Type Here to Get Search Results !

गुळूंचे ग्रा.पं. ची निवडणूक होणार पुन्हा रंगतदार; उमेदवारांसोबत मतदारांची देखील मतदानावेळी परीक्षा

 गुळूंचे ग्रा.पं. ची निवडणूक होणार पुन्हा रंगतदार; उमेदवारांसोबत मतदारांची देखील मतदानावेळी परीक्षा







पुरंदर :
      पुरंदर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची असलेल्या गुळूंचे ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून, गाव नेत्यांची निवडणुकीसाठीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सरपंचपदाची निवड थेट जनतेतून असून ते सर्वसाधारण महिला राखीव असल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे.

      २ हजार ६०० मतदार असलेल्या गुळूंचे गावात तीन प्रभाग असून प्रत्येकी तीन सदस्य संख्या असून थेट जनतेतून सरपंच निवड होणार आहे. दोन्ही गटांना आपापल्या पॅनेलला उमेदवार मिळवण्यासाठी जय्यत तयारी असून, पॅनेल पूर्ण ताकदीने उभे करण्याकडे गावनेत्यांचा कल आहे. त्यामुळे कोणाचा कसा पॅनेल असणार, कोण उमेदवार असणार व सरपंचपदासाठी कोणकोणते उमेदवार असणार यावर निवडणूक व प्रचार काळात वारे वाहणार आहेत.

     येथील गावनेत्यांनी गावपातळीसह वेगवेगळ्या राजकारणात सहभाग घेतलेला आहे, तसेच गावात पर्वीपासून वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. गुळूंचे गावाला दोनदा पुरंदर पंचायत समितीचे सभापती पद मिळाले होते. तर मागील काळात सांसद आदर्श ग्राममध्ये गावाचा समावेश होता. सध्या सोमेश्वरचे  संचालक पदी गावातील युवक नेतृत्व करत आहेत. त्यामुळे निवडणूक कशी रंगतदार करायची, कोणाचे नाक दाबल्यावर कोणाचे कसे तोंड उघडते हे राजकारणातील डावपेच सर्वांनाच माहीत आहेत. त्यामुळे सध्या सर्वजण निवडणुकीसाठी चांगला सर्वसमावेशक पॅनेल कसा देता येईल याकडे लक्ष देत आहेत.

       गुळूंचेत आमदार संजय जगताप समर्थक पॅनेल, तर माजी सभापती अजित निगडे समर्थक यांचा पॅनेल होणार असल्याची चर्चा सुरू आहे. आ. जगताप समर्थक प्रा.उत्तम निगडे, युवक काँग्रेसचे नितीन निगडे, पोपटभाऊ निगडे, महिला आघाडीच्या नेत्या वैशाली निगडे तसेच इतर पदाधिकारी यांचा एक पॅनेल असणार आहे, तर सभापती निगडे समर्थक पंचायत समितीचे माजी उपसभापती अजित निगडे, सोमेश्वरचे संचालक जितेंद्र निगडे, दिपक निगडे, माजी सरपंच संतोष निगडे तसेच इतर पदाधिकारी यांचा एक पॅनेल असणार आहे. त्यामुळे यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रसचे आमदार संजय जगताप समर्थक व माजी सभापती अजित निगडे समर्थक हे दोन पॅनेल समोरासमोर असल्याची गावात जोरदार चर्चा सुरू आहे.

चौकट १)
तयारीतील युवक झाले एकदम शांत

      मागील काळात गावातील एका विषयावर युवकांनी एकत्रित येत गावनेत्यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्या वेळी युवकांनी आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेल उभा करण्यासाठी बैठकादेखील घेतल्या होत्या. मात्र, निवडणूक जाहीर झाली आणि काही दिवसांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आली असून, या युवकांच्या गटात शांतता दिसत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तयारीत असलेले युवक सध्या शांत का? का ही वादळा पुर्वीची शांतता आहे. अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

चौकट २)
रात्रीस खेळ चाले

    सध्या मोठ्या गावनेत्यांकडून पॅनेलसाठी उमेदवार निश्चित करण्याचे काम सुरू आहे. मात्र, एखादा कार्यकर्ता आपल्याला निवडणुकीत वरचढ होऊ शकतो असे वाटले तर यासाठी अशा ठरलेल्या संभाव्य उमेदवाराच्या घरी रात्रीच्या वेळी जाऊन त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे दडपण टाकले जात आहे. याच दरम्यान गुलाल, भंडाऱ्याच्या आणाभाका घातल्या जात असल्याची देखील चर्चा सुरू आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies