वडगाव निंबाळकर पोलिसांची मोठी कारवाई : दोन महिलांची सुटका, दोन सराईत आरोपी जेरबंद
वडगाव निंबाळकर पोलिसांची मोठी कारवाई : दोन महिलांची सुटका, दोन सराईत आरोपी जेरबंद
बारामती तालुका | 16 सप्टेंबर 2025
वडगाव निंबाळकर पोलिसांनी अवैधरित्या वेश्या व्यवसायासाठी महिलांना जबरदस्तीने नेणाऱ्या दोन सराईत आरोपींना अटक करून दोन महिलांची सुटका केली आहे. या कारवाईमुळे परिसरात एक मोठे मानव तस्करी रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
घटनाक्रम
दिनांक 15 सप्टेंबर रोजी करंजे पूल बस स्टॉप परिसरात पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांना लाल रंगाची काळ्या काचा असलेली संशयास्पद गाडी फिरत असल्याची माहिती मिळाली. तत्काळ नाकाबंदी करून गाडी तपासली असता, त्यात दोन पुरुष व दोन महिला आढळल्या. महिला पोलिसांच्या उपस्थितीत चौकशी केल्यानंतर धक्कादायक बाब समोर आली.
महिलांना जबरदस्ती
पीडित महिलांनी सांगितले की, त्यांना पैशाचे आमिष दाखवून हडपसर, पुणे येथून लोणंद येथे आणण्यात आले होते. आरोपी महिलांना बेकायदेशीर वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत होते. त्याच गैरकृत्यासाठी त्यांना नीरा-बारामती रोडवर नेले जात असताना पोलिसांनी कारवाई केली.
आरोपींची माहिती
1. सुयोग हिंदुराव खताळ (रा. कापडगाव, लोणंद, ता. फलटण, जि. सातारा)
2. प्रीतम आप्पासाहेब घुले (रा. कापडगाव, लोणंद, ता. फलटण, जि. सातारा)
हे दोघे स्विफ्ट कार (क्र. MH 11 MD 8055) मधून महिलांना घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले.
कायदेशीर कारवाई
या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 140(3), 143(3), 144(2), 3(5) तसेच महिला व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विलास नाळे व पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून, आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांची टीम
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक विलास नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पीएसआय राहुल साबळे, डीएस वारुळे व हवालदार अमोल भोसले, एस.पी. देशमाने, रमेश नागटिळक, कुंडलिक कडवळे, पोपट नाळे, निलेश जाधव, नागनाथ परगे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या कारवाईनंतर परिसरात एक प्रकारे दिलासा व्यक्त केला जात असून, पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलांची सुटका झाल्याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे
Comments
Post a Comment