कर्नाटकच्या मुजोरीविरुद्ध संसदेत गदारोळ, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी लोकसभा दणाणून सोडली

म हाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात कन्नडिगांनी माजवलेल्या उच्छादाचे तीव्र पडसाद आज संसदेत उमटले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी कर्नाटकच्या मुजोरीविरुद्ध लोकसभेत जोरदार आवाज उठवला. यावेळी कर्नाटकच्या खासदारांनी नाक खुपसण्याचा प्रयत्न केल्याने सभागृहात शाब्दिक चकमक झडली आणि प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर संसद भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ासमोरही राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या खासदारांनी निदर्शने केली. ' बिदर , भालकी , बेळगाव , कारवार , निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ', अशा घोषणांनी यावेळी संसद भवन परिसर दणाणून गेला. दरम्यान , सीमाभागात तणावाची स्थिती कायम असून चिपळूण , संभाजीनगर , सोलापूर येथे आज कर्नाटकच्या बसेसना लक्ष्य करण्यात आले , तर मुंबईत आणि नाशिकमध्ये कर्नाटक बँकेच्या फलकाला काळे फासण्यात आले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर शून्य पहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार विनायक राऊत यांनी सीमाप्रश्नाचा मुद्दा मांडत क...