अपूर्ण रस्त्यामुळे दिवे घाटात माऊलींची पालखी खोळंबली; लाखो वारकऱ्यांचा संताप काम वेळेत पूर्ण करण्यात प्रशासनाला अपयश; दिवे घाटात वाहतूक आणि पालखीला विलंब
अपूर्ण रस्त्यामुळे दिवे घाटात माऊलींची पालखी खोळंबली; लाखो वारकऱ्यांचा संताप
काम वेळेत पूर्ण करण्यात प्रशासनाला अपयश; दिवे घाटात वाहतूक आणि पालखीला विलंब
पुरंदर | दिवे :
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी दरवर्षी लाखो वारकरी दिवे घाटातून मार्गक्रमण करतात. हा सोहळा निश्चित तारखेला होतो, हे माहिती असतानाही दिवे घाटातील रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यात संबंधित यंत्रणेला अपयश आल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले. अपूर्ण रस्त्यामुळे पालखीला घाट पार करण्यासाठी नेहमीपेक्षा अधिक वेळ लागला आणि यामुळे वारकरी, भाविक तसेच स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
"ज्ञानोबा-तुकाराम"च्या अखंड गजरात माऊलींच्या पालखीने सायंकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पुरंदर तालुक्यात प्रवेश केला. ऐतिहासिक दिवे घाटातून पालखीचे आगमन उत्साहात झाले असले, तरी अपूर्ण रस्ता, खडी, धूळ आणि अरुंद झालेला मार्ग यामुळे पालखीच्या हालचाली संथ झाल्या. लाखो वारकऱ्यांना चालताना मोठी कसरत करावी लागली.
वारकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना, "पालखीची तारीख वर्षभर आधी निश्चित असते. तरीही प्रशासनाला रस्ता वेळेत पूर्ण करता आला नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. संतांच्या पालखी मार्गालाच प्राधान्य न देणारी ही नियोजनशून्यता आहे," अशी भावना व्यक्त केली.
पालखी मार्गावरील कामामुळे वाहतुकीवरही परिणाम झाला. घाटात काही काळ संथ गतीने वाहतूक सुरू होती. धूळ, खडी आणि अपूर्ण डांबरीकरणामुळे ज्येष्ठ वारकरी, महिला आणि लहान मुलांना विशेष त्रास सहन करावा लागला.
दिवे घाट पार केल्यानंतर पालखीने विसावा घेतला असून, रात्री उशिरा ११च्या सुमारास माऊलींची पालखी सासवड येथे मुक्कामी दाखल होणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी सासवड शहर सज्ज असले, तरी दिवे घाटातील अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे यंदाच्या सोहळ्यावर नाराजीची छाया पडल्याची चर्चा वारकरी वर्तुळात होती.
दरवर्षी लाखो वारकरी या मार्गाने जात असताना पालखीपूर्वीच रस्त्यांची कामे पूर्ण करणे ही संबंधित विभागांची जबाबदारी आहे. मात्र यंदा ती पार पाडण्यात आलेले अपयश उघड झाल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा