उदगीरमध्ये १८-१९ एप्रिलला अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थितीत; बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष

उदगीरमध्ये १८-१९ एप्रिलला अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन 


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थितीत; बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष 



मुंबई :

       अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे राष्ट्रीय अधिवेशन १८ व १९ एप्रिल रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होणार असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार असून राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. 


८७ वर्षांची परंपरा जपणारी मातृसंस्था 


         मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची तब्बल ८७ वर्षांची समृद्ध परंपरा आहे. राज्यातील विविध भागांमध्ये दर दोन वर्षांनी परिषदेचे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित केले जाते. यापूर्वी रोहा, पिंपरी-चिंचवड, शेगाव आणि नांदेड येथे अधिवेशने झाली होती. यंदा उदगीर येथे होणाऱ्या अधिवेशनासाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. 



मुख्यमंत्र्यांना निमंत्रण; उपस्थित राहण्याची ग्वाही 


         अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर परिषदेच्या शिष्टमंडळाने स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले व स्थानिक आमदार संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी ही विनंती मान्य करत “मी नक्की येतो” अशी ग्वाही दिल्याची माहिती आयोजकांनी दिली. 


देशभरातून तीन हजार पत्रकारांची अपेक्षा 


       यंदाचे अधिवेशन विशेष व आगळेवेगळे करण्याचा आयोजकांचा प्रयत्न असून देशभरातील नामांकित पत्रकारांना निमंत्रित केले जाणार आहे. या अधिवेशनासाठी देशभरातून सुमारे तीन हजार पत्रकार उपस्थित राहतील, असा अंदाज असून त्यानुसार नियोजन व व्यवस्था करण्यात येत आहे. उदगीर येथील अधिवेशन कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. 


  शिष्टमंडळात मान्यवरांची उपस्थिती 


          मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, मुंबई विभागीय सचिव दीपक कैतके, लातूर विभागीय सचिव तथा अधिवेशनाचे प्रमुख संयोजक सचिन शिवशेट्टे, सातारा जिल्हाध्यक्ष तथा अधिस्वीकृती समितीचे पुणे विभागाचे अध्यक्ष हरिष पाटणे, मुंबई अध्यक्ष राजा आदाटे तसेच संयोजन समितीचे युवराज धोतरे आदी उपस्थित होते. 


मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 


        मराठी पत्रकारांसाठी अभिमानाचा सोहळा ठरणाऱ्या या अधिवेशनास राज्यासह देशभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, लातूर विभागीय सचिव तथा प्रमुख संयोजक सचिन शिवशेट्टे, संभाजीनगर विभागीय सचिव रवी उबाळे आणि संयोजन समितीचे युवराज धोतरे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई