जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : प्रशासनाची जय्यत तयारी, सोमवारी सकाळी किती वाजता मतमोजणी होणार?

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक :

प्रशासनाची जय्यत तयारी, सोमवारी सकाळी किती वाजता मतमोजणी होणार? 



पुणे :

         पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी पार पडलेल्या मतदानानंतर आता सर्वांचे लक्ष मतमोजणीकडे लागले आहे. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि.०९) सकाळी १० वाजता जिल्ह्यातील सर्व निर्धारित (तालुक्याच्या मुख्यालयात) मतमोजणी केंद्रांवर एकाचवेळी सुरू होणार आहे. 


     मतमोजणी प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, सीसीटीव्ही देखरेखीखाली मतमोजणी होणार आहे. उमेदवारांचे प्रतिनिधी, निवडणूक कर्मचारी व माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. 


      जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या निकालाबाबत राजकीय वातावरण तापले असून, प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारांचे भवितव्य सोमवारी स्पष्ट होणार आहे. काही तालुक्यांमध्ये सरळ लढत, तर काही ठिकाणी चुरशीची त्रिकोणी व चौरंगी लढत पाहायला मिळाली. त्यामुळे निकालाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

यंदाच्या निवडणुकीवर भावनिक छाया देखील राहिली. पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वातावरण भावनिक झाले होते. त्याचा मतदारांवर किती परिणाम झाला, हेही निकालातून स्पष्ट होणार आहे. 


      मतमोजणीदरम्यान प्रथम टपाली मतदानाची, त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक फेरीचा निकाल अधिकृतरीत्या जाहीर केला जाणार असून, निकालानंतर विजय मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. 


    दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने कडक सूचना दिल्या असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. सोमवारी दुपारपर्यंत बहुतांश निकाल स्पष्ट होण्याची शक्यता असून, सत्तासमीकरण कोणाच्या बाजूने झुकते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पण्या