वाढदिवसाच्या खर्चाला फाटा; मुक्ताई वसतिगृहातील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
वाढदिवसाच्या खर्चाला फाटा; मुक्ताई वसतिगृहातील विद्यार्थ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
पिंगोरी, ता. पुरंदर : आजच्या काळात वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात होणारा अनावश्यक खर्च, पार्ट्या आणि दिखाव्याला फाटा देत वाल्हे येथील युवक चैतन्य चव्हाण यांनी आपला वाढदिवस एका वेगळ्याच पद्धतीने साजरा करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी पिंगोरी येथील मुक्ताई वसतिगृहात विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करत त्यांना खाऊ व शालेय साहित्याचे वाटप केले.
पिंगोरी येथे उद्योजक लक्ष्मण कदम व त्यांच्या पत्नी यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल, परंतु शिक्षण घेण्याची जिद्द असलेल्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षीपासून मुक्ताई वसतिगृह सुरू केले आहे. या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या निवासासह शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधांची व्यवस्था करण्यात येत असून त्यांच्यावर कोणताही आर्थिक भार पडत नाही. सध्या या वसतिगृहात सात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत चैतन्य चव्हाण यांनी आपला वाढदिवस याच विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्याचे वाटप करून त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक आणि वसतिगृहाचे संस्थापक लक्ष्मण कदम यांनी कौतुक करत त्यांचे आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी कै. राहुल मारुती यादव आणि कै. गोपाळ शंकर चव्हाण यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. सामाजिक जाणीव जपणारा हा उपक्रम इतर युवकांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
सामाजिक संदेश :
"वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजाला काहीतरी देण्याची संधी आहे. केक, फटाके आणि दिखाव्यापेक्षा गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य अधिक मौल्यवान असते," हे चैतन्य चव्हाण यांच्या कृतीतून अधोरेखित झाले.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा