Saturday, December 27, 2025

युईआय ग्लोबल एज्युकेशनची तिसरी राष्ट्रीय ‘युसीसी’ पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न

 युईआय ग्लोबल एज्युकेशनची तिसरी राष्ट्रीय ‘युसीसी’ पाककृती स्पर्धा उत्साहात संपन्न

दिल्लीच्या विनोद विश्वकर्मा यांना प्रथम, पुण्याला दुसरा क्रमांक




पुणे | प्रतिनिधी

युईआय ग्लोबल एज्युकेशन संस्थेच्या वतीने आयोजित तिसरी संस्थांतर्गत राष्ट्रीय पाककृती (क्युलिनरी) स्पर्धा अर्थात युसीसी (UCC) पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत देशभरातील युईआय ग्लोबलच्या नऊ अभ्यासकेंद्रांमधील प्रथम वर्षाच्या १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या चुरशीच्या स्पर्धेत दिल्लीच्या विनोद विश्वकर्मा यांनी उत्कृष्ट पाककृती सादर करत प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना मानाचा चषक, ‘मास्टर शेफ 2025’ हा किताब, रोख ५१ हजार रुपये, पदक व गोल्डन शेफ कोट देऊन गौरविण्यात आले.

पुण्याच्या ओंकार राजू देशमुख याने दुसरा क्रमांक मिळवला (रोख ३१ हजार रुपये), तर दंडोती मोहम्मद दानिश रियाज (पुणे) याने तिसरा क्रमांक पटकावला (रोख ११ हजार रुपये).

याशिवाय मिस्ट्री बॉक्स चॅलेंजमध्ये महाराष्ट्राच्या शैलेंद्र लक्ष्मण परदेशी यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर ग्लोबल बिर्याणी फेरीत दिल्लीच्या अमिनेश अंबर यांनी बाजी मारली.

ही स्पर्धा हॉटेल मॅनेजमेंट शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी असून, येथे विद्यार्थ्यांनी भारतीय, प्रादेशिक तसेच आंतरराष्ट्रीय पदार्थ सादर करत परीक्षकांची दाद मिळवली. ‘मास्टर शेफ’च्या धर्तीवर घेण्यात येणारी ही स्पर्धा विशेषतः प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते.



पारितोषिक वितरण समारंभ आयसीएफ अध्यक्ष शेफ देवींदरकुमार, उपाध्यक्ष शेफ सिरीश सक्सेना, महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अधिकारी डॉ. जयदीप निकम, रेडिसन हॉटेलचे व्यवस्थापकीय संचालक पंकज सक्सेना, देवव्रत जातेगांवकर, रिट्झ कार्लटनचे व्यवस्थापकीय संचालक श्रीकांत पाट्रो तसेच युईआय ग्लोबलचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक मनीष खन्ना यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी स्पर्धकांचे कौतुक करत हॉटेल व्यवस्थापन व पाहुणचार क्षेत्रात उज्ज्वल भवितव्याच्या शुभेच्छा दिल्या. तर मनीष खन्ना यांनी सांगितले की, “युसीसी स्पर्धा विद्यार्थ्यांमधील नवनिर्मिती, कल्पकता, कष्ट करण्याची तयारी, तंत्रज्ञानाची जाण आणि चवीचा कस विकसित करणारी आहे. गेल्या १९ वर्षांपासून युईआय ग्लोबल संस्था विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आमचे विद्यार्थी चमकत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.”

विद्यार्थ्यांना उद्योगजगतात ओळख मिळावी यासाठी पुणे, महाराष्ट्र व देशभरातील हॉटेल व्यवसायातील अनेक दिग्गजांना या स्पर्धेसाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे परीक्षण करून मार्गदर्शनही केले.


No comments:

Post a Comment

Featured Post

बाबुर्डी येथे MAHAVISTAR AI अ‍ॅपचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 बाबुर्डी येथे MAHAVISTAR AI अ‍ॅपचे प्रात्यक्षिक मार्गदर्शन; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  बारामती :           डिजिटल तंत्रज्ञानाच्या साह...