श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान मध्ये 'कारगिल विजय दिवस' साजरा
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील माऊली मंदिरात 'कारगिल विजय दिवस' रौप्य महोत्सवी वर्ष निमित्ताने कारगिल युद्धात ज्यांनी आपले दोन्ही पाय गमावले असे सैनिक सुभेदार (नायक) संदीप इंदलकर, पुरातत्वाचे अभ्यासक, संस्कृती संरक्षण संस्थान, पुणे, महाराष्ट्र, डॉ. नंदकुमार एकबोटे, सैनिक ट्रेनिंग सेंटरचे प्रमुख उत्तम जाधव व त्यांचे सहकारी नरेंद्र वाघमारे, सुभेदार रघुनाथ भोसले, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, बाणेरचे उद्दोजक संजीव मुरकुटे, भाऊसाहेब कोळेकर, ह. भ. प. शिवाजी महाराज नवल, आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, कैलास महाराज ढगे, नवनाथ महाराज शिंदे, राजेंद्र महाराज जाधव, जनार्दन महाराज जंगले, श्री. व सौ. धोत्रे, देवेश जाधव, कृष्णा जाधव, रवींद्र महाराज जोशी, गजानन महाराज सोनुने आदींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी डॉ. नंदकुमार एकबोटे यांनी प्रास्ताविकातून भारतीय सैनिकांसाठी व सर्व भारतीयांसाठी हा महत्वपूर्ण विजय दिवस असून याचा सर्व देशप्रेमी भारतीयांना त्याचा अभिमान असल्याचे सांगितले. २६ जुलै याच दिवशी आपण गेली १२ वर्षे आळंदीत माऊलींच्या समाधी वर पुष्पवृष्टी करुन सैनिकांना नेहमी विजयश्री मिळावी, सैनिकांचे आरोग्य चांगले रहावे, सैनिकांचे दहा दिशातून रक्षण व्हावे अशी आर्त प्रार्थना करण्यासाठी एकत्र येत असतो असे सांगितले.
त्यानंतर उत्तम जाधव, संदीप इंदलकर, अजित वडगावकर, रघुनाथ भोसले, अर्जुन मेदनकर यांनी आपल्या मनोगतातून सैनिकवरील आपले प्रेम आपल्या प्रत्येक कृतीतून दाखवून दिले पाहिजे तसेच देशप्रेमासाठी प्रत्येकाला वेड असणे आवश्यक असल्याचे सांगितले. समाजाच्या / देशाच्या रक्षणार्थ आपले सर्वस्व समर्पित केले त्या शहीद जवानांचे फक्त १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारी या दिवशीच स्मरण न करता रोजच स्मरण करणे गरजेचे असल्याचेही सांगितले. ईश्वराने दिलेल्या जीवनाचा सदुपयोग करणे हे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य असून त्यांनी ते प्रामाणिकपणे करावे असे सांगितले. तसेच कारगिल विजय दिवसाची गौरवगाथा सांगून श्रोत्यांच्या अंगावर शहारे उमटवले. शेवटी कैवल्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी सैनिकांसाठी आरोग्य, दीर्घायुष्य व त्यांच्या रक्षणासाठी प्रार्थना करून शहिदांना आदरांजली वाहिली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.