निरा–कोळविहिरे गड राखण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज; प्राजक्ता दुर्गाडेंसह मोनिका कांबळे व स्मिता निगडे या महिला नेतृत्व मैदानात

निरा–कोळविहिरे गड राखण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज; प्राजक्ता दुर्गाडेंसह मोनिका कांबळे व स्मिता निगडे या महिला नेतृत्व मैदानात 



पुरंदर :

       पुरंदर तालुक्यातील निरा–कोळविहिरे जिल्हा परिषद गटात यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने महिला नेतृत्वावर ठाम विश्वास टाकत प्रचाराला वेग दिला आहे. घरोघरी भेटी, थेट संवाद आणि लोकाभिमुख आश्वासनांच्या जोरावर राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला कायम राखण्याचा निर्धार उमेदवारांकडून व्यक्त केला जात आहे. 


     “निरा–कोळविहिरे जिल्हा परिषद गटातील घरोघरी भेटींमुळे नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा योग येत आहे. गावकऱ्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांना मनापासून ऐकून घेताना मिळणारे प्रेम व आशीर्वाद हीच आमच्या कार्याची खरी ऊर्जा आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्वांगीण विकास, लोकाभिमुख निर्णय आणि जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करण्याचा निर्धार मी करते,” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद उमेदवार प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे यांनी केले. 


     पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात निरा–कोळविहिरे गटातून प्राजक्ता दिगंबर दुर्गाडे, तर पुरंदर तालुका पंचायत समितीच्या निरा–वाल्हे गणातून मोनिका स्वप्निल कांबळे आणि गुळूंचे–कोळविहीरे गणातून स्मिता संतोष निगडे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत. 


     गेली अनेक वर्षे निरा–कोळविहिरे गट राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. यावेळी हा गड कायम राखण्यासाठी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, माजी सभापती लक्ष्मणराव चव्हाण, दत्ताजी चव्हाण, राजेश चव्हाण तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य विराज काकडे, माजी सभापती बापूसाहेब भोर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचारयंत्रणा कार्यरत आहे. 



     राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिवंगत अजितदादा पवार यांनीच प्राजक्ता दुर्गाडे यांना या निवडणुकीसाठी उभे राहण्याचे आव्हान केले होते. राज्यातील नामांकित पुणे जिल्ह्याच्या नेतृत्वाची संधी एका युवतीला देण्यात आल्याने स्थानिक मतदारांमध्ये उत्सुकता असून, या संधीचे सोने करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 



      गुळूंचे–कोळविहीरे गणातून उमेदवार असलेल्या स्मिता संतोष निगडे या मितभाषी, स्वाभिमानी आणि सामाजिक भान जपणाऱ्या महिला म्हणून ओळखल्या जातात. महिला बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब महिलांना आर्थिक आधार देण्याचे काम केले आहे. गुळूंचे गावातील एकत्रित कुटुंब व्यवस्थेचा आदर्श त्यांच्या कुटुंबाने निर्माण केला असून, ही जबाबदारी संतोष आणि स्मिता निगडे समर्थपणे पार पाडत आहेत. 


     तर निरा–वाल्हे गणातून मोनिका स्वप्निल कांबळे या सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्या कार्यकर्त्या आहेत. महिलांना बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. माजी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रेखाताई राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना सामाजिक व राजकीय कामाचा अनुभव मिळाला आहे. आदर्श गृहिणी ते समाजसेविका आणि आता लोकप्रतिनिधी म्हणून गोरगरीबांना न्याय मिळवून देण्याचा त्यांचा निर्धार आहे. 


     या निवडणुकीसाठी शनिवार, दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. महिला नेतृत्व, विकासाचा अजेंडा आणि राष्ट्रवादीचा संघटित प्रचार यामुळे निरा–कोळविहिरे गटातील लढत रंगतदार ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पठ्याने स्कॉर्पिओ दामटत दुचाकींना ठोकरले. नीरा बारामती रोडवर स्कार्पिओचा थरार : चालक गाडी का दामटत होता?

राख - कर्नलवाडी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ काय झालं रात्री वाचा..

धक्कादायक, नीरेत घरफोडी : सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरट्यांनी केले लंपास. घटना सी.सी.टिव्ही.कॅमेऱ्यात कैद.