Sunday, February 26, 2023

पुरंदर मधील शेतकऱ्याला १०० किलो वांग्याला मिळाले ६६ रुपये..! शेतकऱ्याची सटकली त्याने पीकच टाकले उपटून

पुरंदर मधील शेतकऱ्याला  १०० किलो वांग्याला मिळाले ६६ रुपये..! शेतकऱ्याची सटकली त्याने पीकच टाकले उपटून



सासवड दि.२७

  राज्यामध्ये ८०० किलो कांद्याचे ३ रुपये शेतकऱ्याला मिळाल्याचे समोर असताना  आता पुरंदर तालुक्यातील एका शेतकऱ्याला १०० किलो वाग्याला फक्त ६६ रुपये मिळाल्याचे  समोर आले आहे.  पुण्यातल्या गुलटेकडी मार्केट यार्ड मध्ये हा प्रकार घडला आहे. तिथेच वांग्याची विक्री करण्यात आली आहे. या प्रकाराने शेतकऱ्याने संतप्त होत वांग्याचे पीकच उपटून टाकले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे.



पुरंदर तालुक्यातील कुंभार वळण गावातील नाना तिवटे हे शेतकरी  आहेत. त्यांनी त्यांच्या शेतात ११ गुंठ्यांत वांग्याचे पीक लावले होते. वांग्याला चांगला बाजारभाव मिळेल या हेतूने त्यांनी  पीक चांगले खत औषधे वापरून मोठे केले.  या ११ गुंठ्यांत पीक देखील चांगले आले. १०० किलो वांगे निघाले ते विक्री साठी गुलटेकडी मार्केट यार्ड येथे नेले मात्र त्याला बाजारभावच मिळाला नाही. तीन महिने मेहनत करून १०० किलो वांग्याना फक्त ६६ रुपये मिळाले. यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे.  या रागात त्याने शेतात पिकवलेले वांग्याचे पीक स्वतः जावून उपटून टाकले. साधा काढणीचा खर्च सुद्धा निघाला नसल्याची भावना शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.



राज्यात सरकार सद्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करीत असून अनेक पिकांना बाजारभाव मिळत नसल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्याने केलेला खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आक्रमक होत आहे. सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, आमच्या मालाला हमीभाव मिळवून द्यावा यासाठी प्रयत्न करावे,नाही तर आम्हाला अशीच शेतातील पीक उपटून फेकून द्यावी लागतील.  


पुणे जिल्ह्यात अशी घटना घडल्याने मोठा संताप व्यक्त केला जात आहे.  पुरंदर हे प्रगतशील शेतकऱ्याचा तालुका म्हणून ओळखला जातो. पुरंदरचा अंजीर हे जगात ओळखले जाऊ लागले आहेत. त्यांना जागतिक बाजारपेठ निर्माण झाली आहे. मात्र तरकारी पिकांना एवढा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

नरेंद्र मोदी हे भारत देशाला लाभलेले कणखर नेतृत्व- वासुदेव काळे

 


नरेंद्र मोदी हे भारत देशाला लाभलेले कणखर नेतृत्व-  वासुदेव काळे


चांबळी येथे भाजप नेते जालिंदर कामठे आयोजित मन की बात  कार्यक्रम


गराडे दि. 26 (वार्ताहर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध विकास कामातून सध्या भारत देशाचा गतिमान विकास सुरू आहे. एकखांबी नेतृत्वामुळे गतिमान निर्णय घेतले जात आहेत. नरेंद्र मोदी हे भारत देशाला लाभलेले कणखर नेतृत्व आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केले.

    चांबळी (ता. पुरंदर ) येथे पश्चिम महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी मन की बात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना श्री. काळे बोलत होते.

    यावेळी पश्चिम महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष जालिंदर कामठे, पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस अॅड. श्रीकांत ताम्हाणे, पुणे जिल्हा भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस माऊली शेळके, पुरंदर तालुका भाजप किसान मोर्चा अध्यक्ष सूर्यकांत रणवरे, संघटक शिवाजी शेंडकर, अनिल कामठे, गौरव कामठे, गणेश शेंडकर, रमेश कामठे, मधुसूदन शेंडकर, विशाल शेंडकर, अंकुश कोलते, बाबू कामठे, मंगेश कामठे, श्रेयस कामठे,शरद दळवी आदीसस्ह चांबळी पंचक्रोशीतील शेतकरी बांधव उपस्थित होते.

    जालिंदर कामठे म्हणाले नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली येत्या काळात भारत महासत्ता बनेल. सर्व घटकांबरोबर शेती व शेतकरी वर्गाला लाभदायी योजना भारतीय जनता पार्टी राबवत आहे त्याचा शेतकरी वर्गाने लाभ घ्यावा.

    मन की बात कार्यक्रमाद्वारे शेवटच्या घटकातील सर्वसामान्य माणसाचे कौतुक स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात हे कौतुकास्पद आहे.  सभा व मेळाव्यातून शेतकऱ्यांच्या हाती काही लागत नाही. तेथे खरं नाही तर बरं बोललं जाते. भाजपाच्या माध्यमातून आयुष्यमान भारत, पीएम किसान योजना, प्रधान आवास योजना, उज्वला गॅस योजना मुळे गोरगरीब लोकांचे जीवन सुसह्य झाले आहे‌

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक जालिंदर कामठे यांनी केले. सूत्रसंचालन माऊली शेळके यांनी केले. आभार शिवाजी शेंडकर यांनी मानले.

Wednesday, February 22, 2023

गुळूंचे कर्नलवाडी नियोजित खडिमशीन विरोधात आंदोलनाचा इशारा.

 गुळूंचे कर्नलवाडी नियोजित खडिमशीन विरोधात  आंदोलनाचा इशारा. 


खा. सुप्रिया सुळेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक नियोजिन केले. 


नीरा :  

   

    गुळूंचे कर्नलवाडीसह चार गावच्या ग्रामस्थांचा विरोध असतानाही नियोजित खडिमशीन मालाक कामाच्या हालचाली सुरुच आहेत. खडिमशीन मालकाने नियोजित खडिमशीनच्या ठिकाणी मागील आठवड्यात जिलेटीनचा स्फोट उडवल्याने बोलाईमातेच्या प्रचिन गुफेत हदरे बसले होते.  ग्रामस्थांनी या नंतर प्रशासनाला खडिमशीन विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत बैठक नियोजित केले होती. यानिमित्ताने ग्रामस्थांनी या खडिमशीन विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे दादा मागतली आहे.  


     बारामती तालुक्यातील सोमेश्वरचे संचालक शैलेंद्र रासकर यांंनी गेली तीन वर्षांपासून खडिमशन टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र गुळूंचे, कर्नलवाडी, पिसुर्टी, पिंपरे, थोपटेवाडी, वाल्हे, सुकलवाडी, कामठवाडी या गावातील लोकांचा या नियोजित खडिमशीनला विरोध आहे. या खडिमशीन विरोधात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांच्या भावना तिव्र होत असुन, ग्रामस्थांनी पुरंदरच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर अमरण सोमवार दि. २७ रोजी उपोषण करत असल्याचा इशारा दिला आहे. 


महाराष्ट्र शासनाचा तीर्थक्षेत्र 'ब' दर्जा असलेल्या गुळूंचे व कर्नलवाडी गावच्या पश्चिम बाजूला डोंगरावर प्राचीन गुफेमध्ये बोलाईमातेचे जागृत देवस्थान आहे. राज्यभरात फक्त दोनच ठिकाणी बोलाईमातेची जागृत देवस्थान आहे. या देवस्थानच्या पायथ्याला मेंढपाळांच्या चराऊ जमिनी कवडीमोल भावात खरेदी करून मागील तीन वर्षापासून खडीमशीनचा घाट घातला जात आहे. मात्र या खडीमशीनच्या हदऱ्यांनी, होणाऱ्या स्फोटांमुळे बोलाईमातीचे गुहा धोक्यात येऊ शकते, हे लक्षात घेता ग्रामस्थांनी खडीमशीन या परिसरात होऊच नये असा ठराव शुक्रवार दि. ०३ फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत घेतला आहे. या ठरावाला दोन्ही गावचे प्रमुख व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमताने खडीमशीन या परिसरात होऊच नये असा ठराव संमत केला. मागील महिन्यात विरोधी पक्षनेते अजित पवार, पुरंदरचे आमदार संजय जगताप, माजी राज्यमंत्री विजय शिवतार आणि नुक्तेच खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन खडिमशीनला विरोध असल्याचे सांगितले आहे.

Tuesday, February 21, 2023

नीरा येथील १२ वीच्या परीक्षा केंद्रावर खा. सुप्रिया सुळे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत.

 नीरा येथील १२ वीच्या परीक्षा केंद्रावर खा. सुप्रिया सुळे यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत. 

निर्भयपने, गैरमार्गाचा वापर न करता पेपर लिहिण्याचा दिला संदेश. 



नीरा : 


       नीरा (ता.पुरंदर) येथील एच.एस.सी. बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर खा. सुप्रिया सुळे व पुरंदरे आमदार संजय जगताप यांनी १२ वीच्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. निर्भीडपने पेपर लिहा, चुकीच्या मार्गांचा वापर करू नका, पेपरला लागणारे सर्व साहित्य सोबत आहे का याची दक्षता घ्या. कोणत्याही प्रकारच्या शंका मनात न ठेवता विद्यार्थ्यांनी निर्भयपने व गैरमार्गाचा वापर न करता परीक्षा द्यावी असे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी केले. 



   नीरा येथील महात्मा गांधी विद्यालय व किलाचंद कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी असलेल्या परीक्षा केंद्रावर १७२ मुले, १७९ मुली असे एकुण ३५१ विध्यार्थी परीक्षा देत आहेत. तर सौ. लिलावती रिखावलाल शहा कन्या शाळा व महर्षी वाल्मिकी विद्यालय वाल्हे येथील विध्यर्थी या परीक्षा केंद्रावर  परीक्षा देत आहेत. मंगळवारी सकाळी दहा वाजता पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन प्रा.दिगंबर दुर्गाडे, माणिकराव झेंडे पाटील, माजी जिल्हा परिषदेचे सदस्य विराज काकडे, नीरेच्या सरपंच तेजश्री काकडे, उपसरपंच राजेश काकडे, लक्ष्मणराव चव्हाण यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. दोन्ही कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक विजयकुमार भोसले, निवेदिता पासलकर, पर्यवेक्षक सतिश निगडे, उत्तम लोकरे त्याच बरोबर शिक्षक, होमगार्ड पोलीस कर्मचारी उपस्थित होते. 


पत्रकार शशिकांत वारिशेच्या कुंटूंबाची मराठी पत्रकार परीषदेचे नेते एस. एम. देशमूख व पदाधीकारी यांनी घेतली भेट परीषदेचा दिला मदतीचा धनादेश.

 पत्रकार शशिकांत वारिशेच्या कुंटूंबाची मराठी पत्रकार परीषदेचे नेते एस. एम. देशमूख व पदाधीकारी यांनी घेतली भेट परीषदेचा दिला मदतीचा धनादेश.  




रत्नागीरी (प्रतीनीधी) : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशीकांत वारिशे यांची निर्घृणपणे हत्या केल्या वर मराठी पत्रकार परीषदेने हे प्रकरण लावून धरल्याने आरोपी वर गुन्हा दाखल झाला व त्यांला अटक हि झाली या कुंटूंबाला शासनाने मदत केली व इतरानीही मराठी पत्रकार परीषदेचे मुख्यविश्वस्त एस एम देशमूख यांनी परीषदेच्या पदाधीकाऱ्यां सह वारिशे कुंटूंबाची भेट देऊन परीषदेचा मदतीचा धनादेश देऊन या कुंटूंबाला आधार दिला व सर्वोपरी सहकार्याचा शब्द दिला.

पत्रकार शशिकांत वारिशे यांची निर्घृण हत्या झाली, कुटुंब रस्त्यावर आलं. वृध्द आई आणि मुलगा निराधार झाले. अशा स्थितीत त्यांला मदतीचे आवाहन केल्या नंतर महाराष्ट्रातून जवळपास दोन लाख रूपये यशच्या खात्यावर जमा झाले. काही रोख रक्कम आली. मराठी पत्रकार परीषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमूख, विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, कोषाध्यक्ष विजय जोशी, मुंबई शहराध्यक्ष राजा आदाटे, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, राज्य उपाध्यक्ष जान्हवी पाटील, आनंद तापेकर, खलिपे, राज्य संघटक सुनील वाळुंज या सर्वांनी कशिळे गावात जाऊन शशिकांतच्या परिवाराची भेट घेतली. सांत्वन काय आणि कुणाचे करणार, मुलगा यश अजून शॉक मधून बाहेरच आलेला नाही. आजी अंथरूणावर खिळून आहे. आजीची जेव्हा पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली तेव्हा तिच्या हुंदक्यांनी परीषद पदाधीकारी कोलमडून पडले. कुठल्या शब्दात या मातेचं सांत्वन करावं ते कळत नाही. सांत्वनाचे शब्द या कुंटूंबाचे दु:खापुढे तोकडे पडले. परीषद कायम सोबत आहे" असा शब्द देत आणि मदतीचा चेक यशच्या हाती देत या पदाधीकरी यांनी निरोप घेतला. रिफायनरी विरोधी आंदोलनातले चव्हाण आणि काही कार्यकर्ते या परीषद पदाधीकारी यांना भेटले. शशीकांतचया कुटुंबियांना कायदेशीर मदत मिळावी यासाठी ते हि प्रयत्न करीत आहेत. आरोपी पंढरीनाथ आंबेरकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यान जामिनासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी होती. परीषदेचे नेते एस. एम. देशमूख यांची राजापूर मध्ये घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर बारीक नजर आहे. या कुंटूंबाला सर्वोपरी अधार देण्याचे काम होत आहे. मराठी पत्रकार परीषदेने दिलेल्या या पाठबळामुळे वारिशे कुंटूंबास मोठा अधार मिळाला आहे. व या कुंटूंबास न्याय दिल्या शिवाय परीषद स्वस्थ बसणार नाही असे ही मुख्यविश्वस्त एस. एम. देशमूख यांनी सांगीतले.

Sunday, February 12, 2023

राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी करायला हवी : शरद पवार यांची मागणी

  राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयाची  चौकशी करायला हवी : शरद पवार यांची मागणी 




पुणे दि.१२

 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा म मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.


राज्यपाल कोश्यारी यांनी राजीनामा दिल्याने महाराष्ट्राची सुटका झाली आहे. पण राज्यपाल म्हणून त्यांनी संविधान विरोधी निर्णय घेतले असतील तर त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे. त्यामुळे नवे राज्यपाल रमेश बैस है कोश्यारी यांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी करणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. मात्र, पवार यांच्या या मागणीमुळे भाजपची कोंडी झाल्याचं सांगितलं जात आहे.


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. नवे राज्यपाल आले आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? राज्यपाल कोश्यारी यांनी संविधान विरोधी निर्णय घेतले होते. त्याची चौकशी झाली पाहिजे का? असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना पवार म्हणाले की, संविधानाच्या विरोधात जे काही झालं असेल त्याची चौकशी व्हावी.


केंद्र सरकारने राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करून चांगला निर्णय घेतला आहे. हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. पण तो आता घेतला. महाराष्ट्राची सुटका झाली. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती. ती झाली. पण केंद्राने निर्णय घेतला ही चांगली बाब आहे, असं शरद पवार म्हणाले.

केंद्र सरकारने राज्यपाल कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करून चांगला निर्णय घेतला आहे. हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता. पण तो आता घेतला. महाराष्ट्राची सुटका झाली. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती. ती झाली. पण केंद्राने निर्णय घेतला ही चांगली बाब आहे, असं शरद पवार म्हणाले.

विशेष म्हणजे राज्यपाल कोशारीना नुकत्याच झालेल्या १३ राज्यपालांच्या यादीत स्थान नसल्याने त्यांना राजकीय विजनवासात पाठवल्याचीच चर्चा राजकीय वर्तुळातून आहे



राज्यपालांच्या राजीनाम्याला खूपच उशीर झाला : उशिरा मिळालेला न्याय अन्यायच असतो. खा.उदयराजे भोसले यांची प्रतिक्रिया

 राज्यपालांच्या राजीनाम्याला खूपच उशीर झाला : उशिरा मिळालेला न्याय अन्यायच असतो. खा.उदयराजे भोसले यांची प्रतिक्रिया 



 मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामाराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे.याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. या घडामोडीनंतर राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. विशेष म्हणजे यात महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया देत कोश्यारी आणि शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवरच भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.


उदयनराजे म्हणाले, “जसं राष्ट्रपती हा देशाचा प्रमुख असतो, तसं राज्यपाल हे पद.. यावर जे कोणी विराजमान असतात ते या राज्याचे प्रमुख असतात. अशा महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींनी जबाबदारीने वक्तव्य करणं हे त्यांच्याकडून लोकांना अपेक्षित असतं. कारण नसताना कुठलही विधान करणं. ज्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे कारण नसताना जाती-जातीमध्ये मतभेद निर्माण होतात, हे कशासाठी? " “जगभरातील मोठे योद्धे आणि शिवाजी महाराजांमध्ये एकच फरक होता, तो म्हणजे ते सगळे लढले ते स्वत:चं साम्राज्य वाढवण्यसाठी परंतु शिवाजी महाराजांनी युद्ध केलं ते लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी. आजही आपण आपल्या देवघरात शिवाजी महाराजांना बघतो. असं असताना ज्यांची ती उंची नाही आणि ते कधी उंचीही गाठू शकणार नाही, असे ते लोक विधान करत असताना, मग राजकारणातील किंवा राजकारणाच्या बाहेरील असतील ही एवढी मोठी विकृती आता आपल्याला पाहायला मिळते. त्याचं मूळ कारण म्हणजे त्यांची बुद्धीमत्ता, विचारांची व्याप्ती ही संकुचित आहे. शिवाजी महाराजांनी केवळ स्वत:च्या कुटंबाचाच विचार केला नाहीतर त्यांनी संपूर्ण देशाला आपलं कुटुंबं समजलं. परंतु अलीकडील काळातील लोकांना कारण नसताना एवढा अहंकार निर्माण झाला आहे." असेही उदयनराजे म्हणाले.


  याचबरोबर, “एक ते भगतसिंग होते, ज्यांचं संपूर्ण देश नाव घेतो. दुर्दैवाने सांगावासं वाटतं हे भगतसिंह म्हणजे त्यांच्या आई-वडिलांनी ज्यावेळी त्यांचं नामकरण केलं. भगतसिंह त्यांचं नाव ठेवलं ठीक आहे पण तुम्ही त्या पदावर असताना जरा भान राखलं पाहिजे की नाही? खंतं एवढीच वाटते की उशीर झाला. वेळेत जर निर्णय घेतला तर बरच काही सावरता येतं, उशीरा मिळालेला न्याय हा खरंतर अन्याय असतो. ज्याप्रमाणे सरकारी नोकरीसाठी निवृत्ती वय निश्चित असतं, तसंच राजकारणातील लोकांसाठी ठरवलं पाहिजे." असेही उदयनराजे यांनी यावेळी सांगितले.

Wednesday, February 8, 2023

शशिकांत वारिशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या मुंबईसह राज्यभर पत्रकारांची निदर्शने

 शशिकांत वारिशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ

उद्या मुंबईसह राज्यभर पत्रकारांची निदर्शने

सर्वांनी आंदोलनात सहभागी होण्याचं एस.एम देशमुख यांचं आवाहन



मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची  झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, आदि ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा निषेध करण्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यातील पत्रकार काळ्या फिती लावून तहसिल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करतील.. नंतर अधिकाऱ्यांना निवेदनं देऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त करतील.. मुंबईतील सर्व पत्रकार संघटना उद्या दुपारी १२ वाजता गांधी पुतळ्यासमोर काळया फिती लावून आंदोलन करतील आणि नंतर मुख्यमंत्र्यांना निवेदन देतील.. यानिमित्तानं पुन्हा एकदा राज्यातील पत्रकार संघटना एकत्र येत आपल्यामधील एकजुटीचं दर्शन घडवत आहेत..



मराठी पत्रकार परिषदेच्या आज झालेल्या तातडीच्या ऑनलाईन बैठकीत राज्यातील पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याच्या संदर्भात सांगोपांग चर्चा होऊन सर्व पत्रकार, संघटनांना बरोबर घेऊन आंदोलन करावे असा निर्णय घेतला गेला.. त्यानुसार राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांशी चर्चा करून उद्याच्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.. उद्याच्या या आंदोलनात राज्यातील सर्व पत्रकार तसेच संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन एस.एम देशमुख यांनी केले आहे.. सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे.. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भिंतीची भावना निर्माण होत आहे.. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी उद्या शुक्रवारी दिनांक १० फेब्रुवारी रोजी राज्यभर पत्रकार काळ्या फिती लावून काम करतील आणि तहसिल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करतील..  हा विषय सर्व पत्रकार आणि संघटनांसाठी जिव्हाळ्याचा असल्याने स्थानिक पातळीवरील सर्व मतभेद बाजुला ठेऊन सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन एस.एम देशमुख यांनी केले आहे..  मराठी पत्रकार परिषदेच्या आजच्या बैठकीस एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई, राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, परिषदेच्या उपाध्यक्षा जान्हवी पाटील, रत्नागिरीचे जिल्हा अध्यक्ष तापेकर, कोकण विभागीय सचिव अनिल भोळे आदि उपस्थित होते.

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी समाज काय करणार आहे?

 पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी समाज काय करणार आहे?


मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचा समाज घटकांना सवाल



   सासवड दि.८

रत्नागिरी- समाजस्वास्थ्य आणि माध्यम स्वातंत्र्याबरोबरच लोकशाही टिकली पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटतं अशा सर्वांसाठी शशिकांतची हत्त्या हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय असला पाहिजे....भूमिका घेणारी व्यक्ती एकटी नाही हा संदेश जोपर्यंत राज्यकर्त्यांपर्यत पोहोचणार नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहणार असल्याने लोकहितासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संघटनांनी पत्रकार शशिकांतच्या हत्येचा निषेध करण्यासाठी पुढं आलं पाहिजे.. असं झालं नाही तर कोणताही पत्रकार कोणत्याच विषयावर भूमिका घेणार नाही.. मग पत्रकार भूमिका घेत नाहीत हा टाहो देखील आम्ही ऐकून घेणार नाही.. शशिकांत वारिशे हत्या प्रकरणी समाज काय करणार आहे? असा सवाल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी समाज घटकास केला आहे.


मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, विरोधी भूमिका घेणारा पत्रकार कोणत्याच नेत्याला अथवा राजकीय पक्षाला आवडत नाही.. शशिकांत वारिशे यांनी तर राजकीय पक्षांचे हितसंबंध ज्या रिफायनरीत गुंतलेले आहेत त्याला विरोध करणारी भूमिका घेतली होती.. ही भूमिका भुमीपूत्रांच्या हिताची असली तरी ती दलाल आणि धनदांडग्यांना पचणारी नव्हती.. एक पत्रकार समाजहिताची भूमिका घेऊन सातत्यानं त्याविरोधात आवाज उठवतो आहे, त्याच्यामुळे आपले हितसंबंध धोक्यात येत आहेत हे पाहून पित्त खवळलेले दलाल आणि हितसंबंधी यांनी शशिकांत वारिशे यांचा आवाज कायमसाठी बंद करण्याचं षडयंत्र रचलं आणि ते प्रत्यक्षात आणलं देखील.. रत्नागिरी -राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांची दिवसा ढवळया हत्त्या करणाऱ्या रिफायनरीचा दलाल पंढरीनाथ आंबेरकर याच्यावर भादवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. अपघाताचा बनाव करून पत्रकाराची ठरवून हत्त्या केल्याचे चौकशी अंती स्पष्ट झाल्यानंतर आंबेरकर विरूध्द खुनाचे कलम लावण्यात आले आहे..


रत्नागिरी येथील सर्व पत्रकार तसेच मराठी पत्रकार परिषदेने देखील पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.. त्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली होती.. या दबावाचा अखेर फायदा झाला असून पोलिसांनी आंबेरकर यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.. आंबेरकर याच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्याचे कलम देखील लावले जावे अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने केली असल्याची माहिती एस.एम.देशमुख यांनी दिली आहे... पत्रकारांकडून समाजाच्या भरपूर अपेक्षा असतात.. त्या रास्त ही असतात.. परंतू समाजाच्या या अपेक्षा पूर्ण करताना पत्रकारांचे जेव्हा बळी जातात किंवा पत्रकारांवर हल्ले होतात तेव्हा समाजाची भूमिका काय असते? अनेकदा असं दिसून आलंय की, समाज शांत असतो..मला काय त्याचे हीच समाजाची भूमिका असते.. रिफायनरी विरोधात सातत्यानं लिहिणाऱ्या शशिकांतची हत्या झाल्यानंतर समाजातून किंवा समाजहिताचं काम करणाऱ्या संस्था, संघटनांकडून निषेधाचा सूर अजून तरी व्यक्त झालेला नाही.. आम्ही पत्रकार घटनेचा निषेध करणारच पण हा केवळ एका घटका पुरता मर्यादित विषय आहे का? तर नाही.. असे आम्हाला वाटते.


राष्ट्रीय नियोजित महामार्गासाठी जेजुरीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला समांतर जागा संपादित करावी .

 राष्ट्रीय नियोजित महामार्गासाठी जेजुरीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला समांतर जागा संपादित करावी .

          अन्यथा जेजुरीत जनआंदोलनाचा ईशारा – अन्यायग्रस्त नागरिक 



जेजुरी वार्ताहर दि ७ आळंदी पंढरपूर पालखी महामार्ग रस्ता क्र ९६५ चे रुंदीकरण सुरु आहे. या रस्त्याला जेजुरीकर नागरिकांचा विरोध नाही मात्र मुख्य रस्त्याच्या मध्यातून दोन्ही बाजूला खुणा करून हि केवळ उत्तरेकडील जागा संपादित करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे उत्तरेकडील नागरिकांच्या वर सतत अन्याय केला जात आहे. जेजुरी शहरातून मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला रुंदीकरणासाठी समांतर जागा संपादित करावी अन्यथा प्रशासना विरोधात शांततेच्या मार्गाने रास्ता रोको,आमरण उपोषण असे जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा जेजुरी येथील अन्यायग्रस्त नागरिकांनी दिला आहे.

     जेजुरी येथील अन्यायग्रस्त नागरिकांनी पत्रकार परिषद घेतली या वेळी विजय झगडे, ऋषिकेश दरेकर, संतोष झगडे,रियाज पानसरे,सागर काकडे,जोयेब खान,रमेश शेरे,मंगल काकडे, महानंदा खोमणे,विमल खोमणे, कमल खोमणे,,लीलाबाई खोमणे,सुशील काकडे, जब्बार खान,मोठ्या संख्यने नागरिक उपस्थित होते . याबाबत अन्याग्रस्त नागरिकांनी दिलेली माहिती अशी कि, आळंदी पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे १८ फेब्रुवारी २०१० साली सादर केला,त्याला सप्टेंबर २०१० साली केंद्राने मंजुरी दिली. जेजुरी शहरातून जाणार्या या प्रस्तावित रस्त्यासाठी ३६ मीटर रुंदी ठरविण्यात आली होती. या मध्ये शासनाच्या मालकीचे ३० मीटर, रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला १५ मीटर असे ठरले होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण पुणे विभागाने सयुक्तिक मोजणी करून बाधित बांधकामांचा नकाशा २०१२ साली तयार केला होता.



     त्यांनतर रस्ता रुंदीकरण आणि चौपदरीकरणासाठी ७ जुलै २०१५ रोजी कोणतीही पूर्व सूचना न देता शासनाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला खुणा करूनही केवळ उत्तरेकडील बांधकामे,पत्राशेड ,साईनबोर्ड शासनाने काढून टाकली. अद्याप याजागेची नुकसान भरपाई दिली गेली.नाही. रस्त्याच्या दक्षिण बाजूची बांधकामे काढली गेली नाहीत.यावेळी अन्याग्रस्त नागरिकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला समसमान रुंदीकरण करण्यात यावे अशी निवेदने मुख्यमंत्री व संबधित विभागाला देण्यात आली.शासनाने याबाबत कोणतीही दाखल घेतली नाही.

   २५ जून २०२१ रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ साठी जमीन संपादित करण्यासाठी शासनाने अधिसूचना काढली भूमापन अधिकार्यांनी सध्याच्या अस्तित्वात असणाऱ्या रस्त्याचा मध्य धरून उत्तर व दक्षिण बाजूला जागा संपादित करण्यासाठी खुणा केल्या.( २०१५ साली उत्तरेकडील जागा संपादित करूनही पुन्हा उत्तेकडील जागेत खुणा करण्यात आल्या ) मात्र पुन्हा १७ जानेवारी २०२२ रोजी रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूच्या जागेची एकतर्फी मोजणी करून नकाशे प्रसिद्ध करण्यात आला. यात रस्त्याचा मध्य न घेता पुन्हा केवळ उत्तरेकडील जागा संपादित करण्याचा घाट घातला आहे. तसेच नागरिकांना विश्वासात न घेता मूल्यांकनाच्या नोटिसाही पाठविल्याने नागरिकांच्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

   रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया राबवीत असताना अधिसूचना जाहीर करणे,हरकती,सुनावणी याबाबत दिशाभूल देणारी माहिती प्रसारित झालेली आहे. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे सासवड व नीरा येथे बाह्यवळण मार्ग प्रस्तावित आहे. आणि जेजुरी हे महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा देवाचे तीर्थक्षेत्र व सदैव वर्दळीचे ठिकाण असूनही जेजुरी शहराला बाह्यवळण दिले नाही जेजुरी शहरातूनच महामार्ग काढण्याचा अट्टहास का,कोणासाठी हि आश्चर्याची बाब आहे. याबाबत रस्त्याच्या उत्तरेकडील अन्यायग्रस्त नागरिकांनी नगरपालिका,लोकप्रतिनिधी, संबधित विभाग ,मुख्यमंत्री, पंतप्रधान ते राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे न्याय मागितला मात्र या निवेदनांना केराची टोपली दाखवली आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबधित विभागाने नागरिकांच्या हरकती,सुनावणी न घेता,नागरिकांचे म्हणणे ऐकूण घेता फेटाळून लावल्या आहेत.

   २०१५ साली आणि पुन्हा आता एकाच बाजूची बांधकामे पाडण्यात येणार असल्याने अनेक कुटुंबे उध्वस्त होणार आहेत. जीवन जगण्यासाठी कोणताच आधार नसल्याने यातील काही कुटुंबीयांनी राष्ट्रपती यांच्याकडे इच्छामरणाची मागणी केली आहे.

    सबब रस्ता रुंदीकरणासाठी आमचा कोणताही विरोध नाही मात्र रस्त्याच्या एकाच बाजूला म्हणजे उत्तरे कडील नागरीकांच्यावर अन्याय का , शासनाने याबाबत त्वरित दखल घेवून अन्याग्रस्ताना न्याय मिळवून द्यावा अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा अन्यायग्रस्त नागरिकांनी दिला आहे. 


Monday, February 6, 2023

शरद पवार पंतप्रधान का झाले नाहीत; विजय शिवतारे यांचे अनुमान काय ते पहा

 शरद पवार पंतप्रधान का झाले नाहीत; विजय शिवतारे यांचे अनुमान काय ते पहा 

 


बारामती:

देशाचा इतिहास, भूगोल, अर्थकारण राजकारण,सहकार, शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या समस्यांविषयी जाण आणि राजकीय क्षेत्रात १८ तास काम करण्याची क्षमता तसेच प्रचंड दूरदृष्टी नेतृत्व असणारा देशातील एकमेव नेतृत्व म्हणजे शरद पवार. देशात पवारांच्या कर्तृत्वाबाबत कुणाचेही दुमत नाही, असे वक्तव्य माजी मंत्री विजय शिवतारे यांनी बारामतीत केले. विजय शिवतारे सोमवारी बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पुढे बोलताना ते म्हणाले की, २०१४ साली पंतप्रधान कोण होणार याबाबत कल चाचणी घेतली जात होती. या चाचणीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ४३ टक्के, सोनिया गांधी १७ टक्के, राहुल गांधी यांना ८ टक्के आणि शरद पवार यांना दीड टक्के लोकांनी पंतप्रधान म्हणून पसंती दिली होती.

याचाच धागा पकडत शिवतारे म्हणाले की, या कलचाचणीत पवारांना दीड टक्के मते पडण्याचे कारण म्हणजे शरद पवारांचे राजकारण हे सेल्फ स्टॅंडर्ड तर मोदींचे राजकारण हे मिळालेल्या संधीतून राज्य घडवणे. देश सर्वात पुढे असला पाहिजे तरुणांना नवीन संध्या मिळाल्या पाहिजेत. देशाची अर्थव्यवस्था सर्वात मोठी असली पाहिजे. नरेंद्र मोदी हे ध्येय घेऊन २४ तास काम करणारे होते. म्हणून त्यांना नियतीने साथ दिली. मात्र, केवळ राक्षसी मानसिकतेमुळे क्षमता असतानाही पवार पंतप्रधान होऊ शकले नसल्याची जहरी टीका शिवतारे यांनी केली.

शिवतारे म्हणाले की,बारामती लोकसभा मतदारसंघाचे नाव बदलायला हवे. कारण याच नावावरून देशभरात फसवणूक होते. विधानसभेचे नाव बारामती विधानसभा आहे, म्हणून लोकसभेचे नाव बदलून ते पुणे दक्षिण विभाग मतदार संघ असे करावे. देशाचे पंतप्रधान किंवा आणखी कोणी परदेशी लोक आले की फक्त बारामती शहर दाखवायचे आणि देशभरात बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला असे सांगायचे. मात्र, हा विकास शहरापुरताच मर्यादित असून ५० वर्ष पवारांच्या हातात सत्ता असतानाही विकास केला नाही, असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. तसेच बारामती लोकसभा मतदार संघात फक्त वीस लोकांचा विकास झाला आहे. इतरांचा विकास झालेला नाही. ३० वर्षे नगरसेवक राहिलेल्यांची ही व्यथा आहे, अशी टीकाही शिवतारे यांनी केली.

Saturday, February 4, 2023

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन

 पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन




पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन झालं आहे. पाकिस्तानच्या मीडियाच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे.




परवेज मुशर्रफ प्रदीर्घ काळ आजारपणामुळे त्रस्त होते. त्यांच्यावर दुबईतील रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, आज त्यांची प्रकृती जास्त खालावली असल्याने त्यांचं निधन झाल्याची माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर येत आहे.

Thursday, February 2, 2023

आचार्य अत्रे यांच्या जन्मभूमीतील नियोजित भव्य पत्रकार भवन निर्मिती

 आचार्य अत्रे यांच्या जन्मभूमीतील नियोजित भव्य पत्रकार भवन निर्मिती 



अभिनंदनीय व अनुरकणीय म्हणून पुरंदरच्या पत्रकार मित्रांचा आम्हाला अभिमान आहे :  मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी केले पुरंदर तालुका  मराठी  तालुका पत्रकार संघाचे कौतुक


पुणे : 

           एखाद्या तालुका संघाच्या मालकीच्या जागेत, एव्हढ्या भव्य स्वरुपात उभं राहणार, किमान साडेतीन-चार कोटींचा, खर्च अपेक्षीत असलेले आचार्य अत्रेंच्या जन्मभूमीतील सासवड येथील भव्य-दिव्य पत्रकार भवन हे एखाद्या तालुका संघाच्या मालकीच्या जागेत एव्हढ्या भव्य स्वरुपात उभं राहणारं कदाचित राज्यातील पहिलेच पत्रकार भवन असेल म्हणूनच आम्हाला पुरंदर तालुका पत्रकार संघाचा अभिमान वाटतो. पुरंदरच्या पत्रकारांचे प्रयत्न अभिनंदनीय असून राज्यातील पत्रकारांसाठी अनुकरणीय आहेत असे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी काल आपल्या सहकारी पदाधिकाऱ्यांस येथे भेट दिली त्यावेळी बोलतांना केले. 


आपल्या भावना व्यक्त करतांना एस.एम. देशमुख पुढे म्हणाले, If you can dream it, you can do it.. हा वाक्प्रचार सत्यात आणण्याचं काम पुरंदरच्या पत्रकार मित्रांनी केलंय.. आचार्य अत्रे यांची जन्मभूमी असलेल्या सासवड येथे भव्य, सर्वसोयींनीयुक्त पत्रकार भवन असलं पाहिजे असं स्वप्न सासवड, पुरंदरच्या पत्रकारांनी पाहिलं. ही मंडळी केवळ स्वप्न पाहूनच थांबली नाही तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपड सुरू केली. सासवड - जेजुरी पालखी मार्गावर अगदी मोक्याच्या ठिकाणी पुरंदर तालुका पत्रकार संघानं ६ गुंठे जमिन खरेदी केली. त्या ठिकाणी आता भव्य पत्रकार भवन उभं राहत आहे. राष्ट्रवादीचे नेते श्री. शरद पवार आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ५ फेब्रुवारी रोजी या वास्तूचं भूमीपूजन होत आहे. पत्रकार भवनात एक मोठा वातानुकूलित हॉल असेल, जेजुरीला बाहेरगावहून येणाऱ्या  पत्रकारांसाठी निवास व्यवस्थेसाठी दोन - तीन सुट असतील, पत्रकारांसाठी अभ्यासिका, कॉम्प्युटर आणि डिजिटलचे काम करणाऱ्या पत्रकारांसाठी स्टुडिओची व्यवस्था असेल.. या सर्वासाठी किमान साडेतीन - चार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.. एखाद्या तालुका संघाच्या  मालकीच्या जागेत, एवढ्या भव्य स्वरूपात उभं राहणार कदाचित हे राज्यातलं पहिलंच पत्रकार भवन असेल. पुरंदर तालुका पत्रकार संघाचा म्हणूनच आम्हाला अभिमान वाटतो. त्याच्या या आणि अन्य उपक्रमांचं राज्य पातळीवर कौतूक व्हावं म्हणूनच मराठी पत्रकार परिषदेनं पुणे विभागातून वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारासाठी पुरंदर तालुका पत्रकार संघाची निवड केली आहे. दि. ५ मार्च रोजी चाकूर येथे होणाऱ्या कार्यक्रमात पुरंदर तालुका संघाचा सत्कार होणार आहे. 


मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या सोबत परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, विभागीय सचिव अरूण तथा नाना कांबळे, जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर, राजा आदाटे यांनी काल जेथे पत्रकार भवन उभं राहतंय त्या स्थळाला भेट दिली. आचार्य अत्रे यांच्या गावात एवढं छान पत्रकार भवन  उभं राहतंय हे पाहून आनंद वाटला. दोन अडीच वर्षात हे काम पूर्ण करण्याचा पुरंदर तालुका पत्रकार संघाचा निर्धार आहे. तालुका संघाचे सर्व पदाधिकारी, सदस्यांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा. प्रत्येक वेळी सरकारी मदतीची  वाट पाहण्यात अर्थ नसतो. तशी अपेक्षाही आता व्यर्थ आहे. आपण एकत्र आलो तर कुठलंही काम आपल्यासाठी अशक्य नाही हे पुरंदरच्या पत्रकार मित्रांनी दाखवून दिलंय. त्यांचे हे प्रयत्न अभिनंदनीय आणि अनुकरणीय आहेत. असेही देशमुख यांनी नमूद केले.  


मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख व परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजित पत्रकार भवनास भेट दिल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करतांना पुरंदरचे पत्रकार म्हणाले, एसेम यांची कौतुकाची थाप आमचे मनोबल वाढविणारी असून त्यांनी कालच्या भेटी प्रसंगी आमच्या अध्यक्षांच्या खांद्यावर हात ठेऊन प्रोत्साहन दिल्याने आम्हाला दहा हत्तींचे बळ लाभले आहे. 

Wednesday, February 1, 2023

'राज्यभरातील पत्रकारांनी आदर्श घ्यावा असे पत्रकार भवन पुरंदरचे सहकारी करत आहेत' : एस.एम. देशमुख

   'राज्यभरातील पत्रकारांनी आदर्श घ्यावा असे पत्रकार भवन पुरंदरचे सहकारी करत आहेत' : एस.एम. देशमुख 

मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली पुरंदरच्या पत्रकार भवनाच्या स्थळाची पाहणी




पुरंदर : 

        'पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या सदस्यांनी एकत्रीत येत पुणे-पंढरपूर पालखी मार्गालगत स्वमालकीची सहा गुंठे जमीन खरेदी केली आहे. या ठिकाणी सर्व सोईंयुक्त, देखणी व भव्य वास्तू होत आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी लगत असलेल्या या पत्रकार भवनाचा लाभ राज्यभरातील पत्रकारांसह यात्रेकरूंना होणार आहे. राज्यभरातील पत्रकारांनी आदर्श घ्यावा असे पत्रकार भवन पुरंदरचे सहकारी करत आहेत, असाच आदर्श राज्यातील इतर पत्रकारांनी ही घ्यावा' असे प्रतिपादन एस. एम. देशमुख यांनी पुरंदरमध्ये केले. 



         मराठी पत्रकार परिषद मुंबई व पुणे जिल्हा पत्रकार संघ संचलित पुरंदर तालुका पत्रकार संघाने सहा गुंठे जागा खरेदी करुन भव्य इमारत बांधण्याचे नियोजन केले आहे. या इमारतीचे भुमिपूजन रविवार दि. ०५ रोजी माजी केंद्र मंत्री शरद पवार व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या नियोजित पत्रकार भवनाच्या स्थळाची पाहणी परिषेदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, अध्यक्ष शरद पाबळे यांनी केली. 



        यावेळी परिषदेचे पश्चिम विभागीय सचिव अरुणनाना कांबळे जिल्हा अध्यक्ष सुनिल लोणकर, सोशल मिडिया उपाध्यक्ष राहुल शिंदे, प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अविनाश अदक, रोहित खरगे, राजू वारभूवन उपस्थित होते. पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे, उपाध्यक्ष प्रविण नवले, सचिव अमोल बनकर, सहसचिव मंगेश गायकवाड, खजिनदार निलेश भुजबळ, प्रकश फाळके, समिर भुजबळ, महावीर भुजबळ, हणुमंत वाबळे आदींनी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करुन नियोजित पत्रकार भवनाच्या बांधकामाची माहिती दिली. 


   पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तानाना भोंगळे मागील काही दिवसांपासून आजारी होते. भोंगळे यांची परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सासवड येथे भेट घेतली. 





 

Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...