Monday, December 15, 2025

इंदापूरची श्रावणी शिताप कुराश वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड; 57 किलो गटातून राज्यातील पहिली खेळाडू

 इंदापूरची श्रावणी शिताप कुराश वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड; 57 किलो गटातून राज्यातील पहिली खेळाडू



  बारामती


पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील श्रावणी प्रशांत शिताप हिची जानेवारी 2026 मध्ये इराण येथे होणाऱ्या कुराश वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड करण्यात आली आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे पारपडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप निवड चाचणीत श्रावणीने उत्कृष्ट कामगिरी करत पात्र ठरली. 57 किलो वजन गटातून वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळणारी ती महाराष्ट्रातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे.


श्रावणी ही इंदापूरसारख्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातून पुढे आलेली खेळाडू आहे. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर तिने हा टप्पा गाठला आहे. 2024-25 या कालावधीत तिने राष्ट्रीय स्तरावर दोन पदके पटकावली असून तिच्या खेळातील प्रगती सातत्याने दिसून येते आहे.



या यशामागे कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव तसेच इंटरनॅशनल वन स्टार पंच दत्तात्रय व्यवहारे व जयश्री व्यवहारे यांचे विशेष योगदान आहे. इंदापूर परिसरातील गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील शेकडो खेळाडूंना प्रसंगी मोफत प्रशिक्षण देत त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते आणि त्यांचा स्टाफ करीत आहेत.


श्रावणीला कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अंकुश नागर व महासचिव शिवाजी साळुंखे यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे. जानेवारी 2026 मध्ये श्रावणी भारताचे प्रतिनिधित्व करत 57 किलो वजन गटात कुराश स्पर्धेत उतरणार आहे.


तिच्या या ऐतिहासिक निवडीमुळे इंदापूर तालुका तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील कुराशप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्व स्तरांतून श्रावणीवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या यशामुळे आई-वडील व शहा हेल्थ क्लबचा मान अभिमानाने उंचावला आहे. श्रावणीची ही कामगिरी ग्रामीण भागातील खेळाडूंना निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Featured Post

राज्यात १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज; ५ फेब्रुवारीला मतदान

 राज्यात १२ जिल्ह्यांत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज; ५ फेब्रुवारीला मतदान मुंबई :       ...