नीरा रेल्वे स्थानकात भीषण अपघात; प्रवाशाचे दोन्ही पाय चुरडले
रेल्वे पोलिस व आरपीएफ मदतील आले नसल्याचा गंभीर आरोप
नीरा : प्रतिनिधी
सोमवारी (दि.२९) सायंकाळी नीरा रेल्वे स्थानकात पुणे–सातारा डेमो रेल्वेमधून उतरत असताना एका तरुणाचा भीषण अपघात झाला. या अपघातात तरुणाचे दोन्ही पाय रेल्वेखाली सापडून पूर्णतः चुरडले गेले असून त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे.
आदित्य साहेबराव होळकर (वय १८, रा. सोमेश्वरनगर, ता. बारामती) असे जखमी तरुणाचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डेमो रेल्वे नीरा स्थानकात थांबत असताना आदित्य उतरण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी तोल गेल्याने तो थेट रेल्वेखाली गेला आणि भीषण अपघात घडला.
अपघातानंतर रेल्वे पोलिस, आर.पी.एफ. तसेच नीरा रेल्वे स्थानकातील कर्मचाऱ्यांनी जखमी प्रवाशाला तत्काळ मदत न केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे नीरा रेल्वे स्थानकातील पोलीस मदत केंद्राला कुलूप लागलेले असून आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही यंत्रणा कार्यरत नसल्याचे चित्र दिसून आले. ही बाब अत्यंत संतापजनक असून रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
दरम्यान, स्थानिक तरुण मदतीला धावून आले. प्रहार संघटनेच्या रुग्णवाहिकेतून जखमी आदित्यला प्रथम लोणंद, त्यानंतर जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला पुण्यातील संचेती रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या घटनेची वरिष्ठ कार्यालयाने तातडीने गंभीर दखल घ्यावी, निष्काळजी कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई करावी तसेच नीरा रेल्वे स्थानकातील सुरक्षा व आपत्कालीन व्यवस्थेचा तात्काळ आढावा घ्यावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments:
Post a Comment