आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार
वितरण सोहळा १३ जानेवारी रोजी तिर्थक्षेत्र माहूर येथेमुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे पत्रकारांना उपस्थितीचे आवाहन
मुंबई : वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा अण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारांचे वितरण सोहळा येत्या १३ जानेवारी २०२४ रोजी नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे होणार असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी आज येथे केली.
मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्हा आणि तालुका पत्रकार संघांना पुरस्कार देऊन राज्यपातळीवर त्यांचा गौरव केला जातो. हे सोहळे जाणीवपूर्वक ग्रामीण भागात आणि राज्याच्या विविध विभागात घेतले जातात. २०२२ चा पुरस्कार वितरण सोहळा नगर जिल्ह्यात कर्जत येथे घेण्यात आला होता. त्या अगोदर नागपूर, पाटण, पालघर, वडवणी, अक्कलकोट,गंगाखेड आदि ठिकाणी हे सोहळे घेतले गेले होते. २०२२ चे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. माहूर, माजलगाव, तेल्हारा, अंबरनाथ, आर्वी, बत्तीस शिराळा, साक्री, आणि शिरूर तालुका पत्रकार संघांना तसेच दक्षिण आणि उत्तर नगर जिल्ह्यांना हे पुरस्कार घोषित झाले आहेत. नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे १३ जानेवारी रोजी एका शानदार सोहळ्यात हे पुरस्कार वितरित केले जाणार आहेत. माहूर हे साडेतीन शक्तीपीठा पैकी आद्य पीठ आहे. येथे रेणुका मातेचं मंदीर असून हे तीर्थक्षेत्र देशभर प्रसिध्द आहे. मुंबईहून किनवटपर्यत रेल्वे सेवा उपलब्ध आहे. किनवट येथून एका तासात आपण माहूरला पोहचू शकतो. पुणे येथून नांदेडसाठी रेल्वे सेवा उपलब्ध आहे. नांदेड येथून रस्ता मार्गे पुढे माहूरला जाता येईल. नांदेड, विदर्भातून यवतमाळ, वर्धा, अकोला आदि ठिकाणाहून माहूरसाठी बस सेवा उपलब्ध आहे. नांदेडहून माहूरला जाण्यासाठी रस्ता मार्गे अडीच ते तीन तास लागतात. पुरस्कार मिळालेल्या पत्रकार संघांनी किती पत्रकार येणार आहेत त्याची माहिती स्थानिक संयोजन समितीला द्यावी असे आवाहन परिषदेच्यावतीने करण्यात येत आहे.
परिषदेचे सर्वच कार्यक्रम भव्य दिव्य होतात. माहूरचा कार्यक्रम परिषदेच्या परंपरेला साजेसा असाच होणार आहे. जास्तीत जास्त पत्रकारांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, मराठवाडा विभागीय संघटक प्रकाश कांबळे, सुभाष चौरे, विभागीय सचिव बालाजी सूर्यवंशी, नांदेड जिल्हा अध्यक्ष गोवर्धन बियाणी, माहूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दोसाणी आदिंनी केले आहे.