१५ गंभीर गुन्ह्यांतील फरार दिग्या शेंडकर एटीएसच्या जाळ्यात
१५ गंभीर गुन्ह्यांतील फरार दिग्या शेंडकर एटीएसच्या जाळ्यात
पुरंदर 23
सराईत गुन्हेगार दिग्या शेंडकर जेरबंद
सासवड : जबरी चोरी, खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि आर्म ॲक्टसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगार दिगंबर उर्फ दिग्या दशरथ शेंडकर याला पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) सासवड येथून अटक केली आहे. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलिसांना मोठे यश मिळाले आहे.
दिगंबर शेंडकर हा जेजुरी, सासवड आणि शिरूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार होता. ऑक्टोबर २०२५ मध्ये बेलसर येथील सूरज जाधव यांना ट्रान्सफॉर्मर बंद न केल्याच्या कारणावरून लोखंडी रॉड आणि कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यानंतर मार्च २०२६ मध्ये सोनोरी येथील हॉटेल व्यावसायिक राहुल काळे यांच्या हॉटेलमध्ये घुसून मालक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करत काउंटरमधील ३२ हजार रुपये जबरदस्तीने लुटल्याचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे. याच प्रकरणात त्याने यापूर्वी अडीच लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे.
याच महिन्यात शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट ग्राउंडवरील बॅनरच्या वादातून अमोल चौगुले यांच्यावर जीवघेणा हल्ला करत पिस्तुलातून गोळीबार केल्याचा गंभीर गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे.
दिगंबर शेंडकर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, दुखापत, आर्म ॲक्ट आणि मोक्का यांसारखे तब्बल १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी तो सतत वेशांतर करून ठिकाणे बदलत होता. त्यामुळे विविध पोलीस पथके त्याच्या मागावर असूनही तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
दरम्यान, अवैध अग्निशस्त्र विक्रेत्यांशी त्याचे संबंध असल्याची माहिती एटीएसला मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी विशेष पथक नेमले होते. पथकाने तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि पाळत ठेवून अखेर सासवड परिसरातून त्याला ताब्यात घेतले.
दिगंबर शेंडकरला फरार राहण्यासाठी कोणी मदत केली, त्याच्या संपर्कात कोण होते आणि अवैध शस्त्रांच्या रॅकेटशी त्याचे संबंध आहेत का, याचा आता पोलीस सखोल तपास करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, निलेश कदम, विशाल गव्हाणे तसेच पोलीस कर्मचारी मोसीन शेख आणि ओंकार शिंदे यांच्या पथकाने केली.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा