Wednesday, July 31, 2024

निरा खोऱ्यातील चारही धरणांतून विसर्ग सुरू. चार धरणांनमध्ये ९१.४२ टक्के पाणीसाठा.

 निरा खोऱ्यातील चारही धरणांतून विसर्ग सुरू.


चार धरणांनमध्ये ९१.४२ टक्के पाणीसाठा.





पुरंदर :
   निरा खोऱ्यातील चार ही धरणातून आता विसर्ग सुरू झाले आहेत. मागील आठवड्यात गुरवारी निरा नदिवरील वीर धरण ९७ टक्के भरल्याने ६१ हजार क्युसेक्सने व गुंजवणी धरणातून ४ हजार ३६९ क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला होता. तर आज बुधवारी सायंकाळी आठ वाजल्यापासून निरा देवघर धरणातून ७५० क्युसेक्सने व भाटघर धरणातून १ हजार ७५० क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ४८.३२९  टिएमसी क्षमता असलेल्या नीरा खोऱ्यातील चार धरणात बुधवारी सायंकाळी ४४.१८३ टिएमसी म्हणजे ९१.४२ टक्के पाणीसाठा झाला आहे.

   गेली दोन आठवडे निरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसत आहे. सुरवातीला गुंजवणी धरण ७१.०१ टक्के भरल्याने गुरुवारी (दि.२५) पहाटे सहा वाजता २ हजार ७२४ क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला. सकाळी दहा वाजता ४ हजार ३६९ क्युसेक्सने वाढवण्यात आला. याच दरम्यान अकरा वाजता वीर धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने वीर धरणातून १३ हजार ९११ क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला. दुपारी दिड वाजता ३२ हजार ४५९ क्युसेक्सने, दुपारी २.४५ वाजता ५५ हजार ६४४ क्युसेक्सने, सायंकाळी ७.१५ वाजता विक्रमी ६१ हजार ४८८ क्युसेक्सने करण्यात आल्याने नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली.

      शुक्रवारी सकाळपासून कमी आधी प्रमाणात वीर व गुंजवणी धरणातून पाणी सोडण्यात आले. पण भाटघर व निरा देवघर धरणात ७० टक्के इतकाच पाणीसाठा झाल्याने या दोन धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला नाही. आज बुधवारी सकाळी पाच वाजता भाटघर धरण ९१.३५ टक्के, निरा देवघर धरण ८७.३६ टक्के, वीर धरण ९३.२० टक्के तर गुंजवणी धरण ७७.०७ टक्के पाणीसाठा झाला होता. सायंकाळी आठ वाजता भाटघर धरण ९४.२६ टक्के भरल्याने १ हजार ७५० क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला तर निरा देवघर धरण ९०.०६ टक्के भरल्याने ७५० क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वीर धरणातून आता १५ हजार १६१ क्युसेक्सने तर गुंजवणी धरणातून २५० क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण बुधवारी सकाळी सहा वाजता २६ टक्के पाणीसाठा झाला आहे. 

Tuesday, July 30, 2024

अलंकापुरीत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे नामजयघोषात आगमन

 अलंकापुरीत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे नामजयघोषात आगमन

आषाढी एकादशी दिनी पालखीची ग्रामप्रदक्षिणा    



आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आषाढी पायी वारी पालखी सोहळ्या अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे परंपरेने माऊली मंदिरात हरिनाम गजरात आगमन झाले. हजारो वारकरी भाविकांचे उपस्थितीत सोहळा हरिनाम गजरात आळंदीत परतला. यावर्षी लाखो भाविकांचे उपस्थितीत पायी वारी सोहळा राज्यात साजरा करण्यात आला. पंढरीत श्रीविठ्ठल देव भेट , गोपाळपुर काला उरकून श्रींचे वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे हजारो भाविक, वारकरी, नागरिकांच्या उपस्थितीत हरीनाम जयघोषात सोहळा मंगळवारी ( दि. ३० ) अलंकापुरीत गोरज मुहूर्तावर सव्वा सहाचे दरम्यान आळंदीत प्रवेशाला. परंपरेने बुधवारी ( दि. ३१ ) आळंदीत आषाढी एकादशी सोहळा हरिनाम गजरात साजरा होत आहे. यावेळी श्रींचे पालखी रथावर पुष्पवृष्टी नगरपरिषदे तर्फे करण्यात आला.  

  ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे परंपरेने आळंदी मंदिरात पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, ऋषिकेश आरफळकर यांचे प्रमुख उपस्थितीत श्रींचे पादुका आळंदी देवस्थानकडे वारीहून आल्यानंतर परंपरेने सुपूर्द करण्यात आल्या. श्रींचे पादुका पालखी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर विना मंडपातून माऊलींचे मंदिरात सोहळा आरतीने विसावला. तत्पूर्वी माऊली मंदिरातून श्रींचे स्वागत प्रथा परंपरेने दिंडी हरिनाम गजरात पालखी सोहळ्यास सामोरी जात महानैवेद्य झाला. अभंग हरिनाम गजरात सोहळ्याचे स्वागत व आगमन झाले. वारकरी शिक्षण संस्था मधील साधकांनी सोहळा आळंदीत प्रवेश प्रसंगी हरिनाम गजरात नाम जयघोष केला. पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, प्रमुख विश्वस्त अँड. राजेंद्र उमाप , भावार्थ देखणे, वेदमूर्ती हंसराज चक्रांकित, व्यवस्थापक माऊली वीर, मानकरी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, योगीराज कु-हाडे, योगेश आरु, विठ्ठल घुंडरे, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे चोपदार, उद्धव रणदिवे चोपदार, ज्ञानेश्वर गुळुंजकर,संजय रणदिवे, तुकाराम माने, भीमराव घुंडरे, नगारखाना सेवक मानकरी बाळासाहेब भोसले, समीर घुंडरे, विनायक घुंडरे, सचिन कुऱ्हाडे, महेश केदारी, महादेव रत्नपारखी यांचे सह मानकरी, दिंडीकरी, वारकरी भाविक उपस्थित होते. आळंदी मंदिरात ज्ञानेश्वर महाराज यांचे वैभवी पादुका आल्यानंतर श्रींचे संजीवन समाधी मंदिरात आरती झाली. देवस्थान तर्फे मानकरी यांना नारळ प्रसाद देण्यात आला. आळंदीत पालखी सोहळ्याचे स्वागतास भाविकांनी रस्त्याचे कडेला दुतर्फा उभे राहून गर्दी करीत हरिनाम जयघोषात स्वागत केले. यावर्षी पालखी सोहळ्यावर कोणतेही निर्बंध नसल्याने सोहळा मोठ्या आनंदी उत्साही मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.परंपरेने दिंडीने सामोरे जात सोहळ्याचे आळंदीत जुन्या पुला पलीकडे नैवेद्य, आरती झाली. यावेळी वरूणराजाने हलकासा शिडकावा केला. आळंदी पंचक्रोशीतून भाविक, नागरिक श्रींचे सोहळ्याचे स्वागतास मोठ्या संख्येने आले होते.    



  आळंदीत श्रींचे सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. रांगोळ्यांचे पायघड्या,पुष्पसजावट करण्यात आली. ठिकठिकाणी माऊली भक्त मंडळांनी श्रींचे पालखीवर पुष्प वर्षाव करीत स्वागत केले. भाविकांना विविध ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आळंदीतील प्रथा परंपरांचे पालन करीत श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज यांचे मूळपीठ येथे ह. भ. प. अवधूत महाराज चक्रांकित आणि परिवाराचे वतीने पिठलं भाकरी चा महाप्रसाद वाटप करण्यात आला. यासाठी भाविकांनी परंपरा जोपासत महाप्रसादास गर्दी केली. अनेक दिवसांचे विरहा नंतर श्रींचे पालखी सोहळा आळंदीत येताच येथे चैतन्य अवतरले. मोठ्या ज्ञानभक्तीमय वातावरणात आळंदीकरांचे वतीने सोहळ्याचे स्वागत आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान व ग्रामस्थांचे वतीने व्यवस्थापक माऊली वीर, आळंदी नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी कैलास केंद्रे, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे, अध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, ज्ञानेश्वर रायकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिंद्र शेंडे, दिघी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, मंडलाधिकारी राजेंद्र वाघ, आळंदी जनहित फाउंडेशन अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील, आजी, माजी पदाधिकारी, विविध सेवाभावी संस्था, संघटना यांचे वतीने करण्यात आले.

   यावेळी वारकरी शिक्षण संस्थेच्या शालेय मुलांनी रस्त्याचे दुतर्फा उभे राहून तसेच सोहळ्यात धाकट्या पादुका ते आळंदी असा प्रवास करीत सोहळ्याचे हरिनाम गजरात स्वागत केले. या पालखी सोहळ्यात सर्व प्रकारच्या सेवा सुव्यवस्थित आणि सुसज्ज व्यवस्था, भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात देत सोहळ्याचे चोख नियोजन झाले. उत्साही आनंदात पायी वारी करीत सोहळा वरुणराजाचे संततधारेत सोहळा आळंदीत आला. उपव्यवस्थापक तुकाराम माने, श्रीधर सरनाईक यांनी श्रींचे सोहळ्यात प्रथा परंपरांचे पालन करीत देवस्थानचे नियंत्रणात कामकाज पाहिले. पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर यांनी सोहळ्याचे यशस्वीतेस विशेष परिश्रम घेतले. आळंदी शहरात भाविकणासाठी हुंबे महाराज, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे, आळंदीकर ग्रामस्थ, विविध सेवाभावी संस्था, व्यक्ती यांनी प्रसाद वाटप केले.  

 आळंदी सोहळ्यात पोलिस मित्रांचे कौतुक

आळंदीतील पोलिस मित्र युवा महासंघ,पोलीस मित्र वेल्फेअर फाउंडेशन यांचे पदाधिकारी शिवाजी जाधव, योगेश जाधव, प्रवीण बोबडे, ज्योती पाटील, किरण कोल्हे, बाबासाहेब भंडारी, वैभव दहिफळे आदींनी आषाढी वारीत बंदोबस्तासाठी सेवा व मदत कार्य करीत पोलीस प्रशासनास सहकार्य केले. पोलिस मित्र परीवाराने केलेल्या सेवा कार्याचे कौतुक पोलीस प्रशासनाने केले आहे. आळंदी परिसरात पोलीस मित्र सेवा यावर्षी हि प्रभावी देण्यात आली. संवाद साधून पोलीस प्रशासनास सहकार्य केल्याने पोलीस मित्रांची भेट घेऊन पोलीस प्रशासनाने संवाद साधला.

थोरल्या पादुका मंदिरात माऊलींचे पालखी सोहळ्याचे स्वागत माऊली माऊली नामजयघोषात स्वागत

 थोरल्या पादुका मंदिरात माऊलींचे पालखी सोहळ्याचे स्वागत                       

माऊली माऊली नामजयघोषात स्वागत          


                                   

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील     

पुणे रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात माऊलींच्या पादुका पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर यांनी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत हरिनाम गजरात आणला. यावेळी माऊलींचे पादुकांची पुजा, आरती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अँड. विष्णू तापकीर यांचे हस्ते झाली. यावेळी तुळशीहार, पुष्पहार, श्रीफळ, पेढे प्रसाद पादुकांना ठेवण्यात आला. यावेळी चोपदार बंधुंचे वतीने श्रींची आरती करण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष अँड. विष्णू तापकीर यांच्या हस्ते श्रींची पूजा व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पंचक्रोशीतून भाविकांची दर्शनास मोठी गर्दी झाली होती. माऊली माऊली नामजयघोषात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले.  



 माऊलींच्या वैभवी पादुका आषाढी पायी वारी पालखी सोहळ्या निमित्त पंढरपूर वरून परतीचे प्रवासात आळंदी कडे सोहळा हरिनाम गजरात जात असताना संत श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात विसावा घेऊन श्रीच्या वैभवी पादुकांची पूजा हरिनाम गजरात परंपरेनुसार करण्यात आली.

   यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान चे प्रमुख विश्वस्त अँड. राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ, विश्वस्त भावार्थ देखणे, व्यवस्थापक माऊली वीर, चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे या मान्यवरांचे स्वागत व सत्कार ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अँड. विष्णू तापकीर यांचे हस्ते शाल श्रीफळ, उपरणे देऊन करण्यात आले.



  यावेळी वस्ताद किसनराव लांडगे, ह.भ.प. गजानन महाराज सोनुने, हभप. राधाकृष्ण गरड गुरुजी, संचालक प्रवीण काळजे, हभप. रमेश घोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

दिघी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. रोहिणी परुतगल्ले यांनी उत्कृष्ठ रांगोळी काढली. यावेळी मंदिरात आकर्षक पुष्प सजावट केली होती. आळंदीतील स्वकाम सेवा, पोलीस मित्र यांनी सुरळीत दर्शन बारीचे नियोजन केले होते. यावेळी ट्रस्टचे वतीने भाविकांना लापशीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.



Saturday, July 27, 2024

श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान मध्ये 'कारगिल विजय दिवस' साजरा

 श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान मध्ये 'कारगिल विजय दिवस' साजरा



आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील माऊली मंदिरात 'कारगिल विजय दिवस' रौप्य महोत्सवी वर्ष निमित्ताने कारगिल युद्धात ज्यांनी आपले दोन्ही पाय गमावले असे सैनिक सुभेदार (नायक) संदीप इंदलकर, पुरातत्वाचे अभ्यासक, संस्कृती संरक्षण संस्थान, पुणे, महाराष्ट्र, डॉ. नंदकुमार एकबोटे, सैनिक ट्रेनिंग सेंटरचे प्रमुख उत्तम जाधव व त्यांचे सहकारी नरेंद्र वाघमारे, सुभेदार रघुनाथ भोसले, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, बाणेरचे उद्दोजक संजीव मुरकुटे, भाऊसाहेब कोळेकर, ह. भ. प. शिवाजी महाराज नवल, आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, कैलास महाराज ढगे, नवनाथ महाराज शिंदे, राजेंद्र महाराज जाधव, जनार्दन महाराज जंगले, श्री. व सौ. धोत्रे, देवेश जाधव, कृष्णा जाधव, रवींद्र महाराज जोशी, गजानन महाराज सोनुने आदींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 



     यावेळी डॉ. नंदकुमार एकबोटे यांनी प्रास्ताविकातून भारतीय सैनिकांसाठी व सर्व भारतीयांसाठी हा महत्वपूर्ण विजय दिवस असून याचा सर्व देशप्रेमी भारतीयांना त्याचा अभिमान असल्याचे सांगितले. २६ जुलै याच दिवशी आपण गेली १२ वर्षे आळंदीत माऊलींच्या समाधी वर पुष्पवृष्टी करुन सैनिकांना नेहमी विजयश्री मिळावी, सैनिकांचे आरोग्य चांगले रहावे, सैनिकांचे दहा दिशातून रक्षण व्हावे अशी आर्त प्रार्थना करण्यासाठी एकत्र येत असतो असे सांगितले.

    त्यानंतर उत्तम जाधव, संदीप इंदलकर, अजित वडगावकर, रघुनाथ भोसले, अर्जुन मेदनकर यांनी आपल्या मनोगतातून सैनिकवरील आपले प्रेम आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवून दिले पाहिजे तसेच देशप्रेमासाठी प्रत्येकाला वेड असणे आवश्यक असल्याचे सांगितले. समाजाच्या / देशाच्या रक्षणार्थ आपले सर्वस्व समर्पित केले त्या शहीद जवानांचे फक्त १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी या दिवशीच स्मरण न करता रोजच स्मरण करणे गरजेचे असल्याचेही सांगितले. ईश्वराने दिलेल्या जीवनाचा सदुपयोग करणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य असून त्यांनी ते प्रामाणिकपणे करावे असे सांगितले. तसेच कारगिल विजय दिवसाची गौरवगाथा सांगून श्रोत्यांच्या अंगावर शहारे उमटवले. शेवटी कैवल्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी सैनिकांसाठी आरोग्य, दीर्घायुष्य व त्यांच्या रक्षणासाठी प्रार्थना करून शहिदांना आदरांजली वाहिली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

वीर धरणातून विसर्ग वाढवला निरा खोऱ्यातील धरणासाठ्यात मोठी वाढ

 वीर धरणातून विसर्ग वाढवला 


निरा खोऱ्यातील धरणासाठ्यात मोठी वाढ 





पुरंदर : गुरवारी निरा नदिवरील वीर धरण ९७ टक्के भरल्याने ६१ हजार क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला. गुरवारी रात्री व शुक्रवारी निरा खोऱ्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंती घेतली व विसर्ग ५ हजार ९९७ क्युसेक्सने करण्यात आला. शनिवारी पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आता दुपारी २ वाजता वाढवून २३ हजार १८५ क्युसेक्सने करण्यात आला आहे. 


    शनिवारी सकाळी निरा खोऱ्यातील भाटघर धरण ७८.४९ टक्के, निरा देवघर ७५.६४ टक्के, गुंजवणी ७१.०१ टक्के तर वीर धरण ९८.५५ टक्के भरल्याने वीर धरणातून २३ हजार १८५ क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला असून गुंजवणी धरणातून ९२६ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. वीर धरणावरील निरा डाव्या कालव्यातून ६५० क्युसेक्सने तर निरा उजव्या कालव्यातून १ हजर १०१ क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे.  ४८.३२९ टिएमसी क्षमता असलेल्या निरा खोऱ्यातील या चारही धरणात आज शनिवारी दुपारपर्यंत ३८.९६१ टिएमसी म्हणजे ८०.६२ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी तो ३२.०३४ टिएमसी म्हणजे ६६.२८ टक्के पाणीसाठा होता. यावर्षी धरणे लवकर ओव्हरफ्लो झाल्याने पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व पुढे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. 

Friday, July 26, 2024

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील कुठलीही परंपरा मोडीत अथवा बाधित झालेली नाही : योगी निरंजननाथ

 संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील कुठलीही परंपरा मोडीत अथवा बाधित झालेली नाही : योगी निरंजननाथ 




वाल्हे दि.२६ - 


      संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील पंढरपूर ते आळंदी असा परतीचा प्रवास आज निरास्नानाला पोहोचला. माऊलींचे निरास्नान अगदी व्यवस्थितपणे पार पडले. परंपरेनुसार निरास्नान झाल्यानंतर विणेकऱ्यांना  पादुकांचे दर्शन दिले जाते. सर्वप्रथम रथाच्या पुढील विणेकर्‍यांना आणि नंतर रथाला वेढा मारून मागील विणेकऱ्यांना दर्शन प्राप्त होते. यामध्ये थोडा विलंब झाला आणि काही अपोशक आणि वारकऱ्यांचे स्वघोषित नेतृत्व करणारे नेते यांनी या विलंबाचा फायदा घेत परंपरा मोडीत काढण्याचा सूर ओरडणे सुरू केले. परंतु सोहळ्यातील कुठलीही परंपरा मोडीत अथवा बाधित झाली नाही असा स्पष्ट खुलासा संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांनी केला आहे. 


      योगी निरंजननाथ म्हणाले, माऊलींच्या परतीच्या सोहळ्यामध्ये सर्व दिंड्यांचे प्रतिनिधी म्हणून विणेकरी पायी चालतात आणि यावेळी सर्व परंपरा परिपूर्णपणे माहीत असतात. आजकाल वारीमध्ये काही वारकऱ्यांचे नेतृत्व करणारे स्वघोषित वारकरी महाराज हे सुद्धा घुसखोरी करताना दिसतात आणि त्यांच्याच करवी हे वाद निर्माण करून परंपरादिष्टित वारकऱ्यांना यामुळे त्रास होतो. इसवी सन १८३२ पासून श्री गुरु हैबतराव बाबा महाराज यांनी या पालखी सोहळ्याला विशिष्ट अशी परंपरा घालुन दिलेली आहे. त्यामध्ये आज तागायत कुठलाही बदल कोणीही केलेला नाही. त्यामुळे नीरा स्नानानंतर कुठलीही परंपरा खंडित झालेली नाही. असा प्रसंग भविष्यात देखील घडू शकत नाही कारण हा पालखी सोहळा परंपरेचा पाईक आहे. 


       थोड्यावेळ माऊलींचा रथ थांबवला गेला. वारकऱ्यांतील संवादामध्ये कुठेतरी दुरावा निर्माण करण्याचं काम काही अराजक तत्त्वांनी केले. परंतु एकंदरीत ३० मिनिटांमध्ये सगळं विचारून आणि व्यवस्थितपणे होऊन सर्व विणेकरी माऊलींच्या रथासोबत निरा मुक्कामी आले आणि सर्वांनी एकत्रितपणे भोजन आणि विश्रांती घेतली. सध्या श्री माऊलींचा पालखी सोहळा हा वाल्हे नगरीमध्ये आहे आणि इथे देखील सर्व विणेकरी सर्व वारकरी अगदी आनंदाने एकत्रितपणे समाज आरती मध्ये सम्मिलित झालेले होते. 


     पुनश्च एकदा सांगणे आवश्यक ही कुठलीही परंपरा ही बाधित झालेली नाही सध्या वारकरी संप्रदायात वारीच्या वाटेवर जे काही राजकत्व स्वतःची राजकीय अथवा नेतृत्वाची विचित्रवासना घेऊन वारकऱ्यांमध्येच मिसळून परंपरांना नियमांना डावलण्याचा प्रयत्न करतात. त्याकरवी समाजाला सुद्धा भडकवतात अशा व्यक्तींवर कुठेतरी नियंत्रण ठेवणे आवश्यक झालेले आहे. आजचा हा प्रसंग अशाच काही तत्त्वांच्या विचित्र वागणुकीमुळे निर्माण झाला. हा सोहळा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा आहे त्याला स्वयंशिस्त आणि परंपरेची जोड आहे. ही परंपरा अखंडित आणि अबाधित राहण्यासाठी या सोहळ्यातील प्रत्येक घटक हा तितकाच जबाबदारपणे वागतो. परंतु कुठेतरी संवादामध्ये अपवाद निर्माण झाला आणि त्याचा फायदा काही अराजक तत्त्वांनी घेऊन व्यत्यय आणण्याचा वृथा प्रयत्न केला. 


तरीपण संतांची कृपा आणि परंपरेची जोपासना या दोन्ही गोष्टींनी यावर तात्काळ सुखरूपणे सुसंवाद पूर्ववत होऊन पालखी सोहळा सुखरूप पणे मार्गस्थ झाला सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांनी सांगितले.

शिक्षण सप्ताहात रमले फलटण तालुक्यातील विद्यार्थी

 शिक्षण सप्ताहात रमले फलटण तालुक्यातील विद्यार्थी



ता.

  राज्य शासनाकडून सोमवार (दि.२२) ते रविवार (ता.२८) या कालावधीत शिक्षण सप्ताह राबविण्यात येत आहे. प्रत्येक दिवशी वेगवेगळे उपक्रम घेतले जात असून फलटण तालुक्यातील विद्यार्थी उपक्रमात दंग आहेत. गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह उत्साहात सुरू आहे.

   अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी व्हावी यासाठी शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांच्या भावात्मक, क्रियात्मक व बोधात्मक पैलूंच्या विकासासाठी हा अभिनव उपक्रम सुरू आहे. या अंतर्गत अध्ययन - अध्यापन साहित्य दिवस, मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, शालेय पोषण दिवस, समुदाय सहभाग दिवस अशी सप्ताहाची विभागणी करण्यात आली आहे.

  प्रत्येक दिवशी नवा उपक्रम असल्याने विद्यार्थी उपक्रमात हिरिरीने सहभागी होताना दिसत आहेत. ठसेकाम, चित्रकला, मृदाकाम, चिकटकाम यात विद्यार्थी मग्न होत आहेत. शिक्षक मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहेत. साहित्य पेट्यांतील साहित्याची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली जात आहे. बैठे खेळ कॅरम, बुद्धिबळ खेळण्यात मुलांना निराळीच मजा मिळत आहे. संख्याज्ञान, शब्दकोडी सरावासाठी दिली जात आहेत. 

  शिक्षण विभागाचे अधिकारी शाळांना भेटी देत असून सप्ताहाचा आढावा घेत आहेत. विविध उपक्रमांचे फोटो अपलोड करण्यासाठी शासनाकडून लिंक देण्यात आली आहे. त्यामुळे रोजच्या उपक्रमांचा आढावा जिल्हा शिक्षण विभागाला रोज प्राप्त होत आहे. दरम्यान, अतिवृष्टीने शाळांना सुट्टी देण्यात आली असल्याने उपक्रमात थोडा व्यत्यय येणार असला तरी मुले मात्र उपक्रमातील कृतींनी आनंदात आहेत.


"शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात सुरू असून मुले आनंदाने सहभागी होत आहेत. कौशल्य विकासाची नवी दृष्टी यामुळे मुलांना मिळत आहे."- बापूराव गायकवाड, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा पाडेगाव.


"तालुक्यातील सर्व शाळा या उपक्रमात सहभागी आहेत. मुलांच्या चिकित्सक वृत्तीला खतपाणी घालणारा हा उपक्रम आहे. नवीन कौशल्ये व तंत्रे विद्यार्थी प्राप्त करत आहेत. विद्यार्थी कृतिशील राहत असल्याने कृतीतून आनंद मिळवत आहेत."- बन्याबा पारसे, शिक्षणविस्तार अधिकारी.

Thursday, July 25, 2024

माऊलींच्या परतीच्या प्रवासात वाद सोहळ्यातील रथा मागील विणेकऱ्यांन माऊलींच्या पादुकांचे दर्शन दिले नाही.

 माऊलींच्या परतीच्या प्रवासात वाद


सोहळ्यातील रथा मागील विणेकऱ्यांन माऊलींच्या पादुकांचे दर्शन दिले नाही.





नीरा :
      माऊलींच्या परतीच्या प्रवासामध्ये नीरा नदीवरती वारकऱ्यांमध्ये व विश्वस्तांमध्ये वाद निर्माण झाला आहे. सुमारे अर्ध्या तासापूर्वी माऊलींच्या पादुकांचे रथाच्या मागील वारकऱ्यांना दर्शन न दिल्याने रथाच्या मागील वारकऱ्यांनी रतापुढे येऊन ठिया आंदोलन केले आहे. यावेळी माऊली माऊलीच्या जयघोषणात व टाळ वाजवत हे वारकरी गेली अर्धा तास बसून आहेत. सोहळ्याचे मालक व विश्वस्त याबाबत अरेरावेची भूमिका घेत वारकऱ्यांची समझोता न करता रथ तसाच पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत याला वारकऱ्यांकडून प्रखर विरोध होत आहे.


    आषाढी एकादशीच्या दर्शनानंतर माऊलींचा पालखी सोहळा परतीच्या प्रवासाकडे निघाला आहे. परतीच्या प्रवासात रथा पुढे २७ तर रथामागे ३५० दिंड्या आहेत.  काल पाडेगाव (ता. खंडाळा) येथील मुक्काम आटपून आज सकाळी पावणे नऊ वाजता नीरा नदीच्या पवित्र तीर्थ माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. यानंतर माऊलींचा पालखी सोहळा मालकांकडून पादुका राथाकडे येत असताना प्रथे प्रमाणे रथाच्या पुढे दोन ओळी व रथाच्या मागे दोन ओळी वारकऱ्यांनी तयार केल्या होत्या. सोहळा मालकांनी पादुकांचे वारकऱ्यांना दर्शन देणे हा एक अविस्मरणीय क्षण असतो. यावेळी सोहळा मालकांनी रथाच्या पुढील दोन्ही ओळींना दोन्ही ओळीतील वारकऱ्यांना पादुकांचे स्पर्श दर्शन दिले. मात्र माघारी फिरल्यानंतर रथाच्या मागील वारकरी विणेकरी व तुळशी घेतलेल्या महिलांना हे दर्शन दिली नाही. सोहळा मालकांनी या पादुका पुन्हा रथात ठेवल्याने रथामागील वारकऱ्यांचा हिरमोड झाला व त्यांनी लागलीच रथा पुढे येऊन ठिय्या आंदोलन केले. माऊली माऊलीचा जयघोष करत सुमारे तासभर माऊलींचा रथ अडवून धरला. यानंतर सोहळ प्रमुख वह सोहळा मालक व आळंदी विश्वस्त यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र वारकरी आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले यादरम्यान मोठा गोंधळ उडाला आहे. माऊलींचा रथ तासाभरानंतर मागील वारकऱ्यांना तसेच ठेवून नीरेकडे निघून गेला आहे. रथामागील वारकरी भजन म्हणत ठिय आंदोलनावर ठाम आहेत.

    तासाभरानंतर रथाच्या मागील वारकरी निषेध नोंदवत नीरा येथील दुपारच्या विसाव्याकडे निघाले. आजचा मुक्काम वाल्हे येथे असणार आहे. याठिकाणी रात्री समाज आरती वेळी रथा मागील वारकरी आपले म्हणणे मांडणार असल्याचे वारकऱ्यांनी सांगितले. 

वीर मधून ३२ हजाराने तर गुंजवणीतून ४ हजार क्युसेक्सने विसर्ग वीर धरणातून दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच विसर्ग

 वीर मधून ३२ हजाराने तर गुंजवणीतून ४ हजार क्युसेक्सने विसर्ग 


वीर धरणातून दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच विसर्ग 



पुरंदर  : 

       नीरा नदीच्या गुंजवणी, नीरा देवघर,भाटघर सह वीर या चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्याने सर्व धरणे मिळून ६९.२५ टक्के पाणीसाठा झाला आहे. तर वीर धरणात पाणी येण्याचे प्रमाण वाढते असल्याने तब्बल दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच ३२ हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. 


      बुधवारी दिवसभर व गुरवारी रात्रभर धरण क्षेत्रातील पावसाचा जोर वाढत असून वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार वीर धरणाची पाणी पातळी ५७९.३० मिटर झाली असून वीर धरणाच्या सांडव्याद्वारे २३ हजार १८५ क्युसेक्स  विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला होता. आता दुपारी दिड वाजता तो वाढवून ३२ हजार ४५९ क्युसेक्स इतका करण्यात आला आहे. गुंजवणी धरणातून ४ हजार ३६९ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. 


         पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल. तरी सर्वांना विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी, काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदारी संबंधितांची राहील असे आवाहन नीरा उजवा कालवा विभाग कार्यकारी अभियंता यांनी केले आहे. 


नीरा खोऱ्यातील भाटघर धरण ६७.०४ टक्के, नीरा देवघर धरण ६०.०७ टक्के, वीर धरण ८५.५५ टक्के तर गुंजवणी धरण ७१.०१ टक्के भरले आहे. नीरा खोऱ्यातील या चारही धरणात एकुण ३३.४७० टिएमसी म्हणजे ६९. २५ टक्के पाणीसाठा झाला आहे. 

Wednesday, July 24, 2024

२०२२ नंतर २०२४ ला नीरा नदीत पहिला विसर्ग. दोन वर्षांनंतर नीरा नदी दुथडी वाहणार.

 २०२२ नंतर २०२४ ला नीरा नदीत पहिला विसर्ग.


दोन वर्षांनंतर नीरा नदी दुथडी वाहणार.




पुरंदर :
     पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जिवनदायनी असेलेल्या नीरा नदित पुढील ४८ तासांत वीर धराणातून पाण्याचा पहिला विसर्ग करण्यात येणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर नदीत पाणी सोडणार असल्याने काठावरील शेतकरी सुखावले आहेत. नीरा नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.


    वीर धरण ७५.८० टक्के भरलेले आहे. नीरा खोऱ्यातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस बरसत आहे. वीर धरणामध्ये पाण्याची आवक पाहता वीर धरणामधून येत्या ४८ तासात नीरा नदीमध्ये केव्हाही विसर्ग सोडण्यात येईल. तरी नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घ्यावी. नदी पात्रात कोणीही जाऊ नये, कोणत्याही प्रकारची जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही आव्हान पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

     २०२२ साली नीरा नदीला आठवडाभर पुर होता. मात्र २०२३ साली पावसाने सपशेल पाठ फिरवल्याने वीर धरण १०० टक्के भरलेच नाही पर्यायाने नदीपात्रात वर्षभरात एकदाही विसर्ग करण्यात आला नव्हता. तरी पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन करत निरा डाव्या व उजव्या कालव्याचे आवर्तन वेळेत केले. नियमित कालव्याला पाणी सोडल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना मुबलक पाणी उपलब्ध झाले. 

सासवडच्या राहुल टिळेकरवर मांडकीच्या तीन भावंडांनी युवकांकडून गोळीबार करुन घेतला : पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण तीघे जगताप बंधू, पुण्यातील दोन युवक अटकेत व एक अल्पवयीन मुलगा बालसुधारगृहात.

 सासवडच्या राहुल टिळेकरवर मांडकीच्या तीन भावंडांनी युवकांकडून गोळीबार करुन घेतला : पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण 


तीघे जगताप बंधू, पुण्यातील दोन युवक अटकेत व एक अल्पवयीन मुलगा बालसुधारगृहात. 




पुरंदर : 


     सासवड एसटी बस स्थानकासमोरील आईस्क्रीम पार्लर चालकावर दिवसाढवळ्या गोळीबार करणारे अनोळखी आरोपींना ताब्यात घेवून दोन पिस्टल व पाच जिवंत काडतूस केले हस्तगत करण्यात सासवड पोलीसांना यश आले आहे. राहुल नामदेव टिळेकर हे जखमी झाले आहेत तर पुरंदर तालुक्यातील मांडकीच्या जगताप भावंडांनी "आमचे कौटुंबिक वादात पडू नको, नाहीतर राहुल टिळेकर यास गोळया घालीन” अशी धमकी दिली होती. यांनीच पुण्यातील दोन युवक व एक अल्पवयीन मुलाकडून गुन्हा करण्यास सांगितले असल्याचा संशय व्यक्त करत या गोळीबार प्रकरणात सहा जणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांनी दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व सासवड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणच्या कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली आहे. 


         सासवड पोलीस स्टेशन गु.र.नं. २५८/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९ (१), ३(५) आर्म अॅक्ट ३,२५,२७ प्रमाणे दि. १९/०७/२०२४ रोजी दाखल असून सदर गुन्हयातील जखमी नामे राहुल नामदेव टिळेकर (वय ३८ वर्षे), रा. सोळंकी टॉवर्स सासवड ता. पुरंदर जि. पुणे याचे सासवड एसटी स्टैंड समोर श्रीशा’ज” आईस्क्रीम पार्लर असून दि. १८/०७/२०२४ रोजी दुपारी ०३/३० वा सुतास राहुल टिळेकर हा त्यांचे आईस्क्रीम पार्लर मध्ये काउंटरवर बसलेला असताना दोन अनोळखी इसमांनी दुकानात येवून आईस्क्रीम घेतली व आईस्क्रीम खाऊन झाले नंतर त्यापैकी एकाने राहुल टिळेकर याचेवर बंदुकीतून एक गोळी झाडली ते दोघे अनोळखी इसम रोडवरील त्यांचे तिसऱ्या साथीदाराचे मोटार सायकलवर बसून पळून गेले. वगैरे मजकूराची फिर्याद विजय नामदेव टिळेकर याने सासवड पोलीस स्टेशन येथे नोंदविली आहे. 


सासवड शहरातील गजबजलेल्या ठिकाणी फायरींग झाल्याने ताबडतोब पोलीस अधीक्षक पंकज देशमुख पुणे ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून स्थानिक गुन्हे शाखा, सासवड पोलीस स्टेशन कडील वेगवेगळी पथके तयार करून घटनास्थळालगतचे सीसीटीव्ही तपासून आरोपींचे मोटार सायकलचा माग काढून आरोपी ताब्यात घेण्याबाबत सुचना दिल्या. तपासकामी नेमण्यात आलेल्या पथकांनी संयुक्तरीत्या फिर्यादी याचेकडे विचारपूस केली असता, राहुल टिळेकर याने प्रताप जगताप व त्याचे पत्नीचा नेहमी होणारा कौटुंबिक वादविवाद बऱ्याच वेळी मिटविला होता, त्यामुळे प्रताप जगताप हा राहुल टिळेकर याचेवर चिडून होता. जखमी राहुल टिळेकर याचे प्रताप जगताप, अजय जगताप, दयानंद जगताप यांचे सोबत वाद झाला होता, त्यादरम्यान “आमचे कौटुंबिक वादात पडू नको, नाहीतर राहुल टिळेकर यास गोळया घालीन” अशी धमकी जगताप भावंडांनी विजय टिळेकर याचे जवळ दिली होती. त्यामुळे फिर्यादी व जखमी यांचा जगताप भावंडांनीच सदरचा गुन्हा करणेसाठी अनोळखी इसम पाठविले आहेत. असे तपासात समोर आले. स्था. गु.शा. व सासवड पो. स्टे कडील तपास पथकांनी गुन्हयाचे अनुषंगाने गोपनीय बातमीदाराचे बातमीवरून आरोपी नामे १) अजय संभाजी जगताप (वय ४२ वर्षे), २) दयानंद संभाजी जगताप (वय ३५ वर्षे), ३) प्रताप संभाजी जगताप (वय ३८ वर्षे), तिघे मुळ रा. मांडकी ता. पुरंदर जि. पुणे ४) सुजल तमन्ना आंबेघर (वय २० वर्षे), रा. चंदननगर, खराडी पुणे ५) सुमित कमलाकर वाघमारे (वय १९ वर्षे), उंड्री होलेवस्ती, पुणे यांना अटक करणेत आलेली असून सदर आरोपी हे सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून आरोर्पीकडून दोन गावठी पिस्तुल, पाच जिवंत काडतूस असा एकूण एक लाख पाच हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करणेत आलेला आहे. सदर गुन्हयात ६) एक विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याचे निष्पन्न असून त्याला देखील रखवालीत घेण्यात आलेले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करणेत आलेली आहे. जखमी राहुल टिळेकर याचेवर नोबेल हॉस्पीटल पुणे येथे उपचार चालु आहेत. गुन्हयात आणखी तीन आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांचा शोध चालु असून त्याकरीता दोन पथके रवाना करणेत आलेली आहेत. 


सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, बारामती विभाग, मा. एस.डी.पी.ओ. तानाजी बरडे, भोर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सासवड पो स्टे चे पो नि ऋषीकेश अधिकारी, स्था.गु.शा.चे सपोनि योगेश लंगुटे, राहूल गावडे, पोसई प्रदीप चौधरी, अमित सिद-पाटील, सासवड पो स्टेचे सपोनि नितीन अतकरे, पोसई अतुल खंदारे, श्रीराम पालवे, अर्जुन चोरगे, स्था.गु.शा.चे अंमलदार बाळासाहेब कांरडे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, राजू मोमीन, अतुल डेरे, योगेश नागरगोजे, मंगेश थिगळे, धीरज जाधव, विनोद पवार, स्वप्नील अहिवळे, अमोल शेडगे, अक्षय सुपे, सासवड पो स्टे चे अंमलदार निलेश जाधव, सुरज नांगरे, लियाकत मुजावर, प्रतिक धिवार, वैभव मदने, विकास ओंबासे, तेजस शिवतरे यांनी केली असून पुढील तपास सासवड पो स्टे चे पो नि ऋषीकेश अधिकारी 

हे करत आहेत.

Monday, July 22, 2024

विशाळगडाच्या पायथ्याला गजापुर येथे तोडफोड करणाऱ्यांना ताबडतोप अटक करा

 गजापुर येथे तोडफोड करणाऱ्यांना ताबडतोप अटक करा. 


पुरंदर आरपीआयची मागणी



  सासवड येथे तहसीलदारांना देण्यात आले निवेदन 


  सासवड 



विशालगडच्या पायथ्याशी असलेल्या "गजापूर" गावातील मुस्लिमवाडी येथील मुस्लिम समाजाची ४२ घरे उद्धवस्त करून ,मस्जिदीची तोडफोड करण्यात आली. यातील दोषी आरोपीना तात्काळ अटक करावी. पिडित अन्याय व्यक्तीला प्रति व्यक्तीस दहा लाख रुपये नुकसान फरापाई द्यावी ... तर मस्जिद परत नव्याने उभारून द्यावी अशी मागणी पुरंदर आर पी आयच्यावतीने करण्यात आलीय... या मागणीचे निवेदन पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत यांना आज सोमवारी देण्यात आलय... यावेळी रिपब्लिकन पक्षाचे पुरंदर तालुकाध्यक्ष पंकज धिवार, बाळासाहेब धिवार, विशाल धेंडे, अंबर शिंदे,विकास देशमुख, प्रतिक धिवार, युवराज धिवार, मयूर बेंगळे, अतुल गायकवाड, प्रदीप फुलवरे, प्रस्मित धिवार, आदित्य धिवार, प्रतिक धिवार, ऋतिक धिवार, विजय मंडल, राज कांबळे, माऊली कांबळे, रोहन धिवार, परवीनताई पानसरे, रवी वाघमारे, जुबेर पानसरे, इत्यादी उपस्थित होते..



Saturday, July 20, 2024

नीरा येथे दहशत वाजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केले जेरबंद

 नीरा येथे दहशत वाजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी केले जेरबंद 



  नीरा दि.२०


पुरंदर तालुक्यातील नीरा येथे काल शुक्रवारी रात्री दहशत वाजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि एका तरुणाला आणि त्याच्या वडिलांना मारहाण करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या जेजुरी पोलिसांनी आवळल्या आहेत. अक्षय शेवाळे असं या तरुणाचं नाव असून हा तरुण रेल्वेने पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले आहे.




  अक्षय शेवाळे याने काल रात्री साडेदहा वाजलेच्या दरम्यान साताऱ्यातील सेंद्रे येथून बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथे निघालेल्या सचिन कोरडे आणि त्याच्या वडिलांना जबर मारहाण केली होती. यानंतर त्यांची मोटरसायकल छत्रपती शिवाजी चौकामध्ये आणून ती पेटून देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आज याबाबत नीरा पोस्टमध्ये तक्रार देण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी अक्षय शेवाळे याला ताब्यात घेतले. मात्र हाच अक्षय शेवाळे आज दुपारी पळून जाण्याचा प्रयत्न होता. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती आणि यानंतर पोलिसांनी त्याला सातारा जिल्ह्यातील पिंपरी बुद्रुक या गावापर्यंत पाठलाग करून ताब्यात घेतले. अक्षय शेवाळे यांच्या मुसक्या आवळण्यासाठी ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले त्या पोलीस हवलदार संदीप मदने आणि पोलीस नाईक हरिश्चंद्र करे यांचं कौतुक नीरा परिसरातून करण्यात येत आहे. तर दहशत मजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी निरा ग्रामस्थ आता करीत आहेत.


खेड तालुक्यातील पंधरा हजाराहून अधिक भाविकांना पंढरीचे दर्शन

 खेड तालुक्यातील पंधरा हजाराहून अधिक भाविकांना पंढरीचे दर्शन

मी सेवेकरी फाऊंडेशनचा सामाजिक धार्मिक उपक्रमाचे तालुक्यात स्वागत




आळंदी ( अनिराज मेदनकर ) : मी सेवेकरी फाऊंडेशन संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगसे यांनी राबवलेल्या पंढरपूर देवदर्शन यात्रेच्या माध्यमातून खेड तालुक्यातील जवळपास पंधरा हजारांहून अधिक भाविकांनी विठूरायाचे दर्शन घेतले. यात लहानगयांपासून वयोवृद्ध महिला पुरुष वारकरी भाविकांचा समावेश होता.

  राज्यातील आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन वैष्णवांचा मेळा लाडक्या विठूरायाच्या भेटीसाठी देहू-आळंदी हुन दिंड्या पताकांसह पंढरपूर कडे पायी निघतो. पण अनेकांना काही कारणांनी पायी वारी करता येत नाही. अश्या विठ्ठल भक्तांसाठी सुधीर मुंगसे यांनी मी सेवेकरी फाऊंडेशनच्या माध्यमातून 'मोफत पंढरपूर यात्रेचे' आयोजन हरिनाम गजरात घडविले.



  या यात्रेच्या माध्यमातून खेड तालुक्यातील विविध वयोगटातील महिला आणि पुरुषांना पंढरपूरला जाऊन आपल्या विठुरायाचे दर्शन घेता आले. सुधीर मुंगसे म्हणाले, पंढरपूरचा पांडुरंग हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरला निघतात. पण, अनेकांना मनोमन वारीला जाण्याची इच्छा असली तरी काही कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळेच आम्ही हा यात्रेचा उपक्रम राबवला. जेणे करुन एक दिवस का होईना आषाढी वारीच्या काळात पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेता येईल. या उपक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील पंधरा हजाराहून अधिक लोकांना विठ्ठलाचे दर्शन घडवण्याचे भाग्य मला लाभले. यात मी समाधानी आहे. असेच कार्य आपल्या हातून यापुढील काळात घडावे यासाठी पांडुरंगरायांस त्यांनी साकडे घातले




कुरुळी स्नेह मेळाव्यात शाळेस ध्वनीक्षेपक यंत्रणेसह सॅनिटेरी नॅपकिन मशिन भेट

 कुरुळी स्नेह मेळाव्यात शाळेस ध्वनीक्षेपक यंत्रणेसह सॅनिटेरी नॅपकिन मशिन भेट

एक लाख रुपये खर्चून मदत ; माजी विद्यार्थ्याचे कौतुकास्पद कार्य




आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे १९९५-९६ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन कुरुळी येथील क्राउन प्लाझात आयोजन करीत पुन्हा सुसंवाद साधला. यावेळी सरस्वती पुजन करुन उपक्रमाची सुरवात झाली. यावेळी सर्व उपस्थित शिक्षकांचा सन्मान करण्यात आहे. कुरुळी स्नेह मेळाव्यात शाळेस ध्वनीक्षेपक यंत्रणेसह सॅनिटेरी नॅपकिन मशिन भेट देऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली. यासाठी एक लाख रुपये खर्चून माजी विद्यार्थ्यानी कौतुकास्पद कार्य करीत मदत प्रदान केली.  

 यात अंगणवाडी शिक्षिका चंद्रभागा कांबळे, जिल्हा परीषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका मिरा अभंग / कोल्हे, सुनिता वाव्हळ, भैरवनाथ विद्यालय कुरुळीचे माजी मुख्याध्यापक मधुकर नाईक, राजबा पवार, विद्यमान मुख्याध्यापक रावसाहेब व्यवहारे, माजी सहशिक्षक मनोज नायकवाडी, गंगाधर गिरमकर, भाऊसाहेब थोरात, निवृत्ती भुजाडे, प्रदीप लोखंडे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थी व शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी अश्विनी काळजे, प्रा.सुनीता बनकर, ज्योती दर्शले, डॉ.उज्वला मिसाळ, शैलेशशेठ कड, मदनशेठ गायकवाड, संपतशेठ बागडे, कुंदन सोनवणे, नितीन सोनवणे, सूर्यकांत बधाले, नरेंद्र बधाले, प्रकाश ढोले यांनी मनोगते व्यक्त केली. अंगणवाडी पासुन ते माध्यमिक विद्यालयीन आठवणींना उजाळा यावेळी मिळाला. जीवन शैलीत जे संस्कार करण्यात आले. त्या संस्कारांचा कसा उपयोग होत आहे हे सांगत असताना विद्यार्थी भाऊक झाले होते. काहीचे डोळे भरुन आले. या सर्व शिक्षकांनी तन मनाने जे शिक्षण दिले खरंच कौतुक करणारे होते. असे सामाजिक कार्यकर्ते शैलेश कड यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. प्राध्यापिका सुनिता बनकर अध्यापन करत असताना विद्यालयात जे मिळाले, त्या शिक्षणाचा खुप सारा उपयोग होत आहे. डॅा. उज्वला कड / मिसाळ यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रात या माध्यमिक शिक्षणाचा उपयोग होत आहे. बालपणी जे संस्कार झाले. ते सामाजीक जीवन जगत असताण आम्ही ही संस्काराची शिदोरी पुढे नेत असल्याचे त्यांनी सांगितले.

   सर्व शिक्षकांचे ऋण व्यक्त करत असताना विद्यालयास सर्व वर्गामध्ये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्र देण्यात आले. जवळपास या यंत्रनेसाठी ८० हजार रुपये खर्च तसेच २० हजार रुपयांची सॅनिटेरी नॅपकिन मशिन भेट देण्यात आली. कुंदन सोनवणे हे ज्या कंपनीत काम करत आहेत. त्या माध्यमातून कुरुळी येथील आतंरराष्ट्रीय एन.टी. बी सिरॅमीक कंपनीचे सीइओ पी. राजासर यांनी कुदंन सोनवणे यांना शाळेस मदत करायची असून काय मदत करावी असे विचारून विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी पाणी बाटल वाटप करण्यास सांगितले. तात्काळ एक हजार पाणी बॅाटल उपलब्ध करुन देऊन वाटप करण्याचे ठरले.

 सत्कार समारंभानंतर सुरुची भोजनाचे आयोजन करुन सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला. भोजन झाल्यानंतर शिक्षकांना निरोप देण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी गप्पागोष्टी करत संवाद साधला. भविष्य काळात देखील असे सामाजिक उपक्रम राबवून शाळेस मदत करत राहण्याचा संकल्प माजी विद्यार्थ्यांनी यावेळी केल्याचे स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष शैलेश कड यांनी सांगितले. भैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब व्यवहारे यांनी आभार मानले. सांगता चहापानाने झाली.

Friday, July 19, 2024

नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.

 नीरेतील सराईत गावगुंडाचे रात्री दहशत 


बापलेकांना मारहाण, युवक जखमी, दुचाकी दिली पेटवून.





पुरंदर : नीरेच्या रहदारी असलेल्या पालखीतळा समोर व छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्थानिक गुंडाकडून दहशत निर्माण करत दवाखान्यातून आलेल्या बापलेकांना जबर मारहाण करत त्यांची दुचाकी पेटवून देण्यात आली आहे. याबाबत नीरा पोलीसात जखमी सचिन कोरडे रा. खंडोबाचीवाडी (ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. 


    प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार सचिन कोरडे यांचे वडिल संपत कोरडे एक गंभिर आजाराने ग्रस्त आहेत. त्यांच्यावर सातारा (शेंद्रे) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडिलांना ट्रकमध्ये बसवून सचिन आपल्या अपाची दुचाकिवरुन नीरेत आले. पालखी तळाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ट्रक आल्यावर वडिलांना खाली घेत असताना नीरेतील एक गाव गुंड आला व शिविगाळ करत दमबाजी करायला लागला. सचिनच्या डोळ्यात लाल तिखट चटणी टाकली, आधी सचिनला धक्काबुक्की केले व हातातील हत्याराने सचिन यांच्या डोक्यात जब्बार घाव घातल्याने रक्तस्राव झाल. ते जखमी झाल्याने दुचाकी तेथेच सोडून त्यांनी गावगुंडाच्या तावडीतून सुटका करण्या हेतू तेथून पळ काढला. तरीही त्या गावगुंडाने आजारी असलेल्या वडिलांवरही हल्ला केला. या नंतर अपाची दुचाकी घेऊन जेजुरीकडे पसार झाला. नंतर कळाले की ती दुचाकी त्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाळून टाकली. शिवाजी चौकात पेटती दुचाकी पाहून स्थिनक भयभीत झाले. नीरा पोलिस दुरक्षेत्राचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. जखमी सचिन कोरडे यांना उपचारासाठी नीरेच्या जिवनदिप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 


    नीरेतील हा गावगुंड सतत चर्चेत राहण्यासाठी काहीतरी गुन्हेगारी कृत्य करत असतो. मागिल गुन्ह्यातून तो चारच दिवसांपूर्वी कारागृहातून घरी आला होता. तो नीरेत आला की नीरा रेल्वे स्टेशन व परिसरात धुडगूस घालतोच. चोरी, लुटमार, मारामारी, धमकावणे, दहशत निर्माण करणे अशी कृत्ये करत असतो. अशा सराईत गुन्हेगाराचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक करत आहेत. 

Tuesday, July 16, 2024

पुरंदर तालुक्यात होणार आम सभा आ.संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणार सभा.

 पुरंदर तालुक्यात होणार आम सभा


आ.संजय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली होणार सभा.





पुरंदर :

    पुरंदर तालुक्याची आमसभा वार बुधवार, दि. २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आमदार संजय चंदुकाका जगताप यांच्या अध्यक्षतेखली संपन्न होणार आहे. सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनामध्ये या सभेचे आयोजित करण्यात आल्याची माहिती पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार यांनी दिली आहे.

      नुकतेच पुरंदर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता पवार यांनी दिली एका प्रसिद्धी पत्रानुसार सन २०२३-२४ मधील झालेल्या विकास कामांचा विविध शासकीय कार्यालये व पंचायत समितीचा कामकाजाचा आढावा व सन २०२४-२५ मध्ये कामांचे करावयाचे पुढील नियोजन करणेसाठी आम सभा आयोजित करण्यात आलेली आहे. तसेच सदर आमसभेस तालुक्यातील सर्वांनी उपस्थित राहुन त्यांचे मुलभुत असणाऱ्या अडचणी लेखी स्वरुपात निवेदनाव्दारे आमसभेस मांडणे कामी नागरीकांना आव्हान करण्यात आले आहे. 

Monday, July 15, 2024

नीरा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई विदेशी मद्यासह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त

 नीरा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई 

 विदेशी मद्यासह २१ लाखांचा मुद्देमाल जप्त  



      नीरा (  ता.पुरंदर ) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाद्वारे कारवाई करून लाखो रुपयांचा अवैध मध्ये साठा जप्त करण्यात आला आहे निरा येथील संत ज्ञानेश्वर पालखीतळाच्या बाजूला ही कारवाई करण्यात आली आहे तर या संदर्भात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. 


          राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभाग भरारी पथकाने केलेल्या कारवाईत नीरा गावच्या (ता. पुरंदर) हद्दीत १३ लाख ८२ हजार ४०० रूपये किंमतीच्या गोवा राज्य निर्मित विदेशी  जप्त करण्यात आला आहे.त्याच बरोबर हा मध्यासाठा वाहतुकीसाठी वापरलेले वाहन ही उत्पादन शुल्क विभागाने जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी  एकूण २१ लाख ६९ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.  उपत्पदान शुल्क विभागामार्फत अशा प्रकारची कारवाई करण्याची पुरंदर तालुक्यातील आठवड्याभरातील ही दुसरी घटना असून आठ दिवसांपूर्वी सासवड येथे अशी कारवाई करण्यात आली होती.


नीरा- लोणंद मार्गावर नीरा येथील पालखीतळाजवळ वाहनांच्या तपासणीदरम्यान अशोक लेलॅण्ड कंपनीचे बडा दोस्त मॉडेलच्या चारचाकी टेम्पो वाहन क्र. एमएच ०३- सीव्ही ९४६८ मध्ये गोवा बनावटीच्या विदेशी मद्याच्या १८० मि.ली. क्षमतेच्या ७ हजार ६८० बाटल्या असलेले १६० खोके जप्त करण्यात आले. वाहनातील इसमांकडे मद्य वाहतुकीसंदर्भातील कोणतेही परवानगीपत्र, परवाने अथवा कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

 या कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील, व्हि.एम. माने, जवान पी.टी. कदम, एस.एस.पोंधे, ए.आर. थोरात, एस.सी.भाट, आर. टी. तारळकर, शशांक झिंगळे व महिला जवान यु.आर. वारे तसेच वाहनचालक ए. आर. दळवी यांनी सहभाग घेतला असून,या गुन्हयांचा पुढील तपास निरीक्षक नरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक  ए. बी. पाटील हे करीत आहेत.


Friday, July 12, 2024

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात एका छायाचित्रकाराचा मृत्यू सदाशिवनगरच्या गोल रिंगणातील घटना.

 संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात एका छायाचित्रकाराचा मृत्यू

सदाशिवनगरच्या गोल रिंगणातील घटना.





अकलूज :

    माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथे माऊलींच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण होते. रिंगणात झालेल्या गर्दित एक ४८ वर्षिय छायाचित्रकाराला चक्कर आली व रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच ते मृत झाले. कल्याण चट्टोपाध्याय वय ४८ वर्ष रा. बारानगर, राज्य-पश्चिम बंगाल असे मृत वारकऱ्याचे नाव आहे. याबाबतची माहिती मृत वारकरी छायाचित्रकाराचे मित्र आशुतोष आप्पासाहेब कोळी वय ३३ वर्षे, व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर, रा. जयसिंगपूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर यांनी अकलूज पोलीस ठाण्यात दिली आहे.

     अकलूज पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवार दि.१२ जुलै रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास सदाशिवनगर (ता. माळशिरस) येथे माऊलींच्या पालखीचे गोल रिंगण चालु असताना घोडा पडल्यामुळे गर्दी झाल्याने आशुतोष आप्पासाहेब कोळी यांच्या ओळखीचे कल्याण चट्टोपाध्याय वय ४८ वर्ष हे चक्कर येवून बेशुद्ध पडल्याने त्यांना ॲम्ब्युलन्स मध्ये उपचाराकरीता सरकारी दवाखाना अकलुज येथे दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून ते उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे सांगितले. पुढील योग्य ती कारवाई होणेस विनंती. अशा मजकूरची खबर दिल्याने ती मयत रजिष्टरी दाखल करून मयताची पुढील प्राथमीक चौकशी स.पो.फौ. भोसले करीत असून, आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती अकलूज पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भानुदास रघुनाथ निंभोरे यांनी दिली आहे. 

Sunday, July 7, 2024

सोमेश्वरनगरमध्ये वारकऱ्यांना सतरंज्या, छत्र्या वाटप

 सोमेश्वरनगरमध्ये वारकऱ्यांना सतरंज्या, छत्र्या वाटप


 नसरापुराचे ज्ञानेश्वर झोरे यांचा उपक्रम





नीरा


  ‘वैराग्याचा महामेरू तू गोरा कुंभार, या निनादात गुंजवणी येथून आगमन झालेल्या संतश्रेष्ठ गोरोबाकाका पालखीचे बारामती तालुक्यात ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी वाघळवाडी येथे मुक्कामी असलेल्या दिंडीत नसरापुर ( ता. भोर ) येथील भोर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक ज्ञानेश्वर झोरे यांच्या वतीने वारकऱ्यांना सतरंज्या, छत्र्या वाटप करण्यात आले. 


संतश्रेष्ठ गोरोबाकाका पालखीचे वाघळवडी ( ता. बारामती ) येथे आगमन झाले होते. यावेळी सरपंच वाघळवडीचे सरपंच हेमंत गायकवाड, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक ज्ञानेश्वर झोरे, नसरापूरचे उपसरपंच सुधीर वाल्हेकर, भोर तालुका पत्रकार हल्ला कृती समितीचे अध्यक्ष माणिक पवार, दिंडी सोहळ्याचे तानाजी मिंडे, माणिकराव शिळीमकर, नंदकुमार जगताप, गणेश दळवी, शिवाजी शिंदे, सखाराम इंगुळकर, बाळासाहेब जगताप, विणेकरी सुरेश रसाळ, चोपदार राजू कुंभार, तुकाराम झांजे उपस्थित होते. 




टाळ, मृदंग, वीणा, पताका, डोक्यावर तुळस घेऊन भोर - वेल्हे तालुक्यातील वारकऱ्यांची गुंजवणी ( ता. राजगड ) वेल्हे येथून आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथातून संतश्रेष्ठ गोरोबाकाका पालखीचे सोमेश्वरनगर ( ता. बारामती ) येथे धार्मिक कार्यक्रमात वारकरी रमले होते. यावेळी सोमेश्वरनगर परिसरातील भाविकांनी मोठ्या शिस्तीमध्ये दिंडीचे दर्शन घेतले. गेली १५ वर्षे अविरतपणे पालखी सोहळ्यासाठी परिसरातील दानशूर ग्रामस्थांनी अन्नदान करत असल्याचे गणेश दळवी यांनी सांगितले.



Monday, July 1, 2024

साताराच्या जिल्हाधिका-यांनी माऊलींच्या नीरास्नान घटाकडे फिरवली पाठ

 साताराच्या जिल्हाधिका-यांनी माऊलींच्या नीरास्नान घटाकडे फिरवली पाठ


- नीरा नदीच्या जुन्या ब्रिटीश कालीन पुलाची पाहणी करूनच जिल्हाधिकारी परतले



नीरा

सातारा जिल्ह्यात माऊलींचा पालखी सोहळा ६ जुलैला प्रवेश करणार आहे. त्या पार्श्वभुमीवर 

माऊलींच्या स्वागताची‌ तयारीचा आढावा घेण्यासाठी साताराचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी सोमवारी ( दि.१)पाडेगांव (ता.खंडाळा) हद्दीतील नीरा नदीच्या ब्रिटिश कालीन जुन्या पुलाची पाहणी केली .माञ माऊलींच्या पादुकांना नीरा नदीच्या प्रसिद्ध दत्तघाटावर नीरा स्नान घातले जाते त्या स्थळाकडे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी पाठ फिरवली. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


        आषाढी पायी वारीत माऊलींच्या पादुकांना 

पुणे - सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नीरा नदीतील पविञ तीर्थांनी नीरा स्नान घालण्याची 

गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. या परंपरेला माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पायी वारीत विशेष महत्व आहे. दरवर्षी सातारा जिल्हा प्रशासनाकडून माऊलींच्या नीरा स्नानाच्या तयारी मोठ्या प्रमाणात केली जाते. यावर्षी सोमवारी (दि.१) सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशीन नटराजन यांच्यासह महसुल व जिल्हा परिषदेचे अधिकारी यांनी पाडेगांव ( ता. खंडाळा) येथील नीरा नदीच्या जुन्या ब्रिटीश कालीन पुलाची पाहणी केली. तसेच माऊलींच्या नीरा स्नानाच्या स्थळाची पाहणी करण्याची कोणतीच उत्सुकता न दाखविता पाठ फिरवित परतले. परिणामी यंदा सातारा जिल्हा प्रशासनाला माऊलींच्या नीरा स्नानाचे महत्वच नसल्याचे समोर आले आहे. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...