पिंपरे येथील अपघातग्रस्त युवकांच्या वारसांना मुख्यमंत्री निधीतून अर्थसहाय्य
शिवतारे यांनी कुटुंबियांना थेट घरी जाऊन दिला धनादेश
नीरा दि. ४
पिंपरे( ता.पुरंदर ) येथील अपघातग्रस्त तीन युवकांच्या कुटुंबांना. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येकी तीन लक्ष रुपयाची मदत देण्यात आली आहे. शिव सेनेचे नेते विजय शिवतारे यांनी गुरुवारी सायंकाळी सहाय्यता निधीचे धनादेश अपघात ग्रस्त तरुणांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले.
सुमारे दीड वर्षापूर्वी पिंपरे खुर्द येथील तरुणाचा नीरा लोणंद दरम्यान अपघात झाला होता.यामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला होता. यावेळी विजय शिवतारे यांनी या तरुणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन शिवतारे यांनी दिले होते. यापूर्वी शेतकरी अपघात विमा योजनेतून प्रत्येकी 2 लक्ष रुपये मदत करण्यात आली होती त्याच बरोबर आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येकी तीन लक्ष रुपयाची मदत देण्यात आली आहे. पिंपरे खुर्द गावामधील ओंकार थोपटे, अनिल थोपटे आणि पोपट थोपटे या तीन युवकांचा एका भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबातील लोकांना ही मदत देण्यात आली आहे विशेष म्हणजे हे तीनही तरुण आपल्या आई वडिलांसाठी एकुले एक आपत्य होते. त्यामुळे त्यांना मदत करण्याचे आश्वासन शिवतारे यांनी दिले होते.त्याचे धनादेश त्यांच्या आई दाडीलांकडे देण्यात आले.
यावेळी माजी सभापती अतुल म्हस्के, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य माणिक निंबाळकर, मंडल अधिकारी पी. आर भिसे, सरपंच राजेंद्र थोपटे, उपसरपंच नंदा थोपटे, रवींद्र गायकवाड, भरत थोपटे, स्वप्नील थोपटे, आकाश थोपटे, विश्वजित सोनावणे, प्रमोद सोनावणे, राहुल थोपटे, दिपक थोपटे, प्रशांत थोपटे, प्रकाश थोपटे, सचिन थोपटे, अमोल थोपटे, बाळासाहेब थोपटे, भालचंद्र थोपटे, संतोष थोपटे, सागर चांदे, नाना थोपटे, प्रतिक थोपटे व अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवतारे म्हणाले, या तीनही कुटुंबांनी आपली कर्ती मुलं गमावली. त्यामुळे या कुटुंबांबरोबरच गावावर शोककळा पसरली होती. त्यामुळे या कुटुंबांना सावरण्यासाठी हातभार लावणे आवश्यक होते. या गरीब आई वडिलांची मुलं मी परत आणू शकत नाही पण मानवतेच्या भावनेतून मला जे काही करता येणं शक्य आहे ते करण्याचा मी प्रयत्न केला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा मी अत्यंत आभारी आहे असेही शिवतारे म्हणाले.
*शिवतारेंनी नाकारला सत्कार*
यावेळी उपस्थित गावकऱ्यांनी शिवतारे यांचे आभार मानले. ग्रामस्थांच्या वतीने शिवतारे यांच्या सत्काराचे आयोजन ठेवण्यात आले होते. पण शिवतारे यांनी ‘मी माझे कर्तव्य केले असून अशा दु:खद प्रसंगी सत्कार नको’ असे म्हणत सत्कार नाकारला.