पुरंदर हादरला... प्रेमविवाहाचा राग ठरला जीवघेणा; तरुणाचा कोयत्याने निर्घृण खून. या हत्याकांडाने पुरंदर तालुक्यात भीतीचे वातावरण
पुरंदर हादरला
प्रेमविवाहाचा राग ठरला जीवघेणा; तरुणाचा कोयत्याने निर्घृण खून.
या हत्याकांडाने पुरंदर तालुक्यात भीतीचे वातावरण
पुरंदर | प्रतिनधी
प्रेमविवाहाचा राग मनात धरून एका तरुणाने थेट सूडाचा मार्ग स्वीकारत नवविवाहित तरुणाचा कोयत्याने निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना पुरंदर तालुक्यात घडली आहे. माळशिरस गावच्या हद्दीतील रामकाठी शेताच्या शिवारात घडलेल्या या हत्याकांडाने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिपक गोरख जगताप (वय २२, रा. राजेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो १३ डिसेंबर रोजी दुपारी घरातून बाहेर पडला होता. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी रामकाठी शेताच्या शिवारात त्याचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. मृतदेहावर डोके, मान, पाठ तसेच उजव्या पायावर धारदार शस्त्राने केलेल्या गंभीर जखमा स्पष्ट दिसून आल्या.
प्राथमिक तपासात हा खून प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या सूडभावनेतून झाल्याचे उघड झाले आहे. आरोपी सुशांत संदीप मापारी (रा. माळशिरस, ता. पुरंदर; मूळ रा. पिंपळगाव, ता. दौंड) याची पूर्वीची प्रेयसी पायल अमोल कांबळे हिने दिपक जगताप याच्याशी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून आरोपीने ही हत्या केल्याचा आरोप आहे.
लग्नानंतरचे वाद मिटविण्याचा आणि पायलचा जुना मोबाईल परत देण्याचा बहाणा करत आरोपीने दिपकला शेतात बोलावून घेतले. तेथे एकांतात संधी साधून आरोपीने धारदार लोखंडी कोयत्याने दिपकवर सपासप वार केले. जागीच मृत्यू झाल्याची खात्री करून आरोपीने घटनास्थळीच हत्यार टाकून पलायन केल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी संतोष रोहिदास शेंडकर (वय ४६, रा. चांबळी, ता. पुरंदर) यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या फरार असून त्याच्या शोधासाठी पोलीस प्रशासनाने विशेष पथके रवाना केली आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील करत असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास जेजुरी पोलिसांनी व्यक्त केला आहे.
प्रेम, राग आणि सूड यांचे भीषण परिणाम या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले असून, एका चुकीच्या निर्णयाने एका तरुणाचे आयुष्य संपुष्टात आल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा