इतिहासावर बुलडोझर नको!” निरा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावर हात टाकताच संताप उसळला; निर्णय मागे घ्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा

इतिहासावर बुलडोझर नको!” निरा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलावर हात टाकताच संताप उसळला; निर्णय मागे घ्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा 



पुरंदर : 

         पुरंदर तालुक्यातील निरा नदीवरील सुमारे शतकभर जुना ब्रिटिशकालीन दगडी पूल पाडण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी यांनी दिल्याची माहिती समोर येताच निरा व पाडेगाव परिसरात संतापाची लाट उसळली आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याशी ऐतिहासिक, धार्मिक आणि भावनिक नाते असलेल्या या पुलाला बुलडोझर लावण्याऐवजी त्याचे जतन व बळकटीकरण करावे, अशी ठाम मागणी ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केली असून, प्रशासनाने निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. 


          निरा नदीवरील हा दगडी पूल सुमारे १९२७ मध्ये वाल्हाचे अभियंता कृष्णा मांडके यांनी उभारल्याचे सांगितले जाते. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील हा पूल वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दरवर्षी लाखो भाविकांच्या साक्षीने संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी या पुलावरून सातारा जिल्ह्याकडे प्रस्थान करते. त्यामुळे हा पूल केवळ दळणवळणाचे साधन नसून, धार्मिक परंपरा आणि इतिहासाचा साक्षीदार मानला जातो. 


    जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षेचा मुद्दा पुढे करत पूल पाडण्याचे आदेश दिल्याची चर्चा सुरू होताच स्थानिक नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ग्रामस्थ टी. के. जगताप यांनी संतप्त शब्दांत म्हटले की, “१९२७ मध्ये बांधलेला हा पूल अजूनही खणखणीत आहे. नीरा नदी आणि पुलाचे अतूट नाते आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय कोणाच्या मागणीवर घेतला, हे स्पष्ट करावे. हा निर्णय जनतेवर लादला तर तीव्र जनप्रक्षोभ उसळेल.” 


      एन.सी.पी. महाराष्ट्र प्रदेशाचे सदस्य दिपक उर्फ कांचनदादा निगडे देशमुख यांनी ब्रिटिशकालीन बांधकामाच्या गुणवत्तेचा दाखला देत सांगितले, “अलीकडील अभियंत्यांनाही लाजवेल असे हे काम आहे. अशा वास्तू पाडून इतिहास नष्ट करण्याऐवजी त्या अभ्यासासाठी जतन कराव्यात. वाहतूक बंद करावी, पण पूल पाडू नये.” 


      सामाजिक कार्यकर्ते मंगेश ढमाळ यांनी हा प्रश्न अस्मितेशी जोडत इशारा दिला, “नीरेचा हा पूल आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. विकासाच्या नावाखाली इतिहास पुसला जाऊ नये. प्रशासनाने तात्काळ पुनर्विचार करावा; अन्यथा नागरिक लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करतील.” 


       सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे यांनी पालखी परंपरेचा संदर्भ देत म्हटले, “शतकानुशतके वारकऱ्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा पूल आहे. तो पाडण्याऐवजी दुरुस्ती करून जतन करावा. पुणे व सातारा जिल्ह्यांनी संयुक्तपणे सकारात्मक निर्णय घ्यावा.” 


      ग्रामस्थ सुरेंद्र जेधे यांनीही पुलाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करत सांगितले, “हा पूल गावाच्या वैभवाचा दुवा आहे. शासनाने बळकटीकरणासाठी निधी द्यावा.” 


        उमेश चव्हाण यांनी पुलाच्या वास्तुकलेचे कौतुक करत तो “चालता-बोलता इतिहास” असल्याचे म्हटले, तर गणेश जाधव यांनी पूल जतन करून वॉकिंग प्लाझा व सुशोभिकरण करण्याचा प्रस्ताव मांडला. शामराव धुमाळ यांनी “कोणत्याही परिस्थितीत पूल पाडू देणार नाही, गरज पडल्यास मोठे जनआंदोलन उभे करू,” असा निर्धार व्यक्त केला. 


     अनिल कदम यांनी एकतर्फी निर्णयावर आक्षेप घेत “सखोल तांत्रिक तपासणी करून हा ऐतिहासिक ठेवा जपला पाहिजे,” असे सांगितले. सागर शिंदे यांनी “आंदोलन करूया सगळेच,” अशी हाक दिली. दत्ता शिंदे यांनी “वारसा पाडू नका,” अशी विनंती केली, तर सतिश फरांदे यांनी सरकारी स्तरावर पत्रव्यवहार करण्याचे आवाहन केले. 


       दिनेश ओसवाल यांनी नवीन पूल बांधल्यास हरकत नाही; मात्र जुना पूल कायम ठेवावा, असे मत मांडले. दुसरीकडे श्रीकांत पवार यांनी “तज्ञ अभियंत्यांचा अहवाल घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने निर्णय घेतला असेल, तर तो विचारात घ्यावा,” अशी संतुलित भूमिका मांडली. 


       दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर घाईघाईत निर्णय घेतल्याचा आरोप करत, पुलाच्या पाडावाऐवजी दुरुस्ती, संवर्धन आणि वारसा स्थळ म्हणून जतन करण्याची मागणी जोर धरत आहे. ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या या पुलाच्या भवितव्यावरून नीरा परिसरात वातावरण तापले असून, प्रशासनाने निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी सर्वपक्षीय व सर्वसामान्यांची एकमुखी मागणी होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.