वीजचोरीविरोधी कारवाईदरम्यान महावितरणच्या पथकावर हल्ला
वीजचोरीविरोधी कारवाईदरम्यान महावितरणच्या पथकावर हल्ला
शासकीय कामात अडथळा; अधिकारी-कर्मचाऱ्यांना मारहाण, पाच जणांविरुद्ध जेजुरी पोलिसांत गुन्हा
जेजुरी | प्रतिनिधी
पिसर्वे (ता. पुरंदर) येथील साईलिला हॉटेलवर सुरू असलेल्या वीजचोरीविरोधी कारवाईदरम्यान महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महावितरणचे प्रधानतंत्रज्ञ विक्रम किसनराव तुपे (वय ४१, रा. खंडोबानगर, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप अंकुश कोलते, सचिन कांतीलाल कोलते, गणेश कोलते, वैभव कोलते आणि अरुण अंकुश कोलते (सर्व रा. पिसर्वे, ता. पुरंदर) यांच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १७४/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, दि. २ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता महावितरणचे अधिकारी व कर्मचारी पिसर्वे येथील साईलिला हॉटेलमध्ये वीजचोरीची तपासणी व कारवाई करीत होते. यावेळी त्यांनी संबंधितांना शासकीय ओळखपत्र दाखवून कारवाईबाबत माहिती दिली.
मात्र, आरोपींनी मद्यधुंद अवस्थेत घटनास्थळी येऊन बेकायदा जमाव जमविला. शासकीय कारवाईत अडथळा निर्माण करत कनिष्ठ अभियंता साबळे यांचा मोबाईल फेकून दिला. त्यानंतर फिर्यादी विक्रम तुपे व वरिष्ठ अधिकारी जीवन दिलीप ठोंबरे यांना धक्काबुक्की करून मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
तसेच, पोलीस ठाण्याकडे येत असताना आरोपी वैभव कोलते याने "पुन्हा येथे आलात तर हात-पाय तोडू," अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १३२, १८९(२), १९०, १९१(२), ११५(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उदार करीत आहेत.
क्राईम फाईल
पोलीस ठाणे : जेजुरी
गुन्हा रजिस्टर : १७४/२०२६
घटना : २ जुलै २०२६, दुपारी १.३० वा.
ठिकाण : साईलिला हॉटेलसमोर, पिसर्वे (ता. पुरंदर)
फिर्यादी : विक्रम किसनराव तुपे (प्रधानतंत्रज्ञ, महावितरण)
आरोपी : पाच जण
गुन्ह्याचे स्वरूप : शासकीय कामात अडथळा, मारहाण, धमकी, बेकायदा जमाव
तपास : सहाय्यक पोलीस निरीक्षक उदार

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा