"दोन वर्षांत तुम्हाला देईन उज्ज्वल भारत"; केसीआर यांचा आता राष्ट्रीय राजकारणासाठी प्लान
हैदराबाद : तेलंगणामध्ये यशस्वीपणे सरकार चालवणारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) लवकरच देशव्यापी संघटना बनवण्यासाठी ठोस मोहीम राबविणार असून , याची सुरुवात सर्वाधिक संकटग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या महाराष्ट्रातून होईल , असे बीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले. मला दोन वर्षे द्या , मी उज्ज्वल भारत देईन , अशी ग्वाही त्यांनी दिली. लोकमत समूहाला दिलेल्या विशेष मुलाखतीत राव म्हणाले की , तख्त सचखंड श्री हुजूर साहिब अबचलनगर साहिब हे शिखांच्या पाच तख्तांपैकी एक तख्त असलेल्या नांदेड येथून पक्ष विस्ताराची सुरुवात करणार आहोत. तेलंगणाचा यशस्वीरित्या विकास केल्यानंतर तेथील मॉडेल देशभरात गाजत असून , भारत राष्ट्र समितीच्या माध्यमातून तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रीय राजकारणासाठी ' प्लान ' तयार केला आहे. यासाठी देशातील सहा लाख गावांमध्ये भारत राष्ट्र समिती पोहोचवण्यात येणार असल्याचेही त्यांनी ' लोकमत ' ला सांगितले. बीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ' लोकमत ' शी खास बातचित केली...