पुरंदरमध्ये अजब घटना..
निसर्गाचा अद्भुत चमत्कार! मेंढरू जन्माला पाच पायांसह
पुरंदर :
निसर्ग अनेकदा अशा घटना घडवतो की ज्या पाहून माणूसही थक्क होतो. अशाच एका दुर्मिळ आणि रंजक घटनेमुळे परिसरात एकच चर्चा सुरू झाली आहे. एका शेतकऱ्याच्या गोठ्यात मेंढरू जन्माला आले असून, विशेष म्हणजे या मेंढराला चक्क पाच पाय आहेत.
पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी गावात ही अनोखी घटना घडली असून, संबंधित मेंढीने अलीकडेच एका पाच पायांच्या मेंढराला जन्म दिला आहे. जन्मत:च वेगळेपण दिसत असल्याने शेतकरी कुटुंबासह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. सामान्यतः मेंढरांना चार पाय असतात; मात्र या मेंढराच्या शरीराच्या पुढील बाजूस अतिरिक्त पाय स्पष्टपणे दिसत आहे.
पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, गर्भावस्थेत झालेल्या जैविक बदलांमुळे किंवा अनुवंशिक कारणांमुळे अशा प्रकारची शारीरिक रचना निर्माण होते. ही अवस्था वैद्यकीय भाषेत ‘जन्मजात विकृती’ म्हणून ओळखली जाते. सध्या मेंढरू तंदुरुस्त असून ते दूध पित आहे व हालचालीही सामान्य असल्याचे सांगण्यात आले.
पिसुर्टी येथिल माहादेव सोमा काळे यांच्या मेंढ्यांच्या वाडग्यातील या घटनेमुळे निरा, वाल्हे परिसरातील नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले असून अनेक जण हे मेंढरू पाहण्यासाठी येत आहेत. काहींनी याला निसर्गाचा चमत्कार मानले आहे, तर काहींनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून या घटनेकडे पाहण्याची गरज व्यक्त केली आहे. या दुर्मिळ घटनेमुळे पशुपालन क्षेत्रातही चर्चेला उधाण आले आहे.


No comments:
Post a Comment