Sunday, July 27, 2025

नीरा नदीतल पाणी वाढतंय. नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग

 नीरा नदीतल पाणी वाढतंय. 


नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग 



लोकमत न्यूज नेटवर्क 

नीरा :  नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मागील आठवड्यात पावसाने उसंती घेतल्याने मागील रविवारपासून (दि.२० जुलै) विर धरणातून विसर्ग बंद केला होता. मात्र गुरुवारपासून (दि.२४) पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे काल शनिवारी २.३० वाजल्यापासून वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात ५ हजार ३१८ क्युसेक्सने, आज रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून १४ हजार ४९६ क्युसेक्सने विसर्ग वाढवण्यात आला आहे. 


आज चारही धरणांच्या भांड्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 


       नीरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात असलेले नीरा देवधर धरणात ८६.५४ टक्के पाणीसाठा झाला असून, सकाळी दहा वाजल्यापासून ४ हजार १३० क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भाटघर धरणात ९५.८८ टक्के पाणीसाठा झाला असून, सकाळी दहा वाजल्यापासून भाटघर धरणाच्या अस्वयंचलित द्वारांतून सांडव्याद्वारे ४ हजार क्युसेक्सने तर विद्यूत निर्मिती केंद्रातून १ हजार ६३१ क्युसेक्सने असा नीरा नदिपात्रात ५ हजार ६३१ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. गुंजवणी धरणात  ७५.५२ टक्के पाणीसाठा झाला असून, सकाळी सहा वाजल्यापासून २५० क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या तीन्ही धराणातून मोठ्या प्रमाणावर पाणी वीर धरणात येत आहे. वीर धरणात ९५.३२ टक्के पाणीसाठा झाला असून, वीर धरणाच्या सांडव्यातून सकाळी सहा वाजल्यापासून १४ हजार ४९६ क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 



      नीरा नदीच्या दोन्ही तीरावरील सर्वांनी याबाबत सावधानता बाळगावी असे आव्हान पाटबंधारे विभागाने केले आहे. पावसाचे प्रमाण व पाण्याची आवक लक्षात घेता कोणत्याही क्षणी विसर्गात वाढ अथवा घट केली जाऊ शकते असे ही नीरा पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. 

Friday, July 25, 2025

"महाराष्ट्रातील एक भव्य-दिव्य आणि सुसज्ज पत्रकार भवन म्हणून ओळखले जाईल" : एस. एम. देशमुख. पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या इमारतीच्या पहिल्या स्लॅबचे माजी आमदार संजय जगताप व एस. एम. देशमुख यांनी केले पुजन

"महाराष्ट्रातील एक भव्य-दिव्य आणि सुसज्ज पत्रकार भवन म्हणून ओळखले जाईल" : एस. एम.  देशमुख. 


पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या इमारतीच्या पहिल्या स्लॅबचे माजी आमदार संजय जगताप व एस. एम. देशमुख यांनी केले पुजन 



पुरंदर : 

      "अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या जन्मभूमी परिसरात हे आधुनिक पत्रकार भवन उभे राहात असल्याचा विशेष आनंद आम्हाला आहे. पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने सुसज्ज असे पत्रकार भवन उभे राहात आहे. साडेचार - पाच कोटी रूपयांच्या खर्चातून हे अत्याधुनिक असे पत्रकार भवन उभे राहात आहे, ही बाबा सोपी नव्हे. भूखंडापासून निधी उभारणीपर्यंत अनेक अडथळ्यांवर मात करीत अध्यक्ष योगेश कामथे आणि त्यांच्या टीमने पत्रकार भवनाचे स्वप्न साकार केले आहे. महाराष्ट्रातील एक भव्य-दिव्य आणि सुसज्ज पत्रकार भवन म्हणून ओळखले जाईल" असे मत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केले. 


        पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या इमारतीच्या पहिल्या स्लॅब पुजन कार्यक्रमात देशमुख बोलत होते. पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या इमारतीच्या पहिल्या स्लॅब पुजन पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप व अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते झाले. माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे, साखरे उद्योग समुहाचे दिपक साखरे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, परिषद प्रतिनिधी एम.जी. शेलार, सुनील वाळूंज, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तानाना भोंगळे, मार्गदर्शक बी.एम. काळे, प्रकाश फाळके, सुनील धिवार यांच्या हस्ते नारळ फोडून कार्यारंभ करण्यात आला. मराठी पत्रकार परिषदेचे सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष योगेश कामथे, उपाध्यक्ष प्रवीण नवले, सचिव अमोल बनकर, सहसचिव मंगेश गायकवाड, समन्वयक किशोर कुदळे, कोषाध्यक्ष निलेश भुजबळ, कार्यकारणी सदस्य राहुल शिंदे, समिर भुजबळ, संतोष डुबल, चंद्रकांत चौंडकर, जिल्हा प्रतिनिधी ए.टी. माने, महिला प्रतिनिधी सुजाता गुरव, छायाताई नानगूडे, यवतचे पत्रकार मनोज खंडागळे, हवेलीचे पत्रकार सुनील शिरसाट यांसह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते. 



      "या पत्रकार भवनात राज्यभरातून येणाऱ्या पत्रकारांची निवास व्यवस्था, सुसज्ज ग्रंथालय, बँकेट हॉल, कॉन्फरन्स हॉल, पत्रकारांना बातम्या पाठविण्यासाठी कॉम्प्युटर, वायफाय व्यवस्था असणार आहे. वीजेचा खर्च टाळण्यासाठी सोलार पॅनल उभारण्याचाही मानस आहे. पुढिल काळात याठिकाणी अद्यावत जिम, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके, लेक्चर देण्यासाठी तज्ञ मार्गदर्शकांची सोय केली जाणार आहे. पत्रकारीतेतील नवनवीन गोष्टी युवा पत्रकारांना माहिती होण्यासाठी याठिकाणी प्रशिक्षण मेळावे आयोजित करण्याचा मानस असल्याचे पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. 


    यावेळी झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार संजय जगताप यांनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी नक्की पुर्ण करणार असुन, पत्रकार संघाच्या कार्याचे कौतुक केले. माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे यांनी ही शुभेच्छा दिल्या. पत्रकार संघाच्या इमारतीच्या कामासाठी रात्रंदिवस झाटणारे संघाचे सचिव अमोल बनकर यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. पुजनाचे पौराहित्य संतोष जंगम यांनी केले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष योगेश कामथे यांनी केले. सुत्रसंचलन निलेश जगताप यांनी केले तर आभार बी.एम. काळे यां

नी मानले. 

Saturday, July 19, 2025

नीरेत सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन नागरीकांच्या विविध विभागाच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार

 

नीरेत सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन 


नागरीकांच्या विविध विभागाच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार 



पुरंदर: 

     महसूल विभाग अंतर्गत राज्यातील जनतेची दैनंदिन कामे पूर्ण करणे, महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यात महसूल मंडळ स्तरावर महाराजस्व समाधान शिबिर अभियान व लोकशाही दिनाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यातील वाल्हे मंडल अंतर्गत नीरा येथे सोमवारी (दि.२१) या लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली आहे. 


      पुरंदर तालुक्यामध्ये वेग-वेगळया मंडलस्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिस-या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजित करण्यात येत आहे. त्यामध्ये नागरीकांच्या विविध विभागाच्या अडीअडचणी, तक्रारी, समस्या जाणून घेऊन त्यांचे तक्रारींचे निराकरण करण्याच्या सुचना संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्याना दिल्या जात आहेत. नागरिकांचे प्रश्‍न तालुकास्तरावर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने लोकशाही दिनाचे आयोजन केले आहे. या लोकशाही दिनात सर्व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या हरकती, दावे या लोकशाही दिनात मांडाव्यात असे आव्हान पुरंदर महसूल विभागाने केले आहे. 


     या लोकशाही दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमामध्ये नागरीकांना लाभार्थ्यांना जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले, नॉनक्रिमीलीयर, वय राष्ट्रीय आधिवास व प्रमाणपत्र १५ वर्ष वास्तव्याचा दाखला, अशा विविध प्रकारच्या दाखल्याचे मा. उपविभागीय अधिकारी पुरंदर यांचे हस्ते वाटप करण्यात येणार आहे. तसेच दुय्यम शिधा पत्रिका, वारस नोंदी, फेरफार निर्गती, आधार कार्ड रजिस्ट्रेशन इत्यादींचे वाटप करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी नीरेतील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात जास्तीत जास्ती नागरीकांनी उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन पुरंदरचे तहसीलदार विक्रम रजपूत यांच्या वतीने करण्यात आले आहे. 


खालील सुविधा देण्यात येणार आहेत 

१) संजय गांधी योजना नवीन लाभार्थ्यांची निवड करणे व फॉर्म स्वीकारणे 

२) रेशन कार्ड मधून नावे समाविष्ट करणे व वगळणे 

३) दुबार रेशनिंग कार्ड काढणे 

४) विविध योजनांचे अर्ज स्वीकारणे 

५) उत्पन्न दाखले

६) जातीचे दाखले

सायकल स्पर्धेचे नीरेकरांनी केले स्वागत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सायकल स्पर्धा.

 सायकल स्पर्धेचे नीरेकरांनी केले स्वागत. 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सायकल स्पर्धा. 



पुरंदर : 

        उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त पुणे ते बारामती सायकल स्पर्धा आज शनिवारी पारपडली. नीरा येथे सायकल स्वारांचे आगमन साडेअकराच्या सुमारास झाले. स्पर्धकांचे व आयाजक संदिप कदम यांचे स्वागत हल्लीच्या निनादात मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी नीरा ग्रामपंचायत कार्यालया समोर विद्यार्थ्यांसह नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती. 




   पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय सायकल स्पर्धा २०२५ चे आयोजन केले होते. पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य विराज काकडे, समर्थ पतसंसथेचे चेअरमन राजेश चव्हाण, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य कांचन निगडे, पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष पृथ्वीराज निगडे, सरचिटणीस राजेंद्र थोपटे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला सरचिटनिस तनुजा शहा, अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष नदिम सय्यद, युवराज वणवे, ॲड. आदेश गिरमे, ग्रामपंचात सदस्य अनिल चव्हाण, सुनील चव्हाण, प्रमोद काकडे, अँड. प्रुथ्वीराज चव्हाण, महेश धायगुडे, अजय सोनवणे, उमेश गायकवाड, अभय थोपटे, बाळा लकडे, संतोष मोहिते, बाळासाहेब गार्डी, सागर शिंदे, अनिकेत सोनावणे, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल धुमाळ, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला माने, रयत शिक्षण संकुलातील विद्यार्थी, शिक्षक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.



Thursday, July 17, 2025

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस.टी.च्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक १५ ऑगस्टपासून ऑनलाइन आरक्षणाचीही सुविधा आठ हजार की.मी. प्रवासाची मर्यादा काढणार

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना  एस.टी.च्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देणार 

: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 


१५ ऑगस्टपासून ऑनलाइन आरक्षणाचीही सुविधा 

 आठ हजार की.मी. प्रवासाची मर्यादा काढणार 




मुंबई, दि. १७ :

     महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती देखील लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

    अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना  एस.टी.च्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे.  एसटी बस सीट आरक्षित करण्यासाठी १५ ऑगस्टपासून ऑनलाइन आरक्षणाची सुविधा देण्यात येईल तसेच आठ हजार की.मी. पर्यंत प्रवासाची मर्यादाही काढणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.  

    विधान भवनात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आधीस्वीकृतीधारक पत्रकारांच्या एसटी बस प्रवासाच्या सवलतींच्या मुद्यावर गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दीपक भातुसे, खजिनदार विनोद यादव, कार्यकारिणीचे सदस्य प्रशांत बारसिंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.

  सद्यस्थितीत अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना साध्या, निमआराम व शिवशाही (आसनी/शयनयान) बसप्रकारामध्ये १००% प्रवास भाड्याची सवलत मिळते. मात्र, या सवलतीवर आठ हजार किमीची मर्यादा आहे. ही मर्यादा रद्द करण्याची मागणी वारंवार होत असून, ती मंजूर करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.  तसेच पत्रकारांना  एसटीच्या सर्व बसेस मधून मोफत प्रवास करण्याची सवलत अनुज्ञेय करावी अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत ९ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत केली होती. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिले असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. या मागणीबाबत सकारात्मक प्रस्ताव तयार करण्यात आला असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

   पत्रकारांना एसटी प्रवासासाठी सद्या ऑनलाइन आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध नाही. येत्या १५ ऑगस्टपासून ऑनलाइन सीट आरक्षित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना पुढील महिन्यापासून घरबसल्या एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी सीट आरक्षित करता येईल.  

या निर्णयांमुळे पत्रकारांना काम करताना अधिक सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगत मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री सरनाईक यांचे आभार मानले.

Tuesday, July 15, 2025

सत्य बातमी देणं गुन्हाय काय? नक्कीच नाही.. पण सरकार आणि समाजकंटकांच्या लेखी आता हा गुन्हाच झाला आहे.. कारण बातम्यांमुळे ते नागडे होतात..

 सत्य बातमी देणं गुन्हाय काय?

नक्कीच नाही..

पण सरकार आणि समाजकंटकांच्या लेखी आता हा गुन्हाच झाला आहे..

कारण बातम्यांमुळे ते नागडे होतात.. 

बघा, 



मुंबई : 

     बातमी दिली म्हणून इकडं महाराष्ट्रात स्नेहा बर्वे नावाच्या महिला पत्रकाराला रॉडनं मारहाण केली जाते आणि तिकडं बिहारमध्ये मतदार नोंदणीच्या संदर्भात सत्य उजेडात आणल्याबद्दल पत्रकार अजीत अंजूम यांच्या विरोधात निवडणूक आयोग एफआयआर दाखल करते. दोन्ही घटनांमागचा उद्देश पत्रकारांचा आवाज बंद करणे एवढाच आहे. सरकार आणि समाजकंटकांच्या लेखी आता हा गुन्हाच झाला आहे. कारण अशा बातम्यांमुळे ते नागडे होतात. असे परखड मत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केले आहे. 


     देशमुख पुढे म्हणाले, अजीत अंजूम हे हिंदी पत्रकारितेतलं मोठं नाव. प्रिन्ट, इलेक्ट्रॉनिक माध्यमात काम केल्यानंतर अजीत आता डिजिटल मिडियात कार्यरत आहेत. निर्भिड आणि लोकशाही प्रेमी पत्रकार अशी त्यांची ओळख आहे. 


      बिहार निवडणुकीच्या संदर्भात त्यांनी आपल्या युट्यूब चँनलसाठी काही व्हिडिओ तयार केले. मात्र, मतदार नोंदणी प्रक्रियेत जी गडबड सुरू आहे त्या संदर्भातला एक व्हिडिओ त्यांनी अपलोड करताच निवडणूक आयोगाचे माथे ठणकू लागले. मतदार फॉर्म भरून घेतल्यानंतर त्याची पावती दिली जाईल अशी घोषणा निवडणूक आयोगानं केली होती, तसेच घरोघर जाऊन मतदारयादी तयार केली जाईल असंही निवडणूक आयोगानं सांगितलं होतं. पण आदेश केवळ कागदोपत्री कसे आहेत, कोणालाच पावती कशी दिली जात नाही ही वस्तुस्थिती मांडत अजीत यांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले होते. 


     स्वाभाविकपणे भाजपच्या तालावर नाचणाऱ्या निवडणूक आयोगास अजीत यांचे हे "उद्योग" आवडले नाहीत. त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्या चँनलवर  हटविण्याच्या सूचना केल्या. अजीत यांनी तसे केले नाही. परिणामतः त्यांच्याविरोधात 'सरकारी कामात अडथळे आणणे', 'सरकारी कार्यालयात अवैध प्रवेश करणे', आणि 'जातीयवादी वातावरण तयार करणे'

आदि कलमांखाली गुन्हा दाखल केला गेला आहे.

बेगुसराय येथे हा गुन्हा दाखल झाला आहे. 



हे होत राहणार आहे.

यापुर्वी ४ पीएम हे चँनल बंद केले गेले होते. आता अंजूम यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे.

देशभर पत्रकारांवर हल्ले होत आहेत. महाराष्ट्रात तर अशा घटना रोज घडत आहेत. मात्र सरकार या संदर्भात उदासिन आहे. महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा केवळ कागदोपत्री आहे. नोटिफिकेशन काढून कायदयाची अंमलबजावणी करावी अशी मागणी आम्ही सातत्यानं करतो आहोत. सरकार वेळ मारून नेत आहे. पत्रकार मार खात आहेत. सरकार गंमत बघत आहे. 


     सरकारी कारनामयांचे सत्य बाहेर येतच नाही. 

कारण गोदी मिडिया सरकारी इशाऱ्यावर डोलत असतो. अशा वातावरणात रवीशकुमार, पुण्यप्रसून वाजपेयी, ध्रुव राठी, अभिसार शर्मा, अजीत अंजूम हे आणि असे काही पत्रकार दुसरी बाजू जगासमोर मांडतात. त्यांना देशभर प्रचंड प्रतिसाद मिळतोय.

सरकारची ही डोकेदुखी आणि पोटदुखीही आहे.

त्यामुळेच कधी खोटे गुन्हे दाखल करून, कधी चँनलला टाळे लावून तर कधी थेट पत्रकारांवर हल्ले करून पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा असंख्य घटना देशात घडल्या आहेत. पण एकानं तरी पत्रकारिता सोडलीय का?

नाही. 


      आमचा तुषार खरात एका मंत्र्यांच्या दमननीती विरोधात ठाम उभा राहिला, जो गुन्हा केलाच नाही त्याची शिक्षा म्हणून तीन महिने तुरूंगात राहून आला पण पठ्ठ्या डगमगला नाही. बाहेर आल्यावर त्याच तडफेने पत्रकारिता करीत आहे.

अशी शेकडो उदाहरणं मी देईल.

मग सरकार अशा वांझोट्या लटपटी - खटपटी का करीत राहते?

सरकारनं काहीही करू देत पण या देशातील माध्यमांचा आवाज कोणीही बंद करू शकणार नाही. यापुर्वी ही असे प्रयत्न झाले. तेव्हा वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी पत्रकार एकजूट होऊन लढत राहिले. आजही ही लढाई सुरू आहे. आम्ही अजीत अंजूम यांच्याबरोबर असून त्यांच्यावर दाखल केलेल्या FIR चा आम्ही निषेध करीत आहोत. कारण पत्रकारिता हा गुन्हा नाही असे मत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी व्यक्त केले आहे. 

Friday, July 11, 2025

डिजिटल मिडिया परिषदेचा सप्टेंबरमध्ये संभाजीनगरात राज्यव्यापी मेळावा

डिजिटल मिडिया परिषदेचा सप्टेंबरमध्ये संभाजीनगरात राज्यव्यापी मेळावा 



मुंबई : डिजिटल मिडियात कार्यरत असलेल्या पत्रकारांचा पहिला राज्यव्यापी मेळावा १४ सप्टेंबर २०२५ रोजी संभाजीनगर येथे होत असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर आणि डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी दिली. मेळाव्याचे उद्घाटन राज्यातील पत्रकारांचे नेते एस.एम.देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.


     अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचा एक उपक्रम असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेचा विस्तार राज्यभर झपाट्याने होत आहे. राज्यातील ३० जिल्ह्यात डिजिटल मिडियाच्या शाखा सुरू झाल्या आहेत. सर्वांना एका धाग्यात बांधण्यासाठी एक राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राज्य कार्यकारिणीची घोषणा होणार असून उत्कृष्ट युट्यूब चॅनल आणि पोर्टल चालविणारया दहा संपादकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. 


   दोन सत्रात होणाऱ्या या मेळाव्यात व्यावसायिक पध्दतीने चँनल कसे चालवावे, त्यातून महसूल कसा उभा करावा, या संबंधी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मेळाव्याचे स्थळ आणि अन्य माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.


   राज्यातील युट्यूब, पोर्टलच्या संपादकांनी मेळाव्यास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहनही मिलिंद अष्टीवकर आणि अनिल वाघमारे यांनी केले आहे.

जनतेचा आवाज बंद करणाऱ्या जनसुरक्षा विधेयकावर विरोधक गप्प का? समविचारी कार्यकर्ते पत्रकारांची तातडीने बैठक घेवून विचार मंथन करावे मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे आवाहन

जनतेचा आवाज बंद करणाऱ्या जनसुरक्षा विधेयकावर विरोधक गप्प का?


समविचारी कार्यकर्ते पत्रकारांची तातडीने बैठक घेवून विचार मंथन करावे


मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे आवाहन



मुंबई : सभागृहात बहुमताने जनसुरक्षा विधेयक मंजुर होत असतांना विरोधकांचे गप्प राहणे धोकादायक आणि चिंताजनक असून या कायद्याचा धोका राजकीय पक्षांपेक्षा चळवळीतील कार्यकर्त्यांना अधिक आहे. तसेच चौथ्या स्तंभाचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी जनतेचा आवाज बंद करणाऱ्या विधेयकाला विरोध करण्यासाठी समविचारी कार्यकर्त्यांची व पत्रकारांची तातडीची बैठक घेऊन विचारमंथन व्हावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केले आहे.


एस.एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, प्रश्न सत्ताधाऱ्यांचा नाही.. जनतेचा आवाज बंद करण्यासाठी त्यांना जे शक्य आहे ते करीत राहणारच..ज्यांना आम्ही सपोर्ट करतो ते विरोधक काय करतात हा कळीचा मुद्दा आहे.. 12-13 कोटींची लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातून जनसुरक्षा विधेयकाला विरोध करणाऱ्या फक्त 1200 हरकती? त्यातही आम्ही म्हणजे पत्रकारांनी पाठविलेल्या किमान 500 हरकती.. 10-5 हजार हरकती पाठवू शकतील एवढीही ताकद राज्यात विरोधकांची उरली नाही? समितीत नाना पटोले, जितेंद्र आव्हाड होते.. त्यांनी तिथे काय दिवे लावले ?याचा खुलासा त्यांनी करायला हवा.. सभागृहात विरोधक गप्प का बसले? त्यांनी विधेयकास विरोध का केला नाही? पत्रकार संघटनांनी एकत्र येत मुंबईत आंदोलन केलं, यावेळेसही विरोधकांनी पत्रकारांना पाठिंबा देणारे साधे पत्रकही काढले नाही.. का? जनसुरक्षा कायद्याची चर्चा सुरू झाल्यापासून विरोधक अलिप्त का आहेत? संशय घेता येऊ शकेल असे प्रश्न अनेक आहेत. कोण करणार या साऱ्या शंकांचं निरसन? या कायद्यातले धोके विरोधकांना कळले नाहीत की, हा विषयच त्यांना फार महत्वाचा वाटला नाही..? की सारी मिलिभगत आहे? असेही प्रश्न विचारता येऊ शकतात.. जनसुरक्षा कायदा हा नक्षलवाद विरोधी आहे असं महाराष्ट्र सरकार सांगतंय, पण प्रश्न असा आहे की, ज्या पाच राज्यात 15-20 वर्षांपासून हा कायदा अस्तित्वात आहे तेथील नक्षलवाद संपला का? नाही संपला.. त्यामुळे या कायद्याचा उपयोग तिकडे सरकार विरोधी आवाज दडपून टाकण्यासाठीच झाला..महाराष्ट्रात तेच होणार आहे. या कायद्याचा धोका राजकीय पक्षांपेक्षा चळवळीतल्या कार्यकर्त्यांना, संविधान रक्षणासाठी लढणाऱ्यांना, चौथ्या स्तंभाचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे यासाठी लढणाऱ्या पत्रकारांना अधिक आहे मग आपण का याला विरोध करायचा असा प्रश्न विरोधकांना पडला का ? नेमकं काय झालं.. कळत नाही.. देशातील विरोधकांचा अवसानघातकीपणा, जनहिताच्या प्रश्नापासून अलिप्त राहण्याची वृत्ती हेच भाजपचं बलस्थान आहे..विरोधक अडचणीत असतात तेव्हा त्यांना सामाजिक संघटना, पत्रकारांची मदत हवी असते, मात्र जेव्हा सामान्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा विरोधक मूग गिळून गप्प असतात..का? हरकत नाही..तेही राजकारण करतात.. करू द्या.. पण ज्यांचा या कायद्याला विरोध आहे अशा समविचारी कार्यकर्त्यांनी एक तातडीची बैठक बोलावून त्यावर मंथन केले पाहिजे.. कायद्याच्या विरोधातली ही लढाई रस्त्यावर उतरून करायची की न्यायालयात? यावर चर्चा होऊन निर्णय झाला पाहिजे..कायद्यातील तरतुदींचं गांभीर्य सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे.. विरोधकांकडून आता फार अपेक्षा कोणी करू नये असेही एस.एम.देशमुख यांनी म्हटले आहे.


 



 



Wednesday, July 9, 2025

पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण कधी.. पुरंदर तहसीलदारांनी जाहीर केला दिवस व वेळ.

पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण कधी..


पुरंदर तहसीलदारांनी जाहीर केला दिवस व वेळ.





पुरंदर :
पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत शुक्रवार दि.११ जुलै रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. ही आरक्षण सोडत सासवड नगरपरिषदेच्या आचार्य आत्रे सभागृहात आयोजित करण्यात आली असून ग्रामस्थांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांनी केले आहे.

   तहसील कार्यालयातून दिलेल्या प्रसिद्धीपत्रानूसार सन-२०२५ ते सन २०३० करीता पुणे जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रामीधील ग्रामपंचायातीतील सरपंच पदे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागारीकांचा मागास प्रवर्ग व स्त्रियांसाठी आरक्षित करणेबाबत मा. जिल्हाधिकारी सो पुणे यांनी पत्राद्वारे पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचयातीच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत निश्चीत करणेबाबत कळविलेले आहे. त्याअनुषंगाने दिनांक ११/०७/२०२५ रोजी दुपारी १२:०० वाजता, सासवड नगरपरिषदेचे आचार्य आत्रे सभागृह, सासवड ता. पुरंदर जि. पुणे येथे सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती विक्रम राजपुत, तहसिलदार पुरंदर यांनी दिली आहे. 



Tuesday, July 8, 2025

"कोल्हापूर येथे होत असलेल्या स्वराज्य स्वामिनिष्ठ नरवीर शिवा काशीद यांचा ३६५ वी पुण्यतिथी सोहळ्याला नाभिक बांधवांनी उपस्थित रहावे" : अमर झेंडे. नीरा येथील नाभिक समाजाच्या बैठकीत केले निमंत्रित.

"कोल्हापूर येथे होत असलेल्या स्वराज्य स्वामिनिष्ठ नरवीर शिवा काशीद यांचा ३६५ वी पुण्यतिथी सोहळ्याला नाभिक बांधवांनी उपस्थित रहावे" : अमर झेंडे. 


नीरा येथील नाभिक समाजाच्या बैठकीत केले निमंत्रित. 



पुणे : 

      महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा कोल्हापूर, नरवीर शिवा काशीद समाधी संवर्धन समिती व जिल्हा महिला आघाडी यांच्या वतीने स्वराज्य स्वामिनिष्ठ नरवीर शिवा काशीद यांचा ३६५ वी पुण्यतिथी सोहळा कोल्हापूर येथे होत आहे. या सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात असून पुणे जिल्ह्यातील नाभिक समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन विररत्न शिवा काशिद संवर्धन समिती पन्हाळगडचे निमंत्रक अमर झेंडे यांनी केले आहे. 



    नुकताच अमर झेंडे यांना झी मराठी नाट्य गौरव पुरस्कार २०२५ व्यावसायिक विभाग सर्वोत्कृष्ट सहाय्यक रंगभूषाकार नामांकन पुरस्कार वितरण झाला आहे. हा पुरस्कार सुपरस्टार महानायक बीग बी अमिताभ बच्चन व विद्यमान कॅबिनेट मंत्री प्रकाश  जावडेकर यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर झेंडे यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन निरा व पंचक्रोशीतील नाभिक समाजाच्या बांधवांकडून करण्यात आले होते. यावेळी झालेल्या बैठकीत अमर झेंडे बोलत होते. 


     पुणे जिल्ह्यासह पुरंदर, बारामती तालुक्यातील सर्व नाभिक समाज बंधू-भगिनींना व शिवप्रेमींनी स्वराज्य स्वामिनिष्ठ नरवीर शिवा काशिद पुण्यतिथी सोहळा कोल्हापूर जिल्हा नाभिक महामंडळ व नाभिक समाज सर्व संघटना, यांच्या वतीने रविवार, दि. १३ जुलै २०२५ रोजी पन्हाळगडाच्या पायथ्याशी समाधी स्थळी नेबापूर येथे साजरा करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व समाज बंधू-भगिनी व शिवप्रेमी नागरिक यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. 



या कार्यक्रमात 

सकाळी : ०९.०० वा. स्वामीनिष्ठ नरवीर शिवा काशिद यांच्या समाधीचे पूजन अभिषेक व फुले वाहने

सकाळी : १०.०० वा. स्वामिनिष्ठ नरवीर शिवा काशीद यांच्या पुतळ्यास अभिषेक व पुष्पहार अर्पण करणे

सकाळी : १०.३० वा. बलदंड वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणे

सकाळी : १०.४५ वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणे

दुपारी : ११.०० वा. रक्तदान शिबिर

दुपारी : ११.३० वा. मान्यवरांचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळा

दुपारी : १२.००वा. मा. शाहिर दिलीप सावंत, शिवाजी पेठ, कोल्हापूर यांचा बहारदार पोवाडा

दुपारी : ०१.३० वा. महाप्रसादाचे वाटप सौजन्यः नाभिक युवक संघटना, कोल्हापूर हस्ते - मा. श्री. मोहनराव चव्हाण, अध्यक्ष युवक संघटना, कोल्हापूर असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. 


या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा. खासदार छत्रपती शाहू महाराज,प्रकाश अबिटकरसो मंत्री, सार्वजनिक आरोग्य आणि कुंटूब कल्याण तथा पालकमंत्री, कोल्हापूर, आ.डॉ. विनवरावजी कोरे (आवकर) पन्हाळा शाहूवाडी विधानसभा, खासदार धैर्यशिल माने हातकणंगले लोकसभा मतदारसंघ, आमदार चंद्रदीप नरके, करवीर विधानसभा, भारत पाटील आप्पा मा. उपाध्यक्ष, जिल्हा परिषद, नावेद मुश्रीफ चेअरमन, गोकुळ दुध संघ, सयाजी झुंजार प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळ,  प्रमुख उपस्थिती एम.आर. टिपुगडे प्रदेश मार्गदर्शक, समीर शिंगटे प्राताधिकारी, शाह्वाडी, माधवी शिंदे (जाधव) तहसिलदार, पन्हाळा,  चेतनकुमार माळवी मुख्याधिकारी, पन्हाळा नगरपरिषद, संजय बोंबले सहा. पोलीस निरिक्षक, पन्हाळा, अजित अस्वले कार्य. अभि. महावितरण यांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन मारूती वि. टिपुगडे जिल्हाध्यक्ष, बाबासाहेब ग. काशीद पश्चिम महाराष्ट्र विभागिय अध्यक्ष, मेधाराणी गु. जाधव महिला जिल्हाध्यक्षा, दिगंबर टिपुगडे जिल्हा कार्याध्यक्ष, सुनिल इंगळे जिल्हा कार्याध्यक्ष, अनिल संकपाळ जिल्हा कोषाध्यक्ष, मयुर रोकडे जिल्हा सरचिटणीस, गजानन शिंदे अध्यक्ष, संवर्धन कमिटी. यांसह सर्व पदाधिकारी- महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा कोल्हापूर जिल्हा, नरवीर शिवा काशीद समाधी संवर्धन समिती व जिल्हा महिला आघाडी आणि नाभिक समाज सर्व संस्था यांनी नियोजन केले आहे. कार्यक्रमाचे स्थळ पन्हाळा नगरपरिषद हॉल, एसटी स्टैंड पाठीमागे, पन्हाळा या ठिकाणी होणार आहे. 





Monday, July 7, 2025

नीरा येथील ७५ वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू. चारचाकी वाहनाने दुचाकीला पालखी मार्गावर पाठिमागून ठोकरले.

 नीरा येथील ७५ वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू 


चारचाकी वाहनाने दुचाकीला पालखी मार्गावर पाठिमागून ठोकरले. 



पुरंदर : 

     पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील वाल्हे गावचे हद्दीत माळवाडी जवळील उड्डानपुलाच्या उतारावर चारचाकी व मोटरसायकल यांच्यात अपघात होऊन एक जण ठार झाले आहेत. दुचाकीस्वार अलाउदीन खुदबुध्दीन सय्यद (वय ७५ वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. गणेष बाळकृष्ण घाडगे (वय ४२ वर्षे) रा. एकंबे (ता. कोरेगाव जि. सातारा) यांच्या विरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात फिरोज अल्लाउदीन सय्यद (वय ४७ वर्षे) रा. शिवतक्रारवाडी नीरा यांनी जेजुरी पोलीसांत फिर्याद दाखल केली आहे. 


     याबाबत जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (दि. ७ जुलै)  दुपारी  सव्वा चार वाजता सुमा टाटा नेक्सॉन चार चाकी गाडी न. एम. एच. ११ सी. क्यु  २८५७ वरील चालक गणेश बाळकृष्ण घाडगे (वय ४२ वर्षे) रा. एकंबे ता. कोरेगाव जि. सातारा याने त्याचे ताब्यातील वाहन जेजुरी बाजुकडुन नीरा बाजुकडे घेवुन जात असताना ते हयगयीने निष्काळजीपणे, भरधाव वेगात चालवुन, रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करून चालवून, त्याचे समोर जेजुरी बाजुकडुन नीरा बाजुकडे जाणारे दुचाकी क्र. एम. एच. ११ ए.जे ९३७६ वरील अलाउदीन खुदबुध्दीन सय्यद (वय ७५ वर्षे) रा. शिवतक्रारवाडी नीरा वार्ड नं ५ (ता. पुरंदर जि. पुणे) यांचे दुचाकीस पाठीमागुन ठोस देवुन अपघात करून अपघातामध्ये अलाउदीन खुदबुध्दीन सय्यद याचे डोकीस व शरीरावर झालेल्या जखमास व मृत्युस व दोन्ही वाहनाचे नुकसानीस कारणीभूत झाले आहेत. म्हणुन सय्यद यांनी टाटा नेक्सॉन चार चाकी गाडी न. एम. एच.११ सी. क्यु २८५७ वरील चालक गणेश बाळकृष्ण घाडगे (वय ४२ वर्षे) रा. एकबे ता. कोरेगाव जि. सातारा याचेविरूध्द कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे. यावरून जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     या घटनेच अधिक तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई सर्जेराव पुजारी हे करीत आहेत.

पीएम किसानचा २० वा हप्ता या दिवशी खात्यात! तुमचं नाव यादीत आहे का?

पीएम किसानचा २० वा हप्ता या दिवशी खात्यात! 

तुमचं नाव यादीत आहे का? 



पुणे : 

      पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी चालवलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर तीन महिन्यांनी २ हजारांचा हप्ता दिला जातो. त्यामुळे वर्षभरात एकूण ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. आता शेतकरी २० व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 


     यावर्षी पावसाने लवकर सुरुवात केल्यामुळे काही भागात पेरण्या वेळेवर झाल्या नाहीत. काही ठिकाणी पेरणीच पुन्हा करावी लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी येत आहेत. अशा वेळी केंद्र सरकारकडून मिळणारे २ हजार रुपये हे त्यांच्यासाठी खूप उपयोगाचे ठरतील. म्हणून सगळे शेतकरी हप्ता कधी जमा होतोय, याकडे लक्ष ठेवून आहेत. 


       अनेक जण म्हणत होते की जून महिन्याच्या शेवटी हप्ता मिळेल. पण अजून पर्यंत तो जमा झालेला नाही. आता अशी शक्यता आहे की १८ जुलै २०२५ रोजी बिहारमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता ऑनलाइन पद्धतीने जमा केला जाईल. मात्र याबाबत अजून सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही. 


शेतकरी आपलं नाव यादीत आहे का हे तपासण्यासाठी ही सोपी पद्धत आहे: 


तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा संगणकावर https://pmkisan.gov.in ही वेबसाइट उघडा.

त्यावर ‘Farmer Corner’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

त्यानंतर ‘Beneficiary List’ वर क्लिक करा.

आता आधार नंबर किंवा खाते नंबर टाका.

‘Get Data’ वर क्लिक करा आणि तुमचं नाव हप्ता यादीत आहे का ते तपासा.

जर तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण झाली असेल आणि आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक असेल, तर हप्ता थेट खात्यावर जमा होतो. काही अडचण आल्यास तुम्ही खालील हेल्पलाईन नंबरवर फोन करू शकता: 


पीएम किसान हेल्पलाइन: 1800-115-5525

इतर हेल्पलाईन क्रमांक: 155261 / 011-24300606

या योजनेमध्ये एक नविन नियम लागू झाला आहे. आता एका कुटुंबातील (पती, पत्नी, मुलगा किंवा मुलगी) फक्त एका व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळू शकतो. म्हणजे एकाच घरातले सगळे जण पैसे घेऊ शकत नाहीत. यामागे सरकारचा उद्देश असा आहे की खऱ्या शेतकऱ्यांपर्यंतच ही मदत पोहोचावी आणि फसवणूक टाळावी. 


तुम्हाला वेळेवर हप्ता मिळावा यासाठी तुमची सगळी माहिती अपडेट असणं खूप गरजेचं आहे. वेळोवेळी वेबसाईट तपासा आणि तुमची माहिती योग्य आहे का ते खात्री करून घ्या. योग्य माहिती दिली तर तुमचं २ हजारांचा हप्ता तुमच्या बँक खात्यावर वेळेत जमा होईल.

🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨 वीर धरणातून नीरा नदीत विसर्ग वाढवणार नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात वाढता पाऊस.

 🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨🚨

वीर धरणातून नीरा नदीत विसर्ग वाढणार 


नीरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात वाढता पाऊस. 



पुरंदर : 

     पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जिवनदायनी असेलेल्या नीरा नदित पुढील वीर धराणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावली त्यानंतर अद्याप पावसाने विश्रांती घेतली नाही. परिणामी त्यामुळे नीरा नदिवरील वीर धरण ८०.८९ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे वीर धरणातून सोमवारी (दि.८ जुलै) सकाळी ६ वाजता विसर्ग वाढवण्यात येणार असून नीरा नदीच्या पात्रात ९ हजार ६९६ क्युसेक्सने विसर्ग सुरू होतं आहे. 


       नदीत पाणी सोडणार असल्याने काठावरील शेतकरी सुखावले आहेत. नीरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 


    वीर धरण ८०.८९ टक्के भरलेले आहे. नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे नीरा खोऱ्यातील धरणात एकुण क्षमतेच्या ६८ टक्के पाणीसाठा झाला आहे. वीर धरणामध्ये पाण्याची आवक पाहता वीर धरणामधून नीरा नदीमध्ये रविवारी सकाळी सहा वाजल्यापासून ३ हजार ४४० क्युसेक्स वेगाने विसर्ग सोडण्यात आला. धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सोमवारी सकाळी २ हजार ०४० क्युसेक्सने विसर्ग वाढवण्यात आला होता. त्यामुळे दिवसभर ५ हजार ४८० क्युसेक्सने नदि पात्रातून पाणी वाहिले. तर वीर धरण पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान वाढल्याने वीर धरणातून मंगळवारी  (दि.० जुलै) नीरा नदीच्या पात्रात अजून ४ हजार १४८ क्युसेक्सने विसर्ग वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे नीरा नदीच्या पात्रात सकाळी सहा वाजल्यापासून ९ हजार ६९६ क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग फलटण यांनी दिली आहे. 


     तरी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घ्यावी. नदी पात्रात कोणीही जाऊ नये, कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही आव्हान पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

Tuesday, July 1, 2025

शाळा सोडताना विद्यार्थ्यांकडून अवैध वसुली थांबवा: शिक्षण संचालनालयाचा इशारा

 शाळा सोडताना विद्यार्थ्यांकडून अवैध वसुली थांबवा: शिक्षण संचालनालयाचा इशारा

इंदापूरसह राज्यातील शाळांना निर्देश; विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला व मार्कलिस्ट मोफत द्या


पुणे | 2 जुलै २०२५

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांकडून शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) व मार्कलिस्ट देताना कोणतीही रक्कम वसूल करू नये, असा स्पष्ट आदेश दिला आहे.


ही कारवाई श्री. गणेश मोहन गुप्ते आणि श्री. प्रशांत कोरडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, इंदापूर तालुक्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालये हे प्रमाणपत्र देताना प्रति विद्यार्थी ₹२०० बेकायदेशीरपणे घेत आहेत.


संचालनालयाचा कडक इशारा


शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१५/(५५/१५)/समन्वय कक्ष, दिनांक ४ जानेवारी २०१६ नुसार, विद्यार्थ्यांकडून कोणतीही अतिरिक्त रक्कम मागणे नियमबाह्य असून, अशा प्रकारची वसुली झाल्यास शाळांवर थेट कारवाई करण्यात येणार आहे, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.


विद्यार्थ्यांचे दहावी, अकरावी व बारावीचे निकाल लागल्यानंतर, पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी शाळा सोडल्याचा दाखला आणि मार्कलिस्ट अत्यावश्यक असते. परंतु अनेक ठिकाणी पालक आणि विद्यार्थ्यांना पैसे भरल्याशिवाय ही कागदपत्रे दिली जात नाहीत, अशी तक्रार आहे.


मुख्य सूचना:


सर्व विभागीय उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी आपल्या अधीनस्त शाळांना योग्य आदेश द्यावेत.


विद्यार्थ्यांकडून कोणतीही बेकायदेशीर रक्कम घेतल्यास ती परत करून संबंधित शाळांवर कारवाई करावी.


कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास व तक्रारदारास ई-मेलद्वारे सादर करावा.



विद्यार्थ्यांचा हक्क अबाधित ठेवण्याचा निर्णय


हा आदेश म्हणजे शैक्षणिक व्यवस्थेमधील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाचं पाऊल ठरत आहे. आर्थिक अडचणीतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अत्यंत दिलासा देणारा ठरणार आहे.




Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...