जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पुरंदरचे प्रशासन सज्ज : वर्षा लांडगे ७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला मतमोजणी पुरंदर तालुक्यात १.९४ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पुरंदरचे प्रशासन सज्ज : वर्षा लांडगे
७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला मतमोजणी
पुरंदर तालुक्यात १.९४ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार
पुरंदर :
पुरंदर तालुक्यात होणाऱ्या पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असून ७ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी सासवड येथील नवीन प्रशासकीय इमारतीत होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषद व पुरंदर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत तालुक्यातील ४ जिल्हा परिषद गट व ८ पंचायत समिती गणांमध्ये निवडणूक होत आहे. यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी १६ जानेवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार १६ ते २१ जानेवारीदरम्यान नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात आली, २२ जानेवारी रोजी छाननी पूर्ण झाली, तर २७ जानेवारी रोजी उमेदवारी माघारी घेण्याची प्रक्रिया पार पडली.
जिल्हा परिषदेसाठी १९, पंचायत समितीसाठी ३३ उमेदवार
जिल्हा परिषद गटांमध्ये
गराडे – ३, बेलसर – ६, वीर – ६, निरा – ४
असे एकूण १९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
पंचायत समिती गणांमध्ये
गराडे – ३, दिवे – ३, माळशिरस – ५, बेलसर – ५,
भिवडी – ३, वीर – ५, कोळविहिरे – ४, निरा शिवतक्रार – ५
असे एकूण ३३ उमेदवार रिंगणात आहेत.
१ लाख ९४ हजारांहून अधिक मतदार
निवडणूक क्षेत्राची एकूण लोकसंख्या १,८९,८२३ असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी
पुरुष मतदार – ९५,२७१,
महिला मतदार – ९५,१२९,
इतर – ३,
असे एकूण १,९४,४०३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
२३५ मतदान केंद्रे, व्यापक प्रशासन व्यवस्था
पुरंदर तालुक्यात २३५ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून निवडणूक प्रक्रियेसाठी
३२ तालुकास्तरीय समन्वय अधिकारी,
२० क्षेत्रीय अधिकारी, ८ भरारी पथके, ८ स्थिर निरीक्षण पथके, व्हिडीओ निरीक्षण व व्हिडीओ व्हिव्हिंग पथकेअशी व्यापक यंत्रणा उभारण्यात आली आहे.
एकूण २३८ अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मतदानासाठी २३५ कंट्रोल युनिट व २३५ बॅलेट युनिट, तसेच राखीव म्हणून २४ सीयू व २४ बीयू उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. टपाली मतदानासाठी प्राप्त ६११ अर्जांपैकी ५५३ मतदारांनी मतदान पूर्ण केले आहे.
मतदारांसाठी विशेष सुविधा
प्रत्येक मतदान केंद्रावर स्वच्छतागृह, व्हीलचेअर, रॅम्प, पाळणा, वैद्यकीय सुविधा, पोलीस बंदोबस्त, अग्निशामक व वाहनतळ
यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात आले आहेत.
मतमोजणीनंतर १० फेब्रुवारी २०२६ रोजी विजयी उमेदवारांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत. शनिवार दि. ७ फेब्रुवारी रोजी पात्र मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा