पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदारावर कारवाई कधी? बी.एम. काळे माफीने गुन्हा धुतला जात नाही; पुरंदर तालुका पत्रकार संघाची आक्रमक भूमिका
पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदारावर कारवाई कधी? बी.एम. काळे
माफीने गुन्हा धुतला जात नाही; पुरंदर तालुका पत्रकार संघाची आक्रमक भूमिका
सासवड :
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांनाच "मारून टाकीन" अशी धमकी देणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्यावर केवळ निषेधाच्या घोषणा करून भागणार नाही, तर कायद्याचा बडगा उगारला गेला पाहिजे, असे मत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे बी.एम. काळे यांनी व्यक्त केले
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न पुणे जिल्हा पत्रकार संघ, डिजिटल मिडिया परिषद पुणे व पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने सासवड पोलीस स्टेशनचे निरिक्षक संतोष घोळवे यांना निवेदन देऊन भारतीय न्याय संहितेतील कलमान्वये खासदार संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.
यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक बी.एम. काळे, डिजिटल मिडिया परिषदेचे पुणे जिल्हा अध्यक्ष भरत निगडे, राज्य सरचिटणीस राहुल शिंदे, दत्ता भोंगळे, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे, किशोर कुदळे, निलेश भुजबळ, मंगेश गायकवाड, समिर भुजबळ, चंद्रकांत चौंडकर, संतोष डुबल, राजेंद्र शिंदे, अमृत भांडवलकर, आझिम आतार, महावीर भुजबळ, सुनील धिवार, ए.टी.माने, संतोष डुबल, अनिकेत काळे, सुजाता गुरव, छाया नानगुडे, योगेश खुटवड, कृष्णा फुलावरे, निलेश झेंडे, योगेश घोरपडे, दि.चि. कदम, यांसह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
पत्रकारांनी आपले व्यावसायिक कर्तव्य बजावत प्रश्न विचारले म्हणून त्यांना जीवे मारण्याची धमकी देणे, अर्वाच्च शिवीगाळ करणे आणि दहशतीचे वातावरण निर्माण करणे ही लोकशाहीला काळिमा फासणारी बाब असल्याचे मराठी पत्रकार परिषदेचे सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांनी म्हटले आहे. जनतेसमोर आदर्श ठेवण्याची जबाबदारी असलेल्या लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारची भाषा वापरली जाणे हे अधिक गंभीर असल्याची टीका करण्यात आली आहे.
घटनेनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आणि वाढता विरोध पाहून खासदारांनी व्हिडिओद्वारे माफी मागितली. मात्र, "माफी मागितल्याने गुन्हा संपत नाही; कायदा सर्वांसाठी समान असला पाहिजे," असा स्पष्ट इशारा पत्रकार संघाचे दत्ता भोंगळे यांनी दिला आहे.
पत्रकारांना धमकावून सत्य दडपण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. अशा घटनांकडे दुर्लक्ष झाले, तर पत्रकारांवरील हल्ले आणि दडपशाहीला खतपाणी मिळेल, अशी भीती योगेश कामथे यांनी व्यक्त केले आहे.
कायदा सामान्य नागरिकांसाठी एक आणि लोकप्रतिनिधींसाठी दुसरा असू शकत नाही. पत्रकारांना धमकावणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली तरच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि पत्रकारितेचा सन्मान अबाधित राहील, अशी संतप्त भावना पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी व्यक्त केली.




टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा