पुरंदर तालुक्यात ६८.३२ टक्के मतदान चार जिल्हा परिषद गटांत १ लाख २९ हजार ४०७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
पुरंदर तालुक्यात ६८.३२ टक्के मतदान
चार जिल्हा परिषद गटांत १ लाख २९ हजार ४०७ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
पुरंदर :
पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी शांततेत मतदान पार पडले. सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली. थंडीमुळे सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग मंद असला, तरी दुपारनंतर मतदारांचा उत्साह वाढताना दिसून आला. सायंकाळी साडेपाचनंतरही अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. अखेर तालुक्यात चारही जिल्हा परिषद गटांत सरासरी ६८.३२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली.
शनिवार सकाळी पहिल्या दोन तासांत चारही गटांत मिळून ८.१० टक्के मतदान झाले होते. अकरा वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी २१.५१ टक्क्यांवर पोहोचली. दुपारी दीड वाजेपर्यंत ३७.५५ टक्के, तर साडेतीन वाजेपर्यंत ५०.७५ टक्के मतदान झाले. सायंकाळनंतर मतदानाचा वेग आणखी वाढत गेला आणि अखेरीस रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणची मतदान यंत्रे तालुका निवडणूक कार्यालयात जमा करण्यात आली.
तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गटांमध्ये मतदारांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळाला. गराडे गणात १७,५५० मतदारांनी मतदान करत ७५.२७ टक्के मतदानाची नोंद झाली. दिवे गणात १८,२८५ मतदारांनी मतदान केले असून येथे ७३.६६ टक्के मतदान झाले. बेलसर गणात १५,८६७ मतदान होऊन ७६.८९ टक्के मतदानाची उच्च नोंद झाली. माळशिरस गणात १५,६४४ मतदान झाले असून ६९.७४ टक्के, वीर गणात १५,७९६ मतदान होऊन ६६.१४ टक्के, भिवडी गणात १६,५४३ मतदान होऊन ६५.९६ टक्के, निरा गणात १४,४३६ मतदान होऊन ६२.७१ टक्के, तर कोळविहिरे गणात १५,२८४ मतदान होऊन ६४.१८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
सकाळच्या सत्रात ज्येष्ठ नागरिक व महिला मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्रांवर हजेरी लावली. दुपारनंतर तरुण मतदारांचा सहभाग वाढताना दिसून आला. काही ठिकाणी सायंकाळी साडेपाचनंतरही मतदान केंद्रांबाहेर रांगा लागल्या होत्या.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एकूणच पुरंदर तालुक्यातील मतदान प्रक्रिया शांततेत आणि उत्साहात पार पडल्याचे चित्र दिसून आले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा