तुमच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून पहिले पाऊल जानेवारी ते डिसेंबर २०२६ मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर
तुमच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून पहिले पाऊल
जानेवारी ते डिसेंबर २०२६ मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर
मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२६ :
माहे जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनच्या ग्राम विकास विभागाने या संदर्भात सविस्तर आदेश जारी केला असून, निवडणूक प्रक्रिया वेळेत पार पाडण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रभाग रचनेची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील सुधारित तरतुदींनुसार ही कार्यवाही केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपण्याच्या सहा महिने अगोदर त्यांच्या क्षेत्र व हद्दीत कोणताही बदल करता येणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम (दिनांक निहाय)
टप्पा १ : प्रारूप प्रभाग रचना तयार करणे
२०/०२/२०२६ – तहसीलदार यांनी गटग्रामांचे नकाशे सुपरइम्पोज करून प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणे.
२७/०२/२०२६ – तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे व सीमा निश्चित करणे.
०५/०३/२०२६ – तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी. (समितीत गटविकास अधिकारी व मंडळ अधिकारी समाविष्ट)
११/०३/२०२६ – प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर करणे.
१७/०३/२०२६ – जिल्हाधिकाऱ्यांकडून नमुना ‘ब’ ची तपासणी व आवश्यक दुरुस्ती करून प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणे.
२३/०३/२०२६ – राज्य निवडणूक आयोगाकडून आवश्यक दुरुस्ती करून मान्यता देणे.
३०/०३/२०२६ – दुरुस्त्या समाविष्ट करून तहसीलदार समितीकडून अंतिम मान्यता व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या.
टप्पा २ : हरकती व सूचना मागविणे
०७/०४/२०२६ – प्रारूप प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देऊन हरकती व सूचना मागविण्याची जाहीर सूचना प्रसिद्ध करणे.
१३/०४/२०२६ – हरकती सादर करण्याचा अंतिम दिनांक.
१६/०४/२०२६ – प्राप्त हरकती व सूचना सुनावणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करणे.
२१/०४/२०२६ – उपविभागीय अधिकाऱ्यांकडून हरकतींवर सुनावणी.
२३/०४/२०२६ – सुनावणीनंतर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणे.
टप्पा ३ : प्रभाग रचना अंतिम करणे
२८/०४/२०२६ – जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम प्रभाग रचना निश्चित करून राज्य निवडणूक आयोगास सादर करणे.
०४/०५/२०२६ – राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेची नमुना ‘अ’ मध्ये व्यापक प्रसिद्धी.
या आदेशावर सह सचिव वर्षा भोसले यांनी स्वाक्षरी केली असून, सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
या कार्यक्रमानुसार एप्रिल अखेरपर्यंत प्रभाग रचना अंतिम होऊन मे महिन्याच्या सुरुवातीला अधिकृत प्रसिद्धी दिली जाणार आहे. त्यामुळे २०२६ मधील ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया वेगाने सुरू होण्याचे स्पष्ट झाले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा