मोदी–फडणवीस सरकार म्हणजे आजची ‘औरंगजेबी प्रवृत्ती’; पुरंदरातून स्वराज्याच्या लढ्याचा एल्गार. ‘खोटेपणा, फसवणूक आणि लोकशाहीची गळचेपी’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात
मोदी–फडणवीस सरकार म्हणजे आजची ‘औरंगजेबी प्रवृत्ती’; पुरंदरातून स्वराज्याच्या लढ्याचा एल्गार.
‘खोटेपणा, फसवणूक आणि लोकशाहीची गळचेपी’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात
पुरंदर :
देशाच्या पंतप्रधानपदाची ओळख पूर्वी प्रामाणिकपणा, समाजवाद आणि लोकशाही मूल्यांशी जोडली जात होती; मात्र सध्याच्या पंतप्रधानांची ओळख ‘सगळ्यात जास्त खोटं बोलणारा आणि फेकणारा नेता’ अशी झाली असल्याचा तीव्र आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. पुरंदर येथे झालेल्या जाहीर सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करत भाजपचा कारभार म्हणजे ‘आजची औरंगजेबी प्रवृत्ती’ असल्याचे म्हटले.
पुरंदर तालुक्यातील निरा येथे झालेल्या सभेत सपकाळ पुढं म्हणाले, “डॉ. मनमोहन सिंग यांची ओळख प्रामाणिक, भ्रष्टाचारमुक्त पंतप्रधान अशी होती. माहिती अधिकार, अन्न सुरक्षा आणि शिक्षणाचा हक्क देत त्यांनी लोकशाही अधिक मजबूत केली. मात्र आजचे पंतप्रधान दरवर्षी दोन कोटी रोजगार, शेतकऱ्यांना दीडपट भाव, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये अशी आश्वासने देऊनही एकही वचन पूर्ण करू शकले नाहीत.”
नोटबंदीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, “देशभक्तीच्या नावाखाली जनतेला रांगेत उभे केले; पण काळा पैसा परत आला नाही. उलट अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले.”
देवेंद्र फडणवीस यांची तुलना थेट औरंगजेबाशी करताना सपकाळ म्हणाले, “औरंगजेबाने स्वतःच्या बापाला कैदेत टाकले, भावाला ठार केले. आज फडणवीस भाजपमधील ज्येष्ठ नेते, मित्रपक्ष आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा संपवण्याचे काम करत आहेत. पक्ष फोडा, समाजात फूट पाडा आणि सत्ता टिकवा—हा खेळ सुरू आहे.”
“मी फडणवीसांना ‘दरिंदा’ आणि ‘जल्लाद’ म्हटले, कारण ते लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्राच्या मूल्यांना फासावर लटकवत आहेत,” असेही सपकाळ यांनी ठामपणे सांगितले. या वक्तव्यांवरून माफी मागण्यास नकार देत त्यांनी, “मी चुकीचं काही बोललेलो नाही,” असे स्पष्ट केले.
सभेत ‘स्वराज्य’ या संकल्पनेचा उल्लेख करताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचा संदर्भ दिला. “स्वराज्य म्हणजे इथली माती, हवा, पाणी आणि माणसं. आज या स्वराज्यावरच आक्रमण सुरू आहे. पुरंदरच्या भूमीतून या अन्यायाविरोधात आवाज उठणार नसेल, तर महाराष्ट्र माफ करणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
भ्रष्टाचार, पक्षफोडी, ड्रग्ज प्रकरणे आणि शासकीय जमिनींच्या लुटीचे आरोप करत सपकाळ यांनी भाजप-शिंदे गटावर गंभीर आरोप केले. “पैसा फेको, तमाशा देख—असा कारभार महाराष्ट्रात सुरू आहे,” असे ते म्हणाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच स्वराज्याची आशा असल्याचा दावा करत त्यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने लढण्याचे आवाहन केले. “काँग्रेसचा मावळा विचार आजही जिवंत आहे. पुरंदर ठरवेल, तर महाराष्ट्राचे राजकारण बदलेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा