Type Here to Get Search Results !

निवासी संस्थांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी घ्यावी..... रो. शीतल शहा

 निवासी संस्थांनी पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी घ्यावी..... रो. शीतल शहा 



आजच्या विकसित समाजात वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. पर्यावरण संवर्धन ही आता आपली महत्वाची जबाबदारी आहे. आपण आज समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येत असून हवा,पाणी, ध्वनी प्रदूषण टाळण्याची सार्वत्रिक गरज असल्याचे प्रतिपादन रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 चे प्रांतपाल रो. शीतल शहा यांनी केले.


रोटरी क्लब ऑफ बारामतीने शहरातील निवासी सोसायट्यामधील रहिवाश्यांसाठी गरगटे फार्म येथे आयोजित करण्यात आलेल्या "ग्रीन सोसायटी" या कार्यक्रमात उदघाटक म्हणून ते बोलत होते.या प्रसंगी व्यासपीठावर रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 च्या पर्यावरण समितीचे डायरेक्टर रो. वसंतराव माळुंजकर, ग्रीन सोसायटी समितीच्या विभागीय संचालक रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष अरविंद गरगटे, सचिव रविकिरण खारतोडे,रोटरी क्लब ऑफ पुणे विसडमचे अध्यक्ष रो. निलेश धोपाडे,प्रमुख मार्गदर्शक महेश देवधर, केतकी साठे- कुलकर्णी,शैलेश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना शीतल शहा पुढे म्हणाले की आज आपण नैसर्गिक स्रोत ओरबाडून घेत आहोत आणि हे असेच सुरु राहिले तर पुढील पिढीला पृथ्वीवर काहीही शिल्लक राहणार नाही. आपल्या पुढील पिढीची आम्हाला असल्यानेच रोटरी इंटरनॅशनल या संस्थेने जगभर पर्यावरण संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली आहे.

या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना महेश देवधर यांनी ऊर्जा संवर्धन करण्याचा सल्ला दिला. सोसायट्यानी अपारंपरिक ऊर्जा साधनाचा वापर वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तर शैलेश देशपांडे यांनी पाणी प्रदूषण टाळण्याचा सल्ला देताना आगामी काळात पाणी स्तोत्र टिकविण्याचे खडतर आव्हान मानव जातीपुढे असल्याचे मत व्यक्त केले. पाणी प्रदूषण टाळण्यासाठी नद्यांचे आरोग्य आपण जपले पाहिजे तरच भविष्यात आपणाला पिण्यासाठी चांगले पाणी उपलब्ध होईल अन्यथा मानवाचे अस्तित्व धोक्यात येण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. केतकी साठे - कुलकर्णी यांनी विषमुक्त अन्न ही काळाची गरज असल्याचे सांगताना भविष्यात उत्तम अन्नधान्य तयार करण्याकडे आपण लक्ष द्यायला हवे असे मत व्यक्त केले. आपल्या परसदारात, इमारतीच्या गच्चीत आपल्या कुटुंबासाठी पुरेल इतका भाजीपाला सहज तयार करता येतो मात्र त्यासाठी सोसायट्यानी पुढाकार घ्यायला हवा.

ग्रीन सोसायटी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता भोर यांनी केले. उपस्थित्यांचे आभार रविकिरण खारतोडे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा डॉ अजय दरेकर यांनी केले. यावेळी रोटरी ग्रीन सोसायटी न्यूज लेटरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

बारामती शहरातील सुमारे बारा सोसायट्याचे शंभरहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. ग्रीन सोसायटी कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या सर्व सदस्यांनी मदत केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies