भोरच्या इंगवलीत उभारणार स्व. दादा कोंडके यांचे भव्य स्मारक
भोरच्या इंगवलीत उभारणार स्व. दादा कोंडके यांचे भव्य स्मारक
भोर
भोर तालुक्यातील इंगवली येथे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते व निर्माते स्वर्गीय दादा कोंडके यांच्या स्मरणार्थ भव्य स्मारक उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी इंगवली येथे भेट देत स्मारकासाठी प्रस्तावित जागेची पाहणी केली.
यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत स्मारकाच्या आराखड्याबाबत व संकल्पनेबाबत चर्चा केली. दादा कोंडके यांच्या कार्याचा गौरव जपणारे आणि पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल असे स्मारक उभारण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. "महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरेल असे स्वर्गीय दादा कोंडके यांचे भव्य स्मारक इंगवली येथे उभारण्यात येईल," असे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.
पाहणी दौऱ्यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, उपजिल्हाधिकारी विक्रम बांदल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच गावातील आणि तालुक्यातील अनेक नागरिकांनीही या उपक्रमाला पाठिंबा दर्शवत उपस्थिती लावली.
या स्मारकामुळे दादा कोंडके यांच्या आठवणींना उजाळा मिळण्याबरोबरच इंगवली गावाची सांस्कृतिक ओळख अधिक दृढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा