Tuesday, September 23, 2025

आता पत्रकारांचेही "चलो मुंबई" पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील पत्रकार संघटनांचा ‘चलो मुंबई’चा नारा

 आता पत्रकारांचेही "चलो मुंबई"


पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी

राज्यातील पत्रकार संघटनांचा ‘चलो मुंबई’चा नारा



मुंबई : राज्यातील पत्रकारांवरील वाढत्या हल्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीस राज्य सरकारला भाग पाडण्याकरिता राज्यातील पत्रकार संघटनांनी आज चलो मुंबईचा नारा दिला आहे. विविध पत्रकार संघटनांनी एकत्र येत तयार केलेल्या "पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंच" च्या मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


नाशिक, त्र्यंबकेश्वर, मुंबई, अमरावती आदि ठिकाणी  पत्रकारांवरील भ्याड हल्ल्याचा या बैठकीत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार उद्भवत असून, या संदर्भात राज्य सरकारने २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९ च्या पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नोटीफिकेशन तातडीने काढावे, असा ठराव या बैठकीत संमत करण्यात आला. सरकारने याची तातडीने अंमलबजावणी न केल्यास टप्प्या टप्पयानं आंदोलनाची धार वाढवत नेण्याचा निर्णय घेण्यात आला.. त्यानुसार येत्या ११ ऑक्टोबरपासून यासाठी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार असून ११ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना हजारो एस.एम. एस पाठवून त्यांचे लक्ष पत्रकारांच्या मागण्यांकडे वेधले जाईल..

     त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील किमान ५ हजार पत्रकार सहभागी होतील. त्यासाठी ‘चलो मुंबई’चा नारा या बैठकीत देण्यात आला आहे.



       या बैठकीस अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, विश्वस्त राही भिडे, परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, राजा अदाटे , शरद पाबळे, परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टिवकर, ज्येष्ठ संपादक महेश म्हात्रे, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे सुजित महामुलकर, मुंबई क्राइम रिपोर्टर असोसिएशनचे विशाल सिंह, डिजिटल मिडिया परिषदेचे गणेश जगताप, युवराज जगताप, सुनील ह. विश्वकर्मा, अजय मगरे, जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्राचे राजेंद्र साळसकर आदि पत्रकार उपस्थित होते.

      सरकारला जाग आणण्यासाठी येत्या ११ ऑक्टोबरपासून राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राज्यभरातून पत्रकार लाखोंच्या संख्येने एसएमएस पाठवून पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी विनंती करणार आहेत. त्यानंतरही सरकारचे डोळे उघडले नाहीत, तर संविधान दिनाचे औचित्य साधून आझाद मैदान येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत आणि यासाठी राज्यभरातील पत्रकार मुंबईत धडकतील, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.

Tuesday, September 16, 2025

वडगाव निंबाळकर पोलिसांची मोठी कारवाई : दोन महिलांची सुटका, दोन सराईत आरोपी जेरबंद

वडगाव निंबाळकर पोलिसांची मोठी कारवाई : दोन महिलांची सुटका, दोन सराईत आरोपी जेरबंद



बारामती तालुका | 16 सप्टेंबर 2025


वडगाव निंबाळकर पोलिसांनी अवैधरित्या वेश्या व्यवसायासाठी महिलांना जबरदस्तीने नेणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करून दोन महिलांची सुटका केली आहे. या कारवाईमुळे परिसरात एक मोठे मानव तस्करी रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


घटनाक्रम


दिनांक 15 सप्टेंबर रोजी करंजे पूल बस स्टॉप परिसरात पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना लाल रंगाची काळ्या काचा असलेली संशयास्पद गाडी फिरत असल्याची माहिती मिळाली. तत्काळ नाकाबंदी करून गाडी तपासली असता, त्यात दोन पुरुष व दोन महिला आढळल्या. महिला पोलिसांच्या उपस्थितीत चौकशी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली.


महिलांना जबरदस्ती


पीडित महिलांनी सांगितले की, त्यांना पैशाचे आमिष दाखवून हडपसर, पुणे येथून लोणंद येथे आणण्यात आले होते. आरोपी महिलांना बेकायदेशीर वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत होते. त्याच गैरकृत्यासाठी त्यांना नीरा-बारामती रोडवर नेले जात असताना पोलिसांनी कारवाई केली.


आरोपींची माहिती


1. सुयोग हिंदुराव खताळ (रा. कापडगाव, लोणंद, ता. फलटण, जि. सातारा)



2. प्रीतम आप्पासाहेब घुले (रा. कापडगाव, लोणंद, ता. फलटण, जि. सातारा)




हे दोघे स्विफ्ट कार (क्र. MH 11 MD 8055) मधून महिलांना घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले.


कायदेशीर कारवाई


या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 140(3), 143(3), 144(2), 3(5) तसेच महिला व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पुढील तपास


सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे व पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून, आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.


पोलिसांची टीम


ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक विलास नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पीएसआय राहुल साबळे, डीएस वारुळे व हवालदार अमोल भोसले, एस.पी. देशमाने, रमेश नागटिळक, कुंडलिक कडवळे, पोपट नाळे, निलेश जाधव, नागनाथ परगे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.


या कारवाईनंतर परिसरात एक प्रकारे दिलासा व्यक्त केला जात असून, पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलांची सुटका झाल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे



Monday, September 15, 2025

डिजिटल मीडियामधील पत्रकांराच्या प्रश्नासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू : एस.एम.देशमुख छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाला मोठा प्रतिसाद

डिजिटल मीडियामधील पत्रकांराच्या प्रश्नासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू : एस.एम.देशमुख 


छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाला मोठा प्रतिसाद 



मुंबई, १५ सप्टेंबर : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिले राज्यस्तरीय अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडले. यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करताना मोठी घोषणा केली आहे. ‘डिजिटल मीडियामधील पत्रकारांना आजही शासन दरबारी पत्रकार म्हणून मान्यता दिली जात नाही, ही मोठी शोकांतिका आहे. एखादी बातमी काही क्षणामध्ये जगभर पोहोचवणाऱ्या डिजिटल मीडियातील पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सरकार चालढकल करीत आहे. सरकारने तातडीने या पत्रकारांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा वेळप्रसंगी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद व डिजिटल मीडिया परिषद रस्त्यावर उतरून आंदोलन करू,’ असा इशारा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख  यांनी दिला आहे.  


       माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा खासदार डॉ. भागवत कराड, ज्येष्ठ पत्रकार तुळसीदास भोईटे, धनंजय लांबे, डॉ.अनिल फळे, रवींद्र पोखरकर यांनीही या अधिवेशनात मार्गदर्शन केले. याप्रसंगी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, सह प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, उपाध्यक्ष गणेश मोकाशी, गो.पी.लांडगे, डीजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, सचिव प्रकाश भगनुरे, कार्याध्यक्ष कानिफ अन्नपूर्णे, मुंबई प्रतिनिधी सुनील वाघमारे, उपाध्यक्ष महादेव जामनिक, कोषाध्यक्ष ब्रह्मानंद चक्करवार यांच्यासह राज्याच्या विविध भागातून आलेले पत्रकार उपस्थित होते. 



        या अधिवेशनात पत्रकारांच्या समस्यांना वाचा फोडत देशमुख यांनी ‘पत्रकारांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात’ अशी मागणी केली. एस.एम.देशमुख म्हणाले, ‘पत्रकार संरक्षण कायदा मंजूर होऊन सात वर्षे उलटली तरी सरकारने अधिसूचना काढलेली नाही. यु ट्युबवर काम करणाऱ्या पत्रकारांना पत्रकार म्हणून मान्यता मिळालेली नाही, तसेच पेन्शन व अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. राज्य सरकार पत्रकारांच्या प्रश्नांबाबत चालढकल करत आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सातत्याने पत्रकारांच्या प्रश्नांवर आवाज उठवत असते. प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधील पत्रकारांच्या प्रश्नांसाठी परिषदेच्या माध्यमातून विविध आंदोलने करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे पत्रकारांच्या समस्या सुटण्यास देखील मदत झाली आहे. पण आता प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियामधील पत्रकारांसोबतच डिजिटल माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांच्या प्रश्नासाठी संघटनेचा लढा सुरू राहील, असेही देशमुख म्हणाले. डिजिटल मिडियातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका मिळाली पाहिजे, युट्यूब चँनल साठी सरकारी जाहिराती मिळाल्या पाहिजेत आणि ज्या सवलती प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियातील पत्रकारांना मिळतात त्या सर्व सवलती डिजिटल मिडियातील पत्रकारांना देखील मिळाव्यात अशी आग्रही मागणी देशमुख यांनी केली. या संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. 


       या अधिवेशनाला माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा खासदार डॉ. भागवत कराड यांनी देखील भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या आरोग्यविषयक, रेल्वेविषयक व लघुउद्योगांना मदत मिळावी यासाठी मुद्रा लोनविषयी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच तत्पर आहे, असेही ते म्हणाले. 


       अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे, रवींद्र पोखरकर, धनंजय लांबे, डॉ. अनिल फळे यांनी डिजिटल मिडीयासंबंधी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ पत्रकार तसेच राज्याच्या विविध भागात डिजिटल माध्यम क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा देखील सन्मान करण्यात आला. 

Sunday, September 14, 2025

युट्यूब चँनल्स, पोर्टल, ब्लॉक लिहाणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती, शासनाच्या योजना व जाहिराती मिळण्यासाठी प्रयत्न करणार : एस. एम. देशमुख युट्यूब चँनल्स, पोर्टल, ब्लॉक लिहिणाऱ्या ८ संपादकांचा सन्मान

युट्यूब चँनल्स, पोर्टल, ब्लॉक लिहाणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती, शासनाच्या योजना व जाहिराती मिळण्यासाठी प्रयत्न करणार : एस. एम. देशमुख 


युट्यूब चँनल्स, पोर्टल, ब्लॉक लिहिणाऱ्या ८ संपादकांचा सन्मान 




संभाजीनगर : 


     डिजिटल मिडियाचं लोण आता गाव पातळीवर पोहोचले आहे. गावागावात तरूणांनी युट्यूब चँनल्स, पोर्टल, ब्लॉक सुरू केले आहेत. त्यातील काही चँनल्स अत्यंत उत्कृष्टपणे काम करीत आहेत. आम्ही पत्रकारांची मातृसंस्था असल्याने चांगले कार्य करणाऱ्या पत्रकारांचं कौतूक करणं आमचं काम आहे. म्हणूनच डिजिटल मिडिया परिषदेच्या अधिवेशनात काही युट्यूब, पोर्टल चालकांचा सन्मान करण्यात येतोय. भविष्यात या युट्यूब चँनल्स, पोर्टल, ब्लॉक लिहाणाऱ्या पत्रकारांना अधिस्वीकृती ओळखपत्र, राज्य शासनाच्या विविध योजना योजना जाहिराती कशा मिळतील यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. असे मत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी व्यक्त केले. 



     अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशन संभाजीनगर येथे पारपडले. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानावरून अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांची प्रमुख उपस्थितीत होती. राज्यभरातील ३४ जिल्ह्यातील पत्रकार परिषदेचे पदाधिकारी, सदस्य व डिजिटल मिडिया मध्ये काम करणारे हजारो पत्रकार उपस्थित होते. 


          यावेळी व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मंसूरभाई शेख, उपाध्यक्ष गणेश मोकाशी, गो.पी.लांडगे, लातूर विभागीय सचिव सचिन शिवशेटे, ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे, डॉ.अनिल फळे, डॉ.मोहम्मद अब्दुल कदीर, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी,  सचिव प्रकाश भगनुरे, कार्याध्यक्ष कानिप अन्नपूर्णे, मुंबई प्रतिनिधी सुनील वाघमारे, उपाध्यक्ष महादेव जामनिक, कोषाध्यक्ष ब्रह्मानंद चक्करवार, परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख संदिप कुलकर्णी, सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. 




      अध्यक्षीय समारोपात एस.एम.देशमुख यांनी डिजिटल मीडियाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली. सरकार अद्यापही यु ट्युबच्या पत्रकारांना पत्रकार मानायला तयार नाही. पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात राज्य सरकार चालढकल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रकार संरक्षण कायदा मंजूर होऊन सात वर्षे झाली. तरी सरकार अद्यापही अधिसूचना काढायला तयार नाही. पत्रकारांच्या पेन्शनचे, अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचे प्रश्न प्रलंबित असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. 




खालील संपादकांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संचलित डिजिटल मिडिया परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात सन्मानित करण्यात आले. 


1) रवींद्र आंबेकर

'मॅक्स महाराष्ट्र' मुंबई 


2) मल्हार संतोष पवार 

'न्यूज 24' माथेरान, रायगड 

12 लाख सबस्क्राईबर्स 


3) आफताब मन्सूर शेख 

'न्यूज टुडे 24' अहिलयानगर 

सबस्क्राईबर्स 2,80,000 


4) पुजा अनिल बन्ने 

'गावाकडची टेस्ट' जत, सांगली 

सबस्क्राईबर्स 2,86,000 


5) उमेश घोंगडे, पुणे 

'बखर लाईव्ह'  You-Tube चॅनेल

7 लाख 26 हजार सबस्क्राईबर्स 


6) महेश जगताप (बारामती)

'सोमेश्वर रिपोर्टर लाईव्ही पोर्टल'

1 लाख 85 हजार स्बस्क्राइबर. 


7) प्रभू दिपके 

संपादक 'दै. लोकसमिक्षा'

1लाख 67 हजार स्बस्क्राइबर 


8) आरिफ शेख

'डी 24 संभाजीनगर' 


युट्यूब, पोर्टल चालकांचा सन्मान करण्यात येणाऱ्या या  संपादकांना डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशनात सन्मानित करण्यात आले. शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड व अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Friday, September 12, 2025

डिजिटल मिडिया परिषदेचे राज्यव्यापी अधिवेशन ऐतिहासिक ठरेल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा विश्वास डिजिटल मिडियातील पत्रकारांचे संघटन करुन अधिवेशनात ठोस भूमिका घेणार.

 डिजिटल मिडिया परिषदेचे राज्यव्यापी अधिवेशन ऐतिहासिक ठरेल


मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचा विश्वास


डिजिटल मिडियातील पत्रकारांचे संघटन करुन अधिवेशनात ठोस भूमिका घेणार. 

 



संभाजीनगर : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची एक विंग असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन रविवार दिनांक १४ सप्टेंबर २०२५ रोजी संभाजीनगर येथे होत असून अधिवेशनास एक हजार पत्रकार उपस्थित राहतील असा विश्वास मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केला आहे. डिजिटल मिडियातील पत्रकारांची संख्या उत्तरोत्तर वाढत असून त्यांना संघटीत करून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत अधिवेशनात विचार विनिमय करून ठोस भूमिका घेतली जाणार आहे. 

      संभाजीनगरच्या प्रसिद्धी क्रांती चौक परिसरातील एकनाथ रंगमंदिर येथे पालकमंत्री संजय शिरसाट आणि कँबिनेट मंत्री अतुलजी सावे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून एस. एम. देशमुख अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी असतील. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. "मुक्तपीठ" चे संपादक आणि नवाकाळचे सल्लागार संपादक तुळशीदास भोईटे आणि "अभिव्यक्ती" युट्यूब चँनलचे संपादक रवींद्र पोखरकर मुख्य वक्ते म्हणून उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहेत. डिजिटल आणि प्रिन्ट मिडियातील पत्रकारांनी अधिवेशनास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, डिजिटल मिडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे, कार्यक्रमाचे संयोजक तथा संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांनी केले आहे. 

     अधिवेशनात उत्कृष्ट युट्यूब चँनल चालवून ते यशस्वी करून दाखविणाऱ्या काही संपादकांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती अनिल वाघमारे यांनी दिली. अधिवेशनास स्थानिक निवृत्त मान्यवर पत्रकारांचा ही सन्मान करण्यात येणार आहे. तसेच डिजिटल मिडिया परिषदेची राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे. डिजिटल मिडिया परिषदेचे हे अधिवेशन ऐतिहासिक ठरेल असा विश्वास एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

        डिजिटल मिडिया परिषदेच्या संभाजीनगर अधिवेशनासाठी येणाऱ्या सर्व सन्माननिय मित्रांना सूचित केले जाते की, संभाजीनगर येथे निवास व्यवस्था होऊ शकलेली नाही. एक मंगल कार्यालय बुक केले होते, ते ऐनवेळी संबंधितांनी रद्द केल्याने अडचण झाली आहे. तेव्हा येणाऱ्यांना आपली व्यवस्था स्वत: करावी लागेल. स्वत: एस. एम. देशमुख यांनी देखील त्यांची व्यवस्था केलेली आहे. कृपया ऐनवेळी निर्माण झालेल्या अडचणीची नोंद घ्यावी आणि सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले आहे.


 



महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये* *सहकार्याची नवी दारे खुली होणार* *– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

 *महाराष्ट्र-आयोवा (अमेरिका) भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये*

*सहकार्याची नवी दारे खुली होणार*

*– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*



• गुंतवणूक व आर्थिक देवाणघेवाण वृद्धिंगत होणार

• शेती, अन्नप्रक्रिया, आरोग्य, पर्यटन, क्रीडा, अक्षय ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढेल

• विद्यापीठे व संशोधन केंद्रांमध्ये शैक्षणिक सुविधा मिळणार


मुंबई, दि. 12 : महाराष्ट्र – आयोवा (अमेरिका) यांच्यातील भागीदारीमुळे कृषी, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा व तंत्रज्ञान अशा विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोवाबरोबर करण्यात आलेल्या सामंजस्य करारानंतर केले.



*सामंजस्य करारामुळे नवोपक्रमांना चालना*

अमेरिकेतील कृषिप्रधान आयोवा राज्याशी महाराष्ट्राने ऐतिहासिक सामंजस्य करार केला. आयोवा हे अमेरिकेचे ‘फूड बास्केट’ म्हणून प्रसिद्ध असून शेती व कृषितंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगत राज्य मानले जाते. या कराराद्वारे महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती, कृषितंत्रज्ञान, डिजिटायझेशन, आरोग्य, व्यावसायिक प्रशिक्षण व कौशल्य विकास, पर्यटन, क्रीडा, जैवतंत्रज्ञान, सामाजिक-आर्थिक सेवा, नवीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत सुविधा विकास या महत्त्वाच्या क्षेत्रांत नव्या संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयोवाच्या राज्यपाल किम रेनॉल्ड्स यांच्या उपस्थितीत हा करार मुंबईतील ताज पॅलेस हॉटेलमध्ये झाला. या प्रसंगी मुख्य सचिव राजेशकुमार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, तसेच आयोवाचे कृषी सचिव माईक नैग, विकास प्राधिकरण संचालक डेबी दुर्हम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आयोवा हे उत्पादन व कृषितंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य राज्य आहे. त्यामुळे त्यांच्यासोबतचा हा करार महाराष्ट्रातील शेती, तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रासाठी एक मोठी संधी आहे. आयोवा विद्यापीठ आणि कृषी विद्यापीठे यांच्या संयुक्त सहकार्यातून अत्याधुनिक तंत्रज्ञान महाराष्ट्रात आणले जाईल. भारताने नवीकरणीय ऊर्जेत केलेली प्रगती उल्लेखनीय आहे आणि या करारामुळे या क्षेत्रात आणखी नवे प्रकल्प साकारतील.”


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्राने याआधी जपान व जर्मनीसोबत सिस्टर-स्टेट करार करून व्यापार, उद्योग व सांस्कृतिक देवाणघेवाणीला गती दिली आहे. अमेरिकेतील एखाद्या राज्यासोबत हा पहिलाच करार असून तो भारत-अमेरिका संबंधांना अधिक बळकट करेल. राज्यपाल किम रेनॉल्ड्स यांनी महाराष्ट्राशी दीर्घकालीन भागीदारी करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याने दरवर्षी आयोवाचे शिष्टमंडळ भारतात येईल तर महाराष्ट्राचे शिष्टमंडळ आयोवाला भेट देईल. परस्पर राज्यातील विविध क्षेत्रातील ज्ञानाचा उपयोग दोन्ही राज्याच्या विकासासाठी होणार आहे”


मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, “हा करार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘जागतिक सहकार्य आणि राज्यांची आंतरराष्ट्रीय भागीदारी’ या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे. यामुळे राज्यातील शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक आणि संशोधकांना नवे मार्ग खुले होतील आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला गती मिळेल.”


*दीर्घकालीन भागीदारीचे आश्वासन – राज्यपाल किम रेनॉल्ड्स*

आयोवाच्या राज्यपाल किम रेनॉल्ड्स यांनी आनंद व्यक्त करताना म्हटले, “भारतामधील सर्वात गतिमान राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राशी भागीदारी करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. हा करार नवोपक्रमांना चालना देणारा, आर्थिक समृद्धी वाढवणारा आणि जागतिक सहकार्याला प्रोत्साहन देणारा धोरणात्मक निर्णय आहे. दोन्ही राज्ये औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी क्षेत्रात नवे प्रकल्प उभारतील. दरवर्षी दोन्ही राज्यांचे शिष्टमंडळ परस्पर भेट देऊन या सहकार्याला अधिक दृढ करतील.”


*या करारामुळे होणारे फायदे :*

* शेतीत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर – आयोवाची आधुनिक कृषी तंत्रज्ञान, यंत्रणा व संशोधन महाराष्ट्रात आणता येईल, ज्यामुळे उत्पादनक्षमता वाढेल.

* अन्नप्रक्रिया उद्योग वाढ – शेतमालाला अधिक मूल्य मिळेल, निर्यात संधी वाढतील.

* डिजिटलायझेशन व तंत्रज्ञानात सहकार्य – स्मार्ट गव्हर्नन्स, ई-सेवा व डिजिटल शेतीसाठी नवीन उपाय महाराष्ट्रात लागू होतील.

* आरोग्य क्षेत्रातील सुधारणा – आयोवाच्या आरोग्यसेवा प्रणाली, संशोधन व प्रशिक्षणामुळे ग्रामीण व शहरी आरोग्य सेवा सुधारतील.

* कौशल्य विकास व नोकऱ्या – व्यावसायिक प्रशिक्षण, नवीन कौशल्ये व औद्योगिक सहकार्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

* अक्षय ऊर्जा व पर्यावरण संरक्षण – स्वच्छ ऊर्जेच्या प्रकल्पांमुळे वायूप्रदूषण कमी होईल व शाश्वत विकासाला चालना मिळेल.

* पर्यटन व क्रीडा विकास – दोन्ही राज्यांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण, पर्यटन व्यवसाय आणि क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन मिळेल.

* आर्थिक गुंतवणूक व औद्योगिक वाढ – अमेरिका व भारतातील कंपन्यांमध्ये थेट भागीदारी, गुंतवणूक व व्यापार वाढेल.

* शिक्षण व संशोधन सहकार्य – विद्यापीठे व संशोधन केंद्रांमधील संयुक्त प्रकल्पांमुळे विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील अनुभव मिळेल.

* आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा – महाराष्ट्राचा जागतिक नकाशावर औद्योगिक व तंत्रज्ञान भागीदार म्हणून दर्जा वाढेल.

Thursday, September 11, 2025

पोलीस पाटलांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करणार : विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

 पोलीस पाटलांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करणार : विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे



  नीरा,दि.११: राज्यातील पोलीस पाटलांच्या विविध प्रलंबित मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यावर उपाययोजना करण्यात येणार असल्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी सांगितले.विधानभवन येथे बनसोडे अध्यक्षतेखाली गावकामगार पोलीस पाटील संघटनेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस संबंधित विभागाचे मंत्रालय अधिकारी , संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह राज्यभरातून पोलीस पाटील प्रतिनिधींनी उपस्थित होते. याबाबतची माहिती पोलिस पाटील संघांचे कार्याध्यक्ष विजय कुंजीर पाटील यांनी नीरा येथे माध्यमांना दिली 



          बनसोडे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीमध्ये पोलीस पाटलांचे सेवानिवृत्ती वयोमर्यादा ६० वरून ६५ करणे, पोलीस पाटलांची तक्रार आली तर त्या तक्रारीची चौकशी उपविभागीय अधिकारी स्तरावर करण्यात यावी.जे गाव महानगरपालिकेत, नगरपालिका मध्ये जाईल तेथील पोलीस पाटलांची पर्याय व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न केला जावा. रिक्त पदाची भरती करण्यात यावी. या प्रमुख मागाण्यांसह विविध समस्या बाबत गृहराज्यमंत्री यांच्या उपस्थितीतही बैठक लावण्यात येईल.असे आश्वासन बनसोडे यांनी पोलीस पाटलांच्या शिष्टमंडळाला दिले.



         उपाध्यक्ष बनसोडे म्हणाले, ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यात पोलीस पाटलांचा मोलाचा वाटा असल्याने त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. पोलिस पाठलांच्या समस्यांचे तातडीने निराकरण केले जाईल या बैठकीला पोलीस पाटील संघाचे राज्याध्यक्ष बाळासाहेब शिंदे याच्यासह बैठकीस पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Saturday, September 6, 2025

निरेच्या नगररोडवर ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात. दुचाकीस्वार ठार. दुचाकीवरील पती पत्नी गेले होते मुलाला आश्रमशाळेत भेटायला

निरेच्या नगररोडवर ट्रक व दुचाकीचा भिषण अपघात. दुचाकीस्वार ठार. 


दुचाकीवरील पती पत्नी गेले होते मुलाला आश्रमशाळेत भेटायला 





पुरंदर : 

     नीरा शहरातील अहिल्यानगर सातारा महामार्गावर भिषण अपघात झाला आहे. ट्रकला डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार ट्रकच्या चाकाखाली आला. दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी आधी निरेतील खाजगी दवाखान्यात व नंतर पुढिल उपचारासाठी लोणंदकडे रवाना केले, मात्र उपचारापूर्वीच ते मृत पावले होते. अपघातात दुचाकीस्वार विजय कुवरलाल साखरे, रा. बोपर्डी जिल्हा नागपूर हल्ली मुक्कामी वाई एम.आय.डी.सी. असे नाव आहे. 


     आज शनिवारी (दि.६) सायंकाळी ४.४५ वाजता अहिल्यानगर सातारा महामार्गावर मोरगाव किंवा बारामती दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक एम.एच. २०- जी. सी. ७८११ या ट्रकाला हॉंडा शाईन क्रमांक एम.एच. ११- सी.झेड ३१०२ यांच्यात अपघात झाला आहे. दुचाकीवरील चालक विजय साखरे व मागे बसलेली महिला लता साखरे रस्त्याच्या मध्यावरुन चाललेल्या ट्रकला डाव्याबाजूने ओव्हरटेक करताना दुचाकी घसरली दुचाकी व मागे बसलेली महिला रस्त्यावर कोसळल्या, मात्र दुचाकीस्वार थेट ट्रकच्या खाली गेला. दुचाकीस्वाराने हेल्मेट घातले होते पण गाडीवरुन दुचाकीस्वार खाली पडताच हेल्मेट डोक्यातून पुढे निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 


   अपघातात दुचाकीस्वाराचे प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. नीरेतील एक खाजगी हॉस्पिटल समोरच हा अपघात घडल्याने तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले पण परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी लोणंदकडे रवाना केले. नीरा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस सह उपनिरीक्षक रविराज कोकरे व हवालदार संतोष मदने घटनास्थळी भेट देत दोन्ही वाहने ताब्यात घेतली. 

    

     नागपूर जिल्ह्यातील बोपर्डी येथील विजय साखरे वाई (जिल्हा सातारा) एम.आय.डी.सी. मध्ये कामगार म्हणून दोन महिन्यांपासून काम करतायेत. विजय व लता साखरे वरवंड (ता.दौंड) भागातील एक आश्रम शाळेत बार वर्षांचा सहावीत शिकणाऱ्या आपल्या मुलाला भेटायला गेले होते. मुलाला भेटून वाई कडे निघालेल्या या दांपत्याच्या दुचाकीचा अपघात झाला आहे. 

Wednesday, September 3, 2025

नव्या जीआरनुसार कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ; मराठा समाजाला मोठा दिलासा

 नव्या जीआरनुसार कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुलभ; मराठा समाजाला मोठा दिलासा



मुंबई :

मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या लढ्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानातील उपोषणाच्या पाचव्या दिवशी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने जारी केलेल्या नव्या जीआरनुसार, हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबी, मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.


कुणबी प्रमाणपत्रासाठी आवश्यक पुरावे


कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रक्ताच्या नातेवाईकांचा पुरावा आवश्यक असेल. वडील, आजोबा, चुलते, आत्या, पणजोबा आदींच्या कागदपत्रांत कुणबी जातीची नोंद असणे महत्त्वाचे आहे. यासाठी –


शाळेच्या नोंदी : प्रवेश उतारा, शाळा सोडल्याचा दाखला


कोतवाल बुक/गाव नमुना नं. 14 : स्वातंत्र्यपूर्व काळातील जन्म-मृत्यू नोंदी


महसुली कागदपत्रे : 7/12, 8अ उतारे, फेरफार, खरेदीखत, भाडेपट्टा इ.


सर्व्हिस बुक : शासकीय सेवकांच्या नोंदी


आधीचे प्रमाणपत्र : नातेवाईकाकडे आधीचे कुणबी प्रमाणपत्र असल्यास त्याची प्रत



सुलभ प्रक्रिया


नव्या जीआरनुसार, जर थेट पुरावा उपलब्ध नसेल तर नातेवाईकांचे प्रतिज्ञापत्र व वंशावळ समितीच्या चौकशीच्या आधारे प्रमाणपत्र मिळवता येणार आहे. यासाठी ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहायक कृषी अधिकारी अशी गावपातळीवरील समिती तयार करण्यात येणार आहे. समिती स्थानिक चौकशी करून 90 दिवसांत प्रक्रिया पूर्ण करेल.


58 लाख नोंदींची प्रसिद्धी


शासनाने मिळवलेल्या तब्बल 58 लाख नोंदी ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना हे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. जर 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी राहण्याचा पुरावा नसेल, तर प्रतिज्ञापत्र सादर करून प्रमाणपत्र मिळवता येईल.


संभ्रम दूर, दिलासा मिळाला


सरसकट कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीमुळे निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला आहे. हा जीआर ओबीसी आरक्षणाच्या चौकटीत राहून मराठा समाजाला न्याय देणारा ठरला आहे.


👉 नव्या जीआरमुळे कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया पारदर्शक आणि सुटसुटीत झाली आहे. मराठा समाजातील नागरिकांनी तहसील कार्यालय, ग्रामपंचायत आणि संबंधित समित्यांशी संपर्क साधून प्रमाणपत्रासाठी त्वरित अर्ज करावा, असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.



---

Featured Post

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी सुरेश जगताप-निगडे; अजित पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान

 राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी सुरेश जगताप-निगडे; अजित पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान  बारामती :       राष्ट्र...