“जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे देशाच्या भवितव्याचा कौल” — महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसलाच संधी द्या : प्रशांत जगताप
“जिल्हा परिषद निवडणूक म्हणजे देशाच्या भवितव्याचा कौल” — महागाई, बेरोजगारीविरोधात काँग्रेसलाच संधी द्या : प्रशांत जगताप
पुरंदर :
निरा (ता. पुरंदर) येथे झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या जाहीर सभेत पुणे महानगरपालिकेचे नवनियुक्त नगरसेवक प्रशांत जगताप यांनी सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर जोरदार टीका करत, ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची नसून देशाच्या भवितव्याची दिशा ठरवणारी असल्याचे ठामपणे सांगितले. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राष्ट्रीय सुरक्षेवरून त्यांनी सरकारला जाब विचारत काँग्रेसच्या उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले.
“आज आपण ज्या निवडणुकीसाठी एकत्र आलो आहोत, ती केवळ जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची निवडणूक नाही. ही आपल्या गावाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या आणि थेट देशाच्या भवितव्याची दिशा ठरवणारी निवडणूक आहे,” असे प्रतिपादन पुणे महानगरपालिकेचे नवनियुक्त नगरसेवक प्रशांत जगताप यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, लोकसभेत खासदार कोणाचा आहे, विधानसभेत आमदार कोणाचा आहे हे आपण पाहतो; मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या लोकशाहीच्या मुळाशी असलेल्या संस्था आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, शेतकरी, रोजगार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवरील निर्णय इथूनच घेतले जातात. त्यामुळे या निवडणुकांकडे “फक्त जिल्हा परिषद” किंवा “फक्त पंचायत समिती” अशी मानसिकता ठेवून पाहता येणार नाही.
या मतदारसंघात सातत्याने काँग्रेसच्या विचारांना जनतेने पाठिंबा दिला असून लोकसभेत खासदार आणि विधानसभेत आमदार काँग्रेसचे आहेत. यावरून या भागात काँग्रेसी विचार मजबूत असून तो भविष्यातही अधिक बळकट होणार आहे, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. मात्र, हे कायम ठेवण्यासाठी प्रत्येक निवडणूक तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
देशातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, दिल्लीतील चुकीच्या धोरणांचा थेट फटका आज ग्रामीण भागाला बसत आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, महागाईने कळस गाठला आहे. शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, पण ग्राहकाला मात्र महागाईचा फटका बसतो आहे. दलालशाही आणि गुंडगिरी वाढत असून सीमांवर अतिक्रमण होत असताना सत्ताधारी मौन बाळगत आहेत, ही गंभीर बाब आहे.
“आपण लोकसभेत राहुल गांधी यांची भाषणे पाहिली आहेत. ते मुद्देसूदपणे, तथ्यांच्या आधारे सत्य मांडतात. दुसरीकडे ‘५६ इंच छाती’ची भाषा करणाऱ्यांच्या काळात चीनने भारताची जमीन काबीज केल्याची कबुली स्वतः सत्ताधाऱ्यांनी दिली आहे,” अशी टीका त्यांनी केली.
ही निवडणूक गट–तट किंवा व्यक्तीची नसून देश विकणाऱ्या धोरणांविरुद्ध जनतेचा कौल देण्याची निवडणूक असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसच्या इतिहासाची आठवण करून दिली. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी देशाची सूत्रे हाती घेतली तेव्हा कारखाने नव्हते, पायाभूत सुविधा नव्हत्या. आज भारत उपग्रह तयार करतो, क्षेपणास्त्रे बनवतो, हे काँग्रेसच्या दूरदृष्टीचे फलित असल्याचे त्यांनी नमूद केले.
महागाईचे उदाहरण देताना जगताप म्हणाले, “काँग्रेसच्या ६८ वर्षांच्या काळात गॅस सिलेंडर ₹३४० पर्यंत पोहोचला. पण आज अवघ्या काही वर्षांत तो ₹१००० च्या पुढे गेला आहे. याचा फटका थेट सर्वसामान्य माणसाला बसत आहे.”
शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याची ताकद फक्त काँग्रेसकडे असल्याचा विश्वास व्यक्त करत, येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार बहुमताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
महागाईविरुद्ध, बेरोजगारीविरुद्ध, गुंडगिरीविरुद्ध आणि अन्यायाविरुद्धची ही लढाई असल्याचे सांगत त्यांनी भाषणाचा समारोप केला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा