Type Here to Get Search Results !

दहावी नापास टोळीचा देशभरात धुडगूस, ओएलएक्सवरून कोट्यवधी रुपयांची केली फसवणूक

 


मुंबई : ओएलएक्सवरून जवान, पोलिस असल्याचे भासवून खरेदी करण्याच्या बहाण्याने महाराष्ट्रासह देशभरातील १९ राज्यांतील नागरिकांना राजस्थान, उत्तर प्रदेशमधून गंडविणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांच्या 'स्पेशल २०' टीमने पर्दाफाश केला.

या टोळीच्या म्होरक्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीविरोधात राज्यासह भारतातून २७० तक्रारी समोर आल्या आहेत.
सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बालसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सविता कदम, संदीप पाचांगणे यांच्यासह पोलिस नाईक सचिन सावंतसह २० जणांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. पाच दिवस सुरू असलेल्या या ऑपरेशनअंतर्गत सायबर पोलिसांनी टोळीचा म्होरक्यांपैकी एक सर्वसुख खुट्टा रुजदार ऊर्फ समशू (३७, भरतपूर) यांच्यासह तुलसीराम रोडुलाल मीणा (२५, जयपूर), अजित शिवराम पोसवाल (१९, भरतपूर), इरसाद सरदार (२४, मथुरा) या चौकडीला अटक केली आहे. आरोपींकडून ९ मोबाइल फोन, ३२ विविध बँकांचे डेबिट कार्ड, चेकबुक, १ चेकबुक, ४ सीमकार्ड जप्त करण्यात आले आहेत. तसेच ८३५ मोबाइल क्रमांक, ३८ आयएमईआय क्रमांक प्राप्त झाले असून त्याबाबतही अधिक तपास सुरू आहे.
सुरतहून मुंबईत बदली झालेल्या तक्रारदाराने फर्निचर विक्रीसाठी ओएलएक्सवर जाहिरात दिली होती. आरोपींनी खरेदी करण्यास इच्छुक असल्याचे भासवून संपर्क साधला. पुढे, पैसे पाठविण्याच्या बहाण्याने क्यू आर कोड स्कॅन करण्यास सांगून अवघ्या दोन तासांत १२ व्यवहार त्यांच्या खात्यातील १७ लाख ८२ हजार रुपयांवर डल्ला मारला. हे प्रकरण सायबर पोलिसांकडे येताच तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने पथकाने शोध सुरू केला. याच, तपासातून राजस्थान आणि उत्तर प्रदेशपर्यंतच्या या टोळीपर्यंत पथक पोहोचले.

असे चालते काम...
चार टप्प्यांमध्ये या टोळीचे कामकाज चालते. यामध्ये ओएलएएक्सवर नवीन येणाऱ्यावर लक्ष ठेवणारे, त्यांच्याशी बोलणारे, माहिती देणारे आणि पैसे काढणारे असे ग्रुप आहेत. प्रत्येक टप्प्यात कमिशनचे रेटदेखील ठरले आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावी...
नागरिकांनी ओएलएक्सवरून व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. या टोळीकडून जवान, पोलिस असल्याचे भासवून मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात येत असल्याचे दिसून आले. कुठलीही खातरजमा केल्याशिवाय व्यवहार करू नका. फसवणूक होत असल्याचे वाटताच तात्काळ सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधा. या टोळीविरोधात २६९ तक्रारी आल्या असून राज्यातील १४ तक्रारींचा यामध्ये समावेश आहे. तसेच, तेलंगणामध्ये देखील ५०० हून अधिक तक्रारी असल्याची माहिती मिळत असून ते प्रकरणदेखील तपासासाठी घेण्यात येत आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies