नीरा-शिवतक्रारमध्ये रंगणार ‘द लिजेंडरी नाईट’; किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांना उजाळा
नीरा-शिवतक्रारमध्ये रंगणार ‘द लिजेंडरी नाईट’; किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांना उजाळा
पुरंदर :
भारतीय संगीताच्या सुवर्णकाळाची आठवण करून देणारी आणि ज्येष्ठ गायक किशोर कुमार यांच्या अजरामर गीतांना आदरांजली वाहणारी ‘द लिजेंडरी नाईट’ ही विशेष संगीत मैफल शनिवारी (दि.२२ ऑगस्ट) नीरा-शिवतक्रार येथे रंगणार आहे. संगीतप्रेमींसाठी ही मैफल पर्वणी ठरणार असून, किशोर कुमार यांच्या गाजलेल्या गीतांचे सादरीकरण स्थानिक व प्रतिभावान गायकांच्या आवाजातून अनुभवता येणार आहे.
ऑर्केस्ट्रा एव्हरग्रीनच्या वतीने प्रथमच नीरा-शिवतक्रार परिसरात या भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे अडीच तासांच्या या विशेष कार्यक्रमात किशोर कुमार यांच्या सदाबहार गीतांचा नजराणा संगीतप्रेमींना अनुभवता येणार आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील रोमँटिक, भावगीत, विरहगीत तसेच उत्साहपूर्ण गाण्यांची विविधता या मैफलीतून सादर होणार असल्याने रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
या कार्यक्रमात स्थानिक गायक प्राजक्ता पवार, सचिन अग्रवाल, प्रसाद कामतकर, प्रकाश जगदाळे, दीपक आळंदीकर, शुभम आळंदीकर आणि कल्पना शिरसाट हे गायक-गायिका किशोर कुमार यांच्या लोकप्रिय गीतांना आपल्या आवाजातून उजाळा देणार आहेत. किशोर कुमार यांच्या गायकीची खासियत असलेली सहजता, भावपूर्णता आणि आवाजातील जादू अनुभवण्याची संधी या मैफलीतून मिळणार आहे.
कार्यक्रमासाठी मॅजिकस्टार ग्रुप ऑफ कंपनीज हे मुख्य प्रायोजक असून, मे. रघुनाथ रामजी डोईफोडे फूडमॉल अँड डी मॉल, नीरा आणि वर्धमान मोबाईल, नीरा यांचे सहप्रायोजक म्हणून सहकार्य लाभले आहे. अॅड. पृथ्वीराज हनुमंतराव चव्हाण आणि प्रमोद काकडे यांच्या सहकार्यानेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, दि.२२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता जॅगवार मॉल, नीरा-शिवतक्रार येथे ही संगीत मैफल होणार आहे. कार्यक्रमास सर्व संगीतप्रेमींना विनामूल्य प्रवेश असून, आपल्या कुटुंबीयांसह आणि मित्रपरिवारासह उपस्थित राहून या अविस्मरणीय सांगीतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा