“पत्रकारांचा आवाज दाबण्याचे प्रकार वाढत असून ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा” – एस. एम. देशमुख राज्यभरातील पत्रकारांच्या पाठीशी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ठामपणे उभी

“पत्रकारांचा आवाज दाबण्याचे प्रकार वाढत असून ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा” – एस. एम. देशमुख 


राज्यभरातील पत्रकारांच्या पाठीशी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ठामपणे उभी 



मुंबई : 

      महाराष्ट्रात पत्रकारांवर वाढत्या दबावाच्या आणि दडपशाहीच्या घटना चिंताजनक स्वरूप धारण करत असून, हा प्रकार लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांनाच बाधा आणणारा आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केली आहे. सत्य व निष्पक्ष पत्रकारिता करणाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवून त्यांचा मानसिक, आर्थिक व शारीरिक छळ करण्याचे प्रकार सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. 


      अकोला येथे टीव्ही 9 चे बातमीदार गणेश सोनोने, सामच्या बातमीदार हर्षदा सोनोने यांच्यासह पाच पत्रकारांना हक्कभंग समितीकडून कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. एका आमदारासंदर्भात वस्तुनिष्ठ बातमी दिल्यामुळे अशी कारवाई करण्यात येणे अत्यंत धक्कादायक असल्याचे देशमुख यांनी सांगितले. यामुळे पत्रकारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात सत्य मांडू नये, असा अप्रत्यक्ष दबाव निर्माण केला जात असल्याची टीका त्यांनी केली. 


         नांदेडमध्ये मुक्त पत्रकार मुक्ता कदम यांनी मनपा निवडणूक काळात पाणी, स्वच्छता व आरोग्य यांसारख्या जनहिताच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला. मात्र, याच बातम्यांच्या आधारे त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पत्रकारांचे कर्तव्य बजावत असताना अशा प्रकारे कारवाई होणे निषेधार्ह असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. 


        दरम्यान, श्रीरामपूर येथील पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी सामाजिक गैरप्रकार उघडकीस आणण्याचे धाडस दाखवले. मात्र, त्यांच्या बातम्यांनंतर त्यांना धमक्या देण्यात आल्या असून त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी संरक्षण दिले असले तरी, पत्रकारांना अशा परिस्थितीला सामोरे जावे लागणे ही गंभीर बाब असल्याचे देशमुख म्हणाले. 


       एकीकडे पत्रकारांवर दबाव टाकण्याचे प्रकार सुरू असताना दुसरीकडे पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या सर्व घटनांमुळे पत्रकारांची हेतुपुरस्सर कोंडी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 


        तिन्ही प्रकरणांतील संबंधित पत्रकारांच्या पाठीशी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ठामपणे उभी असल्याचे सांगत, पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी संघर्ष सुरूच राहील, असा इशाराही देशमुख यांनी दिला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई