दत्तात्रय रोकडे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
दत्तात्रय रोकडे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
पुणे – शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय सेवा, नवोन्मेषी उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेऊन पुरंदर तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय रोकडे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
निळू फुले सभागृह, राष्ट्र सेवा दल, साने गुरुजी स्मारक, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात माजी आमदार, लेखक व विचारवंत उल्हासदादा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी पुणे विद्यापीठाचे अनिल खरे आणि शिक्षकेतर संघटनेचे राज्य कार्यवाह शिवाजी खांडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
दत्तात्रय रोकडे यांनी अनेक वर्षांपासून शैक्षणिक गुणवत्तावृद्धी, डिजिटल शिक्षणाचा प्रसार, नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी आणि सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्यांच्या अध्यापन पद्धतीतील नाविन्य, विद्यार्थ्यांशी संवादातील सहजता आणि शैक्षणिक प्रगतीत केलेल्या योगदानामुळे ते जिल्ह्यातील आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जातात.
पुरस्कार स्वीकारताना रोकडे यांनी पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, सर्व संचालक, तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी यांचे मनःपूर्वक आभार मानले.
“हा पुरस्कार माझ्या जबाबदाऱ्या वाढवणारा आहे. पुढेही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हेच कार्य अधिक जोमाने सुरू ठेवेन,” असे त्यांनी सांगितले.
पुरस्काराबद्दल पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीशराव उरसळ, कार्याध्यक्ष अजितदादा निगडे, सचिव उत्तम निगडे, संचालक मच्छिंद्रशेठ कुंभारकर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, सेकंडरी सोसायटीचे सुधाकर जगदाळे, राष्ट्रपती पुरस्कार विजेते कुंडलिक मेमाणे, वसंतराव ताकवले, रामप्रभू पेटकर, प्राचार्य इस्माईल सय्यद, मुख्याध्यापिका लता बोकड यांनी त्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमास पुणे जिल्हा शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष संजय धुमाळ, उपाध्यक्ष अशोक बाने, पुरंदर तालुका शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष सिद्राम कांबळे, सचिव कीर्तिकुमार मेमाणे, तसेच बबन खेडकर, विनायक होळकर, मोहन कुंभारकर, ज्ञानदेव ठोंबरे, संदीप इंदलकर, राम भोसले, दत्ता शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
दत्तात्रय रोकडे यांच्या शैक्षणिक सेवेला, कार्यतत्परतेला आणि नेतृत्वक्षमतेला मिळालेला हा पुरस्कार योग्य असा सन्मान असल्याची भावना विविध क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Comments
Post a Comment