सासवडच्या वाघडोंगर परिसरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

 सासवडच्या वाघडोंगर परिसरात बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  


सासवड ता. ९ : सासवड शहरालगतच्या वाघडोंगर परिसरात सोमवारी (दि.८) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिक, शेतकरी तसेच सकाळ - सायंकाळ व्यायाम व फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


वाघडोंगर परिसर हा सासवड शहरातील नागरिकांसाठी निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखला जातो. दररोज अनेक नागरिक सकाळी व सायंकाळी येथे फिरण्यासाठी, व्यायामासाठी आणि निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मात्र, सोमवारी बिबट्याचे थेट दर्शन झाल्याच्या घटनेनंतर या परिसरातील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत होते. त्यातच बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थतेची भावना निर्माण झाली आहे. विशेषतः शेतकरी, महिला आणि लहान मुलांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.


सासवड येथील नागरिक रोहिदास घारे यांनी सांगितले की, “आम्ही रोज सकाळी व्यायाम आणि फिरण्यासाठी वाघडोंगर परिसरात येत असतो. येथे प्रथमच बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे तसेच नागरिकांच्या 

सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.”



दरम्यान, वाघडोंगर परिसरात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असल्याने बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांचा अधिवास या भागात नैसर्गिकरीत्या असण्याची शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. वन्यजीवांच्या वाढत्या वावराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी, एकटे फिरणे टाळावे आणि वन्य प्राण्यांच्या हालचाली आढळल्यास तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


चौकट : सावधगिरी बाळगण्याचे वनविभागाचे आवाहन

वाघडोंगर परिसरातील वनक्षेत्रामुळे बिबट्यासह इतर वन्य प्राण्यांचा वावर अधूनमधून आढळू शकतो. त्यामुळे सकाळी व सायंकाळी फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांनी केले आहे. वन्य प्राण्यांचे दर्शन झाल्यास अथवा संशयास्पद हालचाली दिसून आल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, असेही ढोले यांनी सांगितले. वनविभागाकडून परिसरावर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई

निरेच्या नगररोडवर ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात. दुचाकीस्वार ठार. दुचाकीवरील पती पत्नी गेले होते मुलाला आश्रमशाळेत भेटायला

नीरा येथील ७५ वर्षीय दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू. चारचाकी वाहनाने दुचाकीला पालखी मार्गावर पाठिमागून ठोकरले.