सामाजिक बांधिलकीची सशक्त ओळख : पत्रकार संजय सावंत यांना मा. साहेब प्रतिष्ठानचा कार्यगौरव पुरस्कार
सामाजिक बांधिलकीची सशक्त ओळख : पत्रकार संजय सावंत यांना मा. साहेब प्रतिष्ठानचा कार्यगौरव पुरस्कार
जेजुरी | वार्ताहर
समाजातील दुर्बल, वंचित व गरजू घटकांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करण्याची परंपरा जपत, मा. साहेब प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा मानाचा कार्यगौरव पुरस्कार यंदा जेजुरी येथील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते पत्रकार संजय सावंत यांना प्रदान करण्यात आला.
श्री क्षेत्र जेजुरी येथे झालेल्या गौरवपूर्ण सोहळ्यात जेजुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जयदीपशेठ बारभाई व उपनगराध्यक्ष गणेशशेठ निकुडे यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. गेल्या २६ वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या पत्रकार संजय सावंत यांनी कै. दिनकरराव सावंत स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजोपयोगी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी गरजू, वंचित व दुर्बल घटकांसाठी विविध उपक्रम राबवून समाजात सकारात्मक बदल घडवून आणला आहे.
राज्यभरातील २३५ हून अधिक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार, आरोग्य सेवक, ग्रामसेवक, पोलीस कर्मचारी व सेवाभावी व्यक्तींना पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक कार्यकर्त्यांना नवी प्रेरणा मिळाली आहे.
शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. जेजुरी येथील जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्या मंदिर, कोथळे आणि विद्या प्रशाला या शाळांमध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्याच्या टाक्यांची उभारणी करून विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करणारा हा उपक्रम विशेष प्रशंसनीय ठरला आहे.
सामाजिक क्षेत्रात जेजुरी येथील स्मशानभूमीचे सुशोभीकरण हा त्यांचा महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे. स्वच्छ, सुव्यवस्थित व सुसज्ज स्मशानभूमीमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात दरवर्षी संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी अन्नदान, तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे, मोफत तपासणी व औषध वाटप असे उपक्रमही सातत्याने राबवले जात आहेत.
पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रश्न, अन्याय, विकासकामे व लोकहिताच्या बाबी निर्भीडपणे मांडणारे प्रामाणिक व लोकाभिमुख पत्रकार अशी पत्रकार संजय सावंत यांची ओळख आहे. त्यांच्या या सर्व सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व पत्रकारितेतील योगदानाची दखल घेऊन कार्यगौरव पुरस्कार देण्यात आल्याचे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व मार्तंड देवस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. साहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश जगताप होते. सूत्रसंचालन व नियोजन प्रतिष्ठानचे सचिव पत्रकार नितीन राऊत, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश खाडे, पुरस्कार समिती सदस्य डॉ. नितीन केंजळे, पुष्कर खाडे यांनी केले.
पुरस्कार स्वीकारताना पत्रकार संजय सावंत म्हणाले,
“हा पुरस्कार माझ्या वैयक्तिक नव्हे, तर माझ्यासोबत कार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान आहे. समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा या पुरस्कारामुळे मिळाली आहे.”
कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक कार्याची प्रेरणा देणारा हा सोहळा जेजुरी शहरात चर्चेचा विषय ठरला असून सर्व स्तरांतून पत्रकार संजय सावंत यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा