पत्रकारांना धमकी प्रकरणी राज्यभर निषेध आंदोलन; "माफी नव्हे, गुन्हा दाखल करा"ची ठाम मागणी
पत्रकारांना धमकी प्रकरणी राज्यभर निषेध आंदोलन;
"माफी नव्हे, गुन्हा दाखल करा"ची ठाम मागणी
मुंबई : पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देत अवमानकारक भाषा वापरणाऱ्या खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात राज्यभर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. "माफी मान्य नाही, गुन्हा दाखल करा" या स्पष्ट भूमिकेसह अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, डिजिटल मीडिया परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रभर निषेध आंदोलने करण्यात आली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. एस. एम. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात पत्रकारांनी पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला.
आंदोलनादरम्यान पत्रकारांनी "पत्रकारांचा अपमान सहन करणार नाही", "पत्रकारांवर हल्ला खपवून घेणार नाही", "पत्रकार एकता जिंदाबाद" आणि "माफी नाही, कारवाई हवीच" अशा जोरदार घोषणा देत संबंधित खासदारावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
यावेळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर अशा प्रकारे धमक्या देणे ही अत्यंत गंभीर बाब असून, केवळ माफी मागितल्याने गुन्ह्याचे गांभीर्य कमी होत नाही. पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.
राज्यातील विविध जिल्हे, तालुके आणि शहरांमध्ये पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी होत निषेध नोंदवला. याप्रसंगी सर्व पत्रकार संघटनांनी एकजुटीने पत्रकारांच्या सन्मानाचे आणि सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी भविष्यातही आवश्यक ते सर्व लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
.jpg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा