नीरेत एटीएम फसवणुकीची मालिका; बँका आणि यंत्रणा झोपेत, भामटे मात्र मोकाट! आठवडाभरात दुसरी घटना; ४० हजारांचा गंडा, तक्रारदाराची पोलिस आणि बँकांकडूनही हेलपाटे
नीरेत एटीएम फसवणुकीची मालिका; बँका आणि यंत्रणा झोपेत, भामटे मात्र मोकाट!
आठवडाभरात दुसरी घटना; ४० हजारांचा गंडा, तक्रारदाराची पोलिस आणि बँकांकडूनही हेलपाटे
पुरंदर :
पुरंदर तालुक्यातील नीरा शहरात एटीएममधून पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या भामट्यांचा सुळसुळाट झाला असून, आठवडाभरात दुसऱ्यांदा एका खातेदाराची हजारो रुपयांची फसवणूक झाल्याने बँकांची सुरक्षा व्यवस्था आणि संबंधित यंत्रणांची कार्यपद्धती पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली आहे. नागरिकांचे कष्टाचे पैसे क्षणात लंपास होत असताना बँका आणि यंत्रणा मात्र जबाबदारी झटकत असल्याचे चित्र समोर आले आहे.
मागील आठवड्यात एसबीआयच्या एटीएममध्ये पिंगोरी येथील एका शेतकऱ्याचे एटीएम कार्ड बदलून सुमारे ३० हजार रुपये काढण्यात आले होते. त्या घटनेची धूळही बसलेली नसतानाच गुरुवारी राख येथील मेंढपाळ व्यावसायिक अण्णा महानवर यांची महाराष्ट्र बँकेच्या एटीएममध्ये तब्बल ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
महानवर पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेले असता एका अनोळखी व्यक्तीने "मी मदत करतो" असे सांगून विश्वास संपादन केला. काही क्षणांतच त्यांच्या खात्यातील ४० हजार रुपये काढून तो पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महानवर यांनी तातडीने शेजाच असलेल्या बँकेत धाव घेतली. मात्र, बँक कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित तत्परता न मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी नीरा पोलीस ठाण्यात धाव घेतली; परंतु "तिकडे जा, अर्ज करा, तक्रार करा" अशा स्वरूपाची बोळवण झाल्याने त्यांची अधिकच फरफट झाली. अखेर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी त्यांनी लेखी अर्ज देऊन तक्रार नोंदवली.
शुक्रवारी दिवसभर महानवर विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडे मदतीसाठी फिरत राहिले; मात्र कुठूनही ठोस प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे फसवणुकीचा बळी ठरलेला नागरिक न्यायासाठी दरवाजे ठोठावत राहिला आणि भामटा मात्र मोकाट फिरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
नीरा शहरात वारंवार अशा घटना घडत असताना संबंधित बँकांनी एटीएम केंद्रांवर सुरक्षा रक्षक नेमणे, सीसीटीव्हीवर सातत्याने लक्ष ठेवणे आणि ग्राहकांना तातडीने मदत करण्याची जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. केवळ सूचना फलक लावून जबाबदारी संपत नाही. एटीएम केंद्रे नागरिकांसाठी सुरक्षित आहेत की भामट्यांसाठी मोकळे कुरण, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
दरम्यान, जेजुरी पोलिसांनी नागरिकांना एटीएममध्ये अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नये, एटीएम कार्ड व पिन कोणालाही सांगू नये आणि संशयास्पद हालचाल दिसताच तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. मात्र, केवळ आवाहन करून चालणार नाही; अशा टोळ्यांवर कठोर कारवाई आणि एटीएम सुरक्षेची प्रभावी अंमलबजावणी ही काळाची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा