निरा नगरीत स्वातंत्र्यदिनानिमित्त समूह राष्ट्रगीत गायनाचा ऐतिहासिक उपक्रम. ‘३ मिनिटे देशासाठी’ नागरिकांनी काय करायचं!
निरा नगरीत स्वातंत्र्यदिनानिमित्त समूह राष्ट्रगीत गायनाचा ऐतिहासिक उपक्रम.
‘३ मिनिटे देशासाठी’ नागरिकांनी काय करायचं!
पुरंदर :
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने निरा शहरात यंदा देशभक्तीचा अनोखा जागर होणार असून, ‘३ मिनिटे देशासाठी’ या संकल्पनेतून १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता शहरातील विविध ठिकाणी एकाच वेळी समूह राष्ट्रगीत गायन करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी निरा नगरी सज्ज झाली असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
निरा शहरातील विविध प्रमुख चौक व ठिकाणी एकाच वेळी राष्ट्रगीत प्रसारित करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या जवळच्या प्रसारित ठिकाणी सकाळी १०.३० वाजता उपस्थित राहून राष्ट्रगीत गायनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
निरा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक, जयभवानी जीवनदीप मंडळ, कानिफनाथ तरुण मंडळ, जय शंकर मित्र मंडळ, श्री बुवासाहेब चौक, नगर रोड वरील भैरवनाथ इलेक्ट्रॉनिक्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पालखी मार्गावरील हॉटेल प्रसन्न समोर, वालचंद हॉस्पिटल (डॉ. चकोर), एस.टी. स्टँड समोर आणि भारत शांतीजवळ आदी ठिकाणी एकाचवेळी राष्ट्रगीताचे प्रसारण करण्यात येणार आहे.
या उपक्रमातून स्वातंत्र्यदिनाचा उत्सव केवळ औपचारिक न ठेवता नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अवघ्या तीन मिनिटांसाठी नागरिकांनी एकत्र येत राष्ट्रगीत गायनात सहभागी होऊन देशाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते मंगेश ढमाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मंगेश नानासाहेब ढमाळ मित्र परिवाराच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. निरा व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या देशभक्तीपर उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
‘एकत्र राष्ट्रगीत गाऊया, एकतेचा संदेश देऊया आणि स्वातंत्र्यदिनाचा हा सुवर्ण क्षण अनुभवूया!’


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा