सोमेश्वरची सर्वोच्च ऊसदराची परंपरा कायम पण किती असेल दर? गाळप पूर्णत्वाकडे ; किती लाख मे. टन गाळप झाले, किती लाख क्विंटल साखर, अल्कोहोल आणि वीज युनिट्स किती निर्माण झाले.
सोमेश्वरची सर्वोच्च ऊसदराची परंपरा कायम पण किती असेल दर?
गाळप पूर्णत्वाकडे ; किती लाख मे. टन गाळप झाले, किती लाख क्विंटल साखर, अल्कोहोल आणि वीज युनिट्स किती निर्माण झाले.
सोमेश्वरनगर :
“सोमेश्वर कारखाना यंदाही सर्वोच्च ऊसदराची परंपरा कायम ठेवणार असून सभासद शेतकऱ्यांना वेळेत आणि अधिक दर देण्याबाबत आम्ही कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी केले. सर्व घटकांच्या सहकार्यामुळे चालू गाळप हंगाम यशस्वीरित्या मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कारखान्याने आजअखेर एकूण ११,४४,५१२ मे.टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. बी-हेवी वगळता सरासरी ११.८७ टक्के साखर उतारा राखत १३,४३,७०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे. तसेच डिस्टिलरी प्रकल्पामधून ४८,६०,५३३ लिटर्स अल्कोहोल निर्मिती झाली असून सहविज निर्मिती प्रकल्पातून ६,४९,६०,४८० युनिट्स वीज महावितरण कंपनीस विक्री करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
ऊसदर व अनुदानाची सविस्तर माहिती
१५ फेब्रुवारीपर्यंत गाळपास आलेल्या उसासाठी कारखान्याने प्रति मे.टन ३३०० रुपये प्रमाणे प्रथम हप्ता वर्ग केला आहे.
१ ते १५ फेब्रुवारीदरम्यान आलेल्या उसाकरिता प्रति मे.टन १०० रुपये अनुदान आज वर्ग करण्यात आले आहे.
१६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान गाळपास आलेल्या उसासाठी प्रथम हप्ता ३३०० रुपये व अतिरिक्त १०० रुपये अनुदान हे १० मार्च रोजी वर्ग करण्यात येणार आहे.
मार्च महिन्यात तुटणाऱ्या उसासाठी प्रथम ३३०० रुपये प्रमाणे रक्कम २५ मार्च व १० एप्रिल रोजी वर्ग करण्यात येईल. त्यानंतर प्रति मे.टन २०० रुपये अनुदान पुढील सात दिवसांत वर्ग केले जाईल, असेही अध्यक्षांनी स्पष्ट केले.
पुढील हंगामासाठीही प्रोत्साहन
फेब्रुवारीनंतर येणाऱ्या उसाला ३३०० रुपयांचा पहिला हप्ता देतानाच, संचालक मंडळाने जाहीर केलेले महिन्यानिहाय अनुदानही देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे १६ फेब्रुवारीनंतर तुटणाऱ्या उसाचा कोटा राखून तो २०२६-२७ हंगामात गाळपास आल्यास प्रति मे.टन १०० रुपये अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना आवाहन
कारखान्याकडे नोंद असलेल्या सभासद व बिगरसभासद शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप करण्यास संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचे सांगून, शेतकऱ्यांनी बाहेरील कारखान्यांना किंवा गुऱ्हाळांना ऊस देऊ नये, असे आवाहन चेअरमन जगताप यांनी केले. तात्पुरत्या फायद्यापेक्षा कारखान्याकडून मिळणारा स्पर्धात्मक उसदर, सवलतीची साखर आणि इतर सुविधा यांचा दूरदृष्टीने विचार करावा, असेही त्यांनी नमूद केले.
सर्व सभासद शेतकरी, अधिकारी-कामगार, ऊसतोड वाहतूकदार व मजूर यांच्या सहकार्यामुळे हंगाम सुरळीत सुरू असून, मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात गाळप यशस्वीरित्या पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा