नीरा नदीच्या पुलावरून ट्रक कोसळला.
अपघातात नंतर युवकांनी काय केले?
साताऱ्याहून शिरुरकडे निघाला होता ट्रक.
पुरंदर :
मागील काळात पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांचा ट्रक नीरा नदीच्या पात्रात कोसळला होता. त्याच पद्धतीने बुधवारी रात्री आठच्या सुमारास मालवाहतूकीचा भरधाव ट्रक नीरा नदीच्या पुलावरून कोसळला आहे. सुदैवाने ट्रक पुलाच्या कठाड्यावर अडकल्याने अनर्थ टळला आहे. ट्रक चालकाला स्थानिकांनी कोसळलेल्या ट्रकमधून बाहेर काढून चौकशी करत, ट्रक मालकाला घटनेची कल्पना दिली आहे.
पुणे पंढरपूर पालखी महामार्गावरील पुणे सातारा जिल्ह्याची सिमा असलेल्या नीरा नदिच्या पुलावर वाहतूक धोकादायक होत आहे. पुणे व सातारा बाजूने पुलावर जाताना नागमोडी वाळणे व चढ आहे. यामुळे या मार्गावर पुढे पुल आहे हे चालकांना लक्षातच येत नाही. त्यामुळे मागील काळात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या दरम्यान पहाटेच्या वेळी वारकऱ्यांचे साहित्य घेऊन मुक्कामाच्या ठिकाणी निघालेल्या ट्रकला पुणे हद्दीत महादेव मंदिरा लगत अपघात झाला होता. अगदी तशाच प्रकारे बुधवार दि. २९ रोजा रात्री आठच्या सुमारास सातारा बाजूने येणारा भरधाव मालवाहतूकीचा अवजड ट्रकला अपघात झाला आहे. साताऱ्याहून शिरुरकडे हा ट्रक निघाला होता. लोणंद (सातारा) बाजूने येताना पाडेगावच्या हद्दीतील जुन्या टोलनाक्या पुढे आल्यावर दोन ठिकाणी वेग नियंत्रणासाठी रॅंप्लर बसवले आहेत. या रॅंप्लरवर येताच ट्रक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. ट्रक डाव्या बाजूला पुलाच्या भराव्यावर कोसळला.
नीरा नदीकाठावरील प्रसिद्ध दत्त घाटासमोरील पायऱ्यांलगतच ट्रक आडवा कोसळल्याने स्थानिकांना ट्रक चालकाला मदत करता आली. ट्रक कोसळताना मोठा आवाज झाल्याने स्थानिक युवकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. मोठा अवजड ट्रक आडवा दिसल्यावर युवकांनी चालकाला आवज दिला व मदत करत त्याला अपघातग्रस्त ट्रकमधून बाहेर काढले. अधिक माहिती घेत ट्रक मालकाला फोन करुन ट्रकला अपघात झाल्याची माहिती दिली. लोणंद (ता.खंडाळा) पोलीसांनी घटनास्थळी भेट देत, चालकाची विचारपूस केली आहे. चालकाला कोणत्याही प्रकारची जखम नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.