राष्ट्रीय नियोजित महामार्गासाठी जेजुरीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला समांतर जागा संपादित करावी .
अन्यथा जेजुरीत जनआंदोलनाचा ईशारा – अन्यायग्रस्त नागरिक
जेजुरी वार्ताहर दि ७ आळंदी पंढरपूर पालखी महामार्ग रस्ता क्र ९६५ चे रुंदीकरण सुरु आहे. या रस्त्याला जेजुरीकर नागरिकांचा विरोध नाही मात्र मुख्य रस्त्याच्या मध्यातून दोन्ही बाजूला खुणा करून हि केवळ उत्तरेकडील जागा संपादित करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे उत्तरेकडील नागरिकांच्या वर सतत अन्याय केला जात आहे. जेजुरी शहरातून मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला रुंदीकरणासाठी समांतर जागा संपादित करावी अन्यथा प्रशासना विरोधात शांततेच्या मार्गाने रास्ता रोको,आमरण उपोषण असे जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा जेजुरी येथील अन्यायग्रस्त नागरिकांनी दिला आहे.
जेजुरी येथील अन्यायग्रस्त नागरिकांनी पत्रकार परिषद घेतली या वेळी विजय झगडे, ऋषिकेश दरेकर, संतोष झगडे,रियाज पानसरे,सागर काकडे,जोयेब खान,रमेश शेरे,मंगल काकडे, महानंदा खोमणे,विमल खोमणे, कमल खोमणे,,लीलाबाई खोमणे,सुशील काकडे, जब्बार खान,मोठ्या संख्यने नागरिक उपस्थित होते . याबाबत अन्याग्रस्त नागरिकांनी दिलेली माहिती अशी कि, आळंदी पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ याच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र शासनाकडे १८ फेब्रुवारी २०१० साली सादर केला,त्याला सप्टेंबर २०१० साली केंद्राने मंजुरी दिली. जेजुरी शहरातून जाणार्या या प्रस्तावित रस्त्यासाठी ३६ मीटर रुंदी ठरविण्यात आली होती. या मध्ये शासनाच्या मालकीचे ३० मीटर, रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला १५ मीटर असे ठरले होते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण पुणे विभागाने सयुक्तिक मोजणी करून बाधित बांधकामांचा नकाशा २०१२ साली तयार केला होता.
त्यांनतर रस्ता रुंदीकरण आणि चौपदरीकरणासाठी ७ जुलै २०१५ रोजी कोणतीही पूर्व सूचना न देता शासनाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला खुणा करूनही केवळ उत्तरेकडील बांधकामे,पत्राशेड ,साईनबोर्ड शासनाने काढून टाकली. अद्याप याजागेची नुकसान भरपाई दिली गेली.नाही. रस्त्याच्या दक्षिण बाजूची बांधकामे काढली गेली नाहीत.यावेळी अन्याग्रस्त नागरिकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला समसमान रुंदीकरण करण्यात यावे अशी निवेदने मुख्यमंत्री व संबधित विभागाला देण्यात आली.शासनाने याबाबत कोणतीही दाखल घेतली नाही.
२५ जून २०२१ रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ साठी जमीन संपादित करण्यासाठी शासनाने अधिसूचना काढली भूमापन अधिकार्यांनी सध्याच्या अस्तित्वात असणाऱ्या रस्त्याचा मध्य धरून उत्तर व दक्षिण बाजूला जागा संपादित करण्यासाठी खुणा केल्या.( २०१५ साली उत्तरेकडील जागा संपादित करूनही पुन्हा उत्तेकडील जागेत खुणा करण्यात आल्या ) मात्र पुन्हा १७ जानेवारी २०२२ रोजी रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूच्या जागेची एकतर्फी मोजणी करून नकाशे प्रसिद्ध करण्यात आला. यात रस्त्याचा मध्य न घेता पुन्हा केवळ उत्तरेकडील जागा संपादित करण्याचा घाट घातला आहे. तसेच नागरिकांना विश्वासात न घेता मूल्यांकनाच्या नोटिसाही पाठविल्याने नागरिकांच्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रस्ता रुंदीकरणाची प्रक्रिया राबवीत असताना अधिसूचना जाहीर करणे,हरकती,सुनावणी याबाबत दिशाभूल देणारी माहिती प्रसारित झालेली आहे. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे सासवड व नीरा येथे बाह्यवळण मार्ग प्रस्तावित आहे. आणि जेजुरी हे महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा देवाचे तीर्थक्षेत्र व सदैव वर्दळीचे ठिकाण असूनही जेजुरी शहराला बाह्यवळण दिले नाही जेजुरी शहरातूनच महामार्ग काढण्याचा अट्टहास का,कोणासाठी हि आश्चर्याची बाब आहे. याबाबत रस्त्याच्या उत्तरेकडील अन्यायग्रस्त नागरिकांनी नगरपालिका,लोकप्रतिनिधी, संबधित विभाग ,मुख्यमंत्री, पंतप्रधान ते राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे न्याय मागितला मात्र या निवेदनांना केराची टोपली दाखवली आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व संबधित विभागाने नागरिकांच्या हरकती,सुनावणी न घेता,नागरिकांचे म्हणणे ऐकूण घेता फेटाळून लावल्या आहेत.
२०१५ साली आणि पुन्हा आता एकाच बाजूची बांधकामे पाडण्यात येणार असल्याने अनेक कुटुंबे उध्वस्त होणार आहेत. जीवन जगण्यासाठी कोणताच आधार नसल्याने यातील काही कुटुंबीयांनी राष्ट्रपती यांच्याकडे इच्छामरणाची मागणी केली आहे.
सबब रस्ता रुंदीकरणासाठी आमचा कोणताही विरोध नाही मात्र रस्त्याच्या एकाच बाजूला म्हणजे उत्तरे कडील नागरीकांच्यावर अन्याय का , शासनाने याबाबत त्वरित दखल घेवून अन्याग्रस्ताना न्याय मिळवून द्यावा अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन उभारण्यात येणार असल्याचा इशारा अन्यायग्रस्त नागरिकांनी दिला आहे.