Type Here to Get Search Results !

शशिकांत वारिशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या मुंबईसह राज्यभर पत्रकारांची निदर्शने

 शशिकांत वारिशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ

उद्या मुंबईसह राज्यभर पत्रकारांची निदर्शने

सर्वांनी आंदोलनात सहभागी होण्याचं एस.एम देशमुख यांचं आवाहन



मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची  झालेली निर्घृण हत्या आणि गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, आदि ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा निषेध करण्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी मुंबईसह संपूर्ण राज्यातील पत्रकार काळ्या फिती लावून तहसिल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करतील.. नंतर अधिकाऱ्यांना निवेदनं देऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त करतील.. मुंबईतील सर्व पत्रकार संघटना उद्या दुपारी १२ वाजता गांधी पुतळ्यासमोर काळया फिती लावून आंदोलन करतील आणि नंतर मुख्यमंत्र्यांना निवेदन देतील.. यानिमित्तानं पुन्हा एकदा राज्यातील पत्रकार संघटना एकत्र येत आपल्यामधील एकजुटीचं दर्शन घडवत आहेत..



मराठी पत्रकार परिषदेच्या आज झालेल्या तातडीच्या ऑनलाईन बैठकीत राज्यातील पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याच्या संदर्भात सांगोपांग चर्चा होऊन सर्व पत्रकार, संघटनांना बरोबर घेऊन आंदोलन करावे असा निर्णय घेतला गेला.. त्यानुसार राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांशी चर्चा करून उद्याच्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.. उद्याच्या या आंदोलनात राज्यातील सर्व पत्रकार तसेच संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन एस.एम देशमुख यांनी केले आहे.. सभ्य आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात भूमिका घेऊन पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांचा आवाज कायमचा बंद केला जातो, पत्रकारांवर हल्ले करून किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, पत्रकार संरक्षण कायदा आहे मात्र या कलमाखाली गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ केली जाते त्यामुळे महाराष्ट्रात निर्धोकपणे काम करणे पत्रकारांना कठीण झाले आहे.. या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भिंतीची भावना निर्माण होत आहे.. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी उद्या शुक्रवारी दिनांक १० फेब्रुवारी रोजी राज्यभर पत्रकार काळ्या फिती लावून काम करतील आणि तहसिल, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करतील..  हा विषय सर्व पत्रकार आणि संघटनांसाठी जिव्हाळ्याचा असल्याने स्थानिक पातळीवरील सर्व मतभेद बाजुला ठेऊन सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन एस.एम देशमुख यांनी केले आहे..  मराठी पत्रकार परिषदेच्या आजच्या बैठकीस एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई, राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, परिषदेच्या उपाध्यक्षा जान्हवी पाटील, रत्नागिरीचे जिल्हा अध्यक्ष तापेकर, कोकण विभागीय सचिव अनिल भोळे आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies