सासवडमध्ये ११ जूनला ‘सुंदर माझी शाळा’ राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा
सासवडमध्ये ११ जून रोजी ‘संत सोपानकाका सुंदर माझी शाळा’ अभियानाचा भव्य राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा
पुणे विभागातील ५ जिल्ह्यांतील ४,०३२ शाळांचा सहभाग; ४.९५ लाख रुपयांच्या पुरस्कारांचे वितरण
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व शिक्षणमंत्री पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती
सासवड प्रतिनिधी :
सहकारमहर्षी स्व. चंदुकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त संत सोपानकाका सहकारी बँकेच्या सौजन्याने सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या पुणे विभागातील ‘संत सोपानकाका सुंदर माझी शाळा’ या अभियानाचा भव्य राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा गुरुवार, दि. ११ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती माजी आमदार संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या अभियानात पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील ५८ तालुक्यांसह पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमधील एकूण ४,०३२ माध्यमिक शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील १,२००, सोलापूर ७३०, सातारा ६९५, सांगली ६०७ आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ८०० शाळांचा समावेश आहे.
अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांना एकूण ४ लाख ९५ हजार रुपयांची रोख पारितोषिके, भव्य चषक आणि सहभाग प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.
पारितोषिकांचे स्वरूप
जिल्हास्तरीय पारितोषिके (५ जिल्हे):
प्रथम क्रमांक : ₹१०,०००
द्वितीय क्रमांक : ₹७,०००
तृतीय क्रमांक : ₹५,०००
उपविजेत्या शाळांना ₹५,००० व आकर्षक ट्रॉफी
तालुकास्तरीय पारितोषिके (६० तालुके):
प्रथम क्रमांक : ₹३,०००
द्वितीय क्रमांक : ₹२,०००
तृतीय क्रमांक : ₹१,०००
विजेत्यांना भव्य चषक प्रदान करण्यात येणार आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संत सोपानकाका सहकारी बँकेचे अध्यक्ष रमणिकलाल कोठडिया असणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण तसेच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री ना. पंकज भोयर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सासवडच्या नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, सनदी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, माजी आमदार संजय जगताप, शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, प्राचार्य डॉ. निवेदिता गजानन एकबोटे, विलास किरवे, गणपतराव बालवडकर, प्रदीप वळसे पाटील, चंद्रकांत पाटील, दादा लाड, बंडोपंत कुलकर्णी, दशरथ सगरे, सुभाष माने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष अनुक्रमे प्रसाद गायकवाड, तानाजी माने, चंद्रकांत जाधव, संजयकुमार झांबरे आणि राहुल पवार यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.
या भव्य उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भोर-पुरंदर उपविभागातील विविध शैक्षणिक संस्था, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ तसेच विविध समित्यांचे पदाधिकारी आणि शिक्षक परिश्रम घेत आहेत. या सोहळ्यास सर्व संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक प्राचार्य नंदकुमार सागर, कुंडलिक मेमाणे, सुधाकर जगदाळे, दत्तात्रय रोकडे, रामप्रभू पेटकर, तानाजी झेंडे, रवींद्रपंत जगताप आणि अनिल उरवणे यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा