भुजबळ, राहुल शिंदे, निखिल जगताप, संतोष डुबल, चंद्रकांत चौंडकर आदींचाही सक्रिय सहभाग आहे. 


     कार्यक्रमाला सासवड व जेजुरी नगरपरिषद क्षेत्रातील सर्व राजकीय नेत्यांना विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. चर्चासत्रात कोणतेही भाषण न करता मुक्त चर्चा होणार असून कार्यक्रमाचे सूत्रीकरण अत्यंत अनौपचारिक व संवादात्मक पद्धतीने करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. पुरंदर तालुका मराठी पत्रकार भवन, शिवरी, ता. पुरंदर, जि. पुणे येथे रविवार दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वा. तालुक्यातील सर्व पत्रकारांसह, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, व्यावसायिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती राहण्याचे आवाहन करण्या

त आले आहे.

Monday, December 8, 2025

दत्तात्रय रोकडे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

 दत्तात्रय रोकडे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान



पुणे – शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय सेवा, नवोन्मेषी उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेऊन पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय रोकडे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

     निळू फुले सभागृह, राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी स्मारक, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात माजी आमदार, लेखक व विचारवंत उल्हासदादा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी पुणे विद्यापीठाचे अनिल खरे आणि शिक्षकेतर संघटनेचे राज्य कार्यवाह शिवाजी खांडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.


    दत्तात्रय रोकडे यांनी अनेक वर्षांपासून शैक्षणिक गुणवत्तावृद्धी, डिजिटल शिक्षणाचा प्रसार, नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी आणि सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या अध्यापन पद्धतीतील नाविन्य, विद्यार्थ्यांशी संवादातील सहजता आणि शैक्षणिक प्रगतीत केलेल्या योगदानामुळे ते जिल्ह्यातील आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जातात.


पुरस्कार स्वीकारताना रोकडे यांनी पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, सर्व संचालक, तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी यांचे मनःपूर्वक आभार मानले.

“हा पुरस्कार माझ्या जबाबदाऱ्या वाढवणारा आहे. पुढेही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हेच कार्य अधिक जोमाने सुरू ठेवेन,” असे त्यांनी सांगितले.


पुरस्काराबद्दल पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीशराव उरसळ, कार्याध्यक्ष अजितदादा निगडे, सचिव उत्तम निगडे, संचालक मच्छिंद्रशेठ कुंभारकर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, सेकंडरी सोसायटीचे सुधाकर जगदाळे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते कुंडलिक मेमाणे, वसंतराव ताकवले, रामप्रभू पेटकर, प्राचार्य इस्माईल सय्यद, मुख्याध्यापिका लता बोकड यांनी त्यांचे अभिनंदन केले.


कार्यक्रमास पुणे जिल्हा शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष संजय धुमाळ, उपाध्यक्ष अशोक बाने, पुरंदर तालुका शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष सिद्राम कांबळे, सचिव कीर्तिकुमार मेमाणे, तसेच बबन खेडकर, विनायक होळकर, मोहन कुंभारकर, ज्ञानदेव ठोंबरे, संदीप इंदलकर, राम भोसले, दत्ता शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.


दत्तात्रय रोकडे यांच्या शैक्षणिक सेवेला, कार्यतत्परतेला आणि नेतृत्वक्षमतेला मिळालेला हा पुरस्कार योग्य असा सन्मान असल्याची भावना विविध क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Sunday, December 7, 2025

राइट टू डिस्कनेक्ट बिल 2025: भारतातील कामकाज संस्कृतीत ‘डिजिटल क्रांती’?

 

राइट टू डिस्कनेक्ट बिल 2025: भारतातील कामकाज संस्कृतीत ‘डिजिटल क्रांती’?





ऑफिसमध्ये घालवलेला वेळ आणि घरात सुरू राहणारे काम — यामधील रेषा आता जवळजवळ पुसली गेली आहे. काम संपल्यानंतर रात्री उशिराचे फोन, सुट्टीत येणारे ईमेल आणि व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम करत आहेत. कोविडनंतर वर्क फ्रॉम होमच्या विस्तारामुळे ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. त्यातून निर्माण होणारा मानसिक ताण, थकवा आणि बर्नआऊट हा नवीन ‘कर्मचारी आजार’ बनला आहे. या सामाजिक-आर्थिक वास्तवातूनच ‘राइट टू डिस्कनेक्ट बिल 2025’ ची निर्मिती झाली.

बिलाची पार्श्वभूमी: कामाचे बदलते स्वरूप

डिजिटल युगात संवादाचा वेग वाढला, पण त्याच वेगाने कर्मचार्‍यांवर कामाचे ओझेही वाढले. ऑफिस टाइम संपल्यानंतरही कर्मचारी सतत उपलब्ध राहण्याची अपेक्षा वाढली. यामुळे ‘ओव्हरटाइम ऑन मोबाइल’ ही नवीन काम संस्कृती रुजली. भारतीय कामगार बाजारात बहुसंख्य कर्मचारी खासगी क्षेत्रात आहेत, जिथे ही समस्या अधिक तीव्र आहे. त्यामुळे खासगी सदस्य विधेयक म्हणून सुप्रिया सुळे यांनी सादर केलेले हे बिल चर्चेला चालना देते.

मुख्य तरतुदी: हक्क की क्रांती?

बिलाचा मूलभूत दृष्टिकोन म्हणजे काम आणि जीवनामध्ये स्पष्ट सीमा.

  • ऑफिस टाइमनंतर कामाशी संबंधित फोन, ईमेल, मेसेजला उत्तर देण्याची सक्ती नाही.
  • सुट्टीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा डिजिटल संवाद बंधनकारक नाही.
  • उत्तर न दिल्यास कर्मचारी दंड किंवा कारवाईस पात्र ठरत नाही.
  • नियमांचे पालन व्हावे म्हणून ‘कर्मचारी कल्याण प्राधिकरण’ स्थापन करण्याची तरतूद.
  • उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कर्मचाऱ्याच्या पगाराच्या 1% दंडाचे प्रावधान.

ही तरतुदी पाहता, बिल कर्मचारी हिताचे मजबूत संरक्षण करते, पण अंमलबजावणीच्या दृष्टीने अनेक प्रश्न उपस्थित होतात. भारतीय उद्योगसंस्कृतीत ‘सतत उपलब्धता’ ही व्यावसायिकता मानली जाते. अशा परिस्थितीत कंपन्यांची प्रत्यक्ष प्रतिसादशक्ती काय असेल?

जागतिक अनुभव काय सांगतो?

फ्रान्स, स्पेन, बेल्जियम आणि पोर्तुगाल यांनी ही संकल्पना आधीच प्रत्यक्षात आणली आहे.

  • फ्रान्स: 2017 पासून 50+ कर्मचार्‍यांच्या कंपन्यांना स्पष्ट धोरण असणे बंधनकारक.
  • स्पेन: कर्मचार्‍यांच्या वैयक्तिक आयुष्याला कायदेशीर संरक्षण.
  • बेल्जियम: सरकारी ते खासगी क्षेत्रात विस्तार.
  • पोर्तुगाल: ‘राइट टू रेस्ट’ — ऑफिसनंतर संवादाला बंदी.

या देशांत एक समान परिणाम दिसतो — कर्मचार्‍यांचा ताण कमी, उत्पादकता वाढ, आणि कौटुंबिक वेळेचा दर्जा उंचावला. म्हणजेच काम कमी नाही, कामाची वेळ निश्चित. हा महत्त्वाचा फरक आहे.

भारताचा संदर्भ: आव्हाने आणि संधी

भारतासारख्या देशात कायदे असले तरी त्यांची अंमलबजावणी कठीण असते. IT, मीडिया, स्टार्टअप, BPO, हेल्थकेअर यांसारख्या सेक्टरमध्ये 24x7 ऑपरेशन ही गरज आहे. अशा क्षेत्रांसाठी काय अपवाद ठेवले जातील?
दुसरीकडे, तरुण कर्मचारी वर्ग मानसिक आरोग्याबाबत अधिक जागरूक आहे. “करिअर-आणि-जीवन” यातील संतुलनाला आता मूल्य दिले जाते. त्यामुळे हे बिल नवीन काम संस्कृतीला मार्ग दाखवू शकते.

अर्थकारण: उत्पादकता विरुद्ध उपलब्धता

कंपन्यांची मान्यता अशी असते की “जास्त उपलब्धता म्हणजे जास्त उत्पादकता”. पण जागतिक संशोधन उलट चित्र दाखवते:

  • पुरेशी विश्रांती असलेल्या कर्मचार्‍यांची निर्णयक्षमता अधिक चांगली
  • ‘बर्नआऊट’मुळे कामगिरी कमी
  • कौटुंबिक ताणामुळे कार्यक्षमता घट

म्हणजेच, हे बिल कर्मचारी हितासोबतच व्यवसाय हिताचेही आहे.

निष्कर्ष: बदलाची गरज

‘राइट टू डिस्कनेक्ट बिल 2025’ हे केवळ कायदेशीर संरक्षण नाही, तर एक सामाजिक संदेश आहे —
काम करा, पण कामातच हरवू नका.

भारतात डिजिटल कामकाज झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ‘वेळेची मर्यादा’ ही नवीन मूल्यव्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. सरकारी प्रतिसाद आणि परिणामकारक अंमलबजावणीवर या बिलाचे भविष्य अवलंबून आहे. परंतु इतके निश्चित — हे विधेयक भारतीय काम संस्कृतीत ‘मानसिक आरोग्य’ हा केंद्रबिंदू बनवण्याचा प्रयत्न करते.

उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित; सुनील लोणकर यांचा गौरव

 उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित; सुनील लोणकर यांचा गौरव 



पुणे : 

    निळू फुले सभागृह, राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी स्मारक, पर्वती पायथा येथे आयोजित कार्यक्रमामध्ये शिक्षक शिक्षकेतर संघटनेतर्फे उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने पत्रकार सुनील लोणकर यांचा गौरव करण्यात आला. ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभलेल्या या सोहळ्यात विविध माध्यमांतून लोणकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. 


   या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सुनील लोणकर यांनी आपल्या शिक्षकी संघटनांवरील वृत्तसंकलनाच्या दीर्घ योगदानाची आठवण करून दिली. अनेक वर्षे शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे प्रश्न, समस्या आणि गौरवकार्यक्रम समाजासमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला असून, त्या सेवेला मिळालेलं हे मोलाचं फळ असल्याचे त्यांनी सांगितले. 


      परिसराशी असलेला भावनिक दुवाही त्यांनी व्यक्त केला. महाविद्यालयीन शिक्षण याच परिसरात पूर्ण झाल्याने अनेक वर्षांनी पुन्हा या ठिकाणचा फेरभेट अनुभव भावुक करणारा ठरल्याचे त्यांनी नमूद केले. 


      कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक शिवाजीराव खांडेकर सर, तसेच आयोजक सहकाऱ्यांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. “सर्वांनी केलेल्या प्रेम, शुभेच्छा आणि विश्वासामुळेच हा सन्मान अधिक विशेष झाला,” अशा शब्दांत त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

Tuesday, December 2, 2025

पुणे–पंढरपूर पालखी मार्गावरील भीषण अपघातात नीरा गावातील दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुणे–पंढरपूर पालखी मार्गावरील भीषण अपघातात नीरा गावातील दुचाकीस्वाराचा मृत्यू 



पुरंदर : नीरा (ता. पुरंदर) येथील पांडुरंग सुरेश मोरे (वय ४८, रा. वार्ड क्र.१) यांचा मंगळवारी (दि. ०२) संध्याकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. मोरे हे संध्याकाळी सुमारे ६.३० वाजता जेजुरीहून नीरेच्या दिशेने MH12KD5545 क्रमांकाच्या दुचाकीवरून निघाले होते. पुणे–पंढरपूर पालखी मार्गावरील धोकादायक पट्ट्यातून जात असताना पुणे–मिरज रेल्वे मार्गावरील गेट ओलांडल्यानंतर त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. अज्ञात वाहनाची धडक बसून किंवा दुचाकी रस्त्याच्या कडेला घसरून खाली गेल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेत मोरे यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच नीरा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस हवालदार संतोष मदने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पुढील तपास नीरा पोलीस करीत आहेत.

पुरुषांच्या वाढत्या आत्महत्यांचे गूढ — नीरा शहरासमोरील नवी सामाजिक शोकांतिका

 पुरुषांच्या वाढत्या आत्महत्यांचे गूढ — नीरा शहरासमोरील नवी सामाजिक शोकांतिका 



पुरंदर : 

     नीरा शहर व परिसरात गेल्या वर्षभरात घडलेल्या घटनांची मालिका केवळ आकडेवारी नाही, तर समाजाच्या अंतःकरणाला हादरा देणारा वेदनादायी आरसा आहे. पन्नासहून अधिक पुरुषांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटना समोर येत आहे, आणि हे संख्यात्मक भयावह वास्तव नीरा शहरासाठी चिंतेचे सत्र बनले आहे. 


ही बाब केवळ एखाद्या वैयक्तिक अडचणीची किंवा कौटुंबिक भांडणाची प्रतिक्रिया नाही; तर समोर येणाऱ्या पृष्ठभागाखाली एक सखोल सामाजिक बदल, दबाव आणि मनोव्यथा दडल्या आहेत. 


सुसाईड नोटमध्ये गंभीर कारणे नाहीत — खरे कारण कुठे दडलेय? 


पोलीस यंत्रणा सांगते की आत्महत्येपूर्वी मिळालेल्या चिठ्ठ्यांमध्ये अनेकदा गंभीर कारणांचे भानही नसते. अनेक वेळा कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेची भीती आणि गावाकडच्या “काय म्हणतील” संस्कृतीमुळे प्रकरणे दडपली जातात.

पण असा प्रश्न निर्माण होतो—

मनाचा घात इतका खोलवर जाऊन बसतो, आणि सुसाईड नोट मात्र वरवरची?

याचा अर्थ खरे कारण समाजाने मान्य न केलेले भावनिक, आर्थिक किंवा सामाजिक दडपण असू शकते. 


आत्महत्या — गुन्हा आणि प्रवृत्ती निर्माण करणारेही तितकेच दोषी 


कायद्यानुसार आत्महत्या करणे किंवा करण्याचा प्रयत्न करणे हा गुन्हा आहेच, पण त्याकडे ढकलणारे, मानसिकदृष्ट्या छळ करणारे, धमकावणारे ही तितकेच जबाबदार आहेत. परंतु वास्तवात हेच लोक दिवसाढवळ्या समाजात उघडपणे फिरताना दिसतात.

बळी पडतो तो भावनिक विवंचना झेलणारा व्यक्ती — आणि सुटतो तो कारण निर्माण करणारा! 


पूर्वी आर्थिक विवंचनेतून, आता सुशिक्षितांकडून आत्महत्येची निवड 


काही वर्षांपूर्वी आत्महत्यांचे प्रमाण आर्थिक दडपण, गरिबी किंवा शिक्षणाच्या अभावाशी जोडलेले होते. परंतु आता सुशिक्षित, नोकरीत किंवा व्यवसायात स्थिर दिसणारे युवकही जीवनाचा शेवट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

यावरून हे स्पष्ट होते की:

समस्या केवळ आर्थिक नाही, तर मानसिक, सामाजिक आणि संबंधांतील दडपणही वाढले आहे. 


व्याजाचे पैसे, कर्जबाजारीपणा आणि ‘आत्महत्येचे नाटक’ — नव्या प्रवृत्तीचे धक्कादायक रूप 


मागील वर्षभरात काही घटनांमध्ये व्यावसायिक कर्जबाजारीपणा आल्याने तरुणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

परंतु काही महाभागांनी व्याजाचे पैसे बुडवण्यासाठी आत्महत्येचे नाटक करून उलट कर्जदारालाच गुन्हेगार ठरविण्याचा प्रयत्न केला.

ही प्रवृत्ती केवळ गुन्हेगारीच नाही, तर कर्ज देणारा–कर्ज घेणारा यांच्यातील अविश्वास अधिक खोल करण्यारा सामाजिक आजार आहे. 


आत्महत्येला प्रतिउत्तर म्हणून आत्महत्या?— धोकादायक स्पर्धा 


अलीकडील प्रकरणात हॉटेल व्यवसायिकाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून व्याजाने पैसे देणाऱ्यानेही आत्महत्येचा प्रयत्न केला.

हा प्रकार समाजात एक विकृत मानसिकता रुजवत असल्याचे गंभीर संकेत आहेत.

जणू काही भावनिक दबावाचा “तोडीसतोड” खेळ सुरू झाला आहे. 


नीरामधील पुरुष आत्महत्यांचे गूढ — अनुत्तरित प्रश्न 


साधारणतः महिलांच्या आत्महत्यांबाबत समाज संवेदनशीलपणे बोलतो. परंतु पुरुषांच्या बाबतीत “पुरुषांनी मजबूत असलं पाहिजे”, “दाखवू नका कमजोरी” असे सामाजिक शिकवणीतून दडपण वाढत जाते.

यामुळे पुरुष मन मोकळे करत नाहीत, मदत मागत नाहीत, आणि संकट एकट्याने झेलतात. 


परिणामी प्रश्न कायम उभा राहतो—

नीरा शहरात पुरुष आत्महत्या का वाढत आहेत?

– आर्थिक ताण?

– नातेसंबंधातील तणाव?

– व्यसन, कर्ज, सामाजिक अपेक्षा?

– की पुरुष मनाच्या आरोग्याला दिले जाणारे मर्यादित महत्त्व? 


उत्तर शोधण्याची गरज आता अत्यंत तातडीची आहे.

--- समाजाने आता विचार करायलाच हवा 


नीरा आणि परिसरात ही आत्महत्यांची मालिका ‘सत्रा’सारखी सुरू आहे—

आणि ते थांबवण्यासाठी

✔ कुटुंबांचे मानसिक आरोग्यावरील शिक्षण

✔ युवकांसाठी समुपदेशन

✔ आर्थिक साक्षरता

✔ तणावमुक्तीची साधने

✔ कर्जवसुलीत पारदर्शक प्रक्रिया

✔ आणि भावनिक संवादाची संस्कृती

यांचा गंभीर विचार आवश्यक आहे. 


समस्येचे मूळ शोधले नाही तर उद्या ही संख्या ५० वरून १०० होईल—

आणि समाज हातावर हात धरून पाहत राहील.

---










नीरा शहर व परिसरात पुरुषांच्या आत्महत्येचे सत्र चिंता वाढविणारे!

मागील वर्षभरात पन्नास हून अधिक पुरुषांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे. आत्महत्येच्या आधी सुसाईड नोट ही असते पण त्यात गंभीर कारणं नसल्याचे पोलीस यंत्रणा सांगते. काही वेळा त्या कुटुंबाची बदनामी नको म्हणून प्रकरणे दाबली जात आहेत. 


वास्तविक आत्महत्या करणे किंवा प्रयत्न करणे हा गुन्हा असून, हा गुन्हा करण्यास प्रवृत्त करणारे ही तीतकेच दोषी असतात. हे सर्व पुढील काळात समाजात उजळ माथ्याने फिरताना दिसून येतात. 


पुर्वी अशिक्षित, हालाखीची परिस्थिती असलेले किंवा मोलमजुरी करणारे आर्थिक विवंचनेतून आत्महते सारखे टोकाचे पाऊल उचलत होते. आता सधन कुटुंबातील सुशिक्षित युवक आत्महत्येचे पाऊल उचलत आहेत ही समाजाच्या दृष्टीने चिंता वाढविणारी घटना आहे. 


मागील वर्षभरात व्यावसायिक कर्जबाजारीपणा आल्याने काहींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तर काही महाभागांनी व्याजाचे पैसे बुडवण्यासाठी फक्त आत्महत्येचे नाटक करत व्याजाचे पैसे देणाऱ्यांची दाणादाण उडविली अशी ही उदाहरणे आहेत. 


मागील आठवड्यात तर हॉटेल व्यावसायिक युवकाने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे ऐकिवात आला. त्यांच्या या कृतीला प्रतिउत्तर म्हणून व्याजाने पैसे देणाऱ्यांने ही आत्महत्येचा प्रयत्न करत तोडीसतोड उत्तर देऊन वेगळाच पायंडा पडण्याचा प्रयत्न केला आहे. 


नीरा शहर व परिसरात पुरुष आत्महत्या का करतायेत ही न उकलणारे कोडे आहे. 


वरील मुद्द्यांवर आधारीत स्तंभलेखन हवे आहे.

Monday, December 1, 2025

नीरा येथील ज्येष्ठ नागरिक निर्मला तेजमल जैन यांचे निधन : मरनोत्तर नेत्रदान करून मानवतेची सेवा

 नीरा येथील ज्येष्ठ नागरिक निर्मला तेजमल जैन यांचे निधन : मरनोत्तर नेत्रदान करून मानवतेची सेवा 




नीरा (ता. पुरंदर) : नीरा शहरातील ज्येष्ठ नागरिक आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्मला तेजमल जैन (वय ८२) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने नीरा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शांत, संयमी स्वभाव, कुटुंबाबद्दलची निस्सीम निष्ठा आणि सामाजिक जाण या गुणांमुळे त्या परिसरात सर्वश्रुत होत्या. 


         निर्मला जैन यांनी आपल्या आयुष्यात कुटुंब एकत्र ठेवण्याचे कार्य जपले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना तसेच नातवंडे असा मोठा परिवार आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांवर त्यांचा मायेचा आणि अनुशासनाचा हात सदैव राहिला. नीरा येथील दिनेश मेडिकलचे मालक नरेंद्र जैन तसेच संतोष जैन व दिनेश जैन यांच्या त्या मातोश्री होत. 


          विशेष म्हणजे, आपल्या जीवनातील परोपकारी वृत्तीचे दर्शन देत त्यांच्या कुटुंबीयांनी मातोश्रींचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोन व्यक्तींना नवे प्रकाशमान आयुष्य मिळणार आहे. नेत्रदान हा मानवतेचा सर्वोच्च आदर्श मानला जातो आणि जैन कुटुंबाने त्याची कर्तव्यदक्षपणे अंमलबजावणी केली याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 


           निर्मला जैन यांचा सौम्य, स्नेहपूर्ण आणि जिव्हाळ्याचा स्वभावामुळे त्यांचे मित्रपरिवार, नातेवाईक आणि शेजारी त्यांना विशेष प्रेम करीत. त्यांच्या निधनाने नीरा शहरात एक पोकळी निर्माण झाली आहे. अंत्यसंस्कार त्यांच्या नीरा गावी धार्मिक विधीनुसार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी नीरा मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर, केमिस्ट असोसिएशनचे सर्व सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, राजकीय, सामाजिक, शैक्षणीक, धार्मीक, पत्रकारीता, क्रिडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. 

ओम शांती..

Featured Post

लग्नाच्या आनंदात शिक्षणाची देणगी; वरात टाळून शाळा विकासासाठी नवदांपत्याचे प्रेरणादायी पाऊल

 लग्नाच्या आनंदात शिक्षणाची देणगी; वरात टाळून शाळा विकासासाठी नवदांपत्याचे प्रेरणादायी पाऊल  पुरंदर :       खर्चिक वरात, आहेर-भेटवस्तूंच्या ...