Wednesday, January 29, 2025

नीरा नदीच्या पुलावरून ट्रक कोसळला. अपघातात नंतर युवकांनी काय केले? साताऱ्याहून शिरुरकडे निघाला होता ट्रक.

 नीरा नदीच्या पुलावरून ट्रक कोसळला. 


अपघातात नंतर युवकांनी काय केले? 


साताऱ्याहून शिरुरकडे निघाला होता ट्रक. 




पुरंदर :

       मागील काळात पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांचा ट्रक नीरा नदीच्या पात्रात कोसळला होता. त्याच पद्धतीने बुधवारी रात्री आठच्या सुमारास मालवाहतूकीचा भरधाव ट्रक नीरा नदीच्या पुलावरून कोसळला आहे. सुदैवाने ट्रक पुलाच्या कठाड्यावर अडकल्याने अनर्थ टळला आहे. ट्रक चालकाला स्थानिकांनी कोसळलेल्या ट्रकमधून बाहेर काढून चौकशी करत, ट्रक मालकाला घटनेची कल्पना दिली आहे. 


  पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील पुणे सातारा जिल्ह्याची सिमा असलेल्या नीरा नदिच्या पुलावर वाहतूक धोकादायक होत आहे. पुणे व सातारा बाजूने पुलावर जाताना नागमोडी वाळणे व चढ आहे. यामुळे या मार्गावर पुढे पुल आहे हे चालकांना लक्षातच येत नाही. त्यामुळे मागील काळात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या दरम्यान पहाटेच्या वेळी वारकऱ्यांचे साहित्य घेऊन मुक्कामाच्या ठिकाणी निघालेल्या ट्रकला पुणे हद्दीत महादेव मंदिरा लगत अपघात झाला होता. अगदी तशाच प्रकारे बुधवार दि. २९ रोजा रात्री आठच्या सुमारास सातारा बाजूने येणारा भरधाव मालवाहतूकीचा अवजड ट्रकला अपघात झाला आहे. साताऱ्याहून शिरुरकडे हा ट्रक निघाला होता. लोणंद (सातारा) बाजूने येताना पाडेगावच्या हद्दीतील जुन्या टोलनाक्या पुढे आल्यावर दोन ठिकाणी वेग नियंत्रणासाठी रॅंप्लर बसवले आहेत. या रॅंप्लरवर येताच ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. ट्रक डाव्या बाजूला पुलाच्या भराव्यावर कोसळला. 




    नीरा नदीकाठावरील प्रसिद्ध दत्त घाटासमोरील पायऱ्यांलगतच ट्रक आडवा कोसळल्याने स्थानिकांना ट्रक चालकाला मदत करता आली. ट्रक कोसळताना मोठा आवाज झाल्याने स्थानिक युवकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. मोठा अवजड ट्रक आडवा दिसल्यावर युवकांनी चालकाला आवज दिला व मदत करत त्याला अपघातग्रस्त ट्रकमधून बाहेर काढले. अधिक माहिती घेत ट्रक मालकाला फोन करुन ट्रकला अपघात झाल्याची माहिती दिली. लोणंद (ता.खंडाळा) पोलीसांनी घटनास्थळी भेट देत, चालकाची विचारपूस केली आहे. चालकाला कोणत्याही प्रकारची जखम नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. 

पत्रकार एकता रॅलीत मोठ्या संख्येनं सहभागी व्हा : एस.एम.देशमुख पुणे ते सेलू पत्रकार एकता रॅली निघणार

पत्रकार एकता रॅलीत मोठ्या संख्येनं सहभागी व्हा : एस.एम.देशमुख

पुणे ते सेलू पत्रकार एकता रॅली निघणार 



मुंबई :

      परभणी जिल्ह्यातील सेलू येथे मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने होत असलेल्या पुरस्कार वितरण सोहळा आणि तालुका अध्यक्षांचा मेळाव्याच्या निमित्तानं शुक्रवार दि.३१ जानेवारी रोजी पुणे ते सेलू अशी पत्रकार एकता रॅली निघणार असल्याची माहिती परिषदेच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे. परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख पत्रकार एकता रॅलीचे नेतृत्व करणार आहेत. 



        ३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०९ वाजता पुण्याजवळील पेरणे फाटयावरील शरद पाबळे यांच्या निवासस्थानापासून एकता रॅलीला सुरूवात होईल. शिक्रापूर मार्गे रॅली रांजणगाव येथे पोहचेल.. तेथे स्वागत आणि दर्शन घेऊन रॅली शिरूर मार्गे अहिलयानगरला पोहोचेल. तेथे स्वागत आणि विश्रांती नंतर रॅली कडा, आष्टी, जामखेड, पाटोदा मार्गे बीडला जाईल.. वरील सर्व ठिकाणी स्थानिक पत्रकार आणि गावातील प्रतिष्ठित रॅलीचे स्वागत करतील.. बीड येथे रेस्ट हाऊसवर रॅलीचे स्वागत केले जाईल. तेथून पुढे वडवणी, तेलगाव, माजलगाव, पाथरी मार्गे रॅली सेलू येथे पोहोचेल. सेलूत स्वागताध्यक्ष आणि स्थानिक संयोजन समितीच्यावतीने रॅली आणि एस. एम. देशमुख यांचे स्वागत करण्यात येईल.मार्गावरील तालुका जिल्हा संघाचे पदाधिकारी देखील रॅलीत सहभागी होतील. 


      रॅलीत विश्वस्त शरद पाबळे, उपाध्यक्ष गणेश मोकाशी, राज्य सहप्रसिद्धी प्रमुख भरत निगडे, पुणे जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर, डिजिटल मिडीयाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत. पत्रकारांच्या हक्कासाठी आणि चौथ्या स्तंभाच्या रक्षणासाठी निघत असलेल्या या रॅलीत जास्तीत जास्त पत्रकारांनी सहभागी व्हावे असे आवाहन एस.एम देशमुख, किरण नाईक, शरद पाबळे, सुरेश नाईकवाडे, मन्सूरभाई शेख, डिजिटल मिडियाचे अध्यक्ष अनिल वाघमारे, प्रसिध्दी प्रमूख संदीप कुलकर्णी, संभाजीनगर विभागीय सचिव रवी उबाळे, लातूर विभागीय सचिव सचिन शिवशेट्टे आदिंनी केले आहे.

Sunday, January 26, 2025

धक्कादायक कर्नलवाडीतील युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. भोर पुरंदर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोरील घटना

 

कर्नलवाडीतील युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न. 


भोर पुरंदर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासमोरील घटना 



पुरंदर :

       प्रजासत्ताक दिनी कर्नलवाडी गावातील युवकाने सासवडच्या भोर पुरंदर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे. अंकुश उमाजी वाघापुरे (वय ३० वर्षे) रा. कर्नलवाडी, ता. पुरंदर याने दि. २६ जानेवारी रोजी सकाळी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. याबाबत दत्तात्रय शांताराम खेगरे पो.हवा. उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग सासवड यांनी फिर्याद दाखल केली आहे. 


  याबाबत सासवड पोलीस स्टेशन मध्ये  गु.र.नं.35/2025 भा.न्या.सं.कलम 125, 286, 35, 221कल्मांअन्वय दत्तात्रय शांताराम खेगरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. सासवड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ०८.४५ वाजताच्या सुमारास मौजे सासवड ता. पुरंदर जि. पुणे गावचे हददीत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भोर विभाग सासवड यांचे कार्यालया समोरील मोकळया जागेत अंकुश उमाजी वाघापुरे (वय ३० वर्षे) रा. कर्नलवाडी, ता. पुरंदर जि. पुणे याने कोणते तरी विषारी औषध प्राशन करून स्वताःचे व इतरांचे व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करून मानवी जिवित धोक्यात येईल अशा पध्दतीने बेदरकारपणे विषारी पदार्थाबाबत कृती करून फौजदारी पात्र धाकधपटशहा करून इतर व्यक्तिंना भयभित करून शासकीय कामात अडथळा आणलेला आहे. म्हणून पो.हव. खेगरे यांनी वाघापूर यांच्या विरूध्द सरकारतर्फे कायदेशिर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. प्रभारी अधिकारी - पो.नि. ऋशषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. फौज. गायकवाड गुन्ह्याचा तपास कर

त आहेत. 

Wednesday, January 22, 2025

ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्तपदी योगी निरंजन नाथ पालखी सोहळा प्रमुखपदी डॉ. भावार्थ देखणे यांची निवड.

 ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्तपदी योगी निरंजन नाथ

पालखी सोहळा प्रमुखपदी डॉ. भावार्थ देखणे यांची निवड. 






आळंदी : 

     आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्तपदी योगी निरंजन नाथसाहेब यांची तसेच २०२५ या वर्षातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखपदी डॉ. भावार्थ देखणे यांची निवड झाल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे मावळते प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप यांनी सांगितले. 


       श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदी यांचं बैठक प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप त्यांचे अध्यक्षते खाली झाली. यावेळी विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख, योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, व्यवस्थापक माऊली वीर उपस्थित होते. या बैठकीत पुढील वर्षभराचे कालावधीसाठी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे झालेल्या बैठकीत कमेटीचे प्रमुख विश्वस्तपदी योगी निरंजन नाथसाहेब यांची निवड करण्यात आली. तसेच या वर्षीच्या पंढरपूर पालखी सोहळा प्रमुखपदी डॉ. भावार्थ देखणे यांनी निवड करण्यात आली. या शिवाय आळंदी संस्थानचे स्कीम प्रमाणे प्रमुख व्यवस्थापकपदी सद्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांची निवड जाहीर करण्यात आली. संस्थानचे तत्कालीन प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच यासाठी बैठक खेळीमेळीचे वातावरणात पार पडली. 


  नवनिर्वाचित प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांना योगी शांतीनाथ यांनी नाथ संप्रदायाची दीक्षा दिली आहे. साधक म्हणून मंदिरात अनेक वर्षांपासून सेवारत आहेत. स्व. भारुडकर डॉ. रामचंद्र देखणे यांचे माध्यमातून वारकरी संप्रदायाचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जात असलेले आळंदी देवस्थानचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांची पालखी सोहळा प्रमुखपदी निवड झाली आहे. ते राज्य परिसरात तसेच परदेशात देखील कीर्तन, प्रवचन, भारुड, आणि निरुपाचें माध्यमातून सेवारत आहे. 

                    प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब                 



     नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा आळंदी देवस्थानचे वतीने मावळते विश्वस्त राजेंद्र उमाप यांचे हस्ते तसेच श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे वतीने निवडीचे स्वागत समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, श्रीधर सरनाईक, विलास वाघमारे, निखिल प्रसादे, विश्वम्भर पाटील, अर्जुन मेदनकर, कैलास आव्हाळे, सोपन काळे आदींचे उपस्थितीत सत्कार करण्यात आला. 

                 पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे



  अनेक महिन्या पासून पदांचे फेरबदल निवडी प्रलंबित राहिल्या होत्या. माऊलींचा पालखी सोहळा पुण्यात आल्यावर परंपरेने संस्थानची बैठक होऊन निवडी पुण्यात जाहीर केल्या जात. तशी अनेक वर्षांची परंपरा होती. १ ऑगस्टला सर्वसाधारण पणे निवडी आणि कामकाज सुरु होत असे. यावेळी या निवडीस विलंब झाला. सद्या तीन विश्वस्त कार्यरत असून ३ विश्वस्त निवडी साठी देवस्थानने अर्ज मागविले असून उर्वरित ३ विश्वस्त निवड प्रक्रिया प्रलंबित आहे.





Tuesday, January 21, 2025

जेजुरी येथील सिंह मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वर कारवाईची आरपीआयची मागणी

 जेजुरी येथील सिंह मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल वर कारवाईची आरपीआयची मागणी 

   हॉस्पिटल अनाधिकृत, असल्याचे म्हणत

री. पा. इ करणार मुख्याधिकारी कार्याल्यासमोर हलगी नाद आंदोलन 



जेजुरी :

    महाराष्टाचे कुलदैवत म्हणून जेजुरी सर्वत्र सुपरिचित आहे. याठिकाणी बहुवीध प्रांतातून, प्रदेशातून लोक वास्तव्यास आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने येथे देशाच्या काना कोपऱ्यातून येऊन लोक उदर निर्वाह करीत आहेत. तशाच काहींशा प्रकारे वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही पदवी संपादन नं करता, कोणत्या तरी डॉक्टर च्या हाता खाली कंपाउंडर म्हणून शिकलेल्या व जुजबी ज्ञान असणाऱ्या व्यक्तीने मल्हार नगरीत दवाखाना नव्हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. 

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेजुरी येथे सिंह मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल या नावाने पुणे -पंढरपूर पालखी महामार्गा लगत हॉस्पिटल सुरु आहे. पूर्वी छोट्या स्वरूपात जुन्या जेजुरी येथे एका खोलीत हे सुरु होते. आत्ता मात्र एखाद्या मल्टि नॅशनल हॉस्पिटलला लाजवेल अशा स्वरूपात हे हॉस्पिटल सुरु आहे. या हॉस्पिटलचे रजिस्ट्रेशन झालेले नाही अशी अधिकृत माहिती जेजुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेली आहे. त्याचबरोबर या हॉस्पिटलच्या इमारत बांधणीसाठी जो आवश्यक बांधकाम परवाना नगरपरिषद यांचेकडून घ्यावा लागतो, तो देखील घेतलेला नाही असे मुख्याधिकारी यांनी लेखी दिलेले आहे. अशा प्रकारे अनधिकृत स्वरूपात सुरु असलेल्या हॉस्पिटल वर कारवाई करावी यासाठीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष पंकज धिवार यांनी मुख्याधिकारी यांना दिले होते. परंतु हेतू पुरस्सर मुख्याधिकारी चारुदत्त इंगवले यांनी या निवेदनाला केराची टोपली दाखवलेली आहे. याबाबत वारंवार विचारणा करून देखील या हॉस्पिटल वर कारवाई करण्यास सदरचे मुख्याधिकारी टाळाटाळ करीत आहेत.

    माणसाच्या आरोग्याशी म्हणजेच जीवनाशी निगडित असलेल्या बाबतीत देखील अधिकारी वर्ग आर्थिक हित संबंधा पोटी टाळाटाळ करीत असेल तर या अधिकाऱ्यांना वठनिवर आणण्यासाठी लोकशाही च्या मार्गाने गुरुवार दि. 23जानेवारी रोजी सकाळी 11वा. सर्व रिपब्लिकन कार्यकर्त्यांचे वतीने हलगीनाद आंदोलन करणार आहोत. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे पंकज धिवार यांनी सांगितले





" पंकज धिवार यांची तक्रार आल्यानंतर संबंधित हॉस्पिटलकडून या संदर्भातील त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे. त्या कागद पात्रांची तपासणी केली जाईल.अर्जदार आणि गैरअर्जदार यांची बाजू ऐकून घेतल्या नंतर योग्य ती कारवाई केली जाईल."


 चारूदत्त इंगोले ( कार्यकारी अधिकारी जेजुरी नगरपरिषद)


.


Monday, January 20, 2025

उद्या पासून जोतिबाच्या मूळ मूर्तिचे दर्शन बंद २१ ते २४ जानेवारी अखेर भारतीय पुरातत्व विभागाकडून संर्वधन प्रक्रिया

 उद्या पासून जोतिबाच्या मूळ मूर्तिचे दर्शन बंद 

२१ ते २४ जानेवारी अखेर भारतीय पुरातत्व विभागाकडून संर्वधन प्रक्रिया




कोल्हापूर : 

      श्री.केदारलिंग (देव जोतिबा) मूळ मूर्तीची मंगळवार (दि.२१) ते शुक्रवार )दि.२४) अखेर भारतीय पुरातत्व विभागाकडून संर्वधन प्रक्रिया करण्यात येणार आहे. भाविकांसाठी या कालावधीमध्ये उत्सवमूर्ती व कलश दर्शनासाठी मंदिरातील कासव चौक येथे ठेवण्यात येणार आहे. 


         मौ.वाडी रत्नागिरी ता. पन्हाळा जि. कोल्हापूर येथील श्री. केदारलिंग (देव जोतिबा) देवस्थान मुळ मूर्ती सुस्थितीत राहणेच्या अनुषंगाने, जिल्हाधिकारी, कोल्हापूर तथा प्रशासक, देवस्थान व्यवस्थापन समिती, कोल्हापूर यांचे वतीने मूर्तीची पाहणी करणेकामी वेळोवेळी पुरातत्व विभाग यांना कळविण्यात आले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्व विभाग, दिल्ली व पुरातत्व विभाग, पुणे यांचेकडून मूर्तीची पाहणी करणेत आली होती व मूर्ती संवर्धनाच्या अनुषंगाने अहवाल देण्यात आला होता. 


      या अहवालाच्या अनुषंगाने देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर यांचे वतीने मूर्तीचे रासायनिक संवर्धन प्रक्रिया करणेच्या अनुषंगाने महासंचालक, भारतीय पुरातत्व विभाग, दिल्ली यांना दि.०३/०१/२०२५ च्या पत्राने कळविले होते. त्यानुसार दि.१७/०१/२०२५ रोजी भारतीय पुरातत्व विभाग, दिल्ली यांचेकडील अधिकारी यांनी मूर्तीची पाहणी केली. पाहणीअंती भारतीय पुरातत्व विभाग, दिल्ली कडील अधिकारी व सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांनी देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर व गावकरी प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून श्री. केदारलिंग (देव जोतिबा) देवस्थान मूर्तीची रासायनिक संर्वधन प्रक्रिया मंगळवार दि.२१/०१/२०२४ पासून शुक्रवार दि.२४/०१/२०२५ अखेर करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 


     त्यामुळे श्री. केदारलिंग (देव जोतिबा) देवाची मूळ मूर्तीचे मंगळवार दि. २१/०१/२०२५ पासून शुक्रवार दि. २४/०१/२०२५ अखेर दर्शन भाविकांना घेता येणार नाही. यास्तव भाविकांना सदर कालावधीमध्ये उत्सवमूर्ती व कलश दर्शनासाठी मंदिरातील कासव चौक येथे ठेवणेत येणार असून, भाविकांनी याकालावधीत कलश व उत्सवमूर्तीचे दर्शन घेऊन, देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर व समस्त पुजारी वर्ग यांना सहकार्य करावे. अशी विनंती देवस्थान व्यवस्थापन समिती, पश्चिम महाराष्ट्र प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

Saturday, January 18, 2025

पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना मोठा धक्का..

 पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना मोठा धक्का..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली, अजित पवार बीड सह पुण्याचे पालकमंत्री , एकनाथ शिंदे ठाणे, शंभुराजे देसाई साताऱ्याचे पालकमंत्री. 



मुंबई : 

मोठी बातमी समोर येत आहे, पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत. अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. तर मंत्री धनंजय मुंडेंना यादीतून वगळण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. गेल्यावेळी धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचं पालकमंत्रिपद होतं.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोलीचे पालकमंत्री असणार आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री असणार आहेत. धुळ्याचं पालकमंत्रिपद जयकुमार रावल यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. वाशिमची जबाबदारी हसन मुश्रीफ यांना देण्यात आली आहे. संजय राठोड हे यवतमाळचे पालकमंत्री असणार आहेत. उदय सामंत हे रत्नागिरीचे पालकमंत्री असणार आहेत.


धनंजय मुंडेंना धक्का

राज्यात सध्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं आहे. अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं मात्र त्यांचं नाव या यादीमधून वगळण्यात आलं आहे. गेल्यावेळी धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री होते. मात्र धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रिपद देऊ नये अशी मागणी करण्यात येत होती.


अखेर बीडचं पालकमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडेच राहिलं आहे, मात्र धनंजय मुंडे यांना डच्चू मिळाला असून, बीडचे नवे पालकमंत्री हे आता अजित पवार असणार आहेत. बीड सोबतच अजित पवार यांच्याकडे पुण्याचं देखील पालकमंत्रिपद असणार आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. आदिती तटकरे या रायगडच्या पालकमंत्री असणार आहेत.


  पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी


गडचिरोली – देवेंद्र फडणवीस

नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे

ठाणे – एकनाथ शिंदे

पुणे – अजित पवार

बीड – अजित पवार

सिंधुदुर्ग- नितेश राणे

अमरावती – चंद्रशेखर बावनकुळे

अहिल्यानगर – राधाकृष्ण विखे पाटील 

पंकजा मुंडे. --- जालना

वाशिम – हसन मुश्रीफ

सांगली – चंद्रकांत पाटील

सातारा -शंभुराजे देसाई

छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाट

जळगाव – गुलाबराव पाटील

यवतमाळ – संजय राठोड

कोल्हापूर – प्रकाश आबिटकर, सह पालकमंत्री माधुरी मिसाळ

अकोला – आकाश फुंडकर

भंडारा – संजय सावकारे

बुलढाणा – मकरंद जाधव

चंद्रपूर – अशोक ऊईके

धाराशीव – प्रताप सरनाईक

धुळे – जयकुमार रावल

गोंदिया – बाबासाहेब पाटील

हिंगोली – नरहरी झिरवळ

लातूर – शिवेंद्रसिंग भोसले

मुंबई शहर – एकनाथ शिंदे

मुंबई उपनगर -आशिष शेलार/ सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

नांदेड – अतुल सावे

नंदुरबार – माणिकराव कोकाटे

नाशिक – गिरीष महाजन

पालघर – गणेश नाईक

परभणी – मेघना बोर्डीकर

रायगड – अदिती तटकरे

सिंधुदुर्ग- नितेश राणे

रत्नागिरी – उदय सामंत

सोलापूर – जयकुमार गोरे

वर्धा – पंकज भोयर


Wednesday, January 15, 2025

ज्ञानपूर्ती क्लासचे 33 विद्यार्थी अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल

 ज्ञानपूर्ती क्लासचे 33 विद्यार्थी अबॅकसच्या राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल



 भोर (राजीव केळकर) दि.१६

 भोर येथील ज्ञानपूर्ती प्रोॲक्टिव अबॅकस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. स्वारगेट,पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली,ज्ञानपूर्ती प्रोॲक्टिव अबॅकस क्लासेसला सलग दुसऱ्यांदा बेस्ट सेंटर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले ज्ञानपूर्ती च्या तब्बल 96 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ भोर येथील वाघजाई माता मंदिर हॉल या ठिकाणी संपन्न झाला 

    भोरचे गटविकास अधिकारी श्री किरण कुमार धनावडे साहेब, नायब तहसीलदार क्रांती पाटील धनावडे मॅडम ध्रुव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजीव केळकर जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल व जुनियर कॉलेज भोरच्या प्राचार्य सौ, रुबीना सय्यद,जिजामाता इंग्लिश मीडियम प्राथमिक विभाग प्राचार्य,स्वाती मोटकर क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती विद्यालयचे मुख्याध्यापक रवींद्र पवार सर, निवृत्त शिक्षक सिकंदर रणवरे सर,भोर एज्युकेशन सोसायटी भोरच्या मुख्याध्यापिका, विनया कुलकर्णी, आर आर कॉलेजचे श्री तानाजी लवटे सर, विद्या प्रतिष्ठानच्या रागिनी भोसले मॅडम उपस्थित होते.मनोज धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले, ज्ञानपूर्ती क्लासेसचे संचालक श्री निलेश भोईटे सर यांनी प्रास्ताविक केले सौ. सोनाली भोईटे यांनी आभार मानले 

    सान्वी काटे, स्वरांश दिघे, साईराज पाटील, शिवांश नेवसे, श्लोक शिंदे, देवश्री आंबवले, नेत्रज बालगुडे, राजवीर सोले, शरण्या बांदल, शिवस्वी झांबे, समीक्षा अभंग, अर्णवी राऊत, तन्वी चौधरी, स्वरा शिंदे, श्रेया किंद्रे , आलिया आतार, सार्थक किंद्रे सई सुर्वे, सार्थक मरगजे, मधुरा चव्हाण, अभंग लिमन, अनघा जेधे, स्वरांजली जेधे, आयुष कोंढाळकर, स्वरा खोपडे, अनघा भिलारे, शिवतेज तावरे, वृषाली चव्हाण, हर्षदीप देवघरे, अद्वैत आवाळे, समीक्षा लवटे, साईश गरुड, विश्वराज पवार असे 33 विद्यार्थी विनर ट्रॉफी चे मानकरी ठरले

     अनन्या बदक, श्रुती मोहिते, सफा आत्तार, अनुराग चव्हाण, साहिल नवले, श्रीतेज मालुसरे, मोक्षदा खुडे, राजवीर काकडे, अनुष्का कंक, अर्णवी भेलके, आर्यन बदक, राजवीर मदने, प्रज्वल लोहार, भाग्येश रिठे, इंद्रजीत प्रधान, श्रावणी मोहिते, समृद्धी करे, प्रणव शेडगे, विहान पालकर, श्री धुमाळ, राघवेंद्र जेधे, श्लोक ढवळीकर, देवराज महांगरे, देव घोरपडे, नेत्रा धरू, मिसबा आत्तार, वेदिका काटकर, प्रतीक्षा राऊत, आयुष अनंतकर, रेवा पोतणीस, स्वरा वरे, सिद्धी जिंकलवाड, विश्वराज सपकाळ, श्लोक म्हेत्रे, कुष्विता तनुकु, मणक खान, ईशान नेरेकर, आर्यन बांदल, ज्ञानदा सोले, रुद्र भेलके, तनिष्का आतकरी, अमृता चव्हाण, अद्विका मदने, मनीष खोपडे, राधिका घोरपडे, अर्णव बुदगुडे, दिव्यम गुजर, श्रेयश सुतार, वरद शेलार, हर्षवर्धन यादव, तनया अंबवले, अनन्या बांदल, आदेश भेलके, श्रेयश तुपे, स्वरूप जाधवर, हर्षवर्धन राजेशिर्के, रुद्र नाझिरकर, साई मुंडलिक, श्रीराम बहिरट, देवश्री सकपाळ, अर्णव शिवतरे, राजवीर कोंढाळकर यांच्यासह 63 विद्यार्थी सुवर्णपदक विजेते ठरले

Friday, January 10, 2025

पुणे पंढरपूर पालखी मार्गावर अपघात जाधववाडी फाट्यावर वृद्धाला एसटीची धडक, वृद्ध ठार

 पुणे पंढरपूर पालखी मार्गावर अपघात 


जाधववाडी फाट्यावर वृद्धाला एसटीची धडक, वृद्ध ठार 



पुरंदर : पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील जाधववाडी फाट्यावर (ता. पुरंदर) भरधाव आलेल्या एसटी बसचने रस्ता ओलांडणाऱ्या लुना चालकाला जोरदार धडक दिल्याने ते उपचारापूर्वीच मृत्यू पावले. लुना चालक विजय काळुराम कोंढाळकर (वय ६७) रा. जाधववाडी रोड जाधवगड कमानीचे वरच्या बाजूला (ता.पुरंदर) यांचा मृत्यू झाला आहे. सासवड पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत एसटी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. 


    सासवड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पृथ्वीराज अशोक ढुमे (वय ४२) रा. ढुमेवाडी, दिवे (ता.पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे. ढुमे यांच्या फिर्यादीनुसार त्यांचे चुलते विजय काळुराम कोंढाळकर हे ढुमेवाडी हुन जाधववाडी येथील राहत्या घरी लुना मोटारसायकल क्र. एम.एच. १२- यु. एल. ९४३६ चालवत चालले होते. जाधववाडी फाट्यावर रस्ता ओलांडताना बारामती डेपोची भरधाव वेगात येणार एसटी बस क्र. एम.एच. १४- के.यु. ५०४१ ने कोंढाळकर यांच्या लुनाला जोरदार धडक दिली. ते गंभीर जखमी झाल्याने स्थानिकांनी त्यांना सासवडच्या संत सोपानदेव हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 


   सासवड पोलीसांनी बारामती एसटी बसचे चालक ज्ञानेश्वर तुळशीराम भांदुर्गे (वय ३१) रा बारामती डेपो, मुळ निवासी योवता, ता. रिसोड, जिल्हा वाशिम यांना रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात आपल्या ताब्यातील बस चालवून कोंढाळकर यांना जोरदार ठोसा मारुन डोक्यास गंभीर व किरकोळ जखमी करुन मृत्यूस कारणीभूत होऊन तसेच मोटारसायकल (लुना) नुकसानीस कारणीभूत झाल्याबद्दल भांदुर्गे यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सासवड पोलीसांनी दिली आहे. 

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर निरेत या दिवशी अधिकचा आठवडे बाजार

 मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर 

निरेत या दिवशी अधिकचा आठवडे बाजार 



पुरंदर : पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नीरा शहराचा आठवडे बाजार हा बुधवारी असतो. यावर्षी मकरसंक्रांतीचा सण मंगळवारी होत आहे. तर भोगीच्या सण सोमवारी आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि.११) अधिकचा आठवडे बाजार भरविण्याचा निर्णय नीरा ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती सरपंच तेजश्री काकडे व उपसरपंच राजेश काकडे यांनी दिली आहे. 


     पुरंदर तालुक्यातील राख, कर्नलवाडी, गुळूंचे, पिंपरे (खुर्द), पिसुर्टी, जेऊर, मांडकी, बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर, निंबूत, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी, निंबुतछपरी, वाघळवाडी, वाणेवाडी, मळशी तर सातारा जिल्ह्यातील पाडेगाव, बाळुपाटलाचीवाडी, रावडी, कसुर, धायगुडेमळा, पिंपरे (बुदृक) आदी गावातील लोक निरेच्या आठवडे बाजारात खरेदी विक्रीसाठी येत असतात. 


    सोमवार (दि.१३) रोजी भोगीच्या सणाला घेवडा, पावटा, वाटाणा, गाजर, यांसह भाजिपाला आवश्यक असतो. तर, मंगळवार दि.१४ रोजी मकरसंक्रांतीचा सण असल्याने परिसरातील गावखेड्यातील लोकांना खरेदी करता येणे सोयीचे होण्यासाठी नीरा शहरातील बाजारतळावर शनिवार (दि.११)आठवडे भरणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे व दवंडी देऊन जाहीर केले आहे. 


     नीरा शहरात ग्रामपंचायत प्रशासनाने शनिवारी आठवडे बाजार भरविण्याच्या निर्णयाचे स्वागत व्यापाऱ्यांनी केले. यामुळे बाजारपेठेला चालणा मिळे, तसेच व्यावसायिकांना अधिकचा लाभ होईल अशी प्रतिक्रिया द न्युज मराठीला किराणा व्यावसायिकांनी बोलून दाखवली. 

Wednesday, January 8, 2025

स्व. एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचा जाधववाडी येथील आढाळगे परिवाराला मदतीचा हात

 स्व. एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचा जाधववाडी येथील आढाळगे परिवाराला मदतीचा हात

   


गराडे दि.९(वार्ताहर) : 


   दिवे गावाजवळील जाधववाडी ( ता. पुरंदर ) येथील कुमार सर्जेराव आढाळगे यांच्या घरात शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत अंदाजे चार लाख रुपयांचे वस्तू जळून नुकसान झाले होते. ही बातमी समजताच स्व.एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष जगताप यांनी संसार उपयोगी वस्तू देऊन आढाळगे परिवाराला मदतीचा हात दिला. 

   यावेळी त्यांच्या समवेत स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे सचिव हेमंत ताकवले ,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, सामाजिक कार्यकर्ते अंकुर शिवरकर ,माधव शिवरकर, ग्रामपंचायत सदस्य निलेश जाधवराव , राजू आढाळगे,श्रीकांत जाधवराव, भगवान आढाळगे, सोमनाथ आढाळगे उपस्थित होते.

   याबाबतचे सविस्तर वृत्त असे की जाधववाडी येथे कुमार आढाळगे,आई जयश्री आढाळगे पत्नी करिष्मा आढाळगे यांचे राहते घर आहे. हे तिघेही मजूर कामानिमित्त सासवडला गेले होते. सायंकाळच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागली. शेजारील ग्रामस्थांना घरातून 

धुराचे लोट येताना दिसले. सर्वांनी मिळून बंद घराचा दरवाजा उघडून आग विझवली. घराला लागलेल्या आगीत घरातील फ्रिज, टीव्ही, भांडी, धान्य आदीसह सर्व चीज गोष्टी जळून खाक झाल्या. घरात कोणही नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. तलाठी सतीश काशीद व ग्रामविकास अधिकारी काशिपती सुतार यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

     कुमार आढाळगे यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. आढाळगे कुटुंबाला नुकसान भरपाईची मिळावी अशी मागणी जाधववाडीकर ग्रामस्थांनी केली आहे. 

    दरम्यान पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती बाबाराजे जाधवराव, दिवे गावचे सरपंच योगेश टिळेकर, उपसरपंच सुमन टिळेकर, माजी उपसरपंच भारती आढाळगे, ग्रामपंचायत सदस्य निलेश जाधवराव, गजानन आढाळगे या जाधववाडीकर ग्रामस्थांनी जळालेल्या घराला भेट देवून आढाळगे परिवाराला वस्तू व आर्थिक स्वरूपात मदत केली आहे.




पुरंदरच्या तरुणाने शब्दबद्ध केले माणच्या धनगरी स्त्री ओव्यातील लोकतत्व

 पुरंदरच्या तरुणाने शब्दबद्ध केले माणच्या धनगरी स्त्री ओव्यातील लोकतत्व



 नीरा. दि.८


          गुळुंचे (ता.पुरंदर) येथील प्रसिद्ध लेखक, कवी व संशोधक प्रवीण जोशी यांनी गेल्या चार वर्षांपूर्वी हाती घेतलेले कार्य अखेर पूर्णत्वाकडे पोहचले आहे. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील धनगर महिलांच्या शेकडो ओव्या त्यांनी शब्दबद्ध केल्या असून त्यातील लोकतत्व लवकरच वाचकांपुढे येणार आहे.


          प्रवीण जोशी हे प्राथमिक शिक्षक असून त्यांनी १४ वर्षे माण तालुक्यातील वाघमोडेवाडी येथे सेवा बजावली. त्याकाळात विद्यार्थी विकासाचे अनेक उपक्रम राबवत गुणवत्तापूर्ण शाळेची पायाभरणी केली. कोरोना संकटकाळात त्यांनी ऑनलाईन पाठशाळा घेतली जिचा फायदा राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना झाला होता. त्यांच्या माणुसकीचा गाव, चिरंतन चिंतन, घरकुल, गल्हाटा, पनव्या या पुस्तकांनी वाचकांच्या मनात घर केले आहे. नुकतेच दुबई येथे पार पडलेल्या विश्व मराठी सृजन साहित्य संमेलनात त्यांच्या पुस्तकांचे कौतुक देखील करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले विद्यापीठात ते इ.स. १८०० ते इ.स. १९५० या दीडशे वर्षांच्या कालावधीत मराठी साहित्यावरील प्रबोधनाचा प्रभाव या विषयावर पीएच. डी पूर्णं करत आहेत.



          धनगर समाजाच्या ओव्यांवरील या संशोधन ग्रंथातून साधारण १०० वर्षे मागील माण तालुक्यातील धनगर महिलांचे भावविश्व, स्त्री मनाचा हुंकार वाचकांपुढे उलगडला जाणार आहे. लोकसमजुती, लोकरिती, लोकमानस, लोकश्रद्धा समजून घेण्यासाठी देखील हा संशोधन ग्रंथ मैलाचा दगड ठरणार आहे. परिस पब्लिकेशन पुणे यांच्यामार्फत ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.


          कृषी, पशुधन, देवीदेवता, मानवी नातेसंबंध, विधी यांवरील शेकडो ओव्या शब्दबद्ध करण्यात आल्या आहेत. या संशोधनासाठी फुलाबाई मडके, अर्चना शिंगटे, विमल सजगणे, अक्काताई झिमल, अलका खताळ, नंदा वाघमोडे, शारदा कोकरे, कमल वाघमोडे, कमल खताळ, शर्मिला मडके, रेश्मा झिमल यांनी योगदान दिले आहे.


          लोकसाहित्यात ओव्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली. या ओव्या मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत राहिल्या. कालमानाने या ओव्यांच्या भाषेत, लयीत व रचनेत कमालीचे बदल झाले आहेत. हे बदल देखील या ग्रंथात विषद करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत नव्या पिढीने या ओव्या आत्मसात करण्याकडे पाठ फिरवल्याने हा साहित्यिक ठेवा भविष्यात दुर्मिळ होणार आहे. या ग्रंथाच्या निमित्ताने धनगर महिलांची साहित्यिक अस्मिता जतन करण्याचा जोशी यांनी केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. मार्च महिन्यात हा संशोधन ग्रंथ वाचकांच्या भेटीला येणार असल्याचे परिस पब्लिकेशनचे गिरीश भांडवलकर यांनी सांगितले.


“लोकसाहित्यातून ऐतिहासिक, सामाजिक, भौगोलिक परिस्थितीचे अनेक अंदाज बांधणे सोपे जाते. एखाद्या प्रतिभासंपन्न कवीला लाजवतील अशा द्वीअर्थी, त्रिअर्थी ओव्या निरक्षर महिलांनी रचल्या व गाईल्या आहेत. अलंकार, रचना, प्रबोधन यादृष्टीने हा अमुल्य साहित्य ठेवा असल्याने संशोधन ग्रंथाला ‘अनर्घ’ नाव दिले आहे.” – प्रविण जोशी, लेखक व संशोधक


“धनगर स्त्रियांच्या मनाचे भावविश्व या ग्रंथातून ओव्यांच्या रूपाने पुढे येते. त्यानिमित्ताने मराठी भाषेतील हद्दपार होत असलेल्या अनेक जुन्या शब्दांचा संग्रह देखील नकळतपणे झाला आहे. मराठी साहित्यात हा संशोधन ग्रंथ मैलाचा दगड ठरेल यात शंका नाही.” – प्रा. कुंडलिक कदम, कार्याध्यक्ष, म.सा.प शिरूर शाखा.

Tuesday, January 7, 2025

मुंबईत आढळला HMPV चा रुग्ण ६ महिन्यांच्या चिमुकलीला लागण; रुग्णालयात उपचार सुरू

 मुंबईत आढळला HMPV चा रुग्ण ६ महिन्यांच्या चिमुकलीला लागण; रुग्णालयात उपचार सुरू




मुंबई दि.८


     भारतातील पहिला एचएमपीव्ही रुग्ण कर्नाटकात आढळल्यानंतर देशातील इतर राज्यातही या व्हायरसचा संसर्ग झाल्याचं समोर येत आहे. कर्नाटकनंतर गुजरात आणि महाराष्ट्रातही एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले आहेत. नागपूर नंतर आता महाराष्ट्रातील मुंबईमध्ये देखील या विषाणूने बाधित असलेला एक रुग्ण आढळून आला आहे


महाराष्ट्रात नागपूरनंतर आता मुंबईत रुग्ण सापडले आहेत. मुंबईत सहा महिन्यांच्या चिमुकलीला एचएमपीव्हीची लागण झालीय. तिला गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल केलं होतं. तिच्यावर आयसीयूत उपचार सुरू आहेत. 


हिरानंदानी हॉस्पिटलच्या डॉक्टरनी बोलताना सांगितलं की, याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती देण्यात आलीय. 1 जानेवारीलाच या प्रकरणाची माहिती समजली होती. बीएमसीच्या परेलमधील आरोग्य विभागाच्या कार्यालयाने मात्र अशी काही माहिती नसल्याचं सांगितलंय. देशभरात १० पेक्षा जास्त रुग्ण गेल्या काही दिवसात आढळले आहेत. नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात दोन रुग्ण आढळल्याची माहिती सोमवारी दिली होती.


चीनमध्ये एचएमपीव्ही रुग्णवाढीच्या दरामुळे जगाची चिंता वाढलीय. कोरोनानंतर आता एचएमपीव्हीचा धोका निर्माण झाल्यानं जगभरात खळभळ उडालीय. पण हा व्हायरस गेल्या अनेक वर्षांपासून अस्तित्वात असल्यानं घाबरण्याची आवश्यकता नसल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलंय. कोरोनासारखी स्थिती होण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं जात आहे.


आता नव्या रॅपिड चाचण्या उपलब्ध असून त्यामुळे काही तासाताच या व्हायरसची लागण झालीय की नाही ओळखता येते. यासाठी ७ हजार रुपयांचा खर्च असल्याचं एका डॉक्टरांनी म्हटलंय. एचएमपीव्हीच्या लक्षणापैकी एक असलेल्या तापाच्या प्रकरणांकडेही लक्ष दिलं जात असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.


अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशातील गाइडलाइन्समध्ये डॉक्टर आणि लॅबसाठी एचएमपीव्हीच्या प्रकरणांबद्दल आरोग्य अधिकाऱ्यांना कळवणं बंधनकारक केलेलं नाही. जर डॉक्टर आणि लॅबकडून आम्हाला माहिती दिली गेली तर आम्हाला फ्लू सारख्या आजारांच्या वाढीवर विशिष्ट भागामध्ये योग्य पद्धतीने लक्ष देता येईल.

अभंग संस्कृति उपासक संत कशिबा महाराज पुण्यतिथी संपन्न

 अभंग संस्कृति उपासक संत कशिबा महाराज पुण्यतिथी संपन्न. 

गुरव समाज महासंघाचे आयोजन



 जेजुरी

 राज्यांतील श्री संत सावतामाळी संतांच्या अभंगवाणी आपल्या लेखन साहित्यानं शब्दबद्ध करणारे साहित्यिक संत काशिबा महाराज यांच्या पुण्यतिथी मंदिरा संस्कृति उपासाक गुरव समाजाच्या वतीन नुकतीच साजरी करण्यात आली यात राज्यांतील विवीध जिल्हयातील गुरव बंधू भगिनी सहभाग दर्शविला. पुरंदर खंडाळा सीमेलगत असलेल्या सूखेड येथे अभंग कीर्तन आणि पुष्प वृष्टी कऱण्यात आली या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते मिलिंद पाटिल, परिवहन अधिकारी ज्योती गुरव, सार्वजनिक फेडरेशन देवस्थान अध्यक्ष विजय कुमार पवार, राष्ट्रीय उपाध्यक्ष गुरव समाज प्रतापराव गुरव. गोरीहर गुरवउपस्थित होते.,तर कार्यक्रमत समाजातील सामाजिक सांस्कृतीक धार्मिक पत्रकारिता,उद्योजक शैक्षणिक अशा विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले यात ख्यातनाम ज्योतिषतज्ञ प्रवीण राजगुरू, राष्ट्रीय गुरव समाज अध्यक्षा अनुपमा गुरव, पत्रकार दिग्दर्शक विजयकुमार हरिश्चंद्रे, नितीन शिर्के, प्रसिध्द महिला शंख आणि तुतारी वादक कविता गुरव,मोहन भांडलवकर इत्यादिंचा समावेश होतो गुरव समाजातील नामवंत कीर्तनकरानीही सहभाग दर्शविला श्री संत काशीबा महाराजांचे संत साहित्य कार्य परिक्रमा सर्व समाजाच्या पर्यंत पोहचवणे करीता काशिबा महाराज जीवनचरित्र अभ्यासिका सूरू करण्याचा मानस यावेळी आयोजक राजेन्द्र भांडवलकर यांनी व्यक्त केला या कार्यक्रमा करीता सातारा जिल्हा आणि फलटण खंडाळा गुरव समाज कार्यकर्त्यांनी विषेश परिश्रम घेतले.





Monday, January 6, 2025

एचएमपीव्ही विषाणूची महाराष्ट्र मध्ये एन्ट्री

 एचएमपीव्ही विषाणूची महाराष्ट्र मध्ये एन्ट्री 

नागपूर मध्ये आढळले दोन रुग्ण 

मुंबई. दि.७



          एचएमपीव्ही या विष्णूची महाराष्ट्रात देखील एंट्री झालेली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये या विष्णूने बाधित झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता एचएमटीव्ही विष्णूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णांमध्ये एक सात वर्षाचा तर दुसरा तेरा वर्षाचा रुग्ण आहे. देशामध्ये बंगलोर, नागपूर आणि तामिळनाडू त्याचबरोबर अहमदाबाद या शहरांमध्ये एचएमटीव्ही या वायरचे रुग्ण आढळले आहेत आणि त्यानंतर आता टास्क फोर्सची घोषणा करण्यात आलेली आहे. पल्लवी सापळे या टास्क फोर्सच्या मुख्याधिकारी असणार आहेत. महाराष्ट्र सरकारचा आरोग्य विभाग या रुग्णांवर सध्या लक्ष ठेवून आहे. यानंतर आता एचएमटीव्ही व्हायरसने महाराष्ट्रात प्रवेश केल्याचं निश्चित झालेल आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील लोकांना देखील या व्हायरसने बाधा होऊ नये म्हणून काळजी घेणे आवश्यक होणार आहे.





चीनमध्ये HMPV या नव्या व्हायरसनं शिरकाव केल्याने जगभरातील देशांची धाकधूक वाढवली आहे. सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. या पाठोपाठ नागपूरमध्ये (Nagpur) देखील एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. प्रकाश आबिटकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, याबाबत आपण एक बैठक बोलावली आहे. हा विषाणू यापूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. फक्त चीनमध्ये त्याची संख्या झपाट्याने वाढल्याने चीनने काळजी घेण्याचे काम केले आहे. आपल्याकडे याबाबत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत. आपली संपूर्ण यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. आरोग्य विभाग नागरिकांना योग्य त्या सूचना देतील. नागरिकांनी काळजी घ्यावी, घाबरण्याचे काहीही कारण नाही. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 




 कशी घ्याल काळजी


खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा.

साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत.

ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.

भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.

संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.

काय करणं टाळावं? 

खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं. यामुळे संसर्ग लगेच पसरतो.

टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा वापर करणं टाळावं.

आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये. शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावं.  

डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये


केंद्र सरकारने पत्रकार संरक्षण कायदा करून तो देशभर लागू करावा : एस.एम.देशमुख यांची मागणी

 केंद्र सरकारने पत्रकार संरक्षण कायदा करून तो देशभर लागू करावा : एस.एम.देशमुख यांची मागणी 



मुंबई : 

      छत्तीसगढ येथील तरूण पत्रकार मुकेश चक्राकर यांची झालेली निर्घृण हत्त्या आणि देशातील पत्रकारांवरील वाढते हल्ले लक्षात घेऊन केंद्र सरकारने देशभर पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. 


     भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवत बातमी दिल्याबद्दल बिजापूर येथील रस्ता गुंतेदाराने (ठेकेदार) तरूण पत्रकार मुकेश चक्राकर यांची निर्घृण हत्त्या केली. त्या अगोदर महाराष्ट्रात देखील रत्नागिरी येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांना गाडीखाली चिरडून ठार करण्यात आले. नरेंद्र मोदी सरकारच्या काळात देशात तब्बल २८ पत्रकारांच्या हत्या झाल्या आहेत. यामध्ये केवळ युपी, बिहारच नाही तर मध्यप्रदेश, झारखंड, पंजाब, गुजरात, पंजाब, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये देखील पत्रकारांच्या हत्त्या झालेल्या आहेत.


       पत्रकारांवरील जीवघेणे हल्ले देखील वाढल्याने माध्यम जगतात मोठा असंतोष आणि असुरक्षिततेची भावना आहे. माध्यमं लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असतील तर त्यांना त्यांचे काम निर्भय वातावरणात  करता आले पाहिजे. त्यासाठी देशभरातील पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळणे आवश्यक आहे असे मत एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केले आहे. 


     महाराष्ट्र सरकारने काही वर्षांपुर्वी पत्रकार संरक्षण कायदा केला पण त्याचं नोटिफिकेशन काढले गेले नसल्याने हा कायदाच अजून राज्यात अंमलात आलेला नाही. महाराष्ट्राच्या धर्तीवर केंद्र सरकारने पत्रकार संरक्षण कायदा केला तर देशातील पत्रकारांना कायदेशीर संरक्षण मिळू शकेल असा विश्वास एस. एम. देशमुख यांनी व्यक्त केला आहे. हा विषय लोकसभा आणि राज्यसभेत उपस्थित करून सरकारला कायदा करायला भाग पाडावे यासाठी मराठी पत्रकार परिषद राज्यातील काही खासदारांच्या भेटी घेणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.


         महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील स्वतंत्र पत्र पाठवून एस. एम. देशमुख यांनी राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याचे नोटिफिकेशन काढून तो तातडीने लागू करावा अशी विनंती केली आहे. महाराष्ट्रात कायदा आहे पण तो अंमलात आलेला नाही हे लक्षात आल्यानंतर राज्यातील पत्रकारांवरील हल्ले पुन्हा वाढले असल्याचा आरोप एस. एम. देशमुख यांनी केला आहे. सरकारने तातडीने कायदयाची अंमलबजावणी केली नाही तर राज्यातील पत्रकारांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशाराही एस. एम. देशमुख यांनी दिला आहे. बुलढाणा येथील पत्रकारावर झालेल्या हल्ल्यातील आरोपीवर लगेच कारवाई करावी अशी मागणी देखील देशमुख यांनी केली आहे.

नीरा येथे मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा

 नीरा येथे मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा


 मराठी पत्रकार दिना निमित वृत्तपत्र प्रतिनिधींचा सन्मान 

 

    नीरा दि.६



            आज ( ६ डिसेंबर ) राज्यभरात मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. नीरा येथील सौ. लीलावती रिखवलाल शहा कन्या शाळेमध्ये स्थानिक वृत्तपत्र प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. तर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 




         नीरा (ता.पुरंदर) सोमवारी सौ लीलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालय मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्राचा शुभारंभ केल्याच्या स्मृती प्रत्यार्थ मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला . यानिमित्त बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब ननवरे,राहुल शिंदे यांच्या हस्ते हे पूजन करण्यात आले. तर पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व गुलाबाचे रोप देऊन स्थानिक वृत्तपत्रे आणि न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला. यावेळी बाळासाहेब ननवरे, भरत निगडे, राहुल शिंदे, रामदास राऊत, श्रद्धा जोशी, मोहम्मदगौस आतार , स्वप्निल कांबळे, या वृत्तपत्र प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.







     यावेळी विद्यालयाच्या मुख्यद्यापिका निर्मला नायकोडे पर्यवेक्षक ज्ञानेश्वर जाधव, संतोष गांधी,शिक्षक विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि प्रस्त्विक ज्ञानेश्वर जाधव यांनी केले तर आभार मयुरी भिसे यांनी मानले.






Friday, January 3, 2025

आद्यरामायणकार महर्षी वाल्मिकीऋषी मंदिरामध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी .

 

आद्यरामायणकार  महर्षी वाल्मिकीऋषी मंदिरामध्ये  सावित्रीबाई फुले यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी .




3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रथमच आद्यरामायणकार महर्षी वाल्मिकीऋषी मंदिरामध्ये अनोखी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रशांत आंधळे, माजी उपसरपंच अमित पवार व उद्योजक मोहन पवार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या रांगोळीतुन रेखाटलेल्या चित्रासभोवती मेणबत्त्या प्रज्वलीत करुन अनोखे अभिवादन केले. 



याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या पुर्वा राऊत, माजी सरपंच सविता भुजबळ, उपक्रमशील शेतकरी उमेश पवार, आशा पर्यवेक्षिका वैशाली दानवले, प्राची जाधव, दत्तात्रय पवार, बबनमहाराज पवार, सुनिता पवार, अनुराधा काळंगे, आदि उपस्थित होते.


 दरम्यान सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीप्रसंगी येथील रश्मी पवार व श्रेया काळंगे यांनी रांगोळीच्या सहाय्याने कल्पकतेने रेखाटलेले क्रांतीज्योती 

सावित्रीबाई फुले यांचे रेखाचित्र व लेक वाचवा लेक शिकवा आदि संदेश लक्ष वेधुन घेणारे ठरले.

 उद्योजक मोहन पवार यांनी प्रास्ताविक केले. आरोग्य सेवक किशोर काळोखे यांनी सुत्रसंचालन तर ग्रामपंचायत सदस्य सागर भुजबळ यांनी 

आभार मानले.

Featured Post

लग्नाच्या आनंदात शिक्षणाची देणगी; वरात टाळून शाळा विकासासाठी नवदांपत्याचे प्रेरणादायी पाऊल

 लग्नाच्या आनंदात शिक्षणाची देणगी; वरात टाळून शाळा विकासासाठी नवदांपत्याचे प्रेरणादायी पाऊल  पुरंदर :       खर्चिक वरात, आहेर-भेटवस्तूंच्या ...