Sunday, December 31, 2023

पुरंदर उपसा सिंचन योजना पूर्णपणे बंद ठेऊ नका : माजी आमदार अशोकराव टेकावडे

 पुरंदर उपसा सिंचन योजना पूर्णपणे बंद ठेऊ नका : माजी आमदार अशोकराव टेकावडे



पुरंदर दि.३१




पुरंदर आणि बारामती तालुक्यातील काही गावांसाठी संजीवनी ठरलेली पुरंदर उपसा सिंचन योजना दुरुस्तीसाठी ४५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाच्यावतीने घेण्यात आला होता. मात्र याबाबत पुरंदरचे माजी आमदार अशोकराव टेकवडे यांनी ही योजना पूर्णपणे बंद ठेवू नका अशी मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे. त्याला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद आला असून ही योजना पूर्णपणे बंद ठेवणार नसल्याची माहिती माजी आ. अशोकराव टेकवडे यांनी माध्यमांना दिली आहे

        पुरंदर उपसा योजना ही दुरुस्ती यासाठी दीड महिना बंद राहणार होती. परंतु या योजनेवर अवलंबून असणारे शेतकरी, उद्योजक यांना त्याचा मोठा फटका बसण्याचा धोका निर्माण झाला होता. पारगाव,आंबळे,टेकवडी, माळशिरस,पोंढे, पिसर्वे, नायगाव, मावडी सुपे, नायगाव, राजेवाडी, राजुरी आदी गावातील शेतकऱ्यांना घेऊन माजी आमदार अशोक टेकवडे यांनी जलसंपदा विभागाच्या पुणे येथील सिंचन भवन या ठिकाणी धडक देत मुख्य अभियंता ह.वी.गुणाले यांच्याशी चर्चा करून अडचणी समजून सांगितल्या. त्यानंतर यावर तात्काळ कारवाई करत ही योजना पूर्ण बंद राहणार नसून एका पंपाद्वारे २४ तास सेवा देणार असून बाकीची पंपाची देखभाल व दुरुस्ती तसेच पाईपलाईनचे काम करण्यात येणार आहे. तर दुरुस्तीसाठी डबल यंत्रणा कामी लावण्यात येईल व रात्र दिवस काम करून कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही याची दखल जलसंपदा विभाग घेईल यात शंका नाही. असे मुख्य अभियंता ह. वि.गुणाले यांनी सांगितले. यावेळी कनिष्ठ अभियंता कानिटकर हे देखील उपस्थित होते. पुरंदर उपसा सिंचन योजना दुरूस्तीसाठी 45 दिवस बंद राहणार होती. याबाबतची बातमी माध्यमांच्यावर प्रसिद्ध झाली होती.अस झाल असत तर शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असते. ही परिस्थिती लक्षात घेता दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळे ही योजना तात्काळ बंद न करता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे. यासाठी भाजपा नेते मा.आमदार अशोक टेकवडे यांच्या उपस्थितीत सिंचनभवन येथे मुख्य अभियांता यांना लेखी निवेदन दिले. योजना बंद न करण्याचे मा.गुणालेसाहेब यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले. 



     यावेळी कृषिभुषण महादेव शेंडकर (भाजपचे पुणे जिल्हा किसान मोर्चा उपाध्यक्ष) गणेश मेमाणे (सरचिटणीस भाजपा पुरंदर),हनुमंत काळाणे (भाजपा तालुका उपाध्यक्ष),राजेश कोलते ,राहुल यादव यांच्यासह पिंपरी,नायगांव,माळशिरस ,पिसर्वे ,पारगांव,चाचर मावडी,जवळार्जुन,मावडी सुपे, या गावातील प्रमुख शेतकऱ्यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.



Saturday, December 23, 2023

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्नलवाडीतील तिन्ही प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप. कर्नलवाडी शिवसैनिकांनी साजरा केला शिवतरे यांचा वाढदिवस.

 माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्नलवाडीतील तिन्ही प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप. 


कर्नलवाडी शिवसैनिकांनी साजरा केला शिवतरे यांचा वाढदिवस. 




पुरंदर :

      माजी राज्यमंत्री विजय बापू शिवतरे यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त कर्नलवाडी येथे शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊवाटप करण्यात आले. तसेच दिव्यांगांना किराणा किट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन कर्नलवाडीतील शिवसैनिकांनी केले होते. 


      पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी गावातील शिवसैनिकांनी नुकतीच नव्याने शिवसेना शाखेची स्थापना केली आहे. यानंतर उद्या रविवार दि. २४ डिसेंबर रोजी माजी राज्यमंत्री व शिवसेनेचे उपनेते विजय शिवतरे यांचा वाढदिवस होता आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्नलवाडीतील झिरिपवस्ती, कोंडेवाडी, ब्राह्मणदरा या तिन्ही प्राथमिक व अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शिवसैनिकांनी शालेय साहित्य एक वही व पेन तसेच बिस्किट वाटप केले. तर, कर्नलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांगांना किराणा किट विजय शिवतरे यांचे असते वाटप करण्यात आले. 


      कर्नलवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विजय शिवतारे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रिमियम चिक फिड्स प्रा. लि. अहिरेचे व्यवस्थापक सतीश कोंडे होते. यावेळी कर्नलवाडीचे उपसरपंच नंदकुमार निगडे, सदस्या स्वप्नाली निगडे, अनिता कर्णवर, आशा चव्हाण, अनिल निगडे, कपिल कोंडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुभाष भोसले, शिवसेनेचे युवासेना उपप्रमुख मंगेश भिंताडे, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख अविनाश बडदे, गुळूंचे कोळविहिरे गणप्रमूख युवासेना संकेत निगडे व मोठ्या संख्येने कर्नलवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे संयोजन शिवसेना गुळूंचे कोळविहिरे गणप्रमूख विराज रामचंद्र निगडे, कर्नलवाडी शाखाप्रमुखअमोल शिवाजीराव निगडे, कर्नलवाडी युवासेना शाखाप्रमुख लालासाहेब दगडे यांनी केले होते. यावेळी कर्नलवाडीचे शिवसेना युवानेते प्रशांत रासकर, सुरेश दानवले, तुषार गदादे, अमर निगडे, निलेश गदादे, किसन महानवर, श्रीकांत रासकर यांसह आजी माजी पदाधिकार्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. 


       कर्नलवाडीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सुभाष भोसले व उपाध्यक्षपदी विजय कोंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल तसेच कर्नलवाडीतील डॉ. भुषण सतीश कोंडे, फिलिपाईन्स येथे एम. डी मेडिसीन शिक्षण घेत आहेत व सचिन सुभाष भोसले भारतीय सैन्य दलाचे ब्लॅक कॅट कमांडो म्हणून अरुणाचल प्रदेश येथे देशसेवा करत असलेल्याबद्दल माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते सत्कार करुन त्यांचे कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विराज निगडे यांनी केले तर आभार सचिन भोसले यां

नी मानले. 



Friday, December 22, 2023

पुरंदरला २५ कोटींचा निधी त्वरित उपलब्ध करा : अजित पवार. पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती विविध विकास कामांची मागणी.

 पुरंदरला २५ कोटींचा निधी त्वरित उपलब्ध करा : अजित पवार. 


पुरंदर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली होती विविध विकास कामांची मागणी. 





पुरंदर : 

      पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकार्यांनी नुक्तेच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत तालुक्यातील प्रस्तावित कामांसाठी निधी उपलब्ध करावा अशी विनंती केली होती. या सर्व मागण्या मान्य करून पवार यांनी पुरंदर तालुक्यातील विविध विकास कामांसाठी २५ कोटीं रुपयांचा निधी त्वरित उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश नुकतेच दिलेले आहेत. याबाबतची माहिती पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी आज माध्यमांना दिली. 



   प्रा . दुर्गाडी यांनी दिलेल्या माहितीनुसार अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा यांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत येणाऱ्या जनसुविधा, नागरी सुविधा, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, नगरोत्थान, लघु पाटबंधारे, अंतर्गत शाळा दुरूस्ती, साकव बांधकाम, अंगणवाडी बांधकाम, व्यायामशाळा सहाय्यक अनुदान, क्रिडांगणाचा विकास (क्रिडा साहित्य), ग्रामीण मार्गासांठी ३०५४ तसेच जिल्हा मार्गासाठी ५०५४ अशा विविध योजनांच्या व शिर्षकांखाली पुरंदर तालुक्यातील विकास कामांसाठी रूपये २५.०० कोटीचा निधी त्वरीत उपलब्ध करून देण्याबाबतचे आदेश नुकतेच दिलेले आहेत. यामुळे पुरंदर तालुक्यामध्ये विकास कामांना मोठ्याप्रमाणात गती मिळणार असून सर्वसामान्य नागरीकांचे, ग्रामस्थांचे विविध प्रश्नही मार्गी लागणार आहेत. 


     नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, संचालक प्रवीण शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विराज काकडे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उत्तम धुमाळ पुरंदर हवेली मतदार संघाचे अध्यक्ष वामनराव जगताप, महिला अध्यक्ष वंदना जगताप, माई सस्ते, युवक अध्यक्ष अमित झेंडे, इश्वर बागमार, सोमेश्वरचे संचालक मोहन जगताप, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद जगताप, सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार, शिवाजी साळूंखे, नाना सस्ते, अभय थोपटे, अभी दुर्गाडे, धोंडीराम कटके आदी उपस्थित होते. 


     अजित दादांनी पुरंदर तालुक्यातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तालुक्यातील जनतेच्यावतीने व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Monday, December 18, 2023

बोर्डाच्या परीक्षेचा कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण न घेता अत्यंत मोकळेपणाने विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा : रणजीत ताम्हणे

 

बोर्डाच्या परीक्षेचा कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण न घेता अत्यंत मोकळेपणाने विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा : रणजीत ताम्हणे

 


सोमेश्वरनगर, ता. 17 :

बोर्डाच्या परीक्षेचा कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण न घेता अत्यंत मोकळेपणाने विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. आणि अत्यंत संयमाने परीक्षेला सामोरे जावे. अनावश्यक ताण घेतल्यास त्याचा प्रतिकूलच परिणाम होतो. परीक्षेसाठी चांगला आहार घ्या तब्येत निरोगी ठेवा आणि मानसिक सक्षमतेसाठी मेडिटेशन प्राणायाम नियमित करा, असे आवाहन करिअर मार्गदर्शक रणजीत ताम्हणे यांनी केले.

आज दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी विद्याभूषण क्लासेस वाघळवाडी-सोमेश्वर नगर येथे इयत्ता बारावी या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी इयत्ता बारावी मध्ये असणारे विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. सदर शिबिरासाठी रणजीत ताम्हाणे यांनी समुपदेशन केले,



ते म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांनी परीक्षेला सामोरे जाताना नेमकं काय केले पाहिजे. परीक्षेचा तणाव न घेता अगदी सहजपणे अभ्यास केला तर शंभर टक्के यश मिळू शकते तसेच अभ्यास करताना आपल्या आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.


या शिबिराचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत विद्याभूषण क्लासेसच्या संचालिका सौ प्रियांका काकडे-देशमुख यांनी केले . या कार्यक्रमाचे आभार श्री. भूषण काकडे-देशमुख यांनी मानले. सदर शिबिराला बहुसंख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते या शिबिराचा फायदा आमच्या मुलांना होईल अशी भावना यावेळी पालकांनी व्यक्त केली.

Sunday, December 17, 2023

माहूर येथील विशेष पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्यभरातून पत्रकार येणार, एस.एम. देशमुख यांची माहिती

 माहूर येथील विशेष पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्यभरातून पत्रकार येणार, एस.एम. देशमुख यांची माहिती



मराठी पत्रकार परिषद जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत विविध विषयांवर झाले विचारमंथन







मुंबई : 'मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने देण्यात येणारे
वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांचे वितरण सोहळा येत्या 13 जानेवारी 2024 रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने पत्रकार येणार आहेत. त्यादृष्टीने नांदेड व माहूर येथील मराठी पत्रकार परिषदेची टीम नियोजन करीत आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे जोरदार तयारी सुरू असून तो नक्कीच यशस्वी होईल,' असा विश्वास परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला.

मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांची  ऑनलाईन बैठक झाली. राज्यातील ३५ जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांपैकी ३० जिल्ह्यातील प्रतिनिधी बैठकीस हजर होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना देशमुख बोलत होते. बैठकीला विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, परिषदेच्या डिझिटल शाखेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे, राज्याचे प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी, सहाय्यक प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, भाऊसाहेब सकट  (जि.कोल्हापूर), गजानन वाघ  (वाशीम), विजय घरत (जि.पालघर), कमलेश ठाकूर ( जि.रायगड), जमिर खलपे (जि. रत्नागीरी), गोपीभाऊ लांडगे (धुळे), संजय हांगे (बीड ), सुनील वाघमारे (छत्रपती संभाजीनगर), सुभाष राऊत  (नागपूर ), यशवंत थोटे (गोंदीया ), राम साळुंके (लातूर), बबलू दोडके (अमरावती), अहमदनगर जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, नांदेड जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी, डॉ. बबन मेश्राम, ईश्वर माहत्रे, साजिद खान, संजय साळुंके, सरफरोज दोसानी, दिगंबर गायकवाड (नांदेड) आदी उपस्थित होते.

'मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांना पुरस्कार देऊन राज्यपातळीवर त्यांचा गौरव केला जातो. हे सोहळे जाणीवपूर्वक ग्रामीण भागात आणि राज्याच्या विविध विभागात घेतले जातात. 2022 चा पुरस्कार वितरण सोहळा नगर जिल्ह्यात कर्जत येथे घेण्यात आला होता. अतिशय भव्य दिव्य असा तो सोहळा झाला होता. त्या अगोदर नागपूर, पाटण, पालघर, वडवणी, अक्कलकोट आदी ठिकाणी हे सोहळे घेतले गेले होते. 2023 चे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. माहूर, माजलगाव, तेल्हारा, अंबरनाथ, आर्वी, बत्तीस शिराळा, साक्री, आणि शिरूर तालुका पत्रकार संघांना तसेच दक्षिण आणि उत्तर नगर जिल्ह्यांना हे पुरस्कार घोषित झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे 13 जानेवारी 2024 रोजी एका शानदार सोहळ्यात हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. माहूर हे साडेतीन शक्तीपीठा पैकी आद्य पीठ आहे. येथे रेणुका मातेचं मंदीर असून हे तीर्थक्षेत्र देशभर प्रसिध्द आहे. मुंबईहून किनवटपर्यत रेल्वे सेवा उपलब्ध आहे. किनवट येथून एका तासात आपण माहूरला पोहचू शकतो. पुणे येथून नांदेडसाठी रेल्वे सेवा उपलब्ध आहे. नांदेड येथून रस्ता मार्गे पुढे  माहूरला जाता येईल. नांदेड, विदर्भातून यवतमाळ, वर्धा, अकोला आदी ठिकाणाहून माहूरसाठी बस सेवा उपलब्ध आहे. नांदेडहून माहूरला जाण्यासाठी रस्ता मार्गे अडीच ते तीन तास लागतात. माहूरचा हा पुरस्कार वितरण कार्यक्रम परिषदेच्या परंपरेला साजेसा असाच होणार आहे. राज्यभरातून पत्रकार या कार्यक्रमासाठी येतील,' असेही
देशमुख यांनी सांगितले.

तर, यावेळी विश्वस्त किरण नाईक यांनी सांगितले की, 'मराठी पत्रकार परिषदेचे आतापर्यंतची वाटचाल ही खूपच महत्त्वपूर्ण आहे. माहूर येथील पुरस्कार वितरण सोहळा खूपच चांगला होईल, असा आह्मा सर्वांना विश्वास आहे. लवकरच यासाठी विभागीय सचिव व राज्यातील उपाध्यक्ष यांची बैठक घेतली जाईल.'

बैठकीत प्रास्ताविक करताना अध्यक्ष शरद पाबळे यांनी  मागील जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांच्या बैठकीचा आढावा सांगितला. तसेच पुरस्कार प्राप्त जिल्हा तालुका संघांनी त्यांनी वर्षभर केलेल्या कामाची माहिती दोन दिवसात पाठवावी, जेणेकरून त्यावर आधारित एक प्रेझेंटेशन तयार करता येईल. तसेच माहूर येथील कार्यक्रमात दाखवण्यासाठी डॉक्युमेंटरीही तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे स्वरूप कसे असावे, याबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. परिषदेचे सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांनी नांदेड व माहूरच्या टीमला कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कोषाध्यक्ष विजय जोशी यांनी पुरस्कार वितरण सोहळ्याची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे, याची माहिती दिली. पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे नांदेड व माहूर येथील आयोजकांनी आत्तापर्यंत झालेल्या कार्यक्रमाच्या तयारीची माहिती देतानाच 13 जानेवारीच्या कार्यक्रमाचे कशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे, हे सांगितले. अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनी नगर जिल्ह्याला पुरस्कार दिल्याबद्दल सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले, व नगर जिल्ह्याने गेल्या वर्षभर केलेल्या कामाची माहिती दिली. यावेळी जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली.  राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी यांनी आभार मानले.

या वर्षीच्या पुरस्कारांचे मानकरी पुढील प्रमाणे आहेत

रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार यंदा उत्तर_नगर आणि दक्षिण_नगर जिल्ह्यांना विभागून देण्यात आला आहे.

वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार

1) मराठवाडा विभाग : माजलगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा बीड
2) लातूर विभाग : माहूर तालुका  पत्रकार संघ, जिल्हा नांदेड
3) नाशिक विभाग : साक्री तालुका मराठी पत्रकार संघ, जिल्हा धुळे
4) पुणे विभाग : शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ, जिल्हा पुणे
5) अमरावती विभाग : तेल्हारा तालुका पत्रकार संघ, जिल्हा अकोला
6) कोल्हापूर विभाग : बत्तीस शिराळा तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली
7) नागपूर विभाग : आर्वी तालुका पत्रकार संघ, जिल्हा वर्धा
8) कोकण विभाग : अंबरनाथ तालुका पत्रकार संघ, जिल्हा ठाणे.

Thursday, December 14, 2023

माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसा निमित्त सासवड येथ दिवसभरात २३९ रक्त दात्यानी केले रक्तदान

 माजी कृषीमंत्री शरद पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसा निमित्त सासवड येथ दिवसभरात २३९ रक्त दात्यानी केले रक्तदान 



   सासवड 


पुरंदर तालुक्यातील सासवड येथे शरद पवार यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन. करण्यात आले होते यामध्ये २३९ रक्तदात्याणी रक्तदान केले... स्वर्गीय शिवाजी पोमन यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले रक्तदान शिबिर आज सासवड येथे पार पडले . गेल्या २० वर्षांपासुन हे रक्तदान शिबिर स्वर्गीय शिवाजी पोमन मित्रपरिवाराच्या वतीने घेण्यात येत आहे. तालुक्यातील अनेक मान्यवरांनी रक्तदान शिबिराला उस्फुर्त पाठिंबा देऊन तब्बल पाचशे रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.



सासवड (ता. पुरंदर) येथील नवप्रकाश चौकात राष्ट्रवादीचे माजी सासवड शहर अध्यक्ष राहुल गिरमे यांनी लोकनेते शिवाजी पोमण मिञ परिवाराच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचे उद्घाटन सासवड नगरपालिकेच्या गटनेत्या आनंदीकाकी जगताप यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. 



      यावेळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजय कोलते, संतोष जाधव( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सासवड) नगरपालिकेचे मुख्याधिकारी कैलास चव्हाण,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदामराव इंगळे, शामकांत भिंताडे, हेमंत माहूरकर, तालुका अध्यक्ष उत्तम धुमाळ, पंकज धिवार, ईश्वर बागमार, पै.विनोद जगताप, शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे, बापु बडदे, राजेंद्र भोसले, योगेश फडतरे, गिरीश गिरमे, शिवाजी साळुंखे, अमोल कामठे, मिलिंद जाधव, धोंडीबा कटके,मयूर पोमण, सुहास पोमण आदी उपस्थित होते.



     शरद पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गेली २० वर्षे रक्तदान शिबिर घेतले जात आहे. शिवाजीअप्पा पोमण यांच्या निधनानंतर गेली तीन वर्षे राहुल गिरमे सातत्याने या शिबिराचे आयोजन करीत आहेत. यावर्षी २३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले असल्याचे निमंञक राहूल गिरमे यांनी सांगितले.

Saturday, December 9, 2023

अधिस्विकृती धारक पत्रकारांना रेल्वे प्रवासाची ५० टक्के सवलत पुन्हा सुरु करावी मराठी पत्रकार परिषदेची मागणी, खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांना दिले निवेदन

 अधिस्विकृती धारक पत्रकारांना रेल्वे प्रवासाची ५० टक्के सवलत पुन्हा सुरु करावी


मराठी पत्रकार परिषदेची मागणी, खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांना दिले निवेदन





मुंबई : अधिस्विकृती पत्रिका धारक पत्रकारांना बंद करण्यात आलेली रेल्वे प्रवासाची सवलत पुन्हा सुरु करण्याची मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरचिटणीस मन्सूर शेख यांच्या नेतृत्वात  राज्य प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषद अहमदनगर जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, डिजिटल मीडिया परिषदेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष आफताब शेख आदींनी दिले. यावेळी पत्रकारांच्या या प्रश्नाची माहिती घेऊन तो मार्गी लावू, असे आश्वासन डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिले.

भारतीय रेल्वे विभागाकडून पत्रकारांना रेल्वे प्रवासात तिकिटामध्ये ५० टक्के सवलत दिली जात होती. देशभरातील राज्य शासनाने अधिस्विकृती पत्रिका दिलेले पत्रकार या योजनेसाठी पात्र होते. प्रवासात सवलत असल्याने वार्ता संकलनासाठी, विविध राजकीय कार्यक्रमासाठी जाण्यासाठी सवलतीचा मोठा फायदा पत्रकारांना होत होता. राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांची प्रसिद्धी देण्यासाठी, विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे सोयीचे होते. सन २०२० पासून रेल्वे विभागाने पत्रकारांची ही सवलत बंद केली आहे. त्यामुळे देशभरातील पत्रकारांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रवासात सवलत नसल्याने अनेक पत्रकार प्रवास करत नाहीत. परिणामी सरकारी योजना, शासकीय कार्यक्रमाला जाण्यास अडचणी येत आहेत. सर्व बाबींचा विचार करून देशभरातील राज्य शासनाने अधिस्विकृती पत्रिका दिलेल्या पत्रकारांना पूर्वीप्रमाणे रेल्वे प्रवासात सवलत देण्याची मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.

डॉ.सुजय विखे पाटील यांनीही पत्रकाराच्या या प्रश्नाची दखल घेतली. तसेच या प्रश्नाबाबत अधिक माहिती घेऊन त्यातून मार्ग कसा काढता येईल, यादृष्टिनं प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

Wednesday, December 6, 2023

आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा १३ जानेवारी रोजी तिर्थक्षेत्र माहूर येथे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे पत्रकारांना उपस्थितीचे आवाहन

 आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार

वितरण सोहळा १३ जानेवारी रोजी तिर्थक्षेत्र माहूर येथे
मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे पत्रकारांना उपस्थितीचे आवाहन





मुंबई : वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांचे वितरण सोहळा येत्या १३ जानेवारी २०२४ रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे होणार असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी आज येथे केली.

       मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांना पुरस्कार देऊन राज्यपातळीवर त्यांचा गौरव केला जातो. हे सोहळे जाणीवपूर्वक ग्रामीण भागात आणि राज्याच्या विविध विभागात घेतले जातात. २०२२ चा पुरस्कार वितरण सोहळा नगर जिल्ह्यात कर्जत येथे घेण्यात आला होता. त्या अगोदर नागपूर, पाटण, पालघर, वडवणी, अक्कलकोट,गंगाखेड  आदि ठिकाणी हे सोहळे घेतले गेले होते. २०२२ चे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. माहूर, माजलगाव, तेल्हारा, अंबरनाथ, आर्वी, बत्तीस शिराळा, साक्री, आणि शिरूर तालुका पत्रकार संघांना तसेच दक्षिण आणि उत्तर नगर जिल्ह्यांना हे पुरस्कार घोषित झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे १३ जानेवारी रोजी एका शानदार सोहळ्यात हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. माहूर हे साडेतीन शक्तीपीठा पैकी आद्य पीठ आहे. येथे रेणुका मातेचं मंदीर असून हे तीर्थक्षेत्र देशभर प्रसिध्द आहे. मुंबईहून किनवटपर्यत रेल्वे सेवा उपलब्ध आहे. किनवट येथून एका तासात आपण माहूरला पोहचू शकतो. पुणे येथून नांदेडसाठी रेल्वे सेवा उपलब्ध आहे. नांदेड येथून रस्ता मार्गे पुढे  माहूरला जाता येईल. नांदेड, विदर्भातून यवतमाळ, वर्धा, अकोला आदि ठिकाणाहून माहूरसाठी बस सेवा उपलब्ध आहे. नांदेडहून माहूरला जाण्यासाठी रस्ता मार्गे अडीच ते तीन तास लागतात. पुरस्कार मिळालेल्या पत्रकार संघांनी किती पत्रकार येणार आहेत त्याची माहिती स्थानिक संयोजन समितीला द्यावी असे आवाहन परिषदेच्यावतीने करण्यात येत आहे.

      परिषदेचे सर्वच कार्यक्रम भव्य दिव्य होतात. माहूरचा कार्यक्रम परिषदेच्या परंपरेला साजेसा असाच होणार आहे. जास्तीत जास्त पत्रकारांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, मराठवाडा विभागीय संघटक प्रकाश कांबळे, सुभाष चौरे, विभागीय सचिव बालाजी सूर्यवंशी, नांदेड जिल्हा अध्यक्ष गोवर्धन बियाणी, माहूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दोसाणी आदिंनी केले आहे.

Monday, December 4, 2023

पुणे जिल्ह्यातील ३०६ पत्रकारांची आरोग्य तपासणी मराठी पत्रकार परिषदेचा ८५व्या वर्धापनदिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर.

 पुणे जिल्ह्यातील ३०६ पत्रकारांची आरोग्य तपासणी 


मराठी पत्रकार परिषदेचा ८५व्या वर्धापनदिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर. 



पुणे : 


       मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर यांनी केलेल्या आव्हानानुसार पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, पुरंदर, हवेली, बारामती, इंदापूर, दौंड, जुन्नर, चाकण या पत्रकार संघांनी पत्रकारांची मोफत आरोग्य तपासणी केली. रविवार दि. ३ रोजी ३०६ पत्रकारांनी या शिबिरात सहभागी होत तपासणी केली. 


         मराठी पत्रकार परिषद विश्वस्त किरण नाईक, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केलेल्या सूचनेनुसार  ३ डिसेंबर २०२३ रोजी सर्व महाराष्ट्रभर आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यामधील रुग्णालयात आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. तालुक्यातील शिबिराची जबाबदारी त्या तालुक्यातील जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष आणि तालुका पदाधिकारी यांनी समर्थपणे पेलली. यामध्ये पुरंदर तालुका पत्रकार संघ- ३५, आंबेगाव तालुका पत्रकार संघ ६८, इंदापूर तालुका पत्रकार संघ- २५, बारामती तालुका पत्रकार संघ २२, हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ चाकण १५,  पिंपरी चिंचवड पत्रकार संघ ८५,दौंड तालुका पत्रकार संघ १२, जुन्नर तालुका पत्रकार संघ २०,हवेली तालुका पत्रकार संघ २४  पत्रकारांची तपासणी झाली. ४ डिसेंबर रोजी  शिरूर तालुका पत्रकार संघ व भोर तालुका पत्रकार संघ, वेल्हे तालुका पत्रकार, संघ, पुणे शहर पत्रकार संघ, लोणावळा शहर पत्रकार संघ येत्या आठवड्यामध्ये पत्रकारांची तपासणी करून घेणार आहेत. 


      पुणे जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी केल्याबद्दल परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्यासह विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, सह प्रसिद्धीप्रमुख भरत निगडे, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर व सोशल मिडिया परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे यांनसह पुणे जिल्हा पत्रकार संघ व सर्व जिल्हा पदाधिकारी कार्यकारिणी यांनी सर्व तालुका पत्रकार संघाचे अभिनंदन केले आहे. तसेच मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व पत्रकारांना शुभेच्छा दि

ल्या आहेत.

Sunday, December 3, 2023

राज्यभरात ८,५०० पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी मराठी पत्रकार परिषदेच्या शिबिराचा सर्वत्र प्रतिसाद, संकल्पपूर्तीकडे वाटचाल एस.एम.देशमुख यांनी मानले सर्वांचे आभार.

 राज्यभरात ८,५०० पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी


मराठी पत्रकार परिषदेच्या शिबिराचा सर्वत्र प्रतिसाद, संकल्पपूर्तीकडे वाटचाल
एस.एम.देशमुख यांनी मानले सर्वांचे आभार.




मुंबई :
        मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनानिमित्त आज रविवारी राज्यभरात विविध जिल्हे, तालुक्यांमध्ये "पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे" आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला असून राज्यात तब्बल ८,५०० पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तर, काही जिल्ह्यांमध्ये पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर हे पुढील तीन ते चार दिवसांमध्ये होणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी १० हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा परिषदेने केलेला संकल्प नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वास परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला.

      मराठी पत्रकार परिषदेची स्थापना ३ डिसेंबर १९३९ रोजी मुंबईत झाली. गेली दहा वर्षे परिषदेच्या वतीने ३ डिसेंबर हा दिवस राज्यात "पत्रकार आरोग्य तपासणी दिवस" म्हणून साजरा केला जातो. राज्यात ३६ जिल्हे आणि ३५४ तालुक्यात परिषदेच्या शाखा आहेत. यातील बहुसंख्य जिल्हे आणि तालुक्यात रविवारी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये पुणे, अहमदनगर, नांदेड, गडचिरोली, रायगड, रत्नागिरी , धुळे, सातारा, कोल्हापूर,  नागपूर, अकोले, परभणी, वाशिम , रत्नागिरी, नांदेड, हिंगोली यासह विविध जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यभर शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाल असून तब्बल ८,५०० पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. तर, राज्याच्या काही भागामध्ये पुढील तीन ते चार दिवसांमध्ये पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी १० हजार पत्रकारांच्या आरोग्य तपासणी करण्याचा परिषदेने केलेला संकल्प नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वास एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला.

      राज्याच्या विविध भागात पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी केल्याबद्दल परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्यासह विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, सह प्रसिद्धीप्रमुख भरत निगडे, डिजिटल मीडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर यांनी सर्व जिल्हा पत्रकार संघ, तालुका पत्रकार संघाचे अभिनंदन केले आहे. तसेच मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

डॉक्टर असलेल्या खासदारांनी स्वतः केली पत्रकारांची आरोग्य तपासणी
   मराठी पत्रकार परिषदेच्या अहमदनगर जिल्हा शाखेने यंदा आरोग्य तपासणी शिबिरासोबतच मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकारांना नंबरचे चष्मे तसेच गॉगलचे मोफत वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, डिजिटल मीडिया परिषदेचे आफताब शेख यांनी हे शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या शिबिराला खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप यांनी भेट देत मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच डॉ.सुजय विखे यांनी स्वतः पत्रकारांची आरोग्य तपासणी करीत वर्धापनदिनानिमित्त अनोख्या शुभेच्छा दिल्या.


          एस.एम.देशमुख यांनी बीड जिल्ह्यात वडवणी येथे तर अध्यक्ष शरद पाबळे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये आणि सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांनी नगरमध्ये आरोग्य तपासणी करवून घेतली. पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील संघांचे नियोजन केले होते. तर पुरंदर तालुका संघाच्या सासवड येथील श्री. सोपानदेव हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी शिबिरत तपासणी करुन तालुक्यातील सदस्यांची तपासणी करून घेतली. 

Saturday, December 2, 2023

आदर्श पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा उत्तर आणि दक्षिण नगर जिल्हा आदर्श जिल्हा पत्रकार पुरस्काराचे मानकरी.

 आदर्श पत्रकार संघ पुरस्कारांची घोषणा 

उत्तर आणि दक्षिण नगर जिल्हा

आदर्श जिल्हा पत्रकार पुरस्काराचे मानकरी. 

शिरूर, माजलगाव, माहूर, साक्री, तेल्हारा, बत्तीस शिराळा, आर्वी, अंबरनाथ तालुका संघ ठरले आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांचे मानकरी.




मुंबई : मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारया वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांची आज एस.एम.देशमुख यांनी घोषणा केली आहे. प्रत्येक महसूल विभागातून एक याप्रमाणे राज्यातील आठ तालुका पत्रकार संघ या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. जिल्हा संघ पुरस्कार यंदा प्रथमच विभागून देण्यात आला आहे. येत्या १३ जानेवारी रोजी माहूर येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचेही एस.एम देशमुख यांनी स्पष्ट केले. 


      मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न राज्यातील अनेक जिल्हा आणि तालुका पत्रकार संघ आपआपल्या कार्यक्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत कार्य करीत असतात, तसेच मराठी पत्रकार परिषदेचे सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवत असतात. अशा तालुका आणि जिल्हा पत्रकार संघांचा राज्यस्तरावर गौरव करण्याचा निर्णय परिषदेने घेतला. त्यानुसार गेली दहा वर्षे मराठी पत्रकार परिषद हे पुरस्कार देत आहे. मराठी पत्रकार परिषदेचे भूतपूर्व अध्यक्ष "संध्या" कार वसंतराव काणे आणि "संचार" कार रंगा अण्णा वैद्य यांच्या नावाने हे पुरस्कार दिले जातात. 


या वर्षीच्या पुरस्कारांचे मानकरी पुढील प्रमाणे आहेत. 

रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार यंदा उत्तर नगर आणि दक्षिण नगर जिल्ह्यांना विभागून देण्यातआला आहे.

वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार 

१) पुणे विभाग : शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ, जिल्हा पुणे 

२) लातूर विभाग : माहूर तालुका  पत्रकार संघ, जिल्हा नांदेड

३) नाशिक विभाग : साक्री तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा धुळे 

४) मराठवाडा विभाग : माजलगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा बीड 

५) अमरावती विभाग : तेल्हारा तालुका पत्रकार संघ, जिल्हा अकोला 

६) कोल्हापूर विभाग : बत्तीस शिराळा तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली 

७) नागपूर विभाग : आर्वी तालुका पत्रकार संघ जिल्हा वर्धा 

८) कोकण विभाग : अंबरनाथ तालुका पत्रकार संघ जिल्हा ठाणे. 

नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे १३ जानेवारी २०२४ रोजी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 

     मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य प्रसिध्दी प्रमुख संदीप कुलकर्णी, सह प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर यांनी पुरस्कार प्राप्त सर्व जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Friday, December 1, 2023

३ डिसेंबर हा मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन 'आरोग्यदिन' म्हणून जाहीर : शरद पाबळे पत्रकारांनी सहकुटुंब आरोग्य तपासणी करून घ्याच.

३ डिसेंबर हा मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापन दिन 'आरोग्यदिन' म्हणून जाहीर : शरद पाबळे 

पत्रकारांनी सहकुटुंब आरोग्य तपासणी करून घ्याच. 



 

पुणे : 

      मित्रहो, पत्रकारितेच्या अत्यंत धावपळीच्या क्षेत्रात सर्व समाजाचे प्रश्न मांडत असताना पत्रकार आपले स्वतःकडे व स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत असते. आरोग्याकडे होत असलेल्या या दुर्लक्षाचा वेळप्रसंगी मोठा फटका आपल्याला व पर्यायाने आपल्या कुटुंबालाही बसतो.  

       हीच बाब गांभीर्याने घेत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. एस.एम. देशमुख सर यांनी राज्यभरातील प्रत्येक तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी कार्यक्रमानंतर मराठी पत्रकार परिषदेचा ३ डिसेंबर हा वर्धापन दिन आरोग्यदिन म्हणून जाहीर करत या दिवशी राज्यभर पत्रकारांची आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन केले. 


      त्यानुसार गेली अनेक वर्षे मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी म्हणजेच ३ डिसेंबरला राज्यभर प्रत्येक तालुक्यात स्थानिक रुग्णालये तसेच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. 


      आजवरच्या या आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरात वेळीच आजाराचे निदान झाल्याने तसेच वेळीच गरजु रुग्णांना रक्त मिळाल्याने अनेकांच्या प्राणांवरचे संकट टळले आहे. गतवर्षी राज्यभरात ८ हजारांपेक्षा अधिक पत्रकारांनी त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करून घेतली. 


      यावर्षीही मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापन दिनी म्हणजेच ३ डिसेंबरला राज्यभर पत्रकार आरोग्य तपासणी शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी १० हजारापेक्षा अधिक जणांच्या तपासणीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. आरोग्य तपासणीचे महत्व लक्षात घेऊन जास्तीत जास्त पत्रकारांनी त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. श्री. एस. एम. देशमुख सर, विश्वस्त मा. श्री. किरण नाईक सर तसेच अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य महिला प्रमुख शोभा जयपूरकर, राज्य प्रसिध्दी प्रमूख संदीप कुलकर्णी, सह प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, राज्य निवडणूक प्रमुख सुरेश नाईकवाडे, परिषदेचे आरोग्य दूत दीपक कैतके तसेच परिषदेचे उपाध्यक्ष, संघटक, विभागीय सचिव आदिंनी केलेले आहे. 


      मित्रांनो, आपले व आपल्या परिवाराचे आरोग्य खुप मोलाचे व महत्वाचे आहे. याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या परिवाराचा एक घटक म्हणून आपल्याला विनंती करतो की, कृपया या शिबीरात आपली व आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी करून घ्याच. तसेच ज्यांना शक्य आहे, त्यांनी रक्तदानाचे पुण्यकर्मही करा, तुम्ही केलेले रक्तदान एखादयाला जीवदान देवू शकतो असे आव्हान मराठी पत्रकार परिषद, मुंबईचे अध्यक्ष शरद पाबळे यां

नी केले आहे. 

Featured Post

बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व

 बारामतीत ‘कृषी 2026’चा भव्य उत्सव; पवार कुटुंबीय एकत्र येणार, शेतीच्या भविष्यासाठी नवे पर्व बारामती : बारामतीत १७ ते २४ जानेवारी दरम्यान पा...