पुरंदर पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीकडे तालुक्याचे लक्ष; कोण होणार सभापती - उपसभापती? राजकीय घडामोडींना वेग

पुरंदर पंचायत समिती सभापती-उपसभापती निवडीकडे तालुक्याचे लक्ष; कोण होणार सभापती - उपसभापती?

राजकीय घडामोडींना वेग 



पुरंदर :

        पुरंदर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी सोमवारी (दि.९) निवडणूक होत असून महिनाभरापूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर तालुक्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला आहे. आठ सदस्यांच्या पंचायत समितीत कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने सत्ता स्थापनेसाठी कोण कोणासोबत हातमिळवणी करणार याकडे संपूर्ण पुरंदर तालुक्याचे लक्ष लागले आहे. 


     पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांना महिना उलटल्यानंतर आता पुरंदर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी सोमवारी निवडणूक पार पडणार आहे. पंचायत समितीत एकूण आठ सदस्य असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, भाजपचे दोन आणि शिवसेनेचे दोन सदस्य निवडून आले आहेत. 


        संख्याबळाच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असला तरी बहुमतासाठी आवश्यक असलेला ‘पाच’ हा आकडा कोणाकडेही नसल्याने सत्ता स्थापनेसाठी इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे उपसभापती पदासाठी भाजप किंवा शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार का, याबाबत रविवारी सायंकाळपर्यंत तरी स्पष्ट चित्र दिसत नव्हते. 


          मागील पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्णतः पराभव करत शिवसेनेने पुरंदर पंचायत समितीवर भगवा फडकावला होता. त्या वेळी राष्ट्रवादीचा एकही सदस्य निवडून आला नव्हता. मात्र यावेळी परिस्थिती बदलली असून आठ पैकी चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. तरीही बहुमतासाठी आवश्यक असलेला एक सदस्य कमी पडत असल्याने सत्ता स्थापनेसाठी ‘कुबड्यांची’ गरज भासणार आहे. 


     पुरंदर तालुक्याच्या राजकीय इतिहासात पंचायत समितीच्या सत्तेसंदर्भात अनेकदा नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सदस्य थेट विरोधी गटात जाऊन सभापती पद पटकावल्याचे उदाहरणही ताजे आहे. तसेच काही वेळा सभापती एका गटाचा तर उपसभापती दुसऱ्या गटाचा अशा प्रकारची समीकरणेही पाहायला मिळाली आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही राजकीय अंकगणितात कोणते बदल घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


  यंदा सभापती पदासाठी नागरिकांचा मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गाचे आरक्षण असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिवे गणातून निवडून आलेले अमित झेंडे हे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. त्यांच्या सोबत गराडे गणातून निवडून आलेल्या अर्चना कटके, कोळविहीरे गणातून निवडून आलेल्या व राष्ट्रवादीच्या गटनेत्या स्मिता निगडे आणि निरा गणातून निवडून आलेल्या मोनिका कांबळे या सदस्यांचा समावेश आहे. 


     शिवसेनेचे वीर गणातून प्रविण जगताप व बेलसर गणातून माणिक निंबाळकर हे दोन सदस्य आहेत. तर भाजपकडून भिवडी गणातून सायली मनोज शिंदे आणि माळशिरस गणातून माऊली यादव हे सदस्य निवडून आले आहेत. 


      दरम्यान, पुढील काळात सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, खरेदी-विक्री संघ, दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच नीरा कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थांमध्ये स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले संजय जगताप यांचे वर्चस्व मानले जाते. या पार्श्वभूमीवर पुढील निवडणुकांतील समीकरणे लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात राजकीय समन्वय होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. 


      त्यामुळे उपसभापती पदासाठी भाजपला संधी देणे, किंवा निवडीच्या वेळी भाजप सदस्यांनी तटस्थ राहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापती-उपसभापती पदाला अप्रत्यक्ष पाठिंबा देणे, अशा विविध शक्यता चर्चेत आहेत. 


   या सर्व राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर सोमवारी होणाऱ्या सभापती आणि उपसभापती निवडीकडे पुरंदर तालुक्याचे राजकीय लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

कापूरहोळ हादरलं! भरदिवसा अपहरण; ‘सर्जिकल नाकाबंदीत’ थरारक सुटका. जेजुरी नीरा पोलीसांंची धडक कारवाई